Jan 11, 2019

शेवटी ना ओरीजनल हाच ना मार्ग खरा!


पुलं विषयी माझ्याकडून अत्यंत सविस्तर असे अजून लिहिले गेले नाही ह्याची कारणे अनेक. पण मुख्य कारण म्हणजे त्यांनी लेखनातून, कथनातून  सांगितलेली, मला समजलेली जीवनदृष्टी ही माझ्यापुरती आहे. माझ्यासाठी ती अतिशय वैयक्तिक, तळमळीची आणि मुख्य म्हणजे आत्यंतिक आपुलकीची गोष्ट आहे. हे जे वर्षानुवर्षे जपून ठेवलेले आहे असे ते विशेष खास एकमेव असे सुंदर काही आहे. त्याविषयी उरकून टाकल्यासारखे लिहायचे नाहीये.

शिवाय पुलं विषयी काय आणि किती लिहायचे हा प्रश्न आहेच. ज्यांना जाणीव व गरज आहे त्यांना जवळपास सर्व अगोदरच माहित आहे. मी सुदैवाने त्यांची प्रत्यक्ष भाषणे ऐकली आहेत. पुलं आमच्या शाळेचे (पार्ले टिळक) म्हणून अनेक वेळा अभिमानाने छाती रुंदावली आहे. तुझे अमुक तमुक लिखाण वाचून पुलं ची आठवण झाली असे कुणी म्हणाले तर किती दिवस मी तारेत असतो हे गणित आता सहज सुटेल. अगदी त्यात बोलणाऱ्याचा मायाळूपणा हाच भाग जास्त असतो हे कळूनही. पुलं सारखे कुणीच असू शकत नाही.  बाकीच्या प्रसंग/अनुभवांविषयी कधी लिहीनही.

पण पुलं विषयी  जे अगोदरच माहित आहे (किंवा मराठी म्हणवत असलेल्या लोकांना माहित असायला हवे) ते पुन्हा सांगायची गरज मला वाटत नाही. त्यांच्या अत्त्युत्तम विनोदाचे दाखले पुलप्रेमींना देण्याची गरज नाही आणि पुलं ‘न कळलेल्या’ लोकाना त्याचा उपयोग नाही. आम्ही पुलं प्रेमी येता जाता आम्ही त्याच भाषेत बोलतो आणि कंठाळी तोच सूर टाकून आयुष्य जगायचा प्रयत्न करतो. विनोद ही वृत्ती आहे. ती असावी, ओळखावी , सापडावी लागते. म्हणूनच (ब्रिटीश) इंग्रजीत ‘finding humour’ असे  म्हणतात. एकदा ते सापडले की बरेचसे काम फत्ते होते!

आज हे लिहायचे प्रयोजन म्हणजे सध्या चालू असलेला पुलं वरील बायोपिक चित्रपट पण मुख्य म्हणजे त्यावरील अनपेक्षित आणि काहीश्या सैरभैर उलटसुलट प्रतिक्रिया. हे चित्रपटाचे (अजून एक!) परीक्षण नाही. कारण हा चित्रपट मी पाहिलेला नाही व पाहणारही नाही. कुणीही चित्रपट काढला की तो पाहिलाच पाहिजे असे मला वाटत नाही. पण ह्या निमित्ताने काही मित्र मैत्रिणींचे / माहितीतल्या लोकांचे / whatasapp वरील फॉरवर्ड मधील  विचार/मते (किंवा त्यांचा अभाव) अंमळ त्रासदायक होऊ लागल्याने हा छोटासा लेखनप्रपंच. सुदैवाने 'तुमचा आणि माजा मत बराब्बर जमता' असे कळवलेले स्नेही आहेत.

चित्रपट कुणीही काढू शकते. हेतू वेगवेगळे असतात. चित्रसृष्टीत दबदबा आहे, नाव माहित असल्याने फायनान्सर तयार आहेत, नेहमीच्या कंपूतले चार कलाकार/तंत्रज्ञ हाताशी आहेतच, बाकीचे मानधन देऊन बोलावता येतात (ज्यात गुणी लोकही असणारच ) आणि पुलं सारखा शंभर नंबरी सोने असलेला विषय आहे, सलग चार वाक्यं मराठीत बोलता आली नाहीत तरी हा विषय आपण पेलू असा आगाऊ उन्माद व अंगभूत दांडगाई अशी वेगवेगळी कारणे असू शकतात. ह्या चित्रपटाविषयी  हेतू शुद्ध आहेत असे मला अजिबात वाटत नाही. हमखास यश देणारा उत्तम धंदा करणारा विषय घेऊन चित्रपटाची बुंदी पाडायची हा मुख्य हेतू असू शकतो असे पूर्वेतिहास सांगतो. पण ते तसे महत्वाचे नाही. तिकडे दुर्लक्ष करता आले असते, त्याला उपेक्षेने मारता आले असते. पण ह्या निमित्ताने विस्कळीत आणि अपुऱ्या स्वरूपात मांडलेली विविध ठिकाणी मांडलेली मते जरा नीट अक्षर काढून थोडी मुद्देसूद आणि ठणकावून मांडणे फार गरजेचे वाटू लागले आहे ह्याचे कारण म्हणजे ऐकलेले वाचलेले काही मुद्दे.

व्यक्तिपूजा मला आवडत नाही. व्यक्ती किंवा माणूस म्हटले की गुण-अवगुण असणारच. पण उत्तुंग व्यक्तिमत्व असेल तर ‘मसाल्या'ची गरज उरत नाही.  माणसाचा अभ्यास करताना तुमचा फोकस काय आहे? अत्त्युत्तम पुरुषोत्तमाची असलेली व कित्येक वर्षे मनामनात ठसलेली महती अजूनही टिकून का आहे, तिचे गुपित काय? त्या व्यक्तीचे घडणे कसे होते? वरवर फक्त विनोदी वाटणाऱ्या कथानामागे दिसणारे आयुष्याकडे पहायची एक तटस्थ, अध्यात्माकडे झुकणारी आणि तरीही अत्यंत रोचक कलंदर खेळकर अवखळ वृत्ती आणि अष्टपैलू  व्यक्ती दाखवायची आहे? का नुसतेच काहीतरी धंदेवाईक सनसनाटी करायचे आहे? हे प्रथम महत्वाचे आहे.

लोक चित्रपटाचा दर्जा / आक्षेपार्ह / खटकलेल्या गोष्टी ह्यावर बोलताना कुणाला काय आक्षेपार्ह वाटेल हे व्यक्तीसापेक्ष आहे पण दोन गोष्टी नक्की खटकणाऱ्या : दृश्याची लांबी किती ह्यावरून ते किती आक्षेपार्ह आहे हे ठरू नये. दोन तासात पाचच मिनिटे आक्षेपार्ह हे कुठले मोजमाप? दुसरे म्हणजे हे असे दाखवण्याचा हेतू काय! जो मुद्दा आधी मांडला आहे. सुंदर मिठाई बनवणाऱ्या मिठाईवाल्याने तिसरीत भूगोलाच्या पेपरमध्ये कॉपी केली होती (!) किंवा त्याने लहानपणी दिवाळीच्या फराळाचे लाडू आधीच चोरून खाल्ले होते ही माहिती मिठाईचा आस्वाद घेताना काय कामाची? जीवनपट काढायचा तर larger than life चित्रण किंवा glorification होऊ नये हे मान्यच आहे. अहो पण इथे जवळजवळ सगळेच आभाळाएव्हढे आहे आणि प्रकाशामानही!

पुलं वर व्यक्ती म्हणून टिपणी करण्याचा अधिकार सुनीताबाईंना होता. तुमची ती लायकी नाही आणि अधिकारही नाही.

अजून एक मत असे ऐकू आले वेगवेगळ्या ठिकाणी की, मुलांना पुलं ‘कळण्यासाठी’ म्हणे ह्या चित्रपटाचा उपयोग होईल!
का???
तुम्ही काय आत्तापर्यंत अज्ञात बेटावर रहात होतात काय? घरी तसे वातावरण असेल तर कळलेच असते मुलांना. काही कारणाने आत्तापर्यंत नसेल कळले तर हे आधी तपासा की तुमची तशी प्रामाणिक इच्छा आहे का ? असेल तर मग सोपे आहे.  सुदैवाने पुलं चे संपूर्ण लेखन सहज उपलब्ध आहे. दोन माहितीपट आहेत. कथाकथनाच्या, भाषणांच्या, इतर कार्यक्रमांच्या दृकश्राव्य फिती आहेत. हे सगळे audio-visual documentation सहज उपलब्ध असताना इतकी वर्षे तुम्हाला पुलं ची महती पटली होती पण मुलांना त्यांची ओळख व्हावी असे वाटले नाही? आणि आता एक (माझ्या मते भुक्कड) चित्रपट येतो आणि त्याच्या कुबड्या वापरणार तुम्ही हा ‘ब्याकलॉग’ भरून? आणि सर्व original उपलब्ध असताना कुणीतरी हुबेहूब केलेले कशाला बघायचे? शिवाय हे बी-ग्रेड गाईड आणून आदळलेत तुम्ही चार पैशाचे तिकीट काढून मुलांसमोर, त्यातल्या काही / जुन्या गोष्टी मुलांना रुचल्या पटल्या झेपल्या नाहीत आणि उलट परिणाम झाला तर कोण जबाबदार? मुलांची अभिरुची उत्तम करायला तुम्हाला चित्रपट यावा लागतो? हे तर्कशास्त्र मला पटत नाही. समजा, तुम्हाला आजकालच्या मुलांना किशोर कुमार  आवडावा असे वाटत असेल, किमान आवडतो का हे बघायचे असेल तर त्याची original उत्तम गाणी रुचतील भावतील जी सुदैवाने सहज उपलब्ध आहेत ती ऐकवणे, ती का चांगली आहेत असे तुम्हाला वाटते ते समजावणे चांगले ना? का कुमार सानू ऐकवायचा किंवा ओर्केष्ट्रा ला न्यायचे आणि म्हणायचे की हे बघ किशोर कुमार असा गायचा बरं !

अजून एक मुद्दा. माझा एक मित्र म्हणाला की तू चित्रपट पाहिला नसल्याने तुझ्या मताला मी किंमत देत नाही. अगदी बरोबर. पण ह्या चित्रपटालाच मी फार किंमत देत नाहीये (nuisance value वगळता). त्यावरच्या प्रतिक्रियांची आणि त्याला मिळणाऱ्या अवाजवी महत्वाची दखल घेतोय. आणि न पहाता काहीच बोलायचे  नाही एव्हढ्या जिव्हाळ्याच्या विषयावर ? शिवाय इच्छा नसताना का पहायचा मी ? टीका करायला? (आधी केले आहे असे. पण पुलं बाबतीत तडजोड नाही). एव्हढी अप्रिय गोष्ट का करावी मी? उद्या म्हणाल ड्रग्ज घेतले नसल्याने त्याच्या दुष्परिणामांविषयी बोलायचा हक्क नाही. आपण बघतो वाचतो ऐकतो ना. माणसाचा track record असतो. त्यावरून अनुमान लावत असतो आपण.

