Jun 5, 2015

कॉमेडीची ट्रॅजेडी!

मराठी सिनेमाचं ना मला झेपेनासंच झालंय.

एक तर पहायला जायला उत्साह येईल असा सिनेमाच खूप दिवस येत नाही. (ह्या आधी केवळ कर्तव्य म्हणून अनेकदा मराठी चित्रपट पाहिले आहेत. आजकाल कंटाळा आलाय) पोस्टरमधेच काही नाविन्य, फ्रेशनेस नसतो! त्यात असा काही चित्रपट आढळला तर तो पटकन १-२ आठवड्यातच बघून घ्यायचा. नंतर तो कुठेतरी जिल्ह्याच्या ठिकाणीच फक्त चालू असतो. हे ब-या हीट सिनेमांचं. नाहीतर तो आधीच झोपतो. कारण एकूण सिनेमाच अनुदानामुळे का कशामुळे माहीत नाही पण ढिगाने बनत आहेत. शिवाय नेमका आपल्याला पहायचा तो सिनेमाही अगदी अवली वेळेला असतो.

'अ पेईंग घोस्ट' पाहून आल्यावर फार वाईट वाटलं. अपेक्षा ठेवली होतीही आणि (आधी अपेक्षाभंग अनेकदा झाल्यामुळे) नाहीही! वाईट वाटलं ते वेळ, पैसे वाया गेल्यासारखे वाटले म्हणून फक्त नव्हे.

चित्रपट पाहून फक्त दोनच गोष्टी आवडाव्यात? एक तर तांत्रिक बाबींचा नीटसपणा (गरज पूर्ण करण्याइतका का होईना) आणि दुसरं म्हणजे एकही मोबाईल वाजला नाही (अपेक्षांची ही पातळी आहे आजकाल). त्यातही दुस-या कारणाचा आपला आनंद मानून घ्यायचा. मोबाईल वाजलेही असतील. पण चित्रपटाचा आवाजच एव्हढा मोठा होता ('12 angry men' च्या भाषेत सांगायच तर 'त्या आवाजात मला माझे विचारही ऐकू येत नव्हते'). त्यामुळे कळलेही नसेल कदाचित कुणी 'वायझेड' इसम किंवा इसमी बोलत असेल तर. आमच्या रांगेतल्या उशिरा आलेल्या २-३ बरण्या व ३-४ मुलं मधेच काहीतरी बोलत होती.

ह्या चित्रपटात अनुभवी आणि तरीही टवटवीत कलाकार होते (मी सिरियल्स बघत नसल्यानेही मला ते ताजेतवाने चेहरे वाटले असतील) अन्यथा मराठीत कास्टींग वगैरे भानगड नसतेच. ज्याचं दुकान सध्या जोरात चालू आहे त्यांनाच घेतलं जातं.

व. पुं च्या कथेमुळे आणि कथाकथनामुळे अपेक्षा वाढवणारी म्हणजे म्हटली तर आता सरधोपट वाटू शकेल अशी पण तरीही रंजनाचे खूप पोटेन्शिअल असणारी, नव्या 'ट्रीटमेंट' ने नवसंजीवनी देण्यासारखी ही गोष्ट होती. पण पटकथा, संवाद व दिग्दर्शन ह्या बाबतीत फार फार निराशा झाली. व. पुं. ची टाळ्यांची वाक्ये तरी जशीच्या तशीच घ्यायची मग. निदान तेव्हढीच जास्त धावसंख्या. कलाकारांनी कामे चोख केली पण अटेन्डंस लावल्यासारखी.

पण लेखक, अभिनेत्यांचे टॅलेंट बघता ह्यापेक्षा कितीतरी जास्त गंमत करता आली असती असे फार वेळा वाटले. अनेक जागा राहून गेल्या. अनेक तकलादू अतार्किक गोष्टी होत्या वगैरे. ( लोक हसण्यासाठी थांबून राहीले होते (हे असं फार वेळा होतं म्हणूनच लोक आजकाल कशालाही हसतात का?)

मग नेमकं गंडत काय? (आता ह्यापुढे वरील सिनेमाविषयी नसून एकंदरच म्हणायचे आहे ते लिहीतो).

