Apr 14, 2012

पकडा-पकडी !


मी: नमस्कार. आपण बनसोडे बोलताय का ?
बनसोडे: बोला.
मी: मी संरजामे. आपण सर्पमित्र, प्राणीमित्र वगैरे असल्याचं ऐकलं. आमच्या बाल्कनीत..
बनसोडे: ते सर्पमित्र वेगळे ! ते छंद वगैरे जोपासतात. लोकसेवा वगैरे. आपला व्यवसाय आहे, आधीच सांगतो !
मी: सांगा ना.
बनसोडे: च्च. तसं नै. लोक नंतर पैशे द्यायला कटकट करतात. म्हणून आधीच सांगतो. लोकांनी पैसे नाय दिले ना तर मग पकडलेला साप तसाच सोडून येतो आपण. मग बसा बोंबलत !
मी: काय सांगताय ?
बनसोडे: मग ? स्वच्छ व्यवहार असतो आपला. क्याश ऑन डिलिवरी !
मी: यू मीन पिक अप ?
बनसोडे: तेच तेच. असं बघा, पकडायचे रेट ठरलेले आहेत. बिनविषारीचे २०० रुपये. विषारीचे ४०० रुपये. पिल्लांचे ५० रुपये..
मी: पिल्लांचे ५० रुपये. विषारी की बिनविषारी ?
बनसोडे: दोन्ही साठी. काये, आपला कुटूंबप्रमुख पोत्यात जाताना पाहून पिल्लं गपगार बसतात, गडबड करत नाहीत असा आपला अनुभव आहे..
मी: म्हणजे गल्लीतल्या दादाला पोलिस व्हॅनमधे बसताना पाहून पंटर लोक कसे संत होतात तसचं.
बनसोडे: करेक्ट. त्यामुळे पिल्लं पकडण सोपं आहे. तर पिल्लं ५० रुपये. झालंच तर मग अजगराचे ५०० रुपये !
मी: मगरीचे किती घेता ?


Feb 20, 2012

झटक्यात...

बडी काली हो रात और फैला हो खौफ
और सिर्फ अंधेराही हो दिलों में छाए
पलट सकता है बाज़ी, उम्मीदका एक दिया
किसीके दिलमें रोशनीका खयाल तो आए

- राफा

Feb 13, 2012

जगावे कसे ते सांग..

जगावे कसे ते सांग, येथे कण्याने ताठ
शेवटास आहे जिथे, आकाशही वाकलेले

फुका आवई नका रे, उठवू ग्रहणाची
बिंब तेजाचे होते.. जरासे झाकलेले !

एकला डाग करतो, कुणा अस्वस्थ रात्री
घोरती निवांत कोणी, नखशिखांत माखलेले

नको बोध तुमचा, जरा चवीने जगाया
अवेळी आहेत अश्रू, आम्हीही चाखलेले


- राफा

Jan 28, 2012

झटक्यात..

लगता है इस कलयुग में
वह भी अपने वादे से मुकर जायेगा
आजकल के कंस, रावण देख
भगवानभी अवतार लेने से डर जायेगा

- राफा


(हिंदीतच सुचले आणि 'झटक्यात' पोस्टले :))

Jan 19, 2012

आजची बातमी आणि..

आजच्या बातमीनंतरच्या 'झटक्यात' :

बरसों बीते, देख रहे हो भ्रष्टाचार
बेटा, इतना तो समझो कमसे कम
नौ महीनें और पाच लाख दिये तो
हो जाय करोडों का घोटाला हजम


बाहर के दुश्मन करे हमसे धोखा तो
पुरी तैय्यारी है, हम उन्हे झेल लेंगे
अंदर के दुश्मन से रहो चौकन्ना यारों
ये साले कसाब को भी ‘बेल’ देंगे

- राफा

पत्र लिहिनेस कारन की मापालिकेचा मासंग्राम !

प्रति :
मान्नीय आमदार भुजंगराव टोपे साहेब उर्फ दादा यासी
शिरसाश्टांग सप्रेम नमस्कार. इशेश इनंती.

कडून :
बबन बैदाबादकर
नगरशेवक

पत्र लिहीनेस कारन की दिवस खराब हेत. मापालिकेच्या निवडनूकांचा मासंग्राम चालू झाला हे. आता हे मी तुमाला काय सांगनार म्हना. आपल्याच तर छायेच्या प्रकाशामदे वाडत वाडत आपन इथवर मजल मारली. आपन ड्वोक्यावर हात ठेवन्याआधी गळ्यात काळा दोरा घालायचो, आता आर्धा इंच जाड सोन्याची चेन आली. तरि पन राज्य लेवलच्या पंचाईतीत असाल म्हनून आठवन करुन दिली. तरी हातच्या काकनाला आरसा दाखवल्याचा आगाउपना झाला असेल तर जाहीर दिलगीरी आधीच मागतो. राग मानू नये.

पुज्य गुंडेबाबांची शप्पत सांगतो की दिवस खराब हेत. कालच जोतिशाकडे गेलेतो तर तो म्हनला ‘अवघडे’. मी म्हनल आर बाबा जे हाय ते वर्तमान नका सांगू, भविश्य सांगा. तर तो म्हनला ‘भविश्यच अवघडे’. आयकून दोनी हातातल्या आटी आंगट्या डोळा लावल्या. आता दोनही हाताच्या चार चार बोटात आंगट्या घालून सुद्दा गाडी रुळावर येईना न्हाई म्हन्जे काय ? दर मयन्याला जे चार पैसे सुटतात त्यातून मार्केटमदल्या गनपतीला पाच टक्के टाकतो. कद्दी चुकनार नाय नेम. परवा टोयटा घेतली तर पैले गुंडेबाबाकडून लाथ मारुन घेतली चारी टायरांवर. फार पावरबाज आन लकी हे त्यांची लाथ. आसा धारमिकपना आन निश्टा पैलेपासुन आपल्याजवळ. तरी पन हे निवडनूकीचे दिवस आलेत ते फार खराब वाटत हेत.

ल्हान तोंडी मोटा घास म्हना हवं तर, पन हा देव पन एक नंबर वस्ताद मानूस हे. आंगट्या घालायला बोट ठेवली आठ आन ग्रह बनवले नवू. म्ह्न्जी काई आरिश्ट आलं तर ज्याची आंगटी घालायची राहिली का तर त्याच ग्रहाचा कोप झाला असं म्हनायला मोकळीक. बेश्ट दिस वगैरे बगून पुज्य गुंडेबाबांकडून स्वता लाथ खानारे. त्याशिवाय काय खरं न्हाई वाटतय ह्या येळेस.


Jan 6, 2012

शाळा !

तर एकंदर दिवस नॉस्टाल्जिक होण्याचे आहेत. नुकतेच आमच्या शाळेच्या आमच्या बॅचचे स्नेहसंमेलन २४ डिसेंबरला पार पडले. माझी शाळा पार्ल्याची 'पार्ले टिळक विद्यालय' ! (अगदी रमाबाई बालमंदीरापासून ते दहावीपर्यंत). त्या स्नेहसंमेलनात पूर्ण वातावरणातच नॉस्टाल्जिया भरलेला होता. (माझ्या मेंदूच्या काही पेशींना मी अजूनही शाळेत आहे असेच वाटते).

कार्यक्रम सुनियोजित असला तरी मी काही 'perform' करायचे ठरवले नव्हते. आदल्या दिवशी झटका आला आणि सुचेल तसे खरडले.. त्यातला काही भाग तिथे वाचताना फार फार आनंद झाला (शाळा सोबत्यांना आणि सोबतिणींनाही ऐकत असताना होत असावा असे त्यांच्या चेह-यावरून तरी वाटत होते :)).

मला वाटते आपल्या सर्वांच्याच शाळेच्या आठवणींत कित्येक समान धागे असल्याने ते माझे लिखाण इथे प्रकाशित करत आहे :

***
मागे वळून पाहताना :

आपण आता सगळेच प्रौढ व साक्षर आहोत. तेव्हा थोडा चावटपणा करायला हरकत नसावी. शाळेचे दिवस आठवताना जाणवतं की आपल्या शाळेत ३ प्रकारच्या मुली होत्या (हे मी नंतर समस्त मुली माझी सामुदायिक धुलाई करतील ही शक्यता लक्षात घेऊनही बोलतोय). मुलींचा पहिला प्रकार म्हणजे ‘आपल्यावर कोणीतरी लाईन मारतोय’ ही जाणीव असलेल्या मुली. (‘अच्छा हे कार्ट बघतयं का सारखं मग त्या दिशेला बघायलाच नको’ इ. विचार असलेल्या). दुसरा प्रकार म्हणजे ‘आपल्यावर कुणीतरी लाईन मारतोय’ ह्याची जाणीव नसलेल्या मुली. आणि तिसरा प्रकार म्हणजे ‘लाईन मारणे’ म्हणजे काय हेच माहीत नसलेल्या मुली ! म्हणजे ‘दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते’ एव्हढ्यापुरताच ‘लाईन’’ शी संबंध असणा-या मुली !

आपल्या शालेय जीवनाची सुरुवात प्राथमिक शाळेत झाली. ‘अभय कमळ बघ’ वगैरेने. ही साक्षरतेची काना मात्रा नसलेली पहिली पायरी. शिक्षण मंडळाला कानामात्रा नसलेलं दुसरं फूल मिळत नाहीये. गेली कित्येक वर्षे अभय आपला कमळ बघतोय !

..आणि माध्यमिक शाळेत काय काय व्हायचे ?

  1. गोलमेज परिषदा व्ह्यायच्या; क्लिष्ट कलमे असलेले ऐतिहासिक तह व्ह्यायचे. इतिहासातल्या लोकांना किती दूरदृष्टी होती पहा. भविष्यात शिक्षकांना पेपर काढणे सोयीचे जावे म्हणून प्रत्येक तहाच्या वेळी त्यांनी किमान पाच कलमे ठेवण्याची काळजी घेतली होती. प्रत्येक कलमाला एक मार्क असल्यामुळे, किमान पाच मार्कांचा प्रश्न घालता यावा म्हणून !
  2. एखाद्या मुलाने गृहपाठ वगैरे न करण्याचे स्वातंत्र्य वारंवार घेतले तर बाई वर्गाबाहेर ‘चले जाव’ म्हणत त्याचा स्वातंत्र्य लढा मोडून काढायच्या. (शिक्षकांबद्दल आदरयुक्त भिती असायची.. काही शिक्षकांच्या बाबतीत भितीयुक्त भिती असायची.. ते सोडा).
  3. गाळलेले शब्द भरायला लागायचे, संधी मिळताच समास सोडवायला लागायचे ! जोड्या जुळवा वगैरे प्रश्न असायचे (काही जण ‘जोड्या जुळवा’ ह्याचा भलताच अर्थ घ्यायचे) बरं काही गोष्टी नुसते सांगून शिक्षक ऐकायचे नाहीत, संदर्भासहीत स्पष्टीकरण लागायचे !