तर एकंदर दिवस नॉस्टाल्जिक होण्याचे आहेत. नुकतेच आमच्या शाळेच्या आमच्या बॅचचे स्नेहसंमेलन २४ डिसेंबरला पार पडले. माझी शाळा पार्ल्याची 'पार्ले टिळक विद्यालय' ! (अगदी रमाबाई बालमंदीरापासून ते दहावीपर्यंत). त्या स्नेहसंमेलनात पूर्ण वातावरणातच नॉस्टाल्जिया भरलेला होता. (माझ्या मेंदूच्या काही पेशींना मी अजूनही शाळेत आहे असेच वाटते).
कार्यक्रम सुनियोजित असला तरी मी काही 'perform' करायचे ठरवले नव्हते. आदल्या दिवशी झटका आला आणि सुचेल तसे खरडले.. त्यातला काही भाग तिथे वाचताना फार फार आनंद झाला (शाळा सोबत्यांना आणि सोबतिणींनाही ऐकत असताना होत असावा असे त्यांच्या चेह-यावरून तरी वाटत होते :)).
मला वाटते आपल्या सर्वांच्याच शाळेच्या आठवणींत कित्येक समान धागे असल्याने ते माझे लिखाण इथे प्रकाशित करत आहे :
मागे वळून पाहताना :
आपण आता सगळेच प्रौढ व साक्षर आहोत. तेव्हा थोडा चावटपणा करायला हरकत नसावी. शाळेचे दिवस आठवताना जाणवतं की आपल्या शाळेत ३ प्रकारच्या मुली होत्या (हे मी नंतर समस्त मुली माझी सामुदायिक धुलाई करतील ही शक्यता लक्षात घेऊनही बोलतोय). मुलींचा पहिला प्रकार म्हणजे ‘आपल्यावर कोणीतरी लाईन मारतोय’ ही जाणीव असलेल्या मुली. (‘अच्छा हे कार्ट बघतयं का सारखं मग त्या दिशेला बघायलाच नको’ इ. विचार असलेल्या). दुसरा प्रकार म्हणजे ‘आपल्यावर कुणीतरी लाईन मारतोय’ ह्याची जाणीव नसलेल्या मुली. आणि तिसरा प्रकार म्हणजे ‘लाईन मारणे’ म्हणजे काय हेच माहीत नसलेल्या मुली ! म्हणजे ‘दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते’ एव्हढ्यापुरताच ‘लाईन’’ शी संबंध असणा-या मुली !
आपल्या शालेय जीवनाची सुरुवात प्राथमिक शाळेत झाली. ‘अभय कमळ बघ’ वगैरेने. ही साक्षरतेची काना मात्रा नसलेली पहिली पायरी. शिक्षण मंडळाला कानामात्रा नसलेलं दुसरं फूल मिळत नाहीये. गेली कित्येक वर्षे अभय आपला कमळ बघतोय !
..आणि माध्यमिक शाळेत काय काय व्हायचे ?
***
- गोलमेज परिषदा व्ह्यायच्या; क्लिष्ट कलमे असलेले ऐतिहासिक तह व्ह्यायचे. इतिहासातल्या लोकांना किती दूरदृष्टी होती पहा. भविष्यात शिक्षकांना पेपर काढणे सोयीचे जावे म्हणून प्रत्येक तहाच्या वेळी त्यांनी किमान पाच कलमे ठेवण्याची काळजी घेतली होती. प्रत्येक कलमाला एक मार्क असल्यामुळे, किमान पाच मार्कांचा प्रश्न घालता यावा म्हणून !
- एखाद्या मुलाने गृहपाठ वगैरे न करण्याचे स्वातंत्र्य वारंवार घेतले तर बाई वर्गाबाहेर ‘चले जाव’ म्हणत त्याचा स्वातंत्र्य लढा मोडून काढायच्या. (शिक्षकांबद्दल आदरयुक्त भिती असायची.. काही शिक्षकांच्या बाबतीत भितीयुक्त भिती असायची.. ते सोडा).
- गाळलेले शब्द भरायला लागायचे, संधी मिळताच समास सोडवायला लागायचे ! जोड्या जुळवा वगैरे प्रश्न असायचे (काही जण ‘जोड्या जुळवा’ ह्याचा भलताच अर्थ घ्यायचे) बरं काही गोष्टी नुसते सांगून शिक्षक ऐकायचे नाहीत, संदर्भासहीत स्पष्टीकरण लागायचे !

