Feb 21, 2010

बातम्या: २१ फेब्रुवारी २०५०

बातम्या: २१ फेब्रुवारी २०५०

 मुंबई (दि. २०): सध्या महाराष्ट्राच्या दौ-यावर प्रथमच आलेल्या जर्मनीच्या उद्योगमंत्री कुमारी मार्गारेट गुटेनबर्ग ह्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

काल महाराष्ट्राचे उद्योगमंत्री बबन ढमढेरे त्यांचे स्वागत करण्यास विमानतळावर गेले होते. तेव्हा ढमढेरे ह्यांना पानाचा तोबरा अनावर झाल्याने ते कु. मार्गारेट ह्यांच्या पायाशीच पाचकन थुंकले. पानाच्या लाल रंगामुळे, ढमढेरे ह्यांना रक्ताची उलटी झाली असावी असे वाटून घाबरलेल्या कुमारी मार्गारेट भोवळ येऊन पडल्या होत्या. भक्कम हाडापेराच्या कुमारी गुटेनबर्ग ह्या श्री. ढमढेरे ह्यांच्यावरच पडल्याने त्यांचाही जीव काही वेळ कासावीस झाला होता.

अजूनही, आज २०५० सालीही महान भारतीय संस्कृतीबद्दल पाश्चात्य देशात किती घोर अज्ञान आहे ह्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ‘विविध आवाज काढून कुठेही कसेही थुंकण्याचे स्वातंत्र्य’ ह्या गोष्टीचा आदर करायचा का मूर्खासारखी किळस वाटून घ्यायची असा प्रश्न विचारला जात आहे.

२०१० साली सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबद्दल रु. १००० दंड होता हे ऐकून तरुण वाचकांना कदाचित आश्चर्य वाटेल. तेव्हापासून ते २०२२ पर्यंत महाराष्ट्राच्या शहरी भागात एकूण सात जणांवर दंडाची कारवाई करण्यात आली. इतकी कठोर कारवाई केल्यानंतर चळवळ करुन हा अमानुष कायदा बदलण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याविरुद्धचा कायदा केव्हाच रद्द केला असला तरी परदेशी पाहुण्यांसमोर किंवा त्यांच्यावर थुंकण्यावर बंदी घालण्याचा नियम करण्याचा विचार सरकार करत असल्याचे आज गृहमंत्र्यांनी जाहीर केले.

त्यामुळे विरोधी पक्षाने ह्याविरुद्ध रान उठवले आहे. विरोधी गटनेते चावरे म्हणाले “कुणीही उठावे आणि आम्हाला काहीही शिकवावे असा डाव असेल तर आम्ही तो हाणून पाडू. इथे परदेशी पाहुणे, मंत्री, पर्यटक वगैरे कुणीही नाही आले तरी बेहत्तर ! पिढ्यान पिढ्या चाललेल्या परंपरा मोडीत काढणा-या सरकारला गाडून टाका व त्याच्या थडग्यावर गुटखा खाऊन थुंका ! उद्या प्रगत देशांप्रमाणे 'दिलेल्या वेळेवर पोचा', 'ठरलेल्या वेळेवर कामे करा' वगैरे नसती थेरंही चालू कराल. आपल्या देशात विदेशी संस्कृतीचे हे आक्रमण सहन केले जाणार नाही. पुढच्या वेळेपासून, आपल्या थोर परंपरेनुसार पाहुण्यांना सप्रेम भेट म्हणून गुटख्याची पाकिटे द्यावीत असे मी सरकारला आवाहन करतो म्हणजे ते आपापल्या देशात जाऊन सराईतपणे थुंकू लागतील व गुटख्याची पाकिटे फेकून रस्त्याची शोभा वाढवतील’.

  
पुणे (संध्याछाया वृत्त) : येथील ज्येष्ठ नागरिक अनंत पड्सुले ह्यांचा प्रदीर्घ समाजसेवेबद्दल आज सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी, चाळीस वर्षांपूर्वी कर्वे रस्त्यावर पीमटी बस सेवेच्या भोंगळ कारभाराविरुद्ध तीव्र आंदोलन झाले होते त्या आठवणी त्यांनी जागवल्या.

ह्याप्रसंगी श्री. पडसुले म्हणाले “ते झपाटलेले दिवसच वेगळे होते. कॉलेजच्या वेड्या वयात पीएमटी बसमागे साचलेल्या धुळीच्या थरावर मी बोटांनी ‘अनंत लव्ह्ज सुनेत्रा’ अशी अक्षरे काढली होती. पुढचे काही महीने म्हणजे पहिला पाऊस पडेपर्यंत माझ्या प्रेमाची ती धुळाक्षरे बाळगणारी पीएमटी बस जेव्हा मी अधून मधून रस्त्यावर पाहत असे तेव्हाच्या भावना व्यक्त करणे अवघड आहे. ”

ह्या प्रसंगी श्री. पडसुले ह्याना खरोखरच भावना अनावर झाल्या. थोडे सावरल्यावर, त्याना आम्ही पीएमटी विरुद्धच्या आंदोलनविषयी छेडले असता ते म्हणाले “चाळीस वर्षांपूर्वीचा तो आंदोलनाचा दिवस मला चांगलाच आठवतो. काही उत्साही मंडळीनी रस्त्यावर आडवे पडून पीएमटी बसेस जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. तेव्हा आमच्या आंदोलनाचे नेते श्री. दादा पोफळे ह्यानी ‘मधे येईल त्यावरून बस नेणे पीएमटी चालकास अगदीच अंगवळणी पडले असून तुमचे भलते धाडस शब्दश: तुमच्या अंगाशी येईल’ अशी जाणीव करून दिली. त्यामुळे भिती व निराशा ह्या संमिश्र भावनेने ग्रासलेले आंदोलनकर्ते त्वरेने उठून उभे राहिले.



दुस-या दिवशी मग आम्ही आंदोलनकर्त्यांनी पवित्रा बदलला व सकाळच्या ६ च्या बसला काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे कर्वे रोडवरील एका बस थांब्यावर आंदोलनकर्ते जमले. परंतु, ७ वाजेपर्यंत एकही बस न आल्याने अर्धे लोक निराश होऊन परत गेले. मग ७.१५ ला एक बस भरधाव वेगाने येऊन थांब्यापासून पुढे १०० मीटरवर रस्त्याच्या मधेच चार ते पाच सेकंद थांबून पुढे गेल्याने उरलेल्या लोकांचीही निराशा झाली. ‘बस थांब्यावर बसची वाट बघणे मूर्खपणाचे असून आंदोलनकर्त्यांनी वास्तवाचे भान ठेवणे आवश्यक होते’ अशी टीका रोज बसने जाणा-या ‘जाणकारानी’ केली पण आम्ही डगमगलो नाही.” इथे पुन्हा एकवार पडसुले ह्यांना भावना अनावर झाल्या होत्या.

अर्थातच वाचकांना माहित आहेच की वर्तमानात अश्या प्रकारच्या आंदोलनाची गरज राहिली नाही आहे. स्कायबस, बीआरटी, मेट्रो, एअर टॅक्सी, महाट्यूब रेल, महाउड्डाण जाल आदी सुंदर कल्पना मंजूर झाल्या व योजनेची अर्धी रक्कम खर्च झाल्यावर मधेच बंद पडल्या. शेवटी २०२८ सालीच स्कायबस प्रकल्प राबविला गेल्याचे वाचकांना आठवत असेलच. फक्त ‘स्कायबस’ च्या मूळ योजनेऐवजी निराळ्या पद्धतीने ती राबविली गेली होती. हवेतल्या मार्गावरून बस चालवण्याऐवजी, १९८० च्या दशकात खरेदी केलेल्या पीएमटी बसेस एकेक करुन बंद पडल्या तेव्हा त्यांची रांग करून त्यांच्या टपावरून हवेत चालणारे पादचारी असे त्याचे स्वरुप शेवटी झाले हे ज्येष्ठ वाचकांना खचितच आठवत असेल. उद्याच्या अंकात वाचा “बीआरटी : एक नियोजनबद्ध बट्ट्याबोळ”


मुंबई (खास प्रतिनिधी): मुख्यंमंत्री गावडे ह्यांनी आज २०४८ पर्यंतच्या झोपड्या कायदेशीर करण्याचे आश्वासन दिले. "मुंबई आता अजून भार उचलू शकत नाही ! त्यामुळे ह्यानंतर मात्र एकाही झोपडीस परवानगी मिळणार नसून बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल" असे त्यांनी सांगितले. ह्या प्रसंगी राज्याच्या वेगवेगळ्या भागांसाठी खास निर्णय जाहीर करण्यात आले :

मुंबई:
  1. मुंबई लोकल गाड्यांच्या टपावर १५० पेक्षा जास्त प्रवाशांना प्रवेश दिला जाणार नाही. गेल्या एका वर्षांत वाढलेल्या अतिरिक्त एक्कावन्न लाख प्रवाशांसाठी सहा डब्यांच्या गाडीची घोषणा.
  2. अपु-या पाणीपुरवठ्यामुळे लोकानी आठवड्यातून दोन पेक्षा अधिक वेळा आंघोळ करु नये असा वटहुकूम काढण्यात येणार. दरम्यान अत्तर व इतर सुगंधी वस्तूंच्या वाढत्या मागणीमुळे फ्रेंच कंपनीला पुरवठ्याचे नवे कंत्राट देणार.
  3. फक्त आपल्या भागाजवळच्याच समुद्रावर आंघोळ करण्यास व कपडे धुण्यास परवानगी.
  4. मुंबईत रस्त्यावरच्या वाढलेल्या बेसुमार गर्दीची सरकारला जाणीव असून, रस्त्यात चालताना धक्का लागून कुणी समुद्रात पडल्यास तात्काळ मदत देण्यात येणार. ह्या घटनेत वाचलेल्याला घटनास्थळीच पोहायचे मोफत प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी वेगळा सिंकींग फंड उभारणार.

पुणे:
  1. पूर्ण शहराला वर्षातून चौदा दिवस सलग चार तास वीजपुरवठा होणार. उरलेले दिवस किमान पाऊण तास वीज पुरवण्याचे बंधन महावीज महापुरवठा मंडळावर राहणार. ह्यासाठी लागणारी अतिरिक्त वीज गुजरात कडून चढ्या भावात घेणार.
  2. महावीज महापुरवठा मंडळाच्या अतिव्यस्त कर्मचा-यांसाठी खास पावसाळी योजना: आकाशात ढग जमून पहिला थेंब जमिनीवर पोचताच ताबडतोब वीजपुरवठा बंद करण्याची स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करणार. त्यामुळे महावीज कर्मचा-यांचे सतत आकाशाच्या रंगाकडे व वा-याच्या वेगाकडे लक्ष ठेवण्याचे तणावपूर्ण काम कमी होण्याची शक्यता.
  3. ‘पुणे वेधशाळेचा हवामानाचा अंदाज’ ह्यावर आधारित दररोज महाराष्ट्र राज्य महावेधलॉटरी चालू करणार. ज्या दिवशी वेधशाळेचा अंदाज बरोबर येईल त्या दिवशी तिकिटाच्या रकमेच्या लाख पट रक्कम तिकीट घेणा-या सर्वांना मिळणार.
  4. महारस्ते महाविकास मंडळाच्या अडतीस वर्षांपूर्वीच्या अध्यादेशातील नुकतीच लक्षात आलेली शुद्धलेखनाची चूक सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलणार. ‘कंत्राटदारांनी रस्त्यांची कामे जास्तीत जास्त तीन दिवसात उरकावीत’ ह्याऐवजी ‘उकरावीत’ असे छापले गेले होते. म्हणूनच गेली कित्येक वर्षे, रस्त्यांची कामे झाल्यावर तिथे नांगरणी केल्यासारखे चित्र दिसत होते. त्यामुळे आता पेरणीही करून ‘आयटी सिटी’ ऐवजी ‘महाग्रीन सिटी’ निर्माण करण्याची शक्यता तपासण्यासाठी कृषीमंत्री स्विडनला जाणार.

शहरी विकास:
  1. सर्व शहरी भागात, रस्त्यावर सर्वत्र कचरा टाकलेला असल्याने मुद्दाम वेगळ्या अश्या कचरा पेट्यांची पद्धत बंद करण्यात येणार आहे. येत्या महिन्यापासून ह्याची अंमलबजावणी करून सरकार खर्चकपातीचा आदर्श घालून देणार आहे.
  2. सिग्नल यंत्रणेवर अवलंबून न राहता, स्वत:चे निर्णय स्वत: घेऊन वाहने चालवणारे सुजाण नागरिक वेगाने वाढत आहेत. त्यामुळे सर्व सिग्नल यंत्रणा कायमची बंद करून, वाहतूक पोलिसांना इतर खात्यांमधे सामावून घेण्याचा निर्णय लवकरच घेणार. त्यादृष्टीने ‘जसे जाऊ शकाल तसे’ अशी स्वनियंत्रित किंवा अनियंत्रित वाहतूक प्रायोगिक तत्वावर सुरु करणार. ज्या शहरांत अगोदरच अशी स्थिती आहे (उदा. पुणे) तेथील पालिकेस सिग्नलवर अनाठायी खर्च केल्याबद्दल ‘कारणे दाखवा’ नोटीस देणार.
  3. शहराचे बकालीकरण होण्याचा वेग वाढवण्यावर भर. अश्या शहरांत जगणे अशक्य झाल्यावर शहराचे पिढ्यान पिढ्या राहणारे रहिवासी खेड्यांकडे स्थलांतरित होऊन आपोआपच खेड्यांचा विकास होईल अशी ही कल्पक योजना अहे.

ग्रामीण विकास:
  1. सलग तीन पिढ्यात एकही आत्महत्या न करण्या-या शेतकरी कुटुंबास बियाणाचे एक पोते सवलतीच्या दरात देणार.
  2. गावात वीजेपासून बसणा-या धक्क्यांविषयी लोकजागृती करण्याची योजना. सलग काही वर्षे वीज न आल्याने लोक सध्या विजेच्या तारांचा कपडे वाळत घालणे, झोपाळा किंवा पाळणा बांधणे अशा कामांसाठी उपयोग करत आहेत.


कॅलिफोर्निया (विशेष प्रतिनिधी): येथील विशेष न्यायालयाने आज एका इसमाने टूथब्रशशी केलेला विवाह कायदेशीर मानला जाईल असा निर्णय दिला. जॉन गर्टेमूट उर्फ ‘बिट डिस्टर्बड’ ह्याने केलेल्या याचिकेवर हा निकाल देण्यात आला.

ह्या निमित्ताने गेल्याच वर्षी नॅन्सी मूर ह्या ४२ वर्षीय महिलेविरुद्धचा खटला वाचकांना आठवणे सहाजिक आहे. नॅन्सीने तिच्या पलंगाशी (किंग साईज बेड) केलेला विवाह कायदेशीर मानला गेला होता. तिचा मित्र डोनाल्ड ह्याने तिच्याविरुद्ध केलेला दावा फेटाळला गेला होता.

“डोनाल्ड तर फक्त २ वर्षे तिचा मित्र आहे पण गेली १२ वर्षे तो नॅन्सी तो पलंग वापरत आहे. त्यामुळे तिची भावनिक गुंतवणूक तिच्या पलंगात कित्येक पटीने जास्त आहे” हा तिचा युक्तीवाद मान्य झाला होता. न्यायालयाने ‘विवाहीत’ नॅन्सीचे घर सोडण्यास डोनाल्डला १० दिवसांचा अवधी दिला होता.

डोनाल्डनेही मग त्यावर तो पलंग ‘मेड इन चायना’ असल्याचे सांगून, ‘अमेरिकन नसलेल्याशी विवाह’ हा बेकायदेशीर असल्याचा