Dec 16, 2011

शॉर्ट फिल्म : टॉईज कम अलाईव्ह !यूट्यूब वर पहा : http://youtu.be/x527bYOPfP0

स्थळ:  पिट्सबर्ग, अमेरिका

काळ: साल २००३ मधील कडकडीत हिवाळा.

झालं ते असं :

मी ‘पिट्सबर्ग फिल्म मेकर्स’ मधे फिल्म मेकींग कोर्स करत होतो. एक शॉर्ट फिल्म प्रॉजेक्ट करायला फारच थोडा वेळ राहीला होता. शूट करायला एक विकएंड आणि एडीट करायला पुढचा एक विकएंड. (ते एडिटींगही जुन्या पद्धतीने करायचे होते. म्हणजे फिल्मचे तुकडे कापून, चिकटवून दृश्यांची जुळणी व फेरजुळणी करणे वगैरे. ते क्लिष्ट, किचकट व कष्टाचे काम करायला इतकी धमाल (!) आली म्हणून सांगू :) .

बाहेर अमानुष बर्फ. नटमंडळी कुणी नाहीत. अशा वेळी ह्या शॉर्ट फिल्म साठी ही कल्पना सुचली. शूट झाले. डेव्हलप केले. एडीट केले (धमाल !)

गेली ८ वर्षे तो ‘रफ कट’ पडूनच होता.. डिजिटल स्वरुपात धर्मांतर झाल्यावर फिल्म चे स्वरुप अजूनच ‘दाणेदार’ झाले होते.. ‘अशी जुनाट फिल्म पहायला कोणाला आवडेल’ ही भिती होती त्यामुळे तो रफ कट त्या प्रश्नासकट तसाच पडून होता आणि दिवसेंदिवस त्या प्रश्नाचे उत्तर ‘कुणालाच नाही’ असेच बळकट होत होते. (आता तर मोबाईल वर पण HD व्हिडीओ घेता येतात म्हणजे प्रश्नच संपला !)


शेवटी धीर करून ह्या आठवड्यात तो रफ कट मी पुन्हा एडीट केला (ह्या वेळेस डिजिटल एडीटींग!). मूळचे ‘स्टॉप मोशन ऍनिमेशन’ तसेच ठेवले व इतर कुठलेही स्पेशल इफेक्ट्स टाकले नाहीत. त्या ‘जुनाट’ स्वरुपाची वेगळीच गंमत वाटली, नॉस्टाल्जिक व्हायला झाले आणि एकंदर खूपच आनंददायक अनुभव होता तो.


तसाच आनंद तुम्हाला फिल्म बघताना वाटेल अशी आशा आहे 


- राफा

ता. क. कृपया ध्वनीसकट पहा.


Dec 7, 2011

झटक्यात : शिट्टी !

काल सांप्रत परिस्थितीचा साकल्याने विचार करत असताना अचानक अशी अनुभूति आली की मला अजून तोंडात बोट घालून जोरदार शिट्टी मारता येत नाही. (शीळ घालून गाणी गुणगुणायला फार आवडते पण ते वेगळे).


शिट्टी ठोकण्याचे हे मुलभूत कौशल्य तज्ञ लोकांकडून शिकायचा मी आत्तापर्यंत दोन-तीन वेळा जुजबी प्रयत्न केला पण इतर फालतू कामांच्या गडबडीत (पैसे कमावणे वगैरे) दर वेळी राहून गेले. ब-याच वेळा आपण प्रायॉरिटीज चुकीच्या ठरवतो ते असे !

आता मात्र दररोज पाच मिनिटे सराव करण्याचा मनसुबा आहे (योग्य वेळ व स्थळ पाहून) !

(‘लग्न शिट्टी न मारताच जमवलेस ना' - इति बायको ! )

ता. क. : “ 'स्थळ'  पाहून शिट्टी ! ” ह्यात काहीही कोटी नाही.


- राफा

Nov 21, 2011

‘आयशॉट’च्या वहीतून - माझा आवडता पकशी !

