Jul 8, 2009

आयशॉटच्या वहीतून - विदन्यान आणि हिवाळा

आयशॉट !

सहावी 'ड' मधल्या ‘आयशॉट’ ला सारखे ‘आयशॉट’ म्हणायची सवय (‘आईशप्पथ’ चा झालेला तो अपभ्रंश). जसे जसे त्याच्या वह्यांतून सापडते तसे तसे त्याचे लेखन आम्ही प्रकाशित करत असतो. अगदीच वाचता येणार नाही तिथेच फक्त शुद्धलेखनाच्या चुका सुधारतो.. पण सर्व लिखाण त्याचेच.. त्याच्याच मनातले थेट वहीत उतरलेले.

त्याला स्वत:लाही त्याचे ते टोपण नाव ‘आतिचशय’ आवडते : आयशॉट !

***

निबंद लिहाव्यास सांगितला की माला आगदी प्राण घशापाशी येतात असे वाट्टे. पानचाळ सर आमाला नेमी नेमी निबंद लिहाव्यास सांगतात व स्वता टेबलावरती मान ठेवून झोपी जातात. ढापण म्हण्तो की ते अशा वेळी आगदीच सीता सयंवर इन फुजी कलर ह्या सिनेमामद्ल्या कुंबकरणासारखे दिस्तात असे म्हण्तो. (ढापण स्वताही चशमा लावलेल्या कुंबकरणासारखा दिसतो वर गात झोपतो तेवा). काही वेळा काही समाजकनटक मुले सरांच्या झोपण्याची नक्कल करितात ते त्यांना आजिचबात शोभत नाही. गुरुजनान्नी जरि मान टाकली तरि आपण मान ठेवावयास नको का ?

पानचाळ सर वर गात कदि कदि जागे आस्तात तेवा आतिचशय शांतता माज्लेली आसते. पण आज तास सुरु होऊनही खूप वेळ निघून गेला तरी सरांचा ठाव व ठिकाणा नवता. मग काही समाजकनटक मुलानी ऑफ तास असल्याची अफवा उठविली. पण टिवीवर सार्खे सार्खे सांगतात त्याचप्रमाणे आमी अफवेवर विशवास ठेवला नाही तसेच कुठल्याही सनशयास्पद वस्तूला हातही लावला नाही.

भाहेर आतिचशय कडाक्याचा पावूस पडत होता. आमी सवंगगडी खिडकीजवळ जमाव करून बाहेरील गोगल गायी बघू लागलो. गोगल गाय हा कधी भू तर कधी उभय चर प्राणी आसतो. तो नेमीच सरपटी जातो. उतक्रानतिचे टप्पे पडण्याआधी सगळेच जण सरपटी जायचे असे अंत्या म्हणाला. (वर राणारे भिंगार्डे आजोबा आहेत त्यांची घरी आजींपुडे गोगलगाय होते असे सगळे मोठे लोक म्हणतात बिलडिंगमदले. मी एक्दा लपून बघणारे की ते घरी सर्पटतात का ते म्हन्जे त्यांची उतक्रानती झालीये का ते लगेच कळेल. चवकस दुष्टी हे विदन्यानिकाचा गुण आहे असे विदन्यान्याच्या वाटसरे बाई म्हण्तात) अंत्या वाईट म्हण्जे आतिचशय हुशार आहे. जितू म्हणला की अंत्या नेमी मशिन लावून नांगरल्यासार्खे केस कापतो त्यामुळेच त्याचे डोके सुपीक झाले आहे. तो साच्लेल्या पाण्यातून तसेच कोरडवाहू जमीनीवरून सर्पटत सर्पटत चालू शकतो. (तो म्हन्जे अंत्या नव्हे तर गोगल गाय हा प्राणी).

असे आमचे गोगल गायिंचे विदन्यानिक कोनातून बघणे चालू आस्ताना अंत्याने गंबिरपणे एक मऊलिक प्रश्न केला की तो म्हण्ला की तुमी कधी विचार केलात का तुमी की गोगल गायी आपल्याकडे कशा कोनातून पहात आसतील? खरोखरच अंत्याचा मेंदू चवकस व धारदार आहे. मग जितू म्हणला की गोगल गायीना तर आपण राकशस वाटत आसणार. (आणि ढापण म्हन्जे चश्मिस राकशस. कुम्बकरण कुठचा)

ढापण काही बोलणार एवड्यात खेकसण्याचा आवाज आला. पानचाळ सर वर गात आले होते. सार्याना पळो की सळो झाले. मी घाबरून कसाबसा लपून गोगल गायीसार्खा सर्पटत सर्पटत माझ्या शेवटच्या बाकापरयंत पोचलो व चडून बसलो. सराना झोप आगदीच आसह्य होत होती असे त्यांच्या डोळ्यांकडे व हाल चालीकडे बघून वाटले. आमाला पुरेसे ओरडून झाल्यावर्ती त्यान्नी आम्हाला हिवाळा ह्या विश्यावर निबंद लिहावयास सांगितला व नेमीप्रमाणे टेबलावर मान टाकली.

