मी लहान असताना दोनच गोष्टींना (विशेष) घाबरायचो. दोन्ही गोष्टी त्यावेळच्या (म्हणजे कृष्णधवल) टिव्हीवर पाहिलेल्या होत्या. एक म्हणजे ‘कल्पनेचा खेळ’ हे नाटक व दुसरे म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा’ ह्या चित्रपटातील ‘नरसूचं भूत’ !
माझी घाबरण्याची स्वतंत्र शैली होती. मी लपून राहणे, घाबरून दुस-या खोलीत जाणे किंवा डोळे हातानी झाकून बोटांच्या फटीतून पाहणे असे काहीही करायचो नाही तर हे असे घाबरणे अपरिहार्य आहे असे कुठेतरी वाटून घ्यायचो. त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम लागले की मी धडधडत्या छातीने ते डोळे विस्फारून पहायचो. ते नाटक तर ब-याच वेळा दाखवायचे. त्यातली ती वाटोळ्या डोळ्यांची, शून्यात वेडसर नजरेने बघणारी व काहीशी तिरकी मान करून बोलणारी आजीबाई अंधूक आठवते.. त्या लहान मुलीला सारखा येत असलेला ताप (मला बरोबर आठवत असेल तर एक नजर वगैरे लागू नये म्हणून असते तशी एक काळी लहान ‘बाहुली’ होती नाटकात). तसाच तो ‘नरसू’ ! तो मालकाच्या मुलीच्या हट्टापायी माडावर भर पावसात चढणारा आणि तो पडून मरण पावल्यावर त्याचे झालेले भूत… आणि ती गाणे म्हणत फिरणारी त्याची बायको..
काल ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ ह्या टिळक स्मारक मंदीरात झालेल्या कार्यक्रमात, मधे मधे दूरदर्शनवरील जुने दृकश्राव्य तुकडे दाखवण्यात येत होते आणि अचानक ‘कल्पनेचा खेळ’ ह्या नाटकातला काही भाग जेव्हा अनपेक्षितपणे डोळ्यासमोर प्रत्यक्ष बघू लागलो तेव्हा काय वाटले हे सांगणे कठीण आहे !
दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळातले निर्माते, दिग्दर्शक, कलाकार ह्यांच्या गप्पांचा हा कार्यक्रम अगदी तुफान रंगला. सुधीर गाडगीळ सूत्रसंचालन करत असलेल्या ह्या कार्यक्रमात सहभागी झाले होते : विनय आपटे, स्मिता तळवलकर, याकूब सईद, अरुण काकतकर, किशोर प्रधान आणि बी. पी. सिंग.
आयोजक होते 'दि आर्ट ऍंड म्युझिक फाऊंडेशन'. त्यांना अनेक धन्यवाद !!!
सुधीर गाडगीळ स्वत: तर त्या काळाचे साक्षीदार आहेतच, पण केवळ मूक साक्षीदार नव्हेत तर, अश्या अनेक कार्यक्रमाची रंगत वाढवण्यात त्यांचा दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळापासूनच मोठा हातभार आहे. त्यामुळे त्यांचे बोलणेही अलिप्त औपचारिक ठेवण्यास त्यांना कसरत करावी लागली असणार.. कारण त्यांनाही मधे मधे जुने संदर्भ, व्यक्ती, घटना आठवत होत्याच. पण त्यांचे संचालन नेहमीप्रमाणेच हुकमी एक्यासारखे व दुस-याला बोलके करणारे..
ह्या सर्वांनाच जुने सोबती भेटल्यामुळे झालेला आनंद त्यांच्या देहबोलीतून जाणवत होता. त्यांचे जुन्या आठवणींत मस्त रमणे, भरभरून उस्फूर्त बोलणे, त्यांचे अफलातून किस्से ऐकणे आणि जुने दृकश्राव्य तुकडे पाहणे हा फार छान अनुभव होता..
कालच आमच्या ‘एन्गेजमेण्ट’ ची ‘ऍनिव्ह’ असल्याने नॉस्टाल्जिक होण्यात वेगळाच मज़ा आला ! (माझ्याच ब्लॉगवर मी स्वत:विषयी किती कमी लिहीले आहे हे अलिकडेच मला जाणवू लागले आहे. तसे लिहीण्यासारखे खूप काही आहे असा गोड गैरसमज तसाच ठेवून सध्या हा लेख पुढे लिहीता होतो! )
खरे म्हणजे अश्या कार्यक्रमांचे चिरफाडीच्या जवळ जाणारे ‘विश्लेषण’ वगैरे करु नये. त्याचा आनंद घ्यावा आणि मोकळे व्हावे. नव्हे, तो साठवून ठेवावा आणि कधीतरी त्या आठवणीची कुपी उघडून त्याचा मंद सुंदर गंध घ्यावा व ताजेतवाने व्हावे. त्यामुळे असे संगतवार सांगणे किंवा ताळेबंद मांडणे म्हणजे त्या वेळी घेतलेला मज़ा कमी करण्यासारखे आहे. पण तरीही सर्वात चित्तवेधक गोष्टी सांगण्याचा मोह अनावर होतो आहे.
पहिली गोष्ट म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे गदगदून येऊन भरभरून बोलणारे सर्व जण. दूरदर्शन माध्यमच मुळी त्यावेळी सर्वांना नवीन होते त्यामुळे त्याविषयीचे कुतूहल, औपचारिक/अनौपचारिक शिक्षण, काहितरी नवीन व उत्तम करण्याची उर्मी, बीबीसी च्या तोडीचे काम करण्याचे अप्रत्यक्ष आव्हान व अपेक्षा; तरिही साधने व आर्थिक पाठबळ मात्र तुटपुंजे ! पण त्यामुळेच उपलब्ध गोष्टींतून व सरकारी चौकटीत सर्जनशीलता दाखवण्याची जिद्द ! ह्या सा-याचे दर्शन ह्या सगळ्यांच्या बोलण्यातून होत होते..