Dec 16, 2007

अघटित ! (कथा)

“Love people, use things.. Not vice versa !” - Kelly Ann Rothaus

माणसांवर प्रेम करा नि वस्तू वापरा. माणसांना वापरू नका !

तुम्हाला आवडतात अशी वाक्यं ? ब-याच लोकाना आवडतात ! मग लक्षात ठेवून अशी वाक्य ते डायरीत टिपून ठेवतात. कधी सहज उघडून वाचण्यासाठी.

शिवाय एखाद वेळी, एखाद्या विशेष संभाषणात ही अशी वाक्य मिसळायला छानंच वाटतं. काहीना अशी वाक्य नुसती वाचून, लिहूनही समाधान वाटतं एक प्रकारचं... म्हणजे माणूस म्हणून आपली वाढ झाली आहे, एक प्रकारची परिपक्वता आली आहे... असंच काहितरी !



***

राजेशचा मूड आजकाल सकाळी सकाळी पार बिघडलेला असायचा..

आजही तेच झालं.

त्याचा चेहरा त्रासलेला.. आक्रसलेला असा. दातओठ खात त्याच्या कॉटलगतच्या भिंतीकडे बघत होता.

भिंतीवरच्या त्या घड्याळाकडे !

राजेश जितका चिडला होता तितक्याच शांतपणे भिंतीवरचं ते घड्याळ वेळ दाखवत होतं.. टिक टिक.. त्याचे निरस, निष्प्राण तास नि मिनिट काटे.. संथ लयीत काम करणारा सेकंद काटा.. त्याचा टिक टिक आवाज… तो आवाज शांत वेळी रुममधे स्पष्ट ऐकू यायचा, मोठा वाटायचा. …

टिक टिक टिक टिक.. आवर्तन चालूच होती..

साडेसात ! ठण्ण…

का ? का होतात रोज साडेसात? होतात तर होतात, हे घड्याळ का दाखवतं बरोबर वेळ?

राजेश झोपायचा त्या लोखंडी कॉटला लागून असलेली भिंत इतर भिंतीसारखीच खरबरीत पोपडे उडालेली.. तिच्यावर साधारण चारएक फुटावर एक आडवी फळी ठोकलेली होती. त्यावर काही फुटकळ सामान होतं.. आणि त्या फळीच्या थोडं वर दोन फुटावर ते जुनाट घड्याळ !

त्याने रुम भाड्याने घेतली तेव्हा जुजबी फर्निचरशिवाय फक्त हे घड्याळ होतं तिथं. अर्थातच घरमालकाच्या दृष्टीने अगदीच टाकाऊ. असून नसल्यासारखं.. म्हणूनच त्याने काढून नेलं नव्हतं बहुतेक.

ते एव्हढं जुनं अजूनही मागे पडत नव्हतं, म्हणून टाकून दिलं नव्हतं एव्हढंच. बरं एखादा सुंदर नमुना असता तर ऍंटीक पीस म्हणून तरी किंमत आली असती कदाचित, पण हे होतं अगदीच मामुली. त्यावर कसलीही कलाकुसर नाही कि रंगसंगती नाही. अगदी रेल्वे प्लॅटफॊर्मवरच्या घडयाळासारखं दिसणारं. पांढ-या वर्तुळावर काळे बोजड आकडे नि भाल्यांचे पाते वाटावेत असे मोठे टोकदार काटे…

त्या घड्याळाचा निर्जीव तटस्थपणा राजेशला आवडायचा नाही.

आपली कंटाळवाणी नोकरी, रोज सकाळी लोकल पकडून वेळेत पोचताना होणारी आपली तारांबळ, ऑफिसमधलं मलूल वातावरण.. हे असं वेळापत्रकात अडकलेलं आपलं आयुष्य.. आहे ह्या मद्दड घड्याळाला ह्याचं काही ?

आपल्या मजबूरीची ते घड्याळ जणू मजा बघतं अस राजेशला राहून राहून वाटायचं.. एखाद्या गुलामाला भाले टोचून त्याला पुन्हा एखाद्या अतिश्रमाच्या कामावर लावावं तसं ते घड्याळ आपले काटे टोचून टोचून आपल्याला हैराण करतं आहे अशी स्वप्नही कधी त्याला पडायची ! मग त्या टिकटिकीतून त्याला ते जणू ऐकू यायचं : ‘उठ ! आवर भराभर. साडेसात झाले. चल ! हात उचल.. आठ दहाला डबा भरून तयार नसेल तर गेली आठ सव्वीस ची लोकल !’ असंच काहीसं.

आजही राजेश आपल्या भकास आयुष्यावर चरफडला.. जणू सगळी त्या घड्याळाचीच सगळी चूक असल्यासारखं त्याने पुन्हा एकवार त्याकडे बघितलं… ..

आणि काहितरी पुटपुटत पांघरूण बाजूला भिरकावून तो उठला..


***

त्याच दिवशी दुपारी..

मुंबईतल्या एका पॉश एरियातली एक चकचकीत इमारत.

तळमजल्याला जाड काचेचं दार असलेलं ऑफिस. आत थंडगार वातावरण. बाहेरच्या उन्हाच्या झळा, रहदारी, गर्दी ह्यापासून सुरक्षित नि अलिप्त.

त्या थंड वातावरणात गुबगुबीत खुर्चीत आपला सुटलेला अवाढव्य देह कोंबून एक माणूस बसला होता. बरंच टक्कल पडलेला.. पण त्याची भरपाई म्हणून की काय मागे बरेच लांब केस वाढवलेला.. त्याने लावलेल्या महागड्या सेंटचा उग्र वास त्या कृत्रीम थंडीत मिसळत होता… त्याचा तो केशरी कलरचा भडक शर्ट जेमतेम त्याच्या पोटाचा घेर झाकू शकत होता.

पुन्हा एकदा त्याने फोन टेबलावर आपटलान आणि एक शिवी हासडलीन.. गेल्या एका मिनिटात तिस-यांदा अस होत होतं बहुतेक.

त्याच्या समोर टेबलापलिकडे बसलेला एक किरकोळ माणूस हसून म्हणाला “अरे केसव भाई, कायको अश्रफ का गुस्सा फोन पे निकालता है. पैसे तर त्याला द्यावेच लागतात ना..”

पण त्या टकलू माणसाचं तिथे फारसं लक्ष नव्हतं.. हातातल्या मोबाईल फोनकडे पुन्हा खुन्नस देऊन तो म्हणाला “इसकी तो.. साला चालीस हज्जार चा फोन चालत नाही. रेंजच येत नाही. हे बघ.. बघ ! आता अश्रफचा फोन आला तर त्याला वाटेल मी मुद्दाम कट करतोय..”

“केसव अरे रेंज नाही तर फोनची मिस्टेक काय त्यात ? वो कंपनी को बोलो ना..”

तेव्हढ्यात मोबाईल वाजतो. कुठ्ल्यातरी नवीन पिक्चरमधलं सवंग ‘आयटम सॉंग’ रिंगटोन म्हणून वाजू लागतं. त्या लहान ऑफिसमधे तो आवाज खूपच मोठा वाटतो. पण तो माणूस उत्तर देणार एव्हढ्यात फोन बंद पडतो !

पुन्हा एकदा तो चरफडतो. चिडून अजून दोन चार वेळा फोन आपटतो !

त्या फोनच्या कडा आपटून आपटून घासल्या गेल्या आहेत.. कडांच्या रंगाचं कोटींगही निघाले आहे. पण त्या माणसाला त्याची विशेष पर्वा नाही..

‘xxx की ! अब गया मै ! आता अश्रफचा मगज सरकला असणार.. मीच त्याला सांगितल होतं की मी कदाचित ऑफिसमधे नसेन, तर लेंड लाईन मधे नको.. मोबाईलवरच कर फोन..”

हताश होऊन तो मोबाईल पुन्हा जोरात आपटतो आणि टेबलावर भिरकावतो.

त्या फोनच्या सुंदर मॉडेलची आपटून आपटून पार रया गेली आहे. तो मोबाईल बिचारा निपचित पडून रहातो. पुन्हा उचलून आपटले जाण्याची वाट पहात..

त्या दोघांचे संभाषण चालूच रहाते…



***


राजेश पहिल्यापासून त्याच्या रुमवर एकटाच राहतो.

म्हणजे आईवडील सोलापूरला असतात. कुणी रुममेटही नाही. आणि त्याच्या रागीट स्वभावामुळे बरोबर कुणी टिकणं शक्यही नव्हतं.. शिक्षण चालू असताना हॊस्टेलवर रहात असताना त्याच्याच लक्षात आलं होतं की आपलं सहज कुणाशी पटणार नाही. त्यामुळे पैसे वाचण्याची शक्यता असूनही त्याने भाड्याची रुम शेअर करण्याविषयी विचार केला नव्हता.

आपण चिडचिड करतो म्हणून एकटं रहाव लागतयं, का एकटं रहातोय म्हणून जास्तच चिडचिड करतो हे कधीकधी त्यालाच कळेनासं व्ह्यायच !

एकटाच रहात असल्याने बोलायला कुणी नाही. कोणाशी बोलणार ?

रुमवर भकास शांतता. फक्त डोक्यावर ते घड्याळ आणि त्याची ती अव्याहतपणे चाललेली टिकटिक !

आपण इतके धुसफुसतो, चिडून बोलतो.. एखादा माणूस असता तर आपलं काम थांबवून आपल्या बोलण्यावर काहीतरी तर प्रतिक्रिया दिली असती. अगदी उलट चिडून बोलला असता तो माणूस तरी परवडल असतं.. पण हे घड्याळ नको.

मालकाचं नसतं तर उचकटून फेकून दिलं असतन त्याने ते घड्याळ !

त्या दिवशी रात्री तो कामावरून परत आला.. त्याचं डोक पार उठलं होतं ऑफिसमधल्या कटकटीनी..

जेवून कॉटवर अंग टाकल्यावर त्या घड्याळ्याच्या टिकटिकीने हैराण झाला अगदी..

आणि मग एखाद्या भ्रमिष्टासारखा त्या घड्याळाला बोलू लागला तो.. एखाद्या माणसाशी भांडावं तसं.. अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली त्याने.. आणि मग एकदम निर्वाणीचं, निश्चयाने तो म्हणून गेला: “बास ! आता फार झालं.. उद्या सकाळी उचकटून फेकून देतो तुला.. पार गच्चीवर जाऊन खाली टाकतो.. तुकडे तुकडे होतील तुझे. तिच्यायला.. दिवसरात्र टिकटिक.. टिकटिक..”

आणि.. एकच सेकंद !

एकच सेकंद ते घड्याळ थबकल्याचा त्याला भास झाला.. अर्थात, भासच असणार ! कारण राजेशच्या धमकीने काळजाचा ठोका चुकायला ते घड्याळ काही जिवंत नव्हतं.

हे असंच काहीसं बरळत राजेश केव्हा तरी झोपून गेला…

अर्थात तो झोपला तरी घड्याळाचं काम चालूच होतं.

टिक टिक.. टिक टिक..



***


मुंबई असली तरी दोन वाजलेले असल्याने तुलनेने ब-यापैकी शांतता…

त्या आलिशान फ्लॅटची लिव्हींग रूममधे मंद झिरपणारा चंद्रप्रकाश. काचेच्या एका मोठ्या सेंटर टेबलवर पडलेला एक मोबाईल… मॉडेल नवीन आहे पण.. त्याच्या कडांचा रंग काहीसा घासला गेला आहे !

रात्रीच्या शांततेत तो मोबाईल एकदम किंचाळून वाजल्यासारखा वाजू लागतो.

तेच ते आयटम सॊंग ! तोच रिंगटोन. रात्रीच्या शांततेत तो अजूनच कर्कश वाटतो.

काही सेकंद जातात..

एक खूप जाडसा मनुष्य अडखळत लिव्हींग रुम मधे येतो. टक्कल पडलेला.. मानेवर लांब केस वाढवलेला. त्याच्या फुगलेल्या पोटावर ताणला गेलेला टीशर्ट आहे नि खाली शॉर्टस आहे. पोटापर्यंत आलेली गळ्यातली सोन्याची जाड साखळी मधेच अर्धवट प्रकाशात चमकते आहे.

तो काहीसा अडखळत चालतोय. बहुतेक तो अर्धा झोपेत आहे आणि अर्धा नशेत.

मोबाईल किंचाळतोच आहे.

शेवटी त्या आवाजाने किंचीत सावध होत तो माणूस मोबाईलपर्यंत पोचतो आणि एकदम त्याला धडधडायला लागतं…

अश्रफचा फोन असेल ?

तो नंबर बघतो.. आश्चर्य म्हणजे कुठलाच नंबर नाहीये. नुसताच फोन वाजतोय.

तो थरथरत्या हाताने फोन उचलतो.

‘हालो’ तो काप-या आवाजात म्हणतो.

‘केशव भगनानी !’

तो आवाज ऐकल्यावर भगनानी एकदम दचकतो. हा अश्रफचा आवाज नाही. त्याच्या गॅंगमधल्या कुणाचाही नाही. हा माणसाचा वाटतच नाहीये आवाज.. पण फार खतरनाक आहे. जणू मृत्यूनेच हाक मारली आहे !

पण तरीही… तरीही आपल्या ओळखीचा का वाटतोय ?

‘क.. कोण?’ भगनानीच्या तोंडाला कोरड पडलीये. आता छातीवर मणाचं ओझं ठेवल्यासारखं विलक्षण दडपण आलंय !

“मी बोलतोय !

कोण बोलतय ते कळत नाहीये. पण… तरीही थोडं लक्षात येतंय.
भगनानीला छातीत एकदम कळ आल्यासारखं होतं. हा.. हा आपल्या मोबाईलचा आवाज आहे ?

नो ! नॉट पॉसिबल !

हा आपला फक्त भास आहे. एक भयंकर भास.

तो छातीवर डाव्या बाजूला हात दाबतो..

“आता तू पुन्हा मला कधीच आपटू शकणार नाहीस ! फेकू शकणार नाहीस !”

आपण काय ऐकलं, बरोबर ऐकलं का ते भगनानीला कळत नाही.. पण तो हबकतो.. त्याच्या छातीतली कळ एकदम वाढते.. वाढतच जाते.

… आणि हळूहळू तो खाली कोसळतो.



***


तर.. आपण बोलत होतो त्या वाक्याबद्दल !

ह्या वाक्यातला साधा संदेश एव्हढाच की माणसांवर प्रेम करायच असतं. त्याना स्नेह, आदर, ममता, मित्रत्व अशा सुंदर भावनांनी जोडायच असत.. सुखाची आणि यशाची नवनवीन शिखरं गाठायला एखाद्या शिडीसारखी वापरायची नसतात माणसं !

कारण माणसं म्हणजे काही वस्तू नाहीत ! वापरायला नि वापरून फेकून द्यायला. ती आहेत जिवंत, हाडामासाची, भावभावना असलेली माणसं !

.. आणि वस्तू ?

वस्तूंचं काय ?


***


इन्स्पेक्टर मानकामे आज खूप चिंताग्रस्त चेह-याने बसले होते..

समोर असलेल्या कागदपत्रांवरून त्यांची नजर फिरत होती. पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्टस वगैरे. त्यांच्या दहा वर्षांच्या अनुभवात एकाच दिवशी अशा विचित्र केसेस कधी आल्या नव्हत्या.

मानकामे त्या माहितीतली सुसूत्रता शोधण्याचा प्रयत्न करत होते..

नाव: राजेश चौबळ
वय : २९ वर्षे
मृत्यूची वेळ : रात्री सुमारे २.३०
मृत्यूचे कारण: ...


भयंकर ! रात्री कसल्यातरी धक्याने भिंतीवरचे घडयाळ खिळ्यापासून निसटले असावे. ते अगोदरच सैल झालेले असणार. आधी ते खिळा आणि कॉट यांच्यामधे असलेल्या फळीवर आदळले असणार. त्या जुन्या घड्याळाचे भाग तुटून वेगवेगळे झाले आणि मग ते काहीसे अवजड घड्याळ थेट राजेशच्या डोक्यात पडले. तरीही तो कदाचित वाचला असता पण विचित्र रितीने घड्याळाचे मोठे आणि अणकुचीदार दोन काटे एखाद्या हत्याराच्या पात्यासारखे त्याच्या गळ्यात आणि छातीत घुसले. तेच त्याच्या मृत्युचे कारण आहे.

विचित्र मृत्यू आहे अगदी !


नाही, म्हणजे घड्याळ पडू शकतं निसटून.. पण अगदी एखाद्याने मुद्दाम खुपसावेत तसे ते काटे त्याच्या शरीरात घुसणं म्हणजे... हॉरिबल !

जुजबी चौकशीत तरी राजेशची कुणाशी दुश्मनी असल्याचे काही समजले नव्हते.. त्यामुळे 'विचित्र अपघात' अशीच नोंद करावी लागणार बहुतेक..

आणि ही दुसरी भगनानीची केस !

केशव भगनानी
वय : ४७ वर्षे..

पुढे वाचायची गरजच नाही.. माहिती आहे चांगलाच. बी ग्रेड पिक्चरचा हा फायनान्सर. त्यासोबत नाना धंदे आणि लफडी. दोन वेळा ह्याला आपणच वॉर्निंग दिलेली आहे. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची डिपार्टमेंटची खात्रीच आहे!

खर म्हणजे हा भगनानी एक दिवस जायचाच होता.. पण कसा ? तर त्याच्या ऑफिसवर भाडोत्री गुंडांचा अंदाधुंद गोळीबार.. त्याच्या ऑफिसच्या काचेच्या दरवाज्याचा चक्काचूर.. आणि रक्ताच्या थारोळ्यात आत पडलेला भगनानी.

हे असच काहीतरी होणार होतं एक दिवस..

काल भगनानी गेलाच… पण हार्ट फेलने !

रात्री दोन वाजता त्याच्या मोबाईलवर कॉल आला एव्हढंच आठवत त्याच्या बायकोला. तो उठून फोन घ्यायला गेला आणि ब-याच वेळाने तिला जाग आली. बाहेर येऊन पहाते तो जमिनीवर पडलेला. निष्प्राण ! जोरात ऍटॅक आला असणार त्याला. हाक मारायचीही संधी मिळाली नसणार.

आधी वाटलं की, त्याला धमकीचाच फोन आला असणार…

पण तेच फार विचित्र आहे ! कारण…


कारण त्याला रात्री अकरा नंतर कुणीच फोन केलेला नाही फोन कंपनीच्या रेकॉर्डप्रमाणे ! दोनदा रिपोर्ट मागवून खात्री केली आपण…

मग… त्याचा मोबाईल वाजलेला त्याच्या बायकोने ऐकला कसा ? त्याचा मोबाईल वाजलाच कसा ?

विचारात असतानाच मानकामेनी घडयाळात पाहिलं.. दोन सतरा ! बरीच रात्र झाली… आता घरी जायला हवं..

दुस-या ऑफिसरला चार्ज देऊन मानकामे बाहेर आले. दोन कॉन्स्टेबल बसून आपसात आरामात कुजबुजत होते ते एकदम सरळ झाले. मानकामेनी त्यांच्याकडे पाहिलं न पाहिलं करुन, पोलिस स्टेशनच्या आवारात असलेल्या आपल्या जुन्या मोटरसायकलकडे पाहिलं..

आणि त्यांच्या चेह-यावर लगेच त्रासिकपणा आला.

