Nov 6, 2016

'ट्रम्पणे' म्हणजे काय रे भाऊ? ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!

आधुनिक शब्दकोशातून:

ट्र्म्पणे!

क्रियापद.

अर्थ:

१. बोलताना आय (I) व माय (My) ह्याच्याशिवाय दुसरे काही न बोलणे.

२. दुस-याविषयी बोललेच तर त्याची किंवा तिची आयमाय काढतच बोलणे.

३. सार्वजनिक नळावरील भांडणात एखाद्याने ‘ठेव तर कळशी पुढे… मग तुझं काय करीन सांगता येणार नाही!’ असे म्हणावे, त्याच चालीवर जागतिक दहशतवादाशी लढायला अत्यंत संदिग्ध व दिशाहीन बोलणे. वैतागून कुणी विचारलेच ‘म्हणजे नक्की काय कराल?’ तर ‘ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!’ असे लाडीक उत्तर देणे.
(अर्थछटा: मूलतत्ववाद्यांशी लढायला स्वत: ‘मूल’तत्ववादी होऊन पोरकट उपाय सुचवणे)

४. विविध प्रकारच्या पिस्तुलांपासून ते स्वयंचलित रायफलीपर्यंत सर्व मोक्षप्राप्तीच्या साधनांचे मुक्तहस्ताने वाटप करण्याचे मनसुबे जाहीर करून, अद्याप डोकं ताळ्यावर असलेल्या सुजाण नागरिकांची काळीजे त्या रायफलीपेक्षा वेगाने धडधडवणे.
(वाचा: गावठी 'कट्टा' व शहरी 'घोडा' - लेखक: टी. डोनाल्ड)

५. काहीही संबंध नसलेल्या क्षेत्रात लुडबूड करणे व तरीही सर्वज्ञ असल्याचे भासवणे.
उदा. वडीलोपार्जित खानावळीचा धंदा असलेल्या गणूशेटने कधी पत्र्याचा डबाही वाजवला नसताना एकदम आपल्या स्वतंत्र तबलावादनाचा कार्यक्रम जाहीर केला आणि कुठला ताल पेश करणार विचारल्यावर गणूशेट ट्रम्पला: ‘ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!’

६. लगट करणे
उदा. ‘तू सुंदर बाई आहेस आणि मी सेलेब्रिटी आहे त्यामुळे मी तुला काहीही करू शकतो’ असे म्हणून एक हिंदी पिक्चरचा नवोदित अभिनेता भर रस्त्यात एकीशी ट्रम्पू लागला. पूर्वीच्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या खटल्यास प्रमाण मानून ह्या खटल्याची कारवाईही तात्काळ दहा वर्षांनी व अत्यंत कडक अश्या कायद्याचा आधार घेऊन नि:पक्षपातीपणे झाली. पूर्वीच्या निकालाचेच ‘टेम्प्लेट’ डोळ्यासमोर ठेवून,  ट्रम्पण्याच्या ह्या अक्षम्य गुन्ह्याबद्दल ह्याही वेळी एक काळवीट, एक पोलीस व पदपथावरील काही गरीब लोक ह्यांना देहांताची सजा केली गेली. आता कायद्याची जबरदस्त जरब बसून तो अभिनेता त्या दुस-या सुप्रसिद्ध अभिनेत्याप्रमाणेच पुन्हा ट्र्म्पायला मोकळा झाला आहे.
(वाचा: 'पोरगा का पनवती?' - लेखक: के. सलीम)

७. कायद्यात पळवाटा शोधून, कर बुडवून, त्याचा जाहीर अभिमान बाळगून वर राष्ट्रीय कर्ज वाढले म्हणून गळा काढणे. थोडक्यात स्वत:चे काम नीट न करता दुस-याने केलेल्या कामाची हेटाई करणे.
(पहा: ‘पुरावा द्या’ फेम माननीय मफलर मुख्यमंत्री ह्यांची विधाने)

८. दुस-याच्या खर्चाने स्वत:च्या कुंपणाची भिंत बांधायच्या वल्गना करणे
(पहा: हवेत मनोरे बांधणे किंवा ‘आम्हीही सर्जिकल स्ट्राईक केले की’ असे म्हणणे)

९. एखाद्याची जात, धर्म झालंच तर वर्ण काढणे, पण देशही काढणे.
(वाचा: ‘मेक्सिकन म्हणजेच गुन्हेगार’ - लेखक: टी. डोनाल्ड)

१०. अत्यंत बिनडोक व अत्यंत स्वार्थी अश्या दोन प्रकारच्या लोकांच्या पाठिंब्यावर सत्तेची हाव धरणे व बघणा-यास ‘ह्याला हसावे का घाबरावे’ अशा संभ्रमात पाडणे
(पहा: यत्ता दुसरीतील पप्पूचा निबंध : ‘मी पंतप्रधान झालो तर..’.)

११. आधीच बदनाम असलेल्या क्षेत्रात, शेतात बैल घुसावा तसे बळजबरीने घुसून, आपल्या अश्लाघ्य व अवली आचरणाने ‘ह्याच्यापेक्षा ते परवडले’ असे वाटावयास लावणे.