झुरळ हा पकशी आहे काय ? ह्या अंत्याच्या प्रश्नाने आमी गानगरुनच गेलो. अंत्या मदेच असे पायाखालची जमिन सळो कि पळो वाव्ही असे प्रशन विचारत आस्तो. पर्वा त्याची कटिंग जालेली आसल्याने तेच्या भांगाची लाइन दोन शेतामदल्या बांधासारखी दिसत होति व दोनी बाजूला साइडला हिरवे व मदे काळेकबिन्न अशा कापलेल्या केसांचे शेत त्याच्या डोक्याच्या वरती पसरले होते. खरोखरिच अंत्याचे डोके फारच सुपिक आहे ज्यातून की कुठला प्रशन कोणच्या वेळेस उगवेल हे कोणालाच सांगता येत नाही. (माईणकरच्या मात्र उजव्या मेन्दुची अवाजवी वाढ झाल्याने त्याचा भांग नीट पडत नाही).

आमाला मराठीला आमच्या रुशितुल्य महामरे बाई जाउन चिरके नावाचे आतिचशय हिनसक व मार कुटे सर आले आहेत. पैल्या दिवशीच तुम्चा आवडता पकशी हा निबंद लिहुन त्यानि आणाव्यास सांगितले आसल्याने आमि सर्व विचारान्च्या गरतेत तरंगत होतो. सर तासभर घसा खर वडून ओरडून जाल्यावरती जेवा दुस-या वरगात जाण्यासाठी अंतरधान पावले तेवा अंत्या सरांच्या खुर्चिमदे जाउन बसला व त्याने वरील मऊलिक प्रश्न केला. सरव जण एकमेकानच्या मुकखमलाकडे टका व मका पाहू लागले.

काही झुरळे उडत आसली तरी झुरळाला चोच नसल्याने तो पकशी नाही असे बाणेदार उत्तर ओतुरकरने दिल्यावर अंत्यासुद्दा चकित झाला. मिसुद्दा झुरळ घरटे बांदत नसल्याने तो पकशी नाहीच असे तेजसवी उत्तर दिले. तेवा नेमीच चप्पल अथवा बूट शोधाव्यास उदयुक्त कर्णारे झुरळ कोणाचेच आवडते नसल्याचे सरवांच्या निदरशनास आले. त्यामुळेच त्यावर निबंद लिहू नई कारण की तो पकशी समजा आसला तरी आवडता अजिचबात होणार नाही असे सरवामुनते ठरले. हि भरुन वाहून चाललेली एकि पाहुन मला चवथि यत्तेमदिल एकिचे बळ हा धडा आठवून माजे रुदयही लगबगून आले.

आता आवडता पकशी शोदण्याच्या मोहिमेत गुनतून आमचे मन पकश्याप्रमाणेच कलपनेच्या आकाशात विरहू लागले. वेग वेगळ्या पकश्यांच्या विचार करताना मला तर आतिचशय गोंधळल्यासारखे होवून धडधडू लागले होते. कोणाचा रंग माला आवडे तर कोणाची चोच तर कोणाची शेपूट. कोणाचे आकार मान आवडे तर कोणाची नुस्तीच मान.

मला बगळा हा नेमी आनघोळ करुन भांग पाडल्यासार्खा स्वछ्छ दिसत आसल्याने आतिचशय आवडतो. त्यावरती मी निबंद चालू कर्णार तेवाच लक्शात आले कि त्या पक्शाचे चित्रहि निंबदाशेजारी सरानी काढून आणाव्यास सांगितले आहे. आता पांड-या कागदावरती पांडराच बगळा कसे बरे काढायचा ह्या प्रशनाने माजी दुपारची झोप बगळ्यासारकी उडाली. बगळा उबा राहतो त्याप्रमाने मी कॉटवरतुन एक पाय खालि सोडूनही विचार करुन पाहिले पण पांड-या रंगाचा प्रशन तसाच लटकत रायला. शेवटी मग मी बगळ्याला मनातून हुस कावून लावले व इतर उडणारे प्राणी आठवू लागलो. जन्नी ही शोधाची गरज आहे हे वाटसरे बाईंचे अलवकिक वाक्य आठवून जिव थोडा जिवात आला व मी माजा आवडता पकशी शोधू लागलो.


Nov 19, 2011

प्रतिभा आणि प्रतिमा !

मी लहान असताना दोनच गोष्टींना (विशेष) घाबरायचो. दोन्ही गोष्टी त्यावेळच्या (म्हणजे कृष्णधवल) टिव्हीवर पाहिलेल्या होत्या. एक म्हणजे ‘कल्पनेचा खेळ’ हे नाटक व दुसरे म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा’ ह्या चित्रपटातील ‘नरसूचं भूत’ !

