Jul 27, 2015

मिठातले आवळे

कु. कुंजलतिका तनमुडपे यांचे ‘आवळा: कृती व विचार’ हे पाककृतींपलिकडे जाऊन जेवणानुभुतीबरोबरच जीवनानुभुती देणारे खास नवगृहिणींसाठीचे पुस्तक लवकरच बाजारात येत आहे. ‘खल व बत्ते’ हे त्यांचे वायव्य महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडवून दिलेले पुस्तक वाचकांच्या ओळखीचे आहेच.
दोन्ही पुस्तके घेतल्यास २५% टक्के सवलत तसेच आवळकाठीचे एक पाकिट (लहान साईज) मोफत मिळेल.

 सर्वत्र उत्सुकता निर्माण करणा-या ह्याच पुस्तकातील एक कृती खास तुमच्यासाठी.

 मिठातले आवळे

 साहित्य: ५० ग्राम काजू (नसल्यास भाजलेले शेंगदाणे चालतील)
८ ते १० आवळे. (१० ते ८ ही चालतील. तुम्ही कुठून बघताय त्यावर आहे)
मीठ (आयोडिनयुक्त असल्यास उत्तम. शक्यतो चवीला खारट असावे व दिसायला कतरीना कैफ च्या रंगाहून थोडे कमी उजळ असावे)
एक आकर्षक बाऊल (हा नसला तरी चालेल पण काहीही सर्व्ह करताना हा कृतीच्या शेवटच्या ओळीत सवयीने लागतोच तेव्हा हाताशी असलेला बरा असतो)
एक चमचा (पाहुण्यांना चिवडा देताना वापरतात तसा लहान आकाराचा असावा)
एक स्मार्ट मोबाईल (आवळ्यांच्या विविध अवस्थांचे तरंगते फोटो फेसबुकवर टाकायला)

कृती:
प्रथम दोन तीन काजू तोंडात टाकावेत. त्याने चित्तवृत्ती उल्हसित होतात आणि पाककृती करायला शारीरिक व मानसिक बळ मिळते.
काजू नीट खावून झाल्याची खात्री झाल्यावर बरणी समोर घ्यावी. त्यात बेताबेताने फिल्टर केलेले पाणी साधारण गळ्यापर्यंत येईल असे घालावे. मुंबईत काही विशिष्ट भागांत रहात असाल तर नळाचे पाणी घेऊ नये कारण पाण्याच्या रंगामुळे त्यात तरंगणारे आवळे दिसणार नाहीत.

टीप: बरणी नीट स्वच्छ असावी. त्यात आधी भरलेल्या कडधान्याचे वगैरे दाणे शिल्लक राहिले तर पाण्यामुळे मोड येऊन आवळ्यांची चव बदलू शकते. विशेषत: नवगृहिणींनी असा अनावस्था प्रसंग टाळावा.

आता मोबाईलने बरणी, आतले पाणी तसेच फिल्टर, किचन प्लॅटफॉर्म, टाईल्स, मायक्रोवेव्ह इत्यादी गोष्टींचे विविध कोनात फोटो काढावेत. फोकस, उजेड, क्लॅरिटी अशा फालतू गोष्टींमुळे कुठलाही फोटो बाद न ठरवता ते सर्वच्या सर्व फोटो फेसबुकवर पोस्ट करावेत. शिवाय खाली ‘आज वेळ होता म्हटलं मिठातले आवळे करावे’ अशी कॉमेंट टाकावी.

थोडा वेळ थांबून साधारण पहिला ‘लाइक’ आल्यावर सेलिब्रेट करायला अजून दोन-तीन काजू तोंडात टाकावे. मग आवळ्यांकडे वळावे. आवळे आठ ते दहा आहेत ना ते मोजून एकेक करुन बरणीच्या पाण्यात गरम तेलात लाटलेली पुरी सोडतात तसे सोडावे (तिखटमिठाच्या पु-यांची कृती ‘खल व बत्ते’ मधे पान नं. ६७ वर पहा)
मग चमचा चमचा मीठ सावकाश घालावे. मध्यम आकाराच्या आवळ्याला एक सपाट चमचा असे प्रमाण असावे. त्याच चमच्याने सावकाश ढवळून मिश्रण एकजीव करावे.

टीप: तो ढवळलेला चमचा पुन्हा मिठाच्या बरणीत खूपसू नये.

आता मघाचच्या फेसबुक पोस्टचे लाईक्स चेक करावेत. साधारण पंचेचाळीस लाईक झाले की मग पुन्हा एकदा पाणी ढवळून मिठासकटच्या पाण्याचे फोटो काढून फेसबुकवर पोस्ट करावेत. पुढची पंधरा मिनिटे ‘अगं आत्ता ग कुठे मिळाले आवळे?’, ‘छानच. पण प्रमाण तर सांगशील? किती चमचे पाणी घ्यायचे?’, ‘आता खातानाही टाका सगळ्यांचे फोटो’, ‘ए आवळ्यांवरून आठवले, रणवीर काय क्यूट दिसतो ना बाजीराव मधे’ अशासारख्या कॉमेंट्सना रिप्लाय द्यावेत.

ह्यानंतर पाच मिनिटे श्रमपरिहार करावा व अजून दोन-तीन काजू खावेत.

तरंगणा-या आवळ्यांचे फोटो काढून पोस्टावेत. काही वेळ आवळ्यांचे निरीक्षण करावे. सर्व आलबेल असल्याची खात्री करुन मग पोस्ट चेक करावे. ‘काय गोड कलर आहे गं. आम्ही कालच अश्याच रंगाचा फ्रिज घेतला. नव-याला वाईन कलरचा हवा होता पण मी दुर्लक्ष केले’ अशासारख्या कॉमेंट्स ना गोडगोड रिप्लाय द्यावेत.

टीप: आधी मीठ पाण्यात मिसळून मग आवळे टाकले तर चालणार नाही का? असा एक कॉमन आणि काहीसा आगाऊ प्रश्न मला विचारण्यात येतो. ही एक घातक प्रथा नवविवाहितेंमधे पडते आहे. अंतिम परिस्थिती साधारण तशीच असली (म्हणजे मॅरीड विथ वन किड) तरी लग्न व बारसे त्याच क्रमाने करतात हे इथे लक्षात ठेवावे.

मघाशी काढलेला आकर्षक बाऊल फोटो काढून पुन्हा कपाटात ठेवून द्यावा. आता ‘झाले तुमचे मिठाचे आवळे!’ असे कदाचित तुम्हाला वाटेल पण मध्यम आकाराच्या ८ ते १० आवळ्यांसाठी साधारण २ ते ३ मध्यम आकाराचे दिवस जाऊ द्यावेत. असे दिवस गेल्यावर आवळे चांगले लागतात हा सार्वत्रिक अनुभव आहे!
फेसबुकवर दर तासाने मिठातल्या आवळ्यांचे फोटो काढावेत व फेसबुकावर पोस्ट करावेत. मीठ थेट बरणीत न टाकता वाटीत काढून घेतले असेल तर उरलेले मीठ वापरून बाकीचे खारे काजू करावेत.

मग, आवडली ना मैत्रिणींनो ही सोप्पी पाककृती? ह्या पाककृतीला फार डोके लागत नसल्याने नव-यालाही शिकवायला हरकत नाही!

Jul 19, 2015

सांगतो ऐका!

पुण्यात भर वस्तीत डेक्कनसारख्या मध्यवर्ती भागात घडलेला हा प्रकार! मी स्वत: अनुभवलेला. कुणाही संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यात टचकन पाणी आणेल असा. ह्या भीषण वेगाने होणा-या बदलाला सामोरे जायला आपण तयार आहोत का?

डेक्कन च्या चौकात एक पुस्तकांचे दुकान. नुकतेच नवीन रुपात आलेले. तिथे दुसरी भेट. मी व माझी धर्मपत्नी (पक्षी: बायको).

मागच्या म्हणजे पहिल्या भेटीत ह्या सगळ्याची सुरुवात झालीच होती. त्यावेळी मी चार पुस्तके विचारली. त्यातले एकच मिळाले (इतके काही मी वेगळे वाचत नाही गडे!). एक आऊट ऑफ प्रिन्ट होते (असणारच होते, पण आशा वेडी असते). एकाची एकच प्रत व ती डिफेक्टिव आहे म्हणून नम्रपणे सांगण्यात आले वगैरे. पण हे सगळे शोधताना, विम्बल्डनचे बॉल बॉइज व गर्ल्स जितकी तत्परता दाखवत नसतील इतका चुटपुटीतपणा तिथला इसम दाखवत होता. इथेच माझ्या मनात खळबळ उडाली होती! पुस्तक उपलब्ध नाही म्हणताना तो खजील होत होता (पुन्हा खळबळ!) शेवटी ते एक पुस्तक मिळाल्यावर त्याला माझ्यापेक्षा जास्त आनंद झालेला दिसला (खळबळीचा क्लायमॅक्स!) ह्याविषयी राजच्या ब्लॉगवर वाचले असूनही हा अनपेक्षित अनुभव मी कसाबसा पचवला होता.

घाबरत धडधडत्या अंत:करणाने परवा पुन्हा गेलो. ३-४ पुस्तके घेतल्यावर बिलिंग काऊंटरला. तेव्हढ्यात तोच इसम आला. मला ओळखलेसे वाटले. 'हॅलो सर' अशा भावार्थाचे काहीतरी पुटपुटला. (पुन्हा मंद खळबळ चालू! सौजन्य, तेही गि-हाईकाशी?)

मग झालेला हा संवाद. आतडे पिळवटून टाकणारा:

मी: अं.. वेळ काय आहे तुमची?
(उत्तराची सुरवात 'दुपारी १-४ बंद असते' अशीच असणार अशी पूर्वानुभवावरून खात्री).
तो: सर, सकाळी ७ ते रात्री ९.
(वेडा कुठला. मराठी पुस्तकाचे दुकान आणि मराठी कळत नाही! तू कधी जागा असतोस ते नाही विचारलं! वेळ विचारली वेळ! दुकानाची!)
तो (माझा साशंक चेहरा पाहत): हो सर आणि सकाळी आम्ही खरचं सातला चालू करतो.
(आता माझा बांध फुटायचा बाकी होता. सकाळी ७ ला चालू? म्हणजे फिरायला येऊन घरी परतताना दुकानात डोकावू पाहणा-या वाचनप्रिय मंडळींची, ऑफिसला जाता जाता ठराविक पुस्तक पटकन खरेदी करु इच्छिणा-यांची किंवा गर्दीची वेळ टाळू पाहणा-या वयस्कर व्यक्तिंची अश्या ह्या सगळ्या लोकांची सोय! गि-हाईकांची सोय? देवा अजून काय काय ऐकवणार आहेस)
मी: रंदबधीमसते?
तो: सर?
मी (भावनातिरेकाने कोरडा पडलेला घसा किंवा दाटून आलेला गळा.. ह्यापैकी काहीतरी एक ठीकठाक करत): बंद कधी असते? म्हणजे कुठल्या वारी?
(बरं झालं आज आलो. आज चालू आहे म्हणजे आज वारी तर बंद नसते. नाहीतर खेप पडली असती. फोन करायला पाहिजे होता.).
तो: सर, सातही दिवस चालू असते.
मी: ...
(इथे डोळ्यापुढे अंधारी आली बहुतेक त्यामुळे मी काही बोलू शकत नव्हतो).
मी (मनातल्या मनात तेही हळू पुटपुटत): कु.. कुठल्या शहरात तुमचे दुकान आहे माहीत आहे ना? (मनातले ऐकू गेले की काय त्याला )
तो: ('चुपके चुपके' मधे 'आप गाते भी है' असं शर्मिला टागोरने विचारल्यावर धर्मेंद कसा मान खाली घालून 'कसचं कसचं' असा हसतो, तसा मंद हसत व टरटर करत प्रिंट झालेल्या बिलाचे चिटोरे फाडत): सर, तुमचे इन्वॉईस.
आले की नाही पाणी डोळ्यात?मित्रमैत्रिणींनो,
वरील भागातील अतिशयोक्ती व मूळ (ख-या) प्रसंगाला दिलेली फोडणी हा विनोदाचा भाग झाला. पण मी लिहीले आहे ते 'बुकगंगा' च्या सहाय्याने नवीन रुपात आलेले 'इंटरनॅशनल बुक सर्विस' ह्या डेक्कनवरील दुकानाविषयी. वर सांगितलेल्या चांगल्या गोष्टींप्रमाणेच सुधारणेलाही वाव आहेच (उदा. विखुरलेली पुस्तके नीट लावणे एका लेखकाची एका जागी एकत्र अशी, जी पुस्तके गोडाऊन ला आहेत किंवा उपलब्ध नाहीत म्हणून आली की फोन करण्यासाठी रजिस्टरमधे माहिती लिहून घेतली त्यानुसार ती मागवून तत्परतेने त्यावर फॉलोअप करणे इत्यादी). पण इरादे नेक आहेत अशी जाणीव झाली म्हणून हा पोस्टप्रपंच.

विशेषत: मराठी पुस्तकांसाठी जरुर भेट द्या. ईंटरनॅशनल बुक सर्विस/हाऊस (बुकगंगा डॉट कॉम), डेक्कन, पुणे.