१२. गंभीर समस्येवर ‘रोग परवडला पण औषध नको’ असे अघोरी उपाय सुचवणे.
उदा. त्या ठिकाणी, फुले आंबेडकरांच्या राज्यातला एक अत्यंत सुसंस्कृत व विनयशील नेता, दुष्काळाने हवालदिल झालेल्या जनतेला उत्तर देताना त्या ठिकाणी ट्रम्पला: ‘आता मी काय धरणात... ’. हे पहिल्या धारेचे विधानामृत ऐकून अर्धमेल्या झालेल्या जनतेने त्या सुसंस्कृत व विनयशील नेत्याला विचारलं ‘कसं सुचतं हो तुम्हाला? काकांनी सुचवलं तसं वाचन वाढवलेलं दिसतयं. काय… वाचताय काय सध्या?’ तेव्हा तो अत्यंत सुसंस्कृत व विनयशील नेता पुन्हा त्या ठिकाणी ट्रम्पला : ‘ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!’

- राफा


Aug 24, 2016

कुठेसे कुणी...

कुठेसे कुणी व्याकूळ गात होते
सूर दूरचे की, आतल्या आत होते?

झळा साहवेनागी राहवेना.. 
वणव्यात माझे प्रारब्ध न्हात होते

पुन्हा पुन्हा वहावे, वाटले नियतीला
असे वेगळे काय माझ्या आसवात होते

तिने आर्त पाहिले, मला एकवार 
हवेसे दिलासे त्या क्षणात होते

पहाटही धुंद त्या मंद सुगंधाने
उमलले राती काही दोघात होते


- राफा

Jun 6, 2016

नवीन चित्र!

पेन्सिल स्केच आणि मग संगणकावर 'टच अप' केले (मुख्यत्वे कॉन्ट्रास्ट साठी आणि माऊस वापरून सही सुध्दा ठोकली!). चारकोल वापरूनही अत्यंत गडद काळा (पिच ब्लॅक) न मिळवता आल्याने संगणकाची मदत :)

चिअर्स!May 31, 2016

कथा कशी लिहावी!


एका रविवारची एक सुमसाम सकाळ.

परममित्र साहित्यिक जगू जगदाळेच्या रुमवर मी... अजूनही त्याच्या ‘नॉर्मल’ ला येण्याची वाट पाहत !

तो लोखंडी कॉटवर कुठेतरी खोलवर शून्यात का काय म्हणतात तशी नजर लावून बसलेला. म्हणजे परीक्षेत आपल्याला जाम काही आठवत नसताना, आपण कसे डोळे बारीक करून, खालचा ओठ तोंडात घेऊन, भिंतीवरच्या उंच कोप-यातले हलणारे जळमट बघत बसतो ना तसा.

मी एकदा त्याच्याकडे, मग मधेच खिडकीतून दिसणा-या फांदीवर निवांत बसलेल्या एका स्थितप्रज्ञ कावळ्याकडे आणि मग जगूच्या मागच्या भिंतीवर लावलेल्या एका विशेष आकर्षक युवतीच्या कॅलेंडरकडे असा आळीपाळीने टकमक बघत होतो.

बराच वेळ झाला. ‘लॉन टेनिस’ चे प्रेक्षक बॉल जातो त्या बाजूला ठेक्यात मुंडी वळवतात तसेच माझे चालले होते. टक... जगू. टक... युवती! टक... कावळा! असा बराच मानेचा व्यायाम झाला पण जगू, तो कावळा व ती युवती ह्यापैकी कुणीच हलायला तयार नाही.

जगू संध्याकाळच्या आमच्या कट्ट्यावरून खूप दिवस बेपत्ता झाला की मला एकूणच काळजी वाटू लागते त्यामुळे आज रविवारी मी ठरवून त्याच्याकडे आलो होतो.

जगू सहसा रात्री झोपत नाही. त्यामुळे विशेषत: रविवारी सकाळी आलं की जगूला मुबलक हाका मारायला लागतात. शेजा-यांना त्रास होणार नाही अशा बेताने. विशेषत: वरच्या वागळे काकूंना. वेळ कुठलीही असो, दहा एक हाका मारल्याशिवाय जगूचा दरवाजा किलकिला होतच नाही.

पण आज पहिल्याच हाकेला जगूने दार उघडलं.. आणि मी दचकलोच !

त्याच्या सुमारे आठवा प्रेमभंग झाला होता तेव्हाही त्याची अशी ‘उध्वस्त धर्मशाळा’ झाली नव्हती. तांबरलेल्या डोळ्यानी त्याने माझ्याकडे बघितलं, भांगात किरंगळी फिरवून “हंऽऽऽ आत ये !” असं खर्जात खरवडल्यासारखं म्हणून जगूने त्याच्या लोखंडी कॉटवर जी जागृत समाधी घेतली ती घेतलीच.