..अगदी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे दोनचार किक्स मारुनही मोटरसायकल चालू होईना.

xxx तिच्या.. आता साताठ वर्ष झाली वापरतोय साली ही मोटरसायकल. आधी नीट चालायची.. आता गेल्या काही दिवसातच फार त्रास देते आहे. नवी घेऊ शकतो की आपण स्वत:च्या पैशातून.. अगदी सहज. पण मग डिपार्टमेंटच्या डोळ्यात लगेच येतं आजकाल ..

नेहमीप्रमाणे सुरू होईचना तेव्हा शेवटी तडकून त्यानी मोटरसायकलला दोन चार लाथा मारल्या !

.. अजून दहा मिनिटानंतर, मानकामे अगदी घामाघूम झाल्यावर, ती एकदाची चालू झाली..

मानकाम्यानी मग पुन्हा एकदा तिला एक शिवी हासडली… आणि रात्रीच्या निर्मनुष्य रस्त्यावर त्यानी ती जुनी मोटरसायकल अगदी भरधाव सोडली.



***

हं.. वस्तूंचं काय ?

दचकू नका.. बरोबरच आहे तुमचं ! वस्तूंचं काय एव्हढं ? त्या फक्त हव्या तश्या वापरायच्या. बिघडल्या, तर दुरुस्त करायचा प्रयत्न करायचा. ते शक्य नसेल तर सरळ फेकून द्यायच्या.. आणि त्या जागी नवीन वस्तू आणायच्या ! ..कदाचित अजूनच उपयोगी आणि वापरायला सोप्या.

फारतर एखाद-दुसरी वस्तू आठवण म्हणून जपून ठेवायची. बास ! एव्ह्ढाच काय तो अपवाद !

बरोबरच आहे अगदी.. वस्तूंचं त्यांचं आयुष्यच मुळी माणसांच्या उपयोगासाठी. अर्थात, आयुष्य कशाला म्हणायच म्हणा.. निर्जीव निष्प्राण वस्तू त्या !

पण तुम्ही एखाद्या वेळेस वैतागलात आणि..

अं.. समजा, तुमचा कॉम्प्युटर प्रतिसाद द्यायचा बंद झाला, म्हणून किबोर्डच्या किज रागारागाने आपटून आपटून वैताग व्यक्त केलात.. किंवा टिव्हीवर सगळीकडे नुसते भिकार कार्यक्रम आहेत असं पाहून, कंटाळून अक्षरश: रिमोट फेकून द्यावासा वाटला.. एखाद वेळी दिलातही फेकून !

फार कशाला, नीट ठिणगी न पाडणा-या स्वयंपाकघरातल्या साध्या लायटरवर भडकलात आणि दातओठ खात ओट्यावर आपटलात तो दोनचार वेळा ..

तर ?

तर काय ? त्या निर्जीव वस्तू काय करणार... निमूटपणे तुमचं वागणं सहन करण्यापलिकडे !

पण.. काही सांगता येत नाही ! आता कल्पना करा ना.. मानकामे भरधाव निघाले त्यांच्या मोटर सायकलला शिव्या घालत घालत..

पण समजा, मोटरसायकल १०० च्या स्पीडला असताना एखाद्या मोक्याच्या क्षणी अगदी अनपेक्षितपणे हॅंडल लॉक झालं .. किंवा त्यांनी दाबला नसतानाही जर अचानक करकचून ब्रेक लागला तर ?

.. तर काय होईल त्यांचं ? राजेश किंवा भगनानीसारखंच काहीतरी ??? नक्कीच !

छे ! कल्पनाही करवत नाही…

म्हणून आपलं सहज सांगावस वाटलं...

Love people.. and if possible, love things too !

माणसांवर प्रेम करा.. आणि जमलंच तर.. निर्जीव, निष्प्राण वस्तूंवरही !


*****


4 comments:

Nandan said...

Rahul, chhan lihila aahes. Vishesh karun tya 3-4 prasanganche varNan. Te ekatra keles tar tyanchi ek mast swatantra katha hou shakel. Kadachit 'vastu-sthiti' ya nawachi :)

राफा said...

Thanx Nandan !

Anonymous said...

bhannat!

राफा said...

Thanx Anonymous !