अजून एक मुद्दा असा की विशेषतः आपल्याकडे लोक फार casual असतात. शिक्षण पद्धती किंवा जे काय असेल ते बऱ्याच लोकांना स्वत:चा असा विचार नसतो. बरोबर किंवा चुकीचा.  साहित्य, कला (ज्यात चित्रपटही आले) ह्याकडे कसे आणि किती तळमळीने पहावे हे पुन्हा वैयक्तिक. पण ‘चांगल्या लोकांच्या वाईट गोष्टींचे काय करायचे हा मला नेहमी प्रश्न पडतो’ हे विजय तेंडूलकरांचे वाक्य मला फार पटते नि आवडते. इतर वेळी सभ्य सुसंस्कृत बुद्धिमान असणारे लोक कुटुंबकबिल्या सकट सलमान खान च्या चित्रपटाला जातात तेव्हा दुःख होते आणि अचंबाही वाटतो. मुद्दा हा नसतो की केव्हा कोण काय पाहणार हे मी ठरवावे. मुद्दा सर्वच / बऱ्याच बाबतीत casual असण्याचा आहे. प्रत्येक कलाकाराची तारीफ करताना त्याचे वर्तन आणि चरित्र भिंग लावून तपासणे शक्य नाही हे मान्यच आहे  पण मुळात तो कलाकार म्हणून तरी चांगला आहे का? हा विषय “एकंदरच ऑफिस पोलिटिक्स च्या पलीकडे ‘काव्य शास्त्र विनोद’ ह्या कडे आत्मीयतेने बघणारे लोक किती” इथवर येतो. तर कुणीतरी काढला म्हणून चित्रपटाला जावेच का? शितावरून भाताची करा की  (रच्याकाने: मराठी चित्रपटाने चांगला धंदा करावा हीच नेहमी सदिच्छा असते त्यामुळे माहित असूनही बरा(च) वाटला तरी चित्रपटाला जाणे आणि शक्यतो काही दिवस तरी वाईट mouth publicity  न करणे हे माझ्यापुरते मी करत आलो आहे. पण काही काही गोष्टी तरी आपण सर्वोत्कृष्ट निकष लावून कराव्यात असे वाटते)

पण मग ह्या सगळ्यात होते काय की संदेश अत्यंत चुकीचा जातो!
घरी, मुलांना: की ठीक आहे रे. फार लोड घ्यायचे नसते. चलता है.
आणि बाहेर, प्रोड्युसर लाही (तिकीट काढल्याने):  की तू काढ रे काहीही. आम्ही येतोच. दर्जाशी, हेतूशी आम्हाला कर्तव्य नाही. मला नगाला नग करमणूक हवी आहे. तीही नवीन आहे म्हणून. चांगले असू शकेल म्हणून नाही. दोन घटका जी  मी सहज महागडे तिकीट खरेदी करून थंड हवेत दोन तास बसून पडद्यावर हलती चित्रे दाखवून एक काम उरकून टाकू शकतो. ही वृत्ती मला खटकते! पण कदाचित अशा विसंगतीनेच आपल्या सर्वांचे माणूसपण सिद्ध होत असावे!

तर विनंती अशी की पुलं विषयीच्या चित्रपटाला (तरी) casually जाऊ नका.  फक्त कर्तव्य भावनेने किंवा पुलंच्या प्रेमापोटी जात असाल  तर तो भाबडेपणा ठरेल. तुम्ही पुलं विषयीचे प्रेम सिद्ध करत नाही आहात तर चुकीचा संदेश देताय विविध लोकांना, विविध प्रकारे!  तुम्हाला ठरवून जावून चित्रपट आवडला तर आनंद आहे. कारण तुम्हाला काय आवडते रुचते हे अर्थातच तुम्हीच ठरवणार पण त्या आवडण्या / नावडण्यावर , त्या मोजपट्टीने पुलं हा विषय समजून घेऊ नका. खऱ्याखुऱ्या, त्यांच्या पुस्तकातून व इतर माध्यमातून भेटणाऱ्या पुलं ची ओळख मुलांना करून द्या आणि काहीसे विसरला असाल तर स्वतःलाही!

- राफा


1 comment:

smita said...

खरं आहे मलाही तो चित्रपट आता टीव्ही वर दाखवणार आहेत तरीही पाहायची इच्छा नाही. त्या दोघातलं उच्च प्रतीचं नातं समजण्याची कुवतच नाही.