Mar 28, 2010

माणूस नावाचे पुस्तक !

जुन्याच मजकूराचे अर्थ नवे
माणसे वाचणे सोडायला हवे


मुखपृष्ठावरुन काही अंदाज ?
कराल तर फसाल !
एखादं पान चाळल्यावरच
खुदकन हसाल !


ह्या बोलण्याला तो संदर्भ,
अन आतला मतलब गूढगर्भ


पाने चाळावीत, चित्रे पहावीत..
पण संपूर्ण माणूस वाचण्याची उबळ ?
...दाबायलाच हवी !


सुंदर चेहरे बघावेत, चंचल नखरे पहावेत
देखणी मने शोधायची सवय ?
...सोडायलाच हवी !


देवमाणसांचे प्रदर्शन
मांडले आहे घराघरात
सामान्यांचे गठ्ठे मात्र
कायम सवलतीच्या दरात


सुंदर सुबक छपाई
मजकूर मात्र कुरुप
मग पाने उलटायला
लागतो उसना हुरूप !


धूळीत पडलेल्या माणसांकडे
कधी कुठे आपली नजर वळते ?
ब-याचदा माणसाची खरी किंमत
शेवटचे पान उलटल्यावरच कळते !


प्रतिभा अफाट म्हणतात,
मग वागणे क्षुद्र कसे ?
गोड मधाळ चेह-यांचे
अनुभव खवट कसे ?


'एकदा मला वाचाच !' कुणी एक बोलतो
पुढची कित्येक पाने स्वस्तुतीत डोलतो
म्हणतो, दुनियेने माझे चरित्र शिकावे
ऐकताना वाटते ह्याला वजनावर विकावे


म्हणे 'ओरिजनल' तो मीच
स्वयंभू ढंग माझा आगळाच !
मनातले त्याच्या वाचू म्हटलं
तर खरा 'प्रकाशक' वेगळाच !


अकारण अतर्क्य, आक्रस्ताळे अनाडी
त्याच गुणांवर आपले प्रस्थ थाटतात
दुमडलेल्या कोप-यांची आडमुठी पाने
मग काही पुस्तके उगाच जाड वाटतात.


कुठे सूप्त दडलेली प्रतिभा
पण भलत्या रकान्यात चुकलेली
रुक्ष वास्तवाच्या ओझ्याने
बिचारी 'फिक्शन'ला मुकलेली


एकगठ्ठा कुटुंबाच्या संचात
सख्खी नाती बोचू लागतात
करकचून बांधलेली नशीबे
एकमेक काचू लागतात.


एका जीर्णश्या डायरीत
असते सारे आयुष्य सरलेले
आठवणींच्या पंचनाम्यात
एक पिंपळपान विसरलेले !


- राफा



 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा

12 comments:

Unknown said...

m seeing this blog recently ..
very nice blog

ani kavita tar best..
sahityik sammelanatil vastaw!

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
kshipra said...
This comment has been removed by the author.
kshipra said...

कविता सहीच. सगळ्यांचे पाय मातीचे :) एकदम पटेश.

राफा said...

योग, Thanx a lot for your appreciation.

क्षिप्रा, मन:पूर्वक आभार !

Anonymous, तुमचे (wikidot ची लिंक असलेले) पोस्ट काढून टाकत आहे. तुम्हाला जे सांगायचे आहे त्याचा ना ह्या पोस्टशी संबंध आहे ना माझ्या ब्लॉगशी. तेव्हा लिंक देण्यासाठी योग्य व्यासपीठ निवडा (तुमचा मुद्दा काय आहे आणि तो बरोबर का चूक हा इथे प्रश्न नाहीच आहे)

Anonymous said...

देवमाणसांचे प्रदर्शन
मांडले आहे घराघरात
सामान्यांचे गठ्ठे मात्र
कायम सवलतीच्या दरात


क्या बात है!
सुंदर

Parag said...

aavadalee kavitaa...
phaarach chhaan.

राफा said...

आल्हाद, पराग : तुमच्या प्रतिक्रियांबद्दल हार्दिक धन्यवाद !

Dk said...

mast!!

राफा said...

Thanx Deep !

BinaryBandya™ said...

ब-याचदा माणसाची खरी किंमत
शेवटचे पान उलटल्यावरच कळते !!

faar chhaan kavita aahe...

राफा said...

Thanx BinaryBandya (naav zakaas ahe :) )