Feb 21, 2010

बातम्या: २१ फेब्रुवारी २०५०

बातम्या: २१ फेब्रुवारी २०५०

 मुंबई (दि. २०): सध्या महाराष्ट्राच्या दौ-यावर प्रथमच आलेल्या जर्मनीच्या उद्योगमंत्री कुमारी मार्गारेट गुटेनबर्ग ह्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

काल महाराष्ट्राचे उद्योगमंत्री बबन ढमढेरे त्यांचे स्वागत करण्यास विमानतळावर गेले होते. तेव्हा ढमढेरे ह्यांना पानाचा तोबरा अनावर झाल्याने ते कु. मार्गारेट ह्यांच्या पायाशीच पाचकन थुंकले. पानाच्या लाल रंगामुळे, ढमढेरे ह्यांना रक्ताची उलटी झाली असावी असे वाटून घाबरलेल्या कुमारी मार्गारेट भोवळ येऊन पडल्या होत्या. भक्कम हाडापेराच्या कुमारी गुटेनबर्ग ह्या श्री. ढमढेरे ह्यांच्यावरच पडल्याने त्यांचाही जीव काही वेळ कासावीस झाला होता.

अजूनही, आज २०५० सालीही महान भारतीय संस्कृतीबद्दल पाश्चात्य देशात किती घोर अज्ञान आहे ह्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ‘विविध आवाज काढून कुठेही कसेही थुंकण्याचे स्वातंत्र्य’ ह्या गोष्टीचा आदर करायचा का मूर्खासारखी किळस वाटून घ्यायची असा प्रश्न विचारला जात आहे.

२०१० साली सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबद्दल रु. १००० दंड होता हे ऐकून तरुण वाचकांना कदाचित आश्चर्य वाटेल. तेव्हापासून ते २०२२ पर्यंत महाराष्ट्राच्या शहरी भागात एकूण सात जणांवर दंडाची कारवाई करण्यात आली. इतकी कठोर कारवाई केल्यानंतर चळवळ करुन हा अमानुष कायदा बदलण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याविरुद्धचा कायदा केव्हाच रद्द केला असला तरी परदेशी पाहुण्यांसमोर किंवा त्यांच्यावर थुंकण्यावर बंदी घालण्याचा नियम करण्याचा विचार सरकार करत असल्याचे आज गृहमंत्र्यांनी जाहीर केले.

त्यामुळे विरोधी पक्षाने ह्याविरुद्ध रान उठवले आहे. विरोधी गटनेते चावरे म्हणाले “कुणीही उठावे आणि आम्हाला काहीही शिकवावे असा डाव असेल तर आम्ही तो हाणून पाडू. इथे परदेशी पाहुणे, मंत्री, पर्यटक वगैरे कुणीही नाही आले तरी बेहत्तर ! पिढ्यान पिढ्या चाललेल्या परंपरा मोडीत काढणा-या सरकारला गाडून टाका व त्याच्या थडग्यावर गुटखा खाऊन थुंका ! उद्या प्रगत देशांप्रमाणे 'दिलेल्या वेळेवर पोचा', 'ठरलेल्या वेळेवर कामे करा' वगैरे नसती थेरंही चालू कराल. आपल्या देशात विदेशी संस्कृतीचे हे आक्रमण सहन केले जाणार नाही. पुढच्या वेळेपासून, आपल्या थोर परंपरेनुसार पाहुण्यांना सप्रेम भेट म्हणून गुटख्याची पाकिटे द्यावीत असे मी सरकारला आवाहन करतो म्हणजे ते आपापल्या देशात जाऊन सराईतपणे थुंकू लागतील व गुटख्याची पाकिटे फेकून रस्त्याची शोभा वाढवतील’.

  
पुणे (संध्याछाया वृत्त) : येथील ज्येष्ठ नागरिक अनंत पड्सुले ह्यांचा प्रदीर्घ समाजसेवेबद्दल आज सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी, चाळीस वर्षांपूर्वी कर्वे रस्त्यावर पीमटी बस सेवेच्या भोंगळ कारभाराविरुद्ध तीव्र आंदोलन झाले होते त्या आठवणी त्यांनी जागवल्या.

ह्याप्रसंगी श्री. पडसुले म्हणाले “ते झपाटलेले दिवसच वेगळे होते. कॉलेजच्या वेड्या वयात पीएमटी बसमागे साचलेल्या धुळीच्या थरावर मी बोटांनी ‘अनंत लव्ह्ज सुनेत्रा’ अशी अक्षरे काढली होती. पुढचे काही महीने म्हणजे पहिला पाऊस पडेपर्यंत माझ्या प्रेमाची ती धुळाक्षरे बाळगणारी पीएमटी बस जेव्हा मी अधून मधून रस्त्यावर पाहत असे तेव्हाच्या भावना व्यक्त करणे अवघड आहे. ”

ह्या प्रसंगी श्री. पडसुले ह्याना खरोखरच भावना अनावर झाल्या. थोडे सावरल्यावर, त्याना आम्ही पीएमटी विरुद्धच्या आंदोलनविषयी छेडले असता ते म्हणाले “चाळीस वर्षांपूर्वीचा तो आंदोलनाचा दिवस मला चांगलाच आठवतो. काही उत्साही मंडळीनी रस्त्यावर आडवे पडून पीएमटी बसेस जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. तेव्हा आमच्या आंदोलनाचे नेते श्री. दादा पोफळे ह्यानी ‘मधे येईल त्यावरून बस नेणे पीएमटी चालकास अगदीच अंगवळणी पडले असून तुमचे भलते धाडस शब्दश: तुमच्या अंगाशी येईल’ अशी जाणीव करून दिली. त्यामुळे भिती व निराशा ह्या संमिश्र भावनेने ग्रासलेले आंदोलनकर्ते त्वरेने उठून उभे राहिले.