Jul 21, 2013

'शोले': एक वाहून गेलेले परीक्षण!

आप्पा जोशी वसईवाले (वाचक, दैनिक 'परखड')
दिनांक: १६ ऑगस्ट १९७५

काल गावातल्या एकमेव टॉकिजमधे 'शोले' हा अप्रतिम बोलपट पाहिला. बाहेर डकवलेल्या पोस्टरावर ७० एमेम, सिनेमास्कोप असे काहीबाही लिहीले होते त्याचा अर्थ कळला नाही. बायोस्कोप पाहिला होता लहानपणी, पण हा सिनेमास्कोप काय हे कळायला काहीच स्कोप नव्हता. चित्रपटाची रिळं जास्त होती त्यामुळे पडदाही नेहमीपेक्षा मोठा लागला बहुतेक त्यांना. चित्रपट सुरु झाल्यावर पडद्यावर वर व खाली आडव्या पट्ट्या दिसत होत्या. झाकायचाच होता तर भव्य पडदा असे कशाला लिहायचे? असो. माझ्या बाजूच्या प्रेक्षकाचे आवाज डावीकडच्या का उजवीकडच्या स्पीकरमधून येतोय इथे जास्त लक्ष होते. 'श्टिर्यो' का कायसं म्हणत होता तो इसम. असो.

तरीही सामाजिक प्रश्नांना हात घालणारा 'शोले' हा अतिशय वास्तवदर्शी चित्रपट आहे असं माझं वैयक्तिक मत झालं आहे. 'विधवा विवाह' हा सामाजिक प्रश्न हाच चित्रपटाचा मुख्य विषय! बाकी डाकू-बिकू म्हणजे आपलं ताटातलं तोंडीलावणं आहे. ते जर नसतं तर 'ग्रामजीवन' व 'ग्रामोद्योग' ह्यावर एक अप्रतिम डॉक्युमेंटरी झाली असती.

'राधा' ही विधवा व 'जय'शी तिचा होऊ घातलेला विवाह हा मुख्य विषय आहे. खरं म्हणजे ह्याला विवाहबाह्य संबंध अशी कुणी दुषणे देईल. पण 'राधा'चा नवरा आधीच 'कालबाह्य' झाला असल्याने त्यांचे प्रेम 'विवाहबाह्य' होऊ शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे.

अर्थात 'जय' चे पात्र जरी वरकरणी हुशार व चतुर वाटत असले तरी ते तसे नाही असही माझं वैयक्तिक मत आहे. आता ख-या आयुष्यात जी आपली बायको आहे ती चित्रपटात बदलायची सोन्यासारखी संधी मिळाल्यावरही पडद्यावर पुन्हा तीच बायको म्हणून मान्य करण्याचा मूर्खपणा जय करतो. मग काय होणार! 'आपले मरण पाहिले म्या डोळा' असे म्हणण्याची वेळ येते. एखादी 'भाग्यरेखा' एखाद्याच्या हातातच नसते. त्यामुळे तीच ती कंटाळवाणी बायको पदरी पडते. शिवाय आधीच्या सगळ्या पांढ-या साड्या असल्याने लग्नानंतर रंगीत साड्यांचा खर्च वाढणार! नशीब एकेकाचं…


आता घरोघरी नवरे लोकांची झालेली परवड 'जय' पहात नाही काय ? वडाला प्रदक्षिणा घालून घालून त्याच त्या नव-याचं ऍडवान्स बुकिंग करण्याची व त्याच्या पुढच्या सात जन्मांची वाट लावण्याची जी अनिष्ट प्रथा समाजात पडली आहे ती बदलायला हवी. (आमच्या कुटुंबाच्या गळ्यात घंटा कोण बांधणार! असो.)

'वीरू' व 'जय' शहरात असताना, जर एखाद्याची किल्ली चुकून आत राहीली आणि दार बंद झाले तर अश्या प्रसंगी घराचे कुलूप तोडून देण्याच्या व्यवसायात असतात. ह्यात त्यांचे सामाजिक भान दिसत नाही का? रामगढ गावातला 'ग्रामोद्योग' ज्या पद्धतीने चित्रीत केला आहे तो अतिशय वास्तवदर्शी आहे. कुणी कापूस पिंजतोय, कुणी लोहार आहे असे उद्योग चालू आहेत. विहीरीवर कपडे धूत स्वावलंबन करताना तरुणी दखवली आहे तसेच टांगा चालवणारीही तरुणी आहे. कुणी पोस्टमन आहे, सुतार आहे, किसान म्हणजे शेतकरी आहे.. आणि ज्याना आता अगदीच काही येत नाही ते शेवटी डाकू बनतात असे दाखवले आहे. अत्यंत वास्तवदर्शी! ख-या आयुष्यातही आपण तेच तर पाहतो. कुणी इंजिनिअर होतो, कुणी शेती करतो, कुणी कारखान्यात कामगार होतो, कुणी शिक्षक होतो, आणि मग अगदीच काही येत नाही म्हणताना जसे उरलेले लोक राजकारणात शिरतात अगदी तसेच!

'गब्बर सिंग' नावाचे एका थोर पुरुषाचे पात्र आहे. तो तर अगदी देवासारखाच आहे. देव जसा आपल्यावर आधी संकटे आणतो आणि मग त्यातून त्यानेच वाचवण्यासाठी आपल्याला त्याची भक्ती करावी लागते, नैवेद्य द्यावा लागतो… अगदी तसाच प्रकार गब्बरसिंगच्या बाबतीत आहे. "गब्बर के ताप से तुम्हे एकही आदमी बचा सकता है.. खुद गब्बर!" असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा तर देवात आणि त्याच्यात फरक तो काय? हा विचार 'जय'च्या खांद्याला चाटून जाणा-या गोळीसारखा मनाला चाटून जातो.

'तुझे याद रखूंगा' म्हणताना तो जणू निश्चयाचा महामेरु भासतो. अगदी गावातल्या धान्याच्या पोत्यापासून ते 'चक्कीच्या आट्या'पर्यंत सगळ्यात रस घेऊन तो सकस आहाराविषयी आपले सामान्य ज्ञान किती सकस आहे हे दाखवतो. 'माणसं किती, गोळ्या किती', 'सहा वजा तीन म्हणजे तीनच ना?' यासारखे चतुर प्रश्न विचारून सहका-यांना शाळेत न जाताही गणिताचे धडे देतो. झालेला विनोद इतरांना कळावा किंवा विनोद झाला आहे हे तरी किमान डाकूंना कळावे म्हणून आधी स्वत: दिलखुलासपणे अगडबंब हसतो. कुणाही इतर महापुरुषांप्रमाणे बिचा-या गब्बरला डोंगरद-यांतच वास्तव्य करावे लागते. त्यातूनही वेळ काढून तो बंजारा समाजाच्या हेलनबाईंच्या लोककला पथकाचे नृत्य बघायला जातो! म्हटलेच आहे: 'काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम'!

'ग्रामोद्योगा'प्रमाणे ह्या बोलपटात 'महिला गृहोद्योग'ही दाखवला आहे. आता तुम्ही म्हणाल कसा? तर 'बसंती'ची मौसी एका प्रसंगात तिला कै-या आणायला सांगते तेव्हा भावी गृहोद्योगाचाच विचार तिच्या मनात असणार हे उघड आहे. उद्या बसंती लग्न होऊन सासरी जाईल मग आपल्या चरितार्थाचे काय? धन्नोलाही टांग्यासकट योग्य वयात उजवलेले बरे असाही विचार मौसीच्या मनात असणार खास, नाहीतर टांगा न चालवता रिकाम्या उभ्या राहिलेल्या धन्नोचे पाऊल वाकडे पडून तिने गुण उधळले तर काय घ्या? ह्या सर्व विचारांनीच मौसी कैरीचं लोणचं म्हणू नका, पोह्याचे पापड म्हणू नका , कुर्डया चिकवड्या म्हणू नका असा काही बाही गृहोद्योग करण्याचा विचार करत असणारच.

अर्थात आता पापड, कुर्डया वगैरे सर्व काही दाखवले नाहीये. पण काही काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या असतात. उदाहरणार्थ, हिंदी चित्रपटात कधी हिरोईनला बाळ होतं असं आपण पाहतो तेव्हा त्या अनुषंगाने हिरो हिरोईनमधे काही विशेष घडामोडी आधी घडलेल्या असणार, हे आपण समजून घेतोच की नाही? ते काही सर्व काय नि कसं झालं ते तपशीलवार दाखवत बसत नाहीत! तसंच ह्या गृहोद्योगाचं दिग्दर्शकाने आपलं जाता जाता सूचीत केलं आहे. मला तर ताबडतोब रामगढच्या घरोघरी जाऊन लोणची व पापड विकणारी मौसी स्पष्ट दिसू लागली. 'वीरू' शेतकरी होण्याच्या दृष्टीने कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळवतो असेही चित्र डोळ्यासमोर उभे राहीले. आता ठाकूरला हाताने चरखा चालवता येणार नसल्याने खादीशी त्याचं सूत जमणार नाही. पण तरी तो पायाने वाईनसाठी 'ग्रेप स्टॉंपींग'चा म्हणजेच द्राक्षं कुस्करायचा छंद जोपासू शकतो. सुदैवाने त्याची पुरखोंकी खेतीबाडी असल्याने दोन वेळच्या जेवणाची आणि पूर्ण वेळच्या शालीची सोय आहे.

तर असा हा समाजप्रबोधन करणारा चित्रपट प्रत्येकाने पहावयास हवा. पण फार गर्दी नव्हती टॉकिजमधे. नेमके असे पिक्चर आपल्याकडे चालत नाहीत!  हे कधी बदलणार?


 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा

5 comments:

Bharatiya Yuva said...

Connect your Marathi Blog to MarathiBlogs.in and Increase Marathi Visitors

Chaitanya Joshi said...

Ek number ....majaa aali!!

Bharatiya Yuva said...

Connect Your Blog to http://marathiblogs.in and get more marathi visitors to your Blog.

मराठी पुस्तके वाचायची आहेत ?
तुमच्या शहरात मिळत नाहीत ?
मग भेट द्या की मराठीबोली.कॉम http://marathiboli.com
सर्व पुस्तकांवर १०% सवलत .
ना नफा ना तोटा संकल्पनेवर आधारित एकमेव संकेतस्थळ.

Anonymous said...

mast!!!!

राफा said...

Chaitanya, Anamik:

मंडळ आभारी आहे! :)