मी निमूट आत जाऊन खाली चटईवर बसलो. (खुर्चीवर बसायचे धाडस झाले नाही कारण आजकाल ह्टके असणारे, बराच गाजावाजा केलेले बरेच पिक्चर जसे पहिल्याच दिवशी कोसळतात तसे जगूच्या रुमवरच्या एकमेव खुर्चीवरुन कित्येक लोकांना कोसळताना मी पाहिले आहे. खुर्चीचा मोडका पाय वाकून हाताने पकडून त्या खुर्चीत बसण्याचे कसब फक्त जगूकडेच आहे. बसने अचानक वळण घेतल्यावर आपण कलतो, तसा तो कायम खुर्चीवर असा कोनात बसतो!)

शेवटी शांतता असह्य होऊन मीच हिय्या करून कहितरी विचारायचं म्हणून विचारलं “काय झोपला नाहीस वाटतं?”

प्रश्नाचं स्पष्ट उत्तर समोर तारवटलेल्या डोळ्यानी बसलेलं होतं.

“नाही !” माझ्या सुदैवाने जगूने माझ्या प्रश्नाची दखल घेतली “रात्रभर डोक्यात नुसते घण घण.. घण!”

“का ? वरच्या वागळे काकूनी पुन्हा रात्री बेरात्री मसाले कुटायला सुरुवात केली वाटतं ?”

शुभ्र साबणावरच्या केसाकडे पहावे तसे माझ्याकडे पहात जगू सुस्कारला “हं… माझी कथा अजुन पूर्ण झाली नाहिये. किम्बहुना मी ती सुरुही केली नाहीये. माझा जागृत आत्मा कथेचा जीव शोधत होता रात्रभर!”

(हा जग्या लेकाचा साधे काही बोलतच नाही. जागूत आत्मा कसला डोंबल.. झोपेत चालायची सवय असणार ह्याला नक्कीच).

पण आता माझा डोकयात प्रकाश पडला ! म्हणजे काये की जगू म्हणजे साहित्यचा खळाळता झरा का झळाळता तारा की एकाच वेळी दोन्हीही आहे.. म्हणजे असं तो स्वत:च कट्ट्ट्यावर आला की म्हणतो म्हणून आम्हाला माहीत !

भर कट्ट्यावर, जगू सारखा आम्हाला ‘ऐहिकतेच्या आहारी गेलेले कलाद्वेषी केविलवाणे व कन्फ्युज्ड जीव’, ‘जीवनपटलावर सरपटणारे जर्जर जीवजंतू’ अशी काहितरी विशेषण देत असतो. आमची आयुष्य उथळ आहेत, आम्हा मित्रांना ती खोली ती कशी नाहीच असे तुच्छतादर्शक कहितरी बोलत असतो आमच्या अड्यावर. एकदा रघूच चण्याच्या पुडीच्या कागदाचं विमान करत करत त्याला शांतपणे म्हाणाला “अरे, तुला खोली आहे हे आम्हला माहित आहे. पण ती गळते आहे म्हणुन जागा बदल म्हणुन लाख वेळा सांगितलं.. ऐकत नाहीस! तुझ्या खोलीवर साधी पार्टीसुद्धा करता येत नाही !”

ते ऐकल्यावर जगू आरतीच्या कापरासारखा पेटला होता आणि त्याने मग तासभर त्याच्याकडे असलेल्या साहित्यीक खोली, रुंदी व उंची वर भाषण दिलं होतं. (‘साहित्यिक असला म्हणून काय.. कुणी असा सर्व दिशेला कसा काय वाढू शकतो?’ हा मला पडलेला प्रश्न मी जग्या पुन्हा पेटेल म्हणून उचलला नव्हता!)

जग्या कायम असे कोड्यातच बोलतो. तो आम्हाला खोली (शिवाय रुंदी व उंची) नसूनही सांभाळून घेतो अशी त्याची प्रामाणिक समजूत आहे.

आत्ताही तो असेच क्षीण उसासे टाकत बसला होता. मी अजूनही मधून मधून त्याच्या मागच्या भिंतीवरच्या मी कॅलेंडरवरच्या युवतीकडे पाहत होतो. हा जग्या कॅलेंडर एव्हढे वर का लावतो कळत नाही ! कदाचित त्याची साहित्यिक जाणिव उच्च आहे म्हणून म्हणून बहुतेक!

“का असा घात केलात माझा “ जगू म्हणाला आणि कॅलेंडरविषयीच्या काही मुग्ध विचारातून मी बाहेर आलो …

“एका अबोल अव्यक्त रसिकाला का अशा सृजनाच्या खडतर वाटेला लावलंत.. अं ऽऽऽ“

“अरे केलं काय आम्ही , कथा लिही, कविता लिही असच सांगितल ना. अरे तू एव्हढा साहित्यातला खळाळता तारा का झरा म्हणालास म्हणून सांगितल रे. म्हणजे तू झरा, ओढा झालचं तर नळ वगैरे असं काहितरी अगम्य बोलण्यापेक्षा म्हटलं तू लिहून बघ. नसेल जमत तर सोडून दे. “

“नाही. आता परतीच्या वाटा बंद झाल्या आहेत.”

त्याच्या वाक्यानंतर त्याची आंतरिक चुळबूळ वाढली आहे हे माझ्या लक्षात आलं. आता तो उसासे सोडण्यासाठी एक भयन्कर पॉझ घेणार आणि मला पुन्हा कॅलेंडरकडे पहाता येणार असा विचार डोकावून गेला. एक मित्र असा आयुष्याच्या वाटा बदलत, झरा की तारा होत असताना, मी सुंदर कॅलेंडरच्या युवतीकडे (इथे विशेषणाची जागा चुकली आहे असे वाटते) पहायला उत्सुक असल्याची मला पाउण एक सेकंद खिन्नता वाटली.

“ह्या खडतर वाटेवर आता मला तुमचीच सोबत लागणार आहे. तुमच्या कल्पनांची शिदोरी घेउनच ही कथाअविष्काराची वाट मी चालू शकेन”

जगू साहित्यिक मॅरेथॉन मधे 'कथा कथा' करत धापा टाकत धावतो आहे आणि आम्ही रस्त्यच्या कडेला राहून त्याला संत्री मोसंबीरुपी कल्पना सोलून देत आहोत असे काहितरी करुण दृश्य मला दिसू लागले.

“शिदोरी म्हणजे ? आज जेवणाचा डबा आला नाही वाटत..”

बसमधे आपल्या खांद्यावर झोपणाऱ्याला जाग आल्यावर आपण ज्या नजरेने त्याच्याकडे पाहू तशा त्रासिक नजरेने जगूने माझ्याकडे पाहिले.

त्याला पुन्हा कथेच्या वाटेवर लावावे म्हणून मीच पुन्हा म्हटले

“अरे पण तू एव्हढा.. एव्हढा आपला हा आहेस (नेमकी आणिबाणिच्या वेळी मला विशेषणे आठवत नाहीत) तू काहीतरी विचार केला असशीलच ना.”

“आहे! मी विचार केला आहेच. पण तुमच्या तोकड्या पदरात माझ्या कल्पनांचे ओझे कसे टाकु ? हंऽऽ पण ढोबळपणे बोलायचे तर कथा अपात्र होइल असे वाटत आहे.”

“म्हणजे ? एव्हढ्यात कथास्पर्धेसाठी नावही नोंदवलेस वाटत ? पण पाठवायच्या आधीच कशी अपात्र ठरली कथा ?”

“मूर्खा , अपात्र म्हणजे तशी नव्हे. पात्र नसलेली ह्या अर्थी अपात्र ! म्हणजे कथेत पात्रच नसतील असे आत्ता तरी वाटत आहे !”

शप्पथ सांगतो, मी चटईवरच बसलो होतो म्हणुनच पडलो नाही! नाही तरं काही खरे नव्हते!

पण जगू प्रचंड आत्मविश्वासाने बोलत होता..

“म्हणजे काय की पहिल्या प्रकरणात, कुठलेच पात्र नाही.. तसे काहीच घडतच नाही. आता बोल, तेरी जालीम दुनिया इसकी दखल लेगी कि नही ?”

जगू खूष असला की हिंदीसदृश्य काहीतरी बोलतो. नेह्मीप्रमाणे ह्या वेळी देखील दखल हा हिंदी शब्द आहे की नाही असा माझा गोंधळ झाला.

“अरे पण अपात्र कथा दखलपात्र कशी होईल ?”

“तुझ्या सामान्यपणाची मला कीव येते. पहिली गोष्ट म्हणजे 'दखलपात्र' व्ह्ययला हा काही गुन्हा नाही... हं अर्थात तुमच्या झापडं लावलेल्या दुनियेत असले तेजस्वी प्रयोग म्हणजे गुन्हाच !”

जगू एकंदर जाग्रणाने खचला होता हे मला कळत होते पण त्याच्या ह्या प्रयोगाचा तेजोभंग कसा करावा ते कळत नव्हते.

“जगू अगदी खरं सांगू का ?”

“बोल!”

“मला काही कळले नाही रे. ”

शिंक येताना आधी होतो तसा चेहरा करत जगू हसला. काही माणसं आवाज न करता चालतात तसा जगू आवाज न करता हसतो.

“मला वाटलच तुझ्या चेहऱ्यावरनं. भौतिकात रमणाऱ्या तुझ्यासारख्या जीवाला हे रसायन कसे कळणार ?”

जगूच्या ह्या वाक्याने शास्त्र विषयाच्या तिन्ही पेपरांना एकत्र बसल्यासारखा मला घाम फुटला.

“म्हणजे अस बघ. ही कथा आहे गूढ. आता कथेत पात्र असणार आहेत की नाहीत इथूनच सस्पेन्स सुरु होतो. तू सारखा भिंतीकडे पहात आहेस..”

मी एकदम चमकलो.

“..त्यावरून तुला शन्का असावी की कथा भिंतीसारखी एकाच रंगात बुडलेली सपाट अशी असणार!” जगू एखाद्या मानसोपचार तज्ञाच्या थाटात बोलला आणि त्याने पुन्हा शिकं आल्यासारखा चेहरा केलान.

“नाही रे म्हणजे आपल ते.. “

खरं म्हणजे कारण अगदी उलटं होतं. मी भिंतीवर कॅलेंडर कडे पहात होतो मधे मधे, कारण त्यात सपाट असे काही नव्हतेच !

जग्याचे चालूच होते विश्लेषण ः

“पण तसे होणार नाही.. माझी कथा गूढ असली तरी त्यात सगळे रस मिळतील तुला.. पुस्तक छापले की सस्पेन्स साठी मी काही मधली पाने कोरी ठेवायचही विचार करतोय.”

“कोरी पाने ? मधेच ?” आता मात्र मला त्या कॅलेंडरवरच्या युवतीनेेही डोळे विस्फारल्याचे भास होऊ लागले.

“येसऽऽऽ, वाचकाना हवा तो उपयोग करु देत त्य कोऱ्या पानांचा !”

“बाकिच्यांचं माहित नाही पण रघू नक्की विमानं करेल ती पानं फाडून. हल्ली त्याचं ते फारच वाढलं आहे.. उरो का ओरिगामीचं. आजकाल त्याच्या घरचे बिलंसुद्धा लपवून ठेवतात त्याच्यापासून ! कुणी सांगाव, कदाचीत तुझ्या कथेची कोरी नसलेली पानंही तो त्याच कामी आणेल. शेवटी काय रे, तुझ्या कल्पनांची भरारी अशी विमानं होऊन शब्दशः झाली तरी..”

“खामोश ! रघू सारख्या नादान माणसाचे काय घेउन बसलास. मला म्हणायचे होते की वाचकच त्या रिकाम्या पानांमधे हवा तो मजकूर कल्पनेने भरतील.. बघ तू, प्रत्येक प्रकरणाला वेगळीच कलटणी मिळेल!!!”

“प्रत्येक प्रकरणाला वेगळी कलाटणी ?” मी आवन्ढा गिळत विचारलं. जगूचे विचार पचायला मिनिटागणिक अवजड होत होते. “पण अरे वाचकांना तुझी पातळी कशी गाठता येईल ? त्यापेक्षा तू सगळी पानं भरलीस तर ?”

“हंऽऽऽऽऽऽ तेही खरचं. एकदम पहिल्याच कथेत एव्हढा क्रांतिकारकपणा पुरोगाम्यांनाही झेपणार नाही” जगू म्हणाला..

पण एकंदर त्याच्या डोळ्यांसमोर एकंदर रघू करत असलेल्या विमानरुपी रसग्रहणाचे भीषण दृश्य उभे राहिले असावे. नाहीतर सहसा जगू माघार घेत नाही.

माझी शन्का खरी होती कारण तो एकदम चमकून म्हणाला “रघू पुरोगामी आहे का रे ?”

“माहित नाही रे नक्की. तो मधेच काहीतरी उरोगामी का कायसं बोलत असतो.”

“उरोगामी नाही रे. ओरीगामी ! ते घड्या पाडून विमानं करण्याच तेच त्याच खूळ. मी विचारलं तर म्हणतो स्टेप बाय स्टेप जातोय. विमानांवर हात बसला की बेडूक, बेडकावर हात बसला की .. बद्तमीज आदमी. पण कधी कधी मला त्याच्यात 'म्येथड इन म्याडनेस' वाटतो”

“बर मग पात्रांचे काय ठरवलेस नक्की ?” मी सरकारी वकील 'आय विटनेस' चा मुद्दा लावून धरतात त्या चिकाटीने विचारले.

“तसं एक अडीच पात्रांचे एक कथानक आहे डोक्यात माझ्या ?”

“अडीच ऽऽ ? म्हणजे कुणी लहान मूल वगैरे आहे का ? का कुणी अर्धवट आहे?”

“तुला मला सगळ उलगडुन सांगाव लागतय. जगू वैतागला. हंऽऽ ठीक आहे. तू उंदीर आहे अस समजेन.”

“उ उ.. उं दी र ? “ मी संतापातिरेकाने एकेक अक्षर उच्चारत विचारले.

“हां म्हणजे पांढऱ्या उंदरावर नाही का प्रयोग करत माणसांच्या आधी.. त्यामुळे तुला आधी ढोबळ कथानक उलगडून सांगायला हरकत नाही. असा अज्ञानी प्रश्न तू विचारलास म्हणजे तू ब्रिजप्रसाद चं 'अढाई पात्रोंका प्रयोग' वाचलेलं नाहीस हे उघड आहे. निदान सत्यकुमारचं ' कहानी, नाटक और शतरंजी चालें' तरी ?”

“सतरंज्यांवर कुणी पुस्तक लिहिले आहे हे मी आजच ऐकतो आहे. तुला आपल कॉलेजच नाटक आठवतयं का ? कनका खानोलकर साठी आपण सर्वात पुढच्या सतरंजीवर जागा पकडून बसलो होतो. त्यानंतर नाटकाचा आणि सतरंजीचा अजून जवळचा संबंध मी पाहीला नाहिये रे अजून !”

माझं बोलण ऐकत असताना प्रत्येक वाक्यावर जगूचा चेहरा घाटात एस.टी. 'लागल्या'सारखा कसानुसा होत होता..

“मला शरम वाटते रे तुम्हा लोकांना मित्र म्हणायची. ऐसे दोस्त हो तो दुश्मनोंकी क्या जरुरत है.” जगू पिसाळला की हिन्दीत चावतो “अरे बुद्धीबळ खेळला आहेस का कधी ?”

“अफ्कोर्स! मागच्याच वर्षीच्या इन्टर कॉलेज फायनलला नाही का खेळलो होतो?” मी उत्साहाने म्हणालो. “सुभाष हट्टंगडी फायनलला पोचला नव्हता का.. त्याला उजव्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं म्हणून सोन्गट्या सरकवायला मीच होतो. तो डाव्या हाताने सोन्गट्या सरकवणं अनलकी मानतो.”

जगूने आता दोन्ही हात कानावर गच्च दाबले आणि प्रेशर गेलेल्या कुकरसारखा स्वस्थ बसून राहीला.

तो तसा आता २ मिनिटे पुन्हा बसणार हे मला माहीत होते पण कॅलेंडर कडे बघायची रिस्क मला पुन्हा घ्यायची नव्हती. त्यामुळे आपल्या बोलण्यात कुठली अशी स्फोटक विधाने होती ह्याचे विश्लेषण मी करू लागलो.

“तुला घोडा माहित्ये का ? घोडा ?” बरोबर २ मिनिटांनंतर जगूने शांतताभंग केला..

जगूकडे मी संशयाने पाहीले. मघाचपासून त्याच्या बोलण्यात आलेले बेडूक, उंदीर वगैरेंच्या जोडीला आता घोडा ! नक्कीच जगू वर फार ताण पडला होता एकंदर कथा घडवण्याच्या प्रक्रियेचा. किंवा त्याची कथा तरी चतुष्पाद प्राण्यांविषयी होती..

माझा बंद केलेल्या टिव्हीसारखा विझलेला निर्बुद्ध चेहरा पाहून जगू पुन्हा म्हणाला

“घोडा .. बुद्धीबळातला रे. तो अडीच घरे जाणारा घोडा कसा समोरच्याला चकवा देतो तसाच चकवा माझ्या अडिच पात्रांनी वाचकांना बसेल ! अगली चाल उनके दिमागे चमन मे आयेगी ही नही. सत्यकुमारने सिद्धच केलय तस.. कथा अगदी घर करुन राहील वाचकांच्या मनात. त्यामुळे नावही मी ठरवल आहे. 'पासष्ठावं घर'! पहिली ६४ बुद्धीबळाची आणि ते पासष्ठावं ! “

शेवटची घरघर लागल्यासारखे माझ्या गळ्यातून काही आवाज निघाले. जग्याच एकंदर कठीण आहे. साला सतरंजीवर पुस्तकं वाचतो आणि तीही हिंदी. तरीच ह्याच्या ज्ञानेश्वर माउलींच्या मायमराठी भिंतीवर सारखी हिंदीची ओल येत असते!

काय तर म्हणे 'कहाणी, नाटक आणि सतरंजीचे चाळे' ! काय पण नाव !.. आज सतरंजी .. उद्या पायपुसण्यावर पुस्तकं वाचेल !

सारा जीव एकवटून त्राग्याने मी विचारलं “अरे पण अर्ध्या पात्राचं काय ?”

“म्हणजे असं आहे की ते पात्र पूर्ण कधीच कळणार नाही. ते कसे दिसेल ते अवलंबून आहे की तू कुठे बसून पहातो आहेस..”

“कुठे बसून म्हणजे ? चटईवर ! तुला दुसरी खुर्ची घेता येईल तो सुदिन. ह्या खुर्चीचा पाय...”

“तस नाही मूढा॒!॒ म्हणजे तु कुठल्या पात्राच्या ऍंगलने पहात आहेस तसे तुला तिसरे पात्र दिसेल. म्हणजे असं बघ 'अ' आणि 'ब' ही पात्रे बुद्धीबळ खेळत आहेत. आणि 'ड' तो अटीतटीचा सामना पहात आहे.... “

“'क' चं काय झालं ?”

“शाब्बास ! बघ, पहिल्याच परिच्छेदात हा प्रश्न निर्माण होईलः 'क' चं काय झालं! आज आल्यापासनं पहिला सूज्ञ विचार मांडलास. तुझ्यात अजून ती धुगधुगी आहे म्हणून तर मी तुला सगळं सांगतो आहे. आता बघ, पहिल्याच परिच्च्हेदात, मी मळलेली वाट चोखाळायला नकार दिला आहे हे सूज्ञ वाचकांच्या लक्षात येईल. धिस्स स्टोरी श्याल बी एनिथीन्ग बट प्रेडिक्टिबल !!”

जगू क्वचित बोलला तरी अत्यंत मराठमोळं इंग्रजी बोलतो. ताजा खरवस बांधायला ‘टाइम्स’ वापरल्यासारखे वाटते.

ह्यानंतर सुमारे जगूने मला तासभर त्याची कथा ऐकवली. ती संक्षिप्त रुपाने देत आहे. त्यात कंसांमधे जगूची मौलीक विचारमंथनेही आहेत आणि माझ्या काही अज्ञानी शंकाही:

टिक टिक टिक . ठण्ण! ठण्ण! रात्रीचे दोन वाजल्याचे टोले घड्याळाने दिले.

(वास्तविक 'अ' ने घड्याळ मागे करून ठेवले होते तास्भर त्यामुळे खरेतर रात्रीचे तीन वाजले आहेत. पण ते शेवटच्या प्रकरणात उघड होतं . इति: जगू)

आणि कथेचे बारा वाजणार आहेत का?

(इति: मी. पण मनातल्या मनात)

मीः (उघड) “'तू नावं 'अ' ,'ब' अशीच ठेवणार आहेस का' “

“होय, रुढ नावाच्या साकळलेल्या प्रतिमांत मला पात्रांना अडकावायचे नाहीये. त्यामुळे वाचक आपल्या मनाने नाव भरतीलच.”

मी: (मनात) सगळे वाचकच भरणार तर जगू काय लिहीणार मग ? वाचकांच्या ह्या 'भरत'कामानंतर का होइना कथेची वीण घट्ट बसली म्हणजे मिळवलं!

मीः (उघड) छान ! पुढे ?

“'ब' ने काळा घोडा पुढे सरकवला” (इथे ख-या घोड्याचा आभास हा प्रेक्षकांना अजून एक चकवा. इति ः अर्थातच जगू). “शुक्रवारी 'ब' नेहमी काळे कपडे घालायचा. काळे बूट, काळे मोजे, काळा अंगरखा ...”

(“मोज्यांनंतर डायरेक्ट अंगरखा ? म्हणजे त्याने पॅंट घातली आहे की नाही ह्याबाबत वाचकांच्या मनात प्रश्न. जगूच्या भाषेत अजून एक चकवा !”)

“आज त्याने निळा पोशाख केला होता”

(म्हणजे आज शुक्रवार नाही. मग कुठला वार ? चकवा ! चकवा ! जगूने कथेचे नाव 'पासष्ठावा चकवा' ठेवायला हवं होतं !)

त्या हस्तिदंती बुद्धीबळाच्या पटाकडे 'अ' निरखून पहात होता. त्यातला एक पांढरा घोडा हरवला होता. त्यामुळे त्या जागी कॅरमची पांढरी सोन्गटी ठेवून ते दोघे खेळत होते. कारण 'शो मस्ट गो ऑन' ह्या संतवचनावर 'ब' ची श्रद्धा होती.

वास्तविक 'अ' ने सोन्गटीऐवजी कॅरमचा 'स्ट्राईकर' ठेवला होता पण त्यामुळे आपण सतत 'नॉन-स्ट्राईकर' एंड ला राहू असा नर्म विनोद 'ब' ने केला होता!

(जगूच्या मते इथे त्याने गूढरसाला हास्यरसाची झालर लावली होती! मी कथेच्या चरकातून भरडला जाऊन माझा मात्र क्रोध रस गळत होता आणि एव्हढे रस वाहिल्यानंतर त्याची कथा रसातळाला जात असल्याची अभद्र शंका येवू लागली !)

त्या पांढऱ्या सोंगटीकडे पहात 'अ' विचारात पडला होता. त्याला सतत विचारात पडण्याची सवय लागण्याचे कारण म्हणजे त्याचा प्रायव्हेट डिटेक्टीव चा व्यवसाय. सर्व गोष्टींचा सर्व बाजूने विचार करण्याची 'अ' ला सवयच झाली होती. किम्बहुना त्याचा क्लायेंट असलेल्या 'ब' शी तो अधून मधून बुद्धीबळ खेळायचा, तेव्हाही कित्येक वेळा केवळ 'ब' च्या बाजूने विचार केल्यामुळे त्याला हार पत्करावी लागली होती.

अरे कसला विचार करतो आहेस मित्रा 'ब' त्याला म्हणाला. “उद्या डिटेक्टिवपणाच्या (हा संकर जगूचा !) ऑफिसला सुट्टी आहे ना. मग आरामात खेळ. हा बघ गेला तुझा उंट गेला.”

'ब' ने 'अ' चा उंट मारून आपल्या नाईट गाऊन्च्या खिशात टाकला. 'ब' ची ही नेहमीची सवय होती. आवडत्या चालीनंतर मारलेले प्यादे तो नेह्मी खिशात टाकायचा.

'ब' चे घराणे ऐतिहासीक इतिहास असलेले (इथे जगूला दुरुस्त करण्याचे मी अडीच एक प्रयत्न केले) असे सरदारांचे घराणे होते. म्हणजे अफजलखानाला फितूर होणाया सरदारांपैकी पहील्या फळीत 'ब' चे खापर पणजोबा होते अशी गावात वदंता होती.

'अ' पांढ-या सोंगटीकडे पहात विचारात बुडून गेला होता (हेच वाक्य निरनिराळ्या पद्धतीने आत्तापर्यन्त लिहून झाल्यामुळे वाचकांवर 'एम्बॉस' होईल असे जगूचे मत होते) पूर्वजांच्या हस्तीदंती पटातला हा घोडा हरवू कसा शकतो हाच विचार त्याला पडला होता.

त्याने काहीतरी चाल केली आणी पुढच्या चालीला 'ब' ने दुसरा उंट खाऊन खिशात टाकला.

अचानक 'अ' चे डोळे लकाकले. सरदार जांबुवंतरावांची तुमची पुरानी दुश्मनी आहे ना मि. 'ब' ? त्यांचा त्यांच्याच वाड्यात मागल्या शुक्रवारी लेंग्याच्या नाडीने आवळून निर्घृण खून झाला आहे.

बर मग ? आजकाल सरदार घराण्याशी संबधित लोकांचे खून होत आहेत म्हणुन तर माझ्या सुरक्षेसाठी तुला कंत्रांट दिले आहे ना 'अ' !

(‘जगू, अरे ती काय लग्नाची जेवणावळ आहे का कंत्रांट द्यायला ?’ ह्या माझ्या प्रश्नाचा जगूवर काही परिणाम नव्हता)

मि. ब, जांबुवतरावाच्या खुनाच्या आरोपावरून मी तुम्हाला अटक करत आहे.

“मला ? अटक ? हा हा तू आजकाल फारच भिकार विनोद मारतोस 'अ' !”

(इथे जगूही शिंक आल्यासारखा चेहरा करून आवाज न करता हसला.)

“हा विनोद नाही” असे म्हणून 'अ' ने खिशातून 'हरवलेला' हस्तिदंती घोडा काढला ! ओळखतोस ना हा ? त्या दिवशीही तू माझा घोडा मारलास आणि खिशात टाकलास. मी गेल्यावर जांबुवंतरावांच्या वाड्यावर जाऊन तू त्याना मारलस. पण तेव्हा तुझ्या खिशातला घोडा तिथेच पडला !

हंऽऽऽऽ पण.. पण तुला माझ्यावर नक्की संशय कधी आला ? 'ब' ने अपराधी स्वरात विचारलं.

'त्या दिवशी जांबुवंतरावांच्या प्रेताशेजारी पडलेली ती लेंग्याची नाडी ! आजच माझा संशय पक्का झाला जेव्हा तू नेहमीच्या पट्ट्यापट्ट्याच्या लेंग्याऐवजी नाईट गाऊन घालून बसलास तेव्हा !!!

....

'धी येन्ड !!! ' जगू म्हणाला 'काय, कशी वाटली ?'

“एकदम कंडा आहे ना !” मी नेमके तेव्हाच कॅलेंडर कडे पहात असल्याने त्याला म्हटलं आणि जोरात जीभ चावली !

माझा मेंदू काहीतरी उत्तर शोधायचा प्रयत्न करत असतानाच, एक नवीनच प्रश्न माझ्या मनात लेन्ग्याच्या नाडीसारखा लोन्बकळत होता:

'ड' चं काय झालं !!!May 22, 2016

आमचे नाटक आता युट्युबवर!

नमस्कार मंडळी!

मागच्या वर्षी, सोसायटीच्या गणेशोत्सवात आम्ही एक नाटक (लहानसे प्रहसन) सादर केले होते. मी अमेरिकेला यायच्या सगळ्या धामधुमीत (आणि मन:स्थितीत) विनोदी लिखाण करून, तालमींचे जमवून, नाटक सादर करता आले ह्याचा खूप खूप आनंद व समाधान आहे.

प्रत्यक्ष प्रयोगात सुजाण व रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला, व नंतर मनापासून कौतुकाचा वर्षाव केला त्यामुळे अगदी भरून पावले! तात्पुरत्या छोट्याश्या रंगमंचावर, प्रासंगिक आपत्तींंना तोंड देत देत केलेले हौशी लेव्हलवरचे हे नाटक... पण 'टायमिंग' साधून व तालमीत पक्क्या केलेल्या 'जागा' घेऊन किंवा टिपून हशे मिळवायची (वसूल करायची) मौज काही औरच.. आनंद निर्माण करण्याजोगा दुसरा आनंद नाहीच!

आमचे प्रहसन तुम्हाला खूप आवडल्याची पावती मिळाली होतीच मागच्या वर्षी फेबु पोस्टावर... ज्यांनी पाहिले आहे त्यांना ह्या निमित्ताने पुन:प्रत्ययाचा आनंद घेता येईल आणि 'पाहू सवडीने' म्हणून ज्यांचे पाहिले गेलेच नाही त्यांच्यासाठी ही युट्युब लिंक.

नाटक आवडले तर इथे व तिथे जरुर लाइक व शेअर करा..

मंडळ आभारी आहे!

- राफा


Apr 11, 2016

नवीन चित्रकला!

गेल्या काही दिवसांत ही दोन स्केचेस काढली:
(पहिल्यावर डोळ्याची शोभा (realism) जाऊ नये म्हणून सही ठोकली नाहीये!)

- राफा