मुळात चांगला चित्रपट बनवणे महाकठीण. पण अरे जागतिक दर्जाचे, उच्च कलात्मक (म्हणजे त्यातले ऍवॉर्ड्स चे ज्यूरी सोडले तर सर्वांच्या डोक्यावरून जाणारे धरून) , नवी वाट दाखवणारे, तंत्र आणि आशय ह्याच्यात कल्पनाशक्तीने अवाक करणारे वगैरे जाऊ देत.. तर अगदी शुद्ध व्यावसायिक दृष्टीने पण दोन घटका खणखणीत हशे वसूल करणारा चित्रपट बनवता येत नाही कित्येक वर्षांत (माझा एखादा असा पाहायचा राहून गेलाही असेलही)?

टॅलेंटची काही कमतरता नाही हाच सूर सगळे लावतात आणि ते कधी कधी पटतेही पण मग नेमकं होतं काय मास्तर?

मला खालील काही कारणे वाटतात:
१. अनुदानाच्या भानगडीमुळे किंवा काय, फक्त व्यवसाय म्हणून पहाणारे व प्रॉडक्ट लवकरात लवकर मार्केटमधे आणण्यास उत्सुक असणारे निर्माते
२. अजूनही लेखकाची किंमत व महत्व न ओळखणे जाणे . कथा, पटकथा व संवाद ह्याच्यावर फार कमी काम किंवा मग फक्त चटकदार संवादांवर सगळा भार.
३. अत्यंत कमी गृहपाठ आणि जो होतो तो शेड्यूलचा / logistics चा होतो. कलात्मक दृष्टीने नाही.
४. प्रत्येक कलाकाराला (लेखक, अभिनेते, दिग्दर्शक) तगून राहायची केविलवाणी धडपड करावी लागत असल्याने चाकोरीबद्ध विचार व तेव्हढा वेळ मोजक्या 'प्रोजेक्ट्स' ना देण्यामागची रिस्क. त्यामुळे 'काही व्यावसायिक पण काही काही मात्र आतल्या कलाकाराला समाधान देणारे काम; असे न करता दुकान चालू राहिल्याशी मतलब!' असे होते असावे. आपण काय हा भोटंपणा करतोय असा सूर लावण्याचं धाडस कुणीही (बाहेर फेकलं जाण्याच्या भितीने) करत नसावं !
५. मराठी प्रेक्षकाचा एकगठ्ठा स्टिरीओ टाईप नसल्याने सगळ्यांना सुखावता सुखावता आपल्याला जे आत्मविश्वासाने सांगायचे करायचे आहे त्याच्याशी तडजोड.


'विनोद' हा मी 'ट्रॅजेडी'पेक्षा श्रेष्ठ कलाप्रकार मानत आलो आहे. 'सामाजिक आशय' वगैरे असलेला म्हटलं की माणसं अगदी गंभीर होऊन खोल खोल काहीतरी शोधू लागतात. पण चित्रपट विनोदी आहे म्हटल्यावर 'थोडा दोन घटका टाईमपास' ह्या उप्पर त्यांची अपेक्षाच जात नाही. ही ढिगाने निघणा-या बहुसंख्य मराठी चित्रपटांनी घडवलेली महान ट्रॅजेडी आहे!

विनोदामागे काही विचार असू शकतो, असायला पाहिजे, जे थेट म्हटले, दाखवले नाहीये ते ऐकायला, समजायला पाहिजे, मॅडनेसमधली मेथड शोधायला पाहिजे असे बहुसंख्य लोकांना वाटत नाही. (गेला बाजार थिएटरमधे आहोत तोपर्यंत तुडुंब हसवायला आणि बाहेरचे जग विसरायला लावावे ही अपेक्षाही विनोदी चित्रपटांकडून अजिबात पूर्ण होत नाही). ज्यांना वाटते त्यांनी अनेकदा कपाळमोक्ष झाल्याने आशा सोडून दिली असावी. त्यामुळे विनोदाला कधी तोंडीलावणे म्हणून वापरलेले पाहीले, बॉक्सिंग मॅच सारखा 'पंचेस' च्या संख्येवर दर्जा ठरवला गेला (टिव्ही वरची दुकानं ह्याला कारणीभूत आहेत) किंवा मराठी चित्रपटांसारखे एकदाचे कार्य उरकून टाकलेले पाहिले की त्रास होतो.

- राफा

1 comment:

Anonymous said...

खरंच खूपच बेक्कर मूव्ही होता हा... Not fan of म्हाग्रू पण त्याचे काही movies खरंच छान आहेत