माझी घाबरण्याची स्वतंत्र शैली होती. मी लपून राहणे, घाबरून दुस-या खोलीत जाणे किंवा डोळे हातानी झाकून बोटांच्या फटीतून पाहणे असे काहीही करायचो नाही तर हे असे घाबरणे अपरिहार्य आहे असे कुठेतरी वाटून घ्यायचो. त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम लागले की मी धडधडत्या छातीने ते डोळे विस्फारून पहायचो. ते नाटक तर ब-याच वेळा दाखवायचे. त्यातली ती वाटोळ्या डोळ्यांची, शून्यात वेडसर नजरेने बघणारी व काहीशी तिरकी मान करून बोलणारी आजीबाई अंधूक आठवते.. त्या लहान मुलीला सारखा येत असलेला ताप (मला बरोबर आठवत असेल तर एक नजर वगैरे लागू नये म्हणून असते तशी एक काळी लहान ‘बाहुली’ होती नाटकात). तसाच तो ‘नरसू’ ! तो मालकाच्या मुलीच्या हट्टापायी माडावर भर पावसात चढणारा आणि तो पडून मरण पावल्यावर त्याचे झालेले भूत… आणि ती गाणे म्हणत फिरणारी त्याची बायको..

काल ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ ह्या टिळक स्मारक मंदीरात झालेल्या कार्यक्रमात, मधे मधे दूरदर्शनवरील जुने दृकश्राव्य तुकडे दाखवण्यात येत होते आणि अचानक ‘कल्पनेचा खेळ’ ह्या नाटकातला काही भाग जेव्हा अनपेक्षितपणे डोळ्यासमोर प्रत्यक्ष बघू लागलो तेव्हा काय वाटले हे सांगणे कठीण आहे !

दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळातले निर्माते, दिग्दर्शक, कलाकार ह्यांच्या गप्पांचा हा कार्यक्रम अगदी तुफान रंगला. सुधीर गाडगीळ सूत्रसंचालन करत असलेल्या ह्या कार्यक्रमात सहभागी झाले होते : विनय आपटे, स्मिता तळवलकर, याकूब सईद, अरुण काकतकर, किशोर प्रधान आणि बी. पी. सिंग. 

आयोजक होते 'दि आर्ट ऍंड म्युझिक फाऊंडेशन'.  त्यांना अनेक धन्यवाद !!!

सुधीर गाडगीळ स्वत: तर त्या काळाचे साक्षीदार आहेतच, पण केवळ मूक साक्षीदार नव्हेत तर, अश्या अनेक कार्यक्रमाची रंगत वाढवण्यात त्यांचा दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळापासूनच मोठा हातभार आहे. त्यामुळे त्यांचे बोलणेही अलिप्त औपचारिक ठेवण्यास त्यांना कसरत करावी लागली असणार.. कारण त्यांनाही मधे मधे जुने संदर्भ, व्यक्ती, घटना आठवत होत्याच. पण त्यांचे संचालन नेहमीप्रमाणेच हुकमी एक्यासारखे व दुस-याला बोलके करणारे..

ह्या सर्वांनाच जुने सोबती भेटल्यामुळे झालेला आनंद त्यांच्या देहबोलीतून जाणवत होता. त्यांचे जुन्या आठवणींत मस्त रमणे, भरभरून उस्फूर्त बोलणे, त्यांचे अफलातून किस्से ऐकणे आणि जुने दृकश्राव्य तुकडे पाहणे हा फार छान अनुभव होता..

कालच आमच्या ‘एन्गेजमेण्ट’ ची ‘ऍनिव्ह’ असल्याने नॉस्टाल्जिक होण्यात वेगळाच मज़ा आला ! (माझ्याच ब्लॉगवर मी स्वत:विषयी किती कमी लिहीले आहे हे अलिकडेच मला जाणवू लागले आहे. तसे लिहीण्यासारखे खूप काही आहे असा गोड गैरसमज तसाच ठेवून सध्या हा लेख पुढे लिहीता होतो! )

खरे म्हणजे अश्या कार्यक्रमांचे चिरफाडीच्या जवळ जाणारे ‘विश्लेषण’ वगैरे करु नये. त्याचा आनंद घ्यावा आणि मोकळे व्हावे. नव्हे, तो साठवून ठेवावा आणि कधीतरी त्या आठवणीची कुपी उघडून त्याचा मंद सुंदर गंध घ्यावा व ताजेतवाने व्हावे. त्यामुळे असे संगतवार सांगणे किंवा ताळेबंद मांडणे म्हणजे त्या वेळी घेतलेला मज़ा कमी करण्यासारखे आहे. पण तरीही सर्वात चित्तवेधक गोष्टी सांगण्याचा मोह अनावर होतो आहे.

पहिली गोष्ट म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे गदगदून येऊन भरभरून बोलणारे सर्व जण. दूरदर्शन माध्यमच मुळी त्यावेळी सर्वांना नवीन होते त्यामुळे त्याविषयीचे कुतूहल, औपचारिक/अनौपचारिक शिक्षण, काहितरी नवीन व उत्तम करण्याची उर्मी, बीबीसी च्या तोडीचे काम करण्याचे अप्रत्यक्ष आव्हान व अपेक्षा; तरिही साधने व आर्थिक पाठबळ मात्र तुटपुंजे ! पण त्यामुळेच उपलब्ध गोष्टींतून व सरकारी चौकटीत सर्जनशीलता दाखवण्याची जिद्द ! ह्या सा-याचे दर्शन ह्या सगळ्यांच्या बोलण्यातून होत होते..


Oct 9, 2011

देवास पत्र !

प्रिय देव,

हाय ! वॉट्स अप ?

सॉरी.. म्हणजे 'साष्टांग नमस्कार !' असं काहीतरी तुझ्या सरावाचं गंभीरपणे लिहीणार होतो. पण लोकप्रिय देवळात (‘जागृत देवस्थान’ फेम) पुजारी सदृश्य घामट्ट लोक असतात ना आणि ते भक्तांना नीट दर्शन घेतलेले नसतानाच अंगणात घुसलेल्या गुराला हाकलावे तसे पुढे ढकलतात ना, अगदी तसेच माझे पत्र ‘टिप्पिकल’ दिसतयं म्हणून न वाचताच पुढे ढकलून देशील असे वाटले.. म्हणून जरा लक्ष वेधून घेतले. तर ते असो.

वॉट्स अप ? ‘वरती’ काय चाल्लंय ? काय कसं काय एकूणात ?

हे असं म्हणजे एक विचारण्याची पद्धत आहे.. कारण तसं एकूणात तुझं बरंच बरं चाललं आहे हे दिसतचं आहे ! माझंही ठीक चाललय म्हण ना. लौकिक अर्थाने (म्हणजे अलौकिक अर्थानेही असेन कदाचित) मी ब-यापैकी सुखी वगैरे आहे.

अर्थातच ही सारी तुझीच कृपा रे बाबा ! (असंही एक म्हणण्याची एक पद्धत आहे तेव्हा लगेच शब्द्श: घेऊ नको ! कारण आम्ही सगळेच जण तुझीच 'प्रॉडक्टस' आहोत तेव्हा थोडा फार ‘मेंनेटन्स’ करण्याची जबाबदारी तुझी नाही का ?) पण नाही, आभार प्रदर्शनासाठी मी हे पत्र लिहीले नाही.
होतं काय की तूच दिलेल्या ज्ञानेंद्रियांचा वापर करून जगात एकूणच जे काही चाललं आहे ते समजतं... बोचणारं, खुपणारं.. मनाला भसकन भोसकणारं. हे सर्व म्हणजे गरिबी, क्रौर्य, अस्वच्छता, अन्याय, धर्मांध/सत्तांध श्वापदं, अंसवेदनशीलता... त्यातून निर्माण होणा-या वेदना, निराशा, चिंता, मनस्ताप, लाचारी, हतबलता वाहणारी माणसं. प्रत्येकाचे ओझे वेगळे.. रस्ते वेगळे, काटे वेगळे.
हे सगळं.. बघवत नाही रे ब-याच वेळा. म्हणून तुला पत्र लिहीण्याचे ठरवले. काहितरी केले पाहिजे ना ? दुस-यांची दु:खं नुसताच पाहत राहिलो तर तुझ्यात आणि आमच्यात काय फरक राहिला ?
रिअली.. थॅंक गॉड की मी देव नाही ! तूझेच आभार तू मला 'तू' न बनवल्याबद्दल !
बरं सर्वात आधी एक गोंधळ दूर कर बघू.. नक्की कुणी कुणाला तयार केलं ?

म्हणजे.. तू आम्हाला का आम्ही तुला ?


Oct 3, 2011

तीच ना ती ?

लाल हिरवे, कधी निळे वस्त्र ल्यालेली
कांती ती सावळीशी, सोन्यात न्हालेली

बर्फाळ थंडीतच, तारुण्य फुलते तिचे
गारठते कमनीय कोमलांग नितळ तिचे

वस्त्र जरासे तोकडे, चिकटून अंगास बसते
सख्यांसवे खेळता, कधी ती किणकिण हसते

त्या थंड तुषारांत, अशी ती थिजलेली
नायिकाच जणू ती, पावसात भिजलेली !

सलज्ज उभ्या तिने, धरला अबोला जरासा
उघडता मुखकमल होई सुंदर ध्वनी खासा

फेसाळत उसळली अन ती यौवनलाट आटली
लोकहो, सावरा ! ही तर बिअरची बाटली !


- राफा


Sep 26, 2011

Aug 5, 2011

नवीन चित्र


माध्यम : जलरंग (Watercolor)

(प्रेरणा: प्रसिद्ध चित्रकार श्री. मिलिंद मुळीक यांचे जलरंगांविषयीचे पुस्तक)


Jul 11, 2011

Mar 30, 2011

गल्ली क्रिकेटचे नियम !

गल्ली क्रिकेट मधे अनेक पोटविभाग असतात. ते ‘ट्वेंटी ट्वेंटी’ किंवा ‘वन डे’ असे नसतात कारण सहसा गल्ली क्रिकेटचा सामना एका दिवसात कधीच संपत नाही. अंधार झाल्यामुळे किंवा आत्ता फलंदाजी करणारा भिडू सांगितलेले महत्वाचे काम विसरला आहे, हे त्याच्या मातोश्रींच्या लक्षात आल्याने सामना संपतो. त्यामुळे, दर दिवशीचा खेळ ‘कालचा सामना पुढे चालू करायचा’ का ‘नवीन डाव सुरु करायचा’ ह्या चर्चेपासूनच चालू होतो.

गल्ली क्रिकेटचे पोटविभाग मुख्यत: स्थळानुसार बदलतात. गल्ली जिथे संपते तिथे म्हणजे ‘डेड एंड’ वर खेळली जाणारी लाइव्हली मॅच; सिमेंट किंवा फरशांच्या जमीनीवर सोसायटीत खेळला जाणारा दररोजचा सामना; शाळेत मधल्या सुट्टीत रंगणारे अतिझटपट क्रिकेटचे सामने असे त्याचे स्वरुप बदलत असते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट आता बरेच गुंतागुंतीचे व नवनवीन नियम असलेले झाले आहे. पण पारंपारिक गल्ली क्रिकेटचे नियम व क्षणाक्षणाला पलटणारी बाजी पाहिली तर ते नक्कीच आंतरराष्टीय क्रिकेटला
यष्टीचीत करणारे असेल.

गल्ली क्रिकेट खेळण्यासाठी त्याचे एकंदर वातावरण व आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तोंडात मारतील असे नियम व पोटनियम समजून घेणे जरुरीचे आहे:

 1. केवळ क्रिकेटच्या सामानाची कमतरता ह्यामुळे सामना सुरु व्ह्यायला कधीही उशीर होत नाही. शाळेत दफ्तरांची रास करून त्याचे स्टंप होतात. परीक्षेनंतर अचानक सामना ठरला (बहुदा एका ‘तुकडी’ ने दुसरीला चॅलेंज फेकले म्हणून) तरी काही क्षणातच रुमालाचा चेंडू व परीक्षेसाठी आणलेल्या ‘पॅड’ ची बॅट होते.
 2. गल्ली क्रिकेटमधे ज्याची बॅट सर्वात चांगली त्याची पहिली बॅटींग असते.
 3. सोसायटीत सर्वात वरच्या मजल्यावर राहणा-या डॉ. गोगट्यांच्या गाडीला फटकावलेला चेंडू आदळला तर फलंदाज बाद होतो !
 4. चेंडू ‘मृत’ होण्याची वाट न बघता, धाव काढल्या काढल्याच नुसती बॅट टेकवून इकडचा फलंदाज तिकडच्याशी हितगूज करायला कधीही जाऊ शकतो.
 5. जिथे सर्वात जास्त ‘शॉट’ मारला जाण्याची शक्यता असते नेमक्या त्या दिशेला व त्या उंचीवर सोसायटीतल्या सर्वात रागीट आणि ‘सरकलेल्या’ बि-हाडकरूच्या खिडकीची काच असते. (दर वेळी काचेला बॉल लागल्यावर क्रिडांगणात हमखास पांगापांग होते)
 6. पत्र्याचा डबा, जमीनीत खोचलेल्या दोन लहान फांद्या, किंवा खडू अथवा विटकरीने भिंतीवर काढलेला आयत हे ‘स्टंप’ होऊ शकतात.
 7. ‘थर्ड अंपायर’ हे बहुदा गॅलरीत मळकट बनियन मधे बसलेले सुखापुरे आजोबा असतात.
 8. ‘स्लेजिंग’ हा नियम असतो व ‘जेंटलमन्स गेम’ हा अपवाद असतो.
 9. ‘हूक शॉट’ वर बंदी असते कारण क्रिडांगणाच्या आकारामुळे अशा शॉट मधे, बॅट ही जवळच्या फिल्डरला लागू शकते.
 10. ‘बेल्स’ नवीन ‘किट’ असेल तर फार तर आठवडाभर वापरल्या जातात. नंतर त्यातली एक हरवते किंवा दर वेळी लावायचा कंटाळा येतो त्यामुळे फारच अभावाने वापरल्या जातात.
 11. उत्कृष्ट मारलेला शॉट जर पलिकडच्या झोपडपट्टीत किंवा गटारात किंवा पलिकडच्या वाड्यातल्या विहीरीत वगैरे गेला तर फलंदाज बाद होतो.
 12. भाजी घेऊन संथपणे येणा-या काकू काही काळ सामना स्थगित करू शकतात.
 13. ‘टिम्स’ पाडताना एक अष्टपैलू भिडू असा असतो जो दोन्ही बाजूच्या कर्णधारांचा पहिला चॉईस असतो त्यामुळे अपेक्षित निवड झाल्यावर तो विजयी मुद्रेने आपल्या नवीन कर्णधाराकडे जातो.
 14. क्रिडांगणाची एकंदर भौगोलिक मर्यादा लक्षात घेता, षटक संपल्यावर इकडचा फलंदाज तिकडे जातो आणि तिकडचा इकडे. गोलंदाजी नेहमी एका बाजूनेच करायची असते.
 15. ‘नो बॉल’ नसतोच कारण ब-याच वेळा गोलंदाजाच्या बाजूला आखलेल्या रेषा वगैरे नसून फक्त एक दगड ठेवला जातो. (क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू, गोलंदाज ह्याच दगडावर पाय ठेवून झेलतो तेव्हा ‘सर्कीट’ पूर्ण झाल्यामुळे अजून न पोचलेला फलंदाज धावचीत होतो असा नियम आहे)
 16. त्या दिवशी सर्दी खोकला वगैरेने माफक आजारी असलेल्या मुलाला अंपायरगिरी करायला खाली उतरावे लागते. इतर वेळी, नियम माहित असणे ह्यापेक्षा न रुचलेल्या निर्णयामुळे अंगावर धावून येणा-या आक्रमक खेळाडूंना शांतपणे तोंड देण्याची क्षमता असणा-या भिडूला अंपायर केले जाते.
 17. उत्तुंग षटकारानंतर चेंडू दाट झाडीत किंवा छपरावर वगैरे गायब झाला तर फलंदाजाच्या वाट्याला कौतुकाऐवजी नवीन चेंडूचा खर्च येऊ शकतो. शिवाय, ‘साला वानखेडेवर खेळल्यासारख्या स्टाईली करतो. आम्ही पण हाणू शकतो असे शॉट्स’ असे शेरे ऐकावे लागतात.
 18. दुस-या मजल्यावरून एखादा मोहक चेहरा जर सामना बघत असेल तर खेळाडूंच्या कौशल्यात अचानक वाढ होऊन सामना अगदी चुरशीचा होतो. (मॅच नंतर काही ‘फिक्सिंग’ होईल का ह्याची स्वप्ने प्रत्येक भिडू खेळताना पाहत असतो.)
 19. ‘कस्ला मारला ना मी’ अशा नांदी होऊन मग दोन तीन वेळा त्याच त्याच ऍंगलने फलंदाजाकडून एखाद्या फटक्याचा ‘ऍक्शन रिप्ले’ पहायला लागतो.
 20. जुन्या चेंडूचा पिचून नैसर्गिक मृत्यू झाला तरच वर्गणी काढून नवीन चेंडू घेतला जातो नाहीतर ज्याच्या चुकीमुळे चेंडू गेला त्याने तो ‘भरून’ द्यायचा असतो.
 21. एकच बॅट चांगली व त्यामुळे सर्व फलंदाजांची लाडकी असते. त्यामुळे दर वेळी एक धाव घेतली की बॅटींची अदलाबदल करण्याचा कार्यक्रम होतो.


- राफा


 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा


Mar 29, 2011

त्या दिव्याखाली..

माझ्या घरासमोरच..

त्या पांढुरक्या, क्षीण दिव्याखाली
संध्याकाळी जमतात
रोज तीच ती..

जवळजवळ विझत आलेली माणसं.

सुरकुतलेल्या हातांची,
भेगाळ चेह-यांची,
कृश, थरथरणा-या शरीरांची

अजूनही जिवंत असणारी..  ती माणसं.

सुकल्या, पराभूत तोंडांनी
आजूबाजूला वाढणा-या अंधाराकडे बघणारी,

कुठेतरी शून्यात नजर लावून
आयुष्याच्या चुकलेल्या गणिताची
पायरी न पायरी मूकपणे
पुन्हा पुन्हा तपासणारी,

रोज एकत्र जमून, एक शब्दही न बोलता
तशीच परत जाणारी..

ती माणसं..

त्यांचे गेले ते बहुतेक दिवस
कठीण. शुष्क.
खड्यांसारखे..

वेचून वेचून फेकून द्यावेसे..
पण तेच आठवून आठवून सारवत बसतात

ती माणसं..
रोज संध्याकाळी..
त्याच पांढुरक्या क्षीण दिव्याखाली.

अचानकच,
मधेच कुणाला तरी आठवतो
कधीतरी आलेला, एखादा.. अगदी एखादाच,
शुभ्र तांदूळाच्या दाण्यासारखा एक दिवस.

त्या दिव्याखालच्या अंधाराला
मग दोन चार शब्द फुटतात
काही क्षण लकाकतात बोलणाराचे डोळे
काही क्षण तरारतात ऐकणा-यांची मने

आपण नियतीला आयुष्यात एकदाच
पण कसे अगदी साफ हरवले..
ती अस्पष्ट कहाणी ऐकताना
काहीसा सुखावून
तो दिवाही फरफरल्यासारखा वाटतो

काहीच क्षण..
मग पुन्हा अस्पष्ट प्रकाशात,
अंधार ठळक जाणवू लागतो..

..

तो डोक्यावरचा पांढुरका क्षीण दिवा,
आता लवकरच जाईल..

पण वाटतं,

तरीही जमतीलच रोजच्या रोज
ती माणसं..
तो नि:शब्द काळोखच बहुतेक
त्यांना उबदार वाटतो आताशा


विझत आलेला दिवा शेवटी शेवटी
अंधाराचा मित्र होत जातो..


- राफा


Feb 23, 2011

कुठल्या विषयाचा तास ?

लाल स्कूटीवालीकडे पाहताना
माझा मित्र ह्या जगात नसतो
दूरवरची स्वप्ने रंगवताना तो
नवकाव्याइतका गूढ हसतो..

खरं तर ‘ती’ ह्या विषयात तो
तोंडी नि लेखी परिक्षा देईल
अगदी एकही मार्क गेला तरी
काय वाट्टेल ती शिक्षा घेईल

पण ओळख कशी करावी
हे गणित त्याला सुटत नाही
ह्या आर्किमिडीजच्या तोंडून
‘युरेका’ काही फुटत नाही

हे असे सामान्य ज्ञान कमीच
म्हणून प्रयत्नाना बसते खीळ
कोण? कुठली? जाणण्यासाठी
मग होतो तो अगदी उतावीळ

मी म्हणतो, तिची माहिती काढूच..
पण सध्या जरा शांत रहा ना..
तिच्या घराण्याचा इतिहास जाऊ दे
तू आत्ता समोरचा भूगोल पहा ना!

जोशात येऊन तो गर्जतो ह्यावर,
नको जॉग्रफी आणि नको हिस्ट्री!
जाऊन थेट विचारतोच तिला
मग जुळेलच आमची केमिस्ट्री!

आता बघशील, लवकरच आम्ही
लग्नात एकमेकाना घास देऊ
आणि रात्री प्रौढ साक्षरता वर्गात
शारीरिक शिक्षणाचा तास घेऊ !


- राफा

 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा