Mar 27, 2013

झटक्यात


तकदीरमें थी वही पुरानी यारी
यह बात हमने तब जान ली
हम तो चले थे मुँह छुपछुपाये
मगर गम ने शक्ल पहचान ली

- राफा

Mar 18, 2013

गुटर्रर्रर्र‘गो’ !


पक्षी सहसा उडू शकतात.

कित्येक तासांच्या अथक सूक्ष्म निरिक्षणानंतर मी हे संपूर्ण वैज्ञानिक असे ठाम मत बनवले आहे. आता पक्षाने किमानपक्षी उडावे ही अपेक्षा विश्वसुंदरीने किमान नाकी डोळी नीटस असावे इतकी माफक नाही का ?

पक्ष्यांबद्दल मला साधारण तेव्हढीच माहिती आहे जेव्हढी त्यांना माझ्याबद्दल. उदाहरणार्थ, मी ‘सहसा उडत नाही’ हे त्यांना माहित आहे.

‘पक्षी उडू शकतात का?’ असा संशय येण्याइतके काही पक्षांचे पाय जमिनीवर असतात ! उदाहरणार्थ कबूतर !

कबूतर हा पक्षीविशेष रस्त्यावरच जास्त फिरत असतो, विशेषत: रस्त्याच्या अगदी मध्यावर. लहान शिकाऊ बालके कसे ‘चाला चाला’ (‘च’ चहातला) करत सराव करतात, तसे ते कबूतर डुलत डुलत, गुबगुबीत ढेरी सांभाळत चालत असते. एकतर रस्त्याच्या मध्यावर असते नाहीतर ‘लंच टाईम’ असेल, तेव्हा म्हणजे दुकानदार वाणी लोक दाणे टाकतात तेव्हा, किराणा धान्याच्या दुकानासमोर!

आता समजा, तुम्ही चारचाकी चालवत आहात आणि लांबूवरून रस्त्याच्या बरोबर मधे असलेले कबूतर तुम्हाला दिसले तर सहाजिकच तुमच्या मनात खळबळ माजते. खरं म्हणजे, झुरळ किंवा माशी वगैरे हवेत काही क्षण संचार करणारे वाह्यात नमुने सोडले तर एकदंर उडणा-या जीवांचे आणि तुमचे काही वाकडे नाही ! प्राण्यांबद्दल तुमच्या मनात असलेली भूतदया तुम्ही ‘एक्स्टेंडेड वॉरंटी’ सारखी पक्ष्यांपर्यंतसुद्धा ताणू शकता.. पण जर ते निमूटपणे उडत असतील तरच!


Mar 15, 2013

झटक्यात


गाठलेच त्यांनी मला, पण एव्हढा पोच होता
वार पहिला कुणाचा... हाच संकोच होता

कोरले शब्द खोटे, त्यांनी थडग्यावरीही
कोरावया पण टोकदार खंजीर तोच होता

- राफा

Mar 8, 2013

लोकल इश्यू !


आज एकदम दोन गोष्टी आठवल्या! 

दोन्ही आठवणी एकाच विषयाशी निगडीत: मुंबईमधील 'लोकल' सेवा !

आठवण क्र. एक :

काही वर्षांपूर्वी जनरल गप्पा मारत असताना एका मित्राशी माझी अचानक तात्विक चर्चा चालू झाली (म्हणजे वाद/उहापोह…जाज्वल्य मते व मतांतरे… कॉफी… पुन्हा उहापोह वगैरे वगैरे).

विषय होता : मुंबईमधला लोकल प्रवास, त्याचा दर्जा, सोयी व सुविधा वगैरे.

त्याचे म्हणणे असे की लोकसंख्याच इतकी आहे की काही पुरे पडत नाही. गाड्या किती वाढवणार ? शिवाय एक चतुर्थांश लोक अडाणी, अशिक्षीत (किंवा दोन्ही) असतात. ते सध्या असलेल्या व नव्याने दिलेल्या साधनांची वाट लावतात. रेल्वे प्रशासन तरी कुठे कुठे पुरे पडणार वगैरे.

त्याच्या ब-याच मुद्यांशी मी सहमत होतो. एक ठळक मुद्दा सोडला तर:

‘रेल्वे प्रशासन कुठे कुठे पुरे पडणार आहे?’

‘कुठे कुठे पुरे पडणार आहे’ म्हणजे काय ? रेल्वे म्हणजे सरकारी यंत्रणेचाच भाग आहे ना ?

तुम्ही केंद्र, राज्य, पालिका इथे सरकार व प्रशासन स्थापन करावे म्हणून कुणी उपोषणाला बसले होते काय ? का देव पाण्यात ठेवले होते ? ‘यंदा तुम्हीच व्हा गडे कारभारी’ असा गोड आग्रह केला होता का कुणी ?


Mar 2, 2013

झटक्यात दोन इनोद !

तर, येस, आय्याम गिल्टी ! सुमारे नऊ महिन्यात काहीही लिहीले नाहीये ब्लॉगवर.. त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट (माझ्यासाठी) म्हणजे WIP (काम चालू म्हणून रस्ता बंद) असं अर्धवट लिखाण झालं आहे (अर्धवट हे लिखाणाचे विशेषण आहे, लेखकाचे नव्हे ) त्यामुळे ते पूर्णत्वास जाईलच कधीतरी...

तर, तोपर्यंत धुगधुगी रहावी म्हणून हे पोस्ट (फेसबुक वरच्या मित्रमैत्रिणींकडे 'अटकपूर्व जामीन' मागत आहे  त्यांनी हे आधी वाचले असेल तिथे तर ) :

तर,

प्रत्येकी सुमारे साडेतीन सेकंदात सुचलेले हे दोन इनोद (वाचून रडू फुटल्यास मला जबाबदार धरू नये :) ):

१)
तो जमाना ७० च्या दशकाच्या अगदी सुरुवातीचा ! जेव्हा डासांचा सुपरस्टार हिरो जवळजवळ प्रत्येक डासीणीच्या मनावर अधिराज्य करत होता. (सोयीसाठी आपण त्याला डासेश फन्नाम्हणू). 

अशाच एका रम्य रात्री, गाढ झोपलेल्या बंडोपंताच्या हातावर बसलेली एक नवतरुणी डासीण डासेशच्या विचाराने व्याकूळ झाली होती. न रहावून तिने निर्णय घेतला आणि बंडोपंताना चावून नुकत्याच बाहेर काढलेल्या रक्ताने ती डासेशला निर्वाणीचे प्रेमपत्र लिहू लागली. 

एव्हढ्यात, उडत उडत तिची भुकेली डासीण आई तिच्या शेजारी येऊन बसली आणि म्हणाली कित्ती वेळा सांगितलयं तुला... अशी अन्नाची नासाडी करु नये !

२)
प्रथमच लहानश्या खेडेगावात आलेला चिमुकला पिंटू, एक गोठा पाहून आईला विचारतो "हे काय आहे?". 

त्यावर त्याची आई ('कित्ती कित्ती चौकस माझं शोंदड ते' छाप भाव चेह-यावर आणत) उत्तर देते "मघाशी नै का बैल नावाचा ऍनिमल पाहिलास... तो बैल दिवसा शेतात काम केल्यावर रात्री इथे गाई गाई करतो !"


(आमेन ! :) )- राफा