Aug 29, 2007

कन्फ्युजन तो है अटर !

आजकाल मला फार म्हणजे फार प्रश्न पडतात.. अंधा-या गुहेत अगदी घरच्या ओढीने वटवाघुळे उडत येऊन लटकावीत तसे हे प्रश्न येऊन माझ्या मेंदूत येऊन लटकून राहतात.

माझा मेंदू अंधारा असावा का ? आणि हे पहिल्याच दिवशी कळल्यामुळेच ' वर्षभर काय उजेड पाडणार आहेस ते दिसतंच आहे' असे शाळेत माझ्या एका वर्षीच्या खवट वर्गशिक्षिका म्हणाल्या असतील का ?

बघा ! सुरु झाले प्रश्न..

ज्या अतिप्रचंड वेगाने आजकाल रटाळ, निरस कौटुंबिक सिरियल्स येत आहेत, त्याहीपेक्षा जास्त वेगाने हे प्रश्न येत असतात. एकेका प्रश्नाच्या निरर्थक अद्भुततेने मुग्ध होत असतानाच पुढचा प्रश्न येतो. कधी कधी एक पुरला नाही तर पकडापकडीत साखळी केल्यासारखे चारपाच प्रश्न एकत्र येऊन मला 'आऊट' करतात.


आता 'कुछ रिश्तोंके नाम नही होते' च्या धर्तीवर 'कुछ सवालोंके जवाब नही होते' अस मी आपलं मला समजावत राहतो. पण प्रश्न थांबत नाहीत.. हेच पहा :


स्वर्गात पुण्य कमावलं तर त्याचं पुढं काय होतं ?

म्हणजे ऑलरेडी मोक्ष मिळाला असल्याने ते पुण्य 'कॅरी फॉरवर्ड' कसे करणार ?

बरं, स्वर्गात पापे केली तर मग काय करतात ? (लब्बाड ! लगेच अप्सरांचा 'विषय' आला की नाही मनात ?)

तर त्या स्वर्गातल्या पापांचे काय होते ? काहीच नाही होतं असं असेल तर हे म्हणजे अगदी भारतासारखं नाही का ? म्हणजे "जर (एकदाचे) तुम्ही 'पोचलेले' असलात की काहीही केलतं तरी फरक पडत नाही" असंच नाही का ? मग भारतालाच स्वर्ग का नाही म्हणत ? अमेरिकेत जाण्यासाठी लोक कशाला एव्हढे 'मरत असतात' ?

रिक्षात आजकाल संगीत का वाजवत नाहीत ? त्या भयाण संगीताची अनुपस्थिती सुखावह असूनही मला 'झकसी चकसी' असं काहितरी स्टिरीओफोनिक ऐकू न आल्याने रुखरुख का लागते ? (खड्ड्यांमधे रिक्षा आपटून ताल धरला जातो त्याने समाधान मानावे का ? .. कदाचित भरपूर खड्डे असलेल्या रस्त्यावर संपूर्ण 'कायदा' ही वाजत असेल ... पण रिक्षावाल्यांचा 'कायद्या' शी एव्हढाच संबध का असावा ? )

रिक्षा मधे पाशिंजरच्या डोक्याला लागेल असाच आडवा बार का असतो वर ? त्याना गिराव्हिकाचं डोकं वाचेल असं रिक्षांच धड (पक्षी : 'बॉडी' ) नसतं का बनवता आलं ? की रिक्षात हेल्मेट घालून बसायचं ?


चालू पीमटीमागे उभे राहिल्यावर तोंड काळे होते (आणि आत बसल्यावर डोळे पांढरे होतात ) तरी सुद्धा 'पीमटी वापरा प्रदूषण टाळा' असा निरागस निर्लज्जपणा करायला ते कुठे शिकले असावेत ?

सीट कव्हर घट्ट बसलेली एम ८० कुणी पाहिली आहे का ? (डीलर ने तरी ?)

ब-याचदा बायका रस्त्याने चालताना, लहान मुलाना ट्रॅफिकच्या बाजूला ठेवून आपण स्वत: अजागळपणे भलतीकडेच बघत का जात असतात ?

'पाणी आडवा पाणी जीरवा' ! पण कुठे अडवा आणि कुठे जिरवा ? ह्या असल्या वाह्यात संदिग्ध पाट्या लिहिणा-याना लिहिण्यापासून अडवले पाहिजे मग तरी त्यांची 'जिरेल' का ?

उजव्या लेनमधून ट्रॅफिक अडवत चालवणारे मारुती ८०० वाल्याना आपण प्रकाशाच्या वेगाने जातोय असं का वाटत असतं ? आपल्या पुढे जाणारे सायकलवाले ते बघत नाहीत का ?

चहा 'टाकू का' विचारतात आणि कॉफी मात्र 'करु का' असे का ?


हे आणि असेच कितीक प्रश्न !


आता मला हे सगळे प्रश्न 'पडतात' का माझ्यासमोर हे प्रश्न 'उभे राहतात' ?

हाही एक प्रश्नच आहे !

Aug 17, 2007

रेड ऑन एन्टीबी !

खूपच दिवसानी रेड ऑन एन्टीबी (एन्टेबी ?) पाहिला... आणि पुन्हा एकदा तेव्हढाच आवडला ! वेगवेगळ्या कारणांसाठी. अर्थातच सर्वात महत्वाचे कारण म्हणजे ह्या सत्यघटनांमधले थरारनाट्य आपल्यापर्यंत पोचवण्यात चित्रपट कमालीचा यशस्वी होतो.

१९७७ चा असला आणि टि.व्ही. साठी बनवलेला असला तरी आजही त्याची निर्मीतीमूल्ये चांगली वाटतात... उत्तम दिग्दर्शक व अभिनेते आहेत... बराचसा चित्रपट डॉक्युमेंटरीच्या शैलीत आहे आणि म्हणून(ही) प्रभावी वाटतो.

चित्रपट ज्यावर बेतला आहे तो घटनाक्रम साधारण असा होता :

जून २७, १९७६ रोजी एअर फ्रान्सचे विमान अथेन्सहून पॅरीसला जाण्यासाठी सुटले. ते विमान आधी तेल अवीव हून निघाले होते.. साधारण अडीचशे प्रवासी असलेल्या ह्या विमानाचे अपहरण पॅलेस्टीनी (PFLP) व जर्मन अतिरेक्यांनी केले. मधे लिबीयात इंधनासाठी थांबून ते विमान थेट युगांडात एन्टीबी विमानतळवर उतरवण्यात आले.

त्या ४ अपहरणकर्त्यांना अजून अतिरेकी नव्याने येऊन मिळाले. विमानतळाच्या एका इमारतीत सर्व प्रवाशाना कोंबण्यात आले. इमारतीभोवती स्फोटके लावली गेली. अतिरेक्यांची मुख्य मागणी जाहीर करण्यात आली की वेगवेगळ्या देशात (मुख्यत: इस्त्रायल मधे) कैदेत असलेल्या चाळीस पॅलेस्टीनींची सुटका करावी नाहीतर ओलीस ठेवलेल्या प्रवाशांना ठार मारले जाईल.

ह्या सर्व प्रकाराला युगांडाचा सर्वेसर्वा (राष्ट्राध्यक्ष/लष्करशहा) इदी आमीन ह्याचा पाठींबा होता. युगांडाच्या लष्करातील सैनिकही ह्या इमारतीभोवती पहाऱ्यास होते.

लवकरच इस्त्रायलचे नागरिक व ज्यू (सुमारे १००) सोडून बाकी प्रवाशांची मुक्तता करण्यात आली. अतिरेक्यांनी त्यांची मागणी पूर्ण करण्याची मुदत वाढवून १ जुलै ऐवजी ४ जुलै केली.

अतिरेक्यांशी चर्चाही न करणाऱ्याचे धोरण असलेल्या इस्त्रायल पुढे हा मोठाच पेच होता. त्यात आंतरराष्ट्रीय राजकारणाची गुंतागुंत तर होतीच पण अंतर्गत परस्परविरोधी मतांचा दबाव आणि चुकीच्या पद्धतीने परिस्थिती हाताळल्यास लोकक्षोभाचीही भिती होती.

पण अखेर...

इस्त्रायलने जे केले त्याला लष्करी कारवायांच्या इतिहासात क्वचितच तोड सापडेल !!!

जुलै ३ ला, तुटपुंज्या वेळात आणि अतिशय गुप्तपणे आखलेल्या लष्करी कारवाईचा आरंभ झाला. अडीच हजार मैल प्रवास करुन इस्त्रायलची २०० सर्वोत्तम सैनिक/कमांडोज ची तुकडी ३ विमानानी युगांडात उतरली... थेट एन्टीबी विमानतळावर !

अतिरेक्याना मारुन प्रवाशांची सुटका करणे हे या मोहिमेचे मुख्य लक्ष्य होते. अर्थातच मधे पडलेच तर युगांडाच्या सैनिकाना गारद करणे ('neutralize' हा शब्द मला आवडतो) हा भागही आधीच ठरवला गेला होताच

वेगवेगळ्या कारणांसाठी इस्त्रायल असे काही करेल अशी सुतराम शक्यता नव्हती. अचानक झालेल्या हल्ल्याने अतिरेकी व युगांडाचे सैनिक गडबडले.. त्या धुमश्चक्रीत सर्वच्या सर्व ७ अतिरेकी मारले गेले. २० युगांडन सैनिक गारद झाले. दुर्दैवाने एक इस्त्रायली कमांडो कामी आला व १०० प्रवाशांपैकी तीन मारले गेले. ही लढाई सुमारे अर्धा तास चालली होती. पाठलाग करु नये म्हणून विमानतळावरच्या युगांडाच्या ११ मिग विमानांनाही (म्हणजे एक चतुर्थांश युगांडन हवाई दल !) नष्ट करण्यात आले !

हा सर्व घटनाक्रम इतका सनसनाटी, थरारक आणि आश्चर्यकारकही आहे की बघून थक्क व्हायला होते.. मुळात सत्य घटनाच एव्हढ्या नाट्यपूर्ण आहेत की काल्पनिक प्रसंगांची जोड देण्याची गरजही नाही. चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'Raid on Entebbe' हे हॉलिवूड version आहे असे कुठे जाणवत नाही. एकतर सुरेख दिग्दर्शन, अभिनय आणि दुसरे म्हणजे सत्य घटनांशी बरेचसे प्रामाणिक राहणे यामुळेच चित्रपट जमला आहे. (ह्या घटनेवरच आधारित दुसरा चित्रपट म्हणजे - इस्त्रायलचे जे version आहे - 'व्हिक्टरी ऍट एन्टिबी' तोही मी पाहिला होता. त्यात बर्ट लॅंकेस्टर, ऍंथनी हॉपकिन्स वगैरे अभिनेते असूनही त्यापेक्षाही 'Raid on..' च अतिशय सरस झाला आहे !)

एक घटनाक्रम म्हणून एकाच वेळी जो थरार आणि सुरसता (युद्धस्य कथा.. ) आहे त्यात मला रोचक/महत्वाच्या वाटलेल्या गोष्टींपैकी काही :

  • अथेन्स विमानतळावर सुरक्षा रक्षकांचा संप अतिरेक्यांच्या पथ्यावर पडणे
  • एका इस्त्रायली कंत्राटदाराने एन्टीबी विमानतळ बांधल्याने त्याच्या अंतर्गत रचनेची माहीती ('मिलिटरी इन्टेलिजेन्स' साठी) उपयोगी पडणे. तसेच सुटका झालेल्या प्रवाशांच्या मदतीने अतिरेक्यांची रेखाचित्र काढून कमांडोजना ती तोंडपाठ करवणे.
  • एकीकडे नमते घेतल्याचे दाखवून.. अतिरेक्यांशी चर्चेस तयार होऊन, त्यांची मागणी ऐकून घेऊन, मुदत वाढवून घेऊन.. दुसरीकडे, प्रवाशांच्या सुटकेसाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करणे (अशक्यप्राय वाटणार्या लष्करी कारवाईचीही तयारी करणे)
  • चित्रपटात चार्ल्स ब्रॉन्सन म्हणतो तसे यशस्वी मोहिमेचे मर्म : ' स्पीड, सायलेन्स ऍंड कम्प्लीट सरप्राईज !'
  • इदी आमीन वापरायचा तशीच काळी मर्सिडीज विमानातून आणून ती कारवाईत वापरणे - ह्या युक्तीला दाद द्यावी तितकी कमीच ! (इदी आमीन कधीतरी येऊन परिस्थिती बघून जायचा / प्रवाशांसमोर नाटकी भाषणबाजी करून नक्राश्रू ढाळायचा .. त्यामुळे इमारतीच्या दरवाजाबाहेर असलेल्या अतिरेक्याना वाटते की त्या विक्षिप्त इदी आमीनचीच शाही स्वारी आली आहे एव्हढ्या रात्री.. पण आत काही इस्त्रायली सैनिक असतात. तशाच मर्सिडिजमुळे अगदी जवळ जाईपर्यंत अतिरेक्याना संशयच येत नाही )
  • "परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण असणारे अतिरेकी (जरा संशय आला तरी नि:शस्त्र ओलीस लोकांवर सेकंदात गोळ्यांचा वर्षाव करण्याच्या परिस्थितीत असलेले), स्फोटकानी वेढलेली इमारत, युगांडन सैनिकांचे सहकार्य" विरुद्ध "अडीच हजार मैल प्रवास करुन आलेले, अनोळखी देशात नि तुलनेने अपरिचित इमारतीत शिरून एकाच वेळी अतिरेक्यांचे शिरकाण आणि प्रवाशांची सुरक्षा व सुटका अशी अतिअवघड जबाबदारी असलेले इस्त्रायली सैनिक" !
  • एक राष्ट्र म्हणून ठाम उभे राहणारे इस्त्रायल. अतिशय कणखर , अतिरेक्यांपुढे न झुकणारे आणि आपल्या नागरिकांच्या सुटकेची विलक्षण काळजी असणारे नेतृत्व ! ज्याला act of war म्हणता येईल (दुसर्या देशाच्या हवाई हद्दीत विमाने घुसवून, उतरवून, सैनिकी कारवाई करणे) असे धाडस योग्य कारणासाठी, कुणाची परवानगी घेत न बसता व नंतरच्या आंतरराष्ट्रीय विरोध व निंदेला न घाबरता आत्मविश्वासाने करणे.. खरोखरच ह्या छोट्या राष्ट्रापासून किती तरी शिकण्यासारखे आहे ! (आपल्या व त्यांच्या असंख्य गोष्टीत (parameters) फरक असला तरी, 'पोलादी नेतृत्व', 'आपल्या देशातील नागरिकांची काळजी व संघभावना' व 'एक राष्ट्र म्हणून स्पष्ट व ठाम भूमिका' ह्या गोष्टींचे महत्व व आवश्यकता वादातीत नाही का ?)
  • विमानाचा फ्रेंच पायलट व कर्मचारी ह्यानी सुटका केली असता जायला चक्क नकार दिला ! 'अजूनही कैदेत असणारे १०० प्रवासी हीसुद्धा आमचीच जबाबदारी आहे' अशी भूमिका पायलटने घेतली आणि त्याच्या सहकार्यांनी त्याला पाठींबा दिला व ते तिथेच राहिले.. ह्या शौर्याबद्दल व आपल्या व्यवसायाशी असलेल्या निष्ठेबद्दलही त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच, पण नंतर सुटका झाल्यावर एअर फ्रान्सने नेमक्या ह्याच कारणासाठी पायलटला काही दिवस चक्क सस्पेंड केले होते !

असा हा नाट्यपूर्ण 'रेड ऑन एन्टीबी' जरुर मिळवून पहा !

घटनाक्रमाची अधिक माहिती :

http://en.wikipedia.org/wiki/Operation_Entebbe

चित्रपटाविषयी अधिक माहिती :

http://www.imdb.com/title/tt0076594/