आता पावूस पडत आस्ताना हिवाळ्याचे दिवस कसे बरे आठवणार ? पण सरांच्या गळ्यात घंटा कोण बांदणार ? त्यामुळेच आम्ही मुकाटपणाने लिहू लागलो.

हिवाळा हा रुतु माला आतिचशय आवडतो. आगदी सुरुवातिला थंडी पडते तिचा रंग गुलाबी आसतो. खरे म्हन्जे माला थंडी मला दिसतच नाही कदी तर रंग कसा कळणार ? पण सगळेच गुलाबी म्हणतात म्हन्जे ते खरे आसणार. हिवाळ्यात लोक कपडे घालतात जे की इतर रुतुत घालत नाहीत (लोकरीचे असे लिहावयाचे राहिले ते कंसात लिले आहे)

विशेश्ता मुसळधार थंडी पडते त्या दिवशी लोक लोकरीचे कपडे घालतात. उन व पावूस आकाशामदून जमिनिकडे खाली येतात. तशी थंडी कुठून येते ते कुणालाच समजत नाही. पण नोवेम्बर मैन्यात ती खाली येऊन साचू लागते व वारा वायला की इकडून तिकडे जाते. बकरी हा आतिशय उप्योगी पाळीव पशू आहे. तो दुध तसेच लोकरीचे गुंडे वगैरे उपयोगी गोशटी रोज सकाळी आपणास देतो. लोकरीच्या गुंड्यापासूनच कपडे बनतात नाहीतर हिवाळ्यात लोकानी काय केले आस्ते ह्याचि कल्पनाच कर्वत नाही. गाय हाही आतिचशय उपयोगी पशू आहे पण तो लोकर देत नाही तर फक्त दूध देतो. गोगलगाय तर दूध व लोकर दोन्ही देत नाही त्यामुळेच तो हिवाळ्यात भूमिगत होवून दिसेनासा होतो. फक्त पावूसाळ्यात कळपाने बाहेर पडतो.

हिवाळ्या रुतुमधे फळे तसेच फळावळ आतिचशय छान मिळतात. फळांमदूनच आपणास वेग वेगळ्या आक्शरांची जिवनसतवे मिळतात. (ती ह्या वरशी सामाईला पाच मारकांना आहेत). हिवाळ्यात दिवाळी, नाताळ, बालदीन, ख्रिसमस असे सणासुदीचे दीन येतात. तेव्हा शाळेला मधे मधे सुट्टी आसल्याने सरवत्र मंगलमय वाता वरण आस्ते. सुट्टीच्या शेवटच्या दिवशी मात्र प्राण आगदी घशाशी येतात. कारण पहिल्या दिवशी सर्व बाई आणि सर सामाई परिकशेचे तपासलेले पेपर वाटतात. अंत्या नेमी पैला येत आसल्याने तो मात्र आतिचशय खूश आसतो.

हिवाळ्यात दरडी व कडे कोसळत नसल्या ने तो पावूसाळ्या सार्खा प्राण घातक रुतु नाही. तसेच थंडीमुळे शेवाळे व निस रडेपणा होत नाही. त्यामुळे पुटफाथ वरुन जाणारी वाने व रसत्यामधून जाणारे पादचारी ह्यांची पडझड होत नाही. तसेच उनाचा त्रास होवून उशमाघातही होत नाही. थंडीच्या रुतुत सर्व पदारथ प्रर्सण पावू लागतात. त्यामुळेच हिवाळ्यात मुले गुट गुटीत व सुदरुढ होण्यास चालना मिळते.

फक्त शाळेत जाताना माला माकडटोपी घालायाला अजिचबात आवडत नाहीत. कारणकी तशी टोपी घालून निट आयकू येत नाही. मी रिकशासाठी उभे अस्ताना समोरचे जे राणारे आहेत तेंच्याकडे आलेली ती मुलगी जी माज्याचएवढीच आहे ती बाहेर येउन बघते आणि माज्याकडे पावून तोंडावर आडवा हात धरून हासत बसते. मग मी चिडून माकडटोपी काढूनच टाकतो पण थंडी जोरात येउन कानावर वाजते. परवाच्या सकाळच्या दिवशी ती हासता हासता म्हणाली की आमाला माकड आणि टोपीची गोशट माला माहितच आहे मुळी असे म्हणली. मी चिडून तिला मारावयाला जाणार होतो पण त्यांच्या बंगल्यात अल सेशन कुतरा आहे. तो पाळिव आसला तरी मोठा पशू आसल्याने मी राग खावून टाकला व थंडीपासून प्राण वाचवण्याकरिता कान दाबून ठेवले. हिवाळ्यामुळेच माला वाईट साईट न आयकणार्या माकडाप्रमाणे कानावर हात ठेवायची शिकवण मिळाली.

असा हा हिवाळा रुतु माला खूप खूप आवडतो मितर व मयत रिणीनो.

आयशॉट उरफ राफा – सहावी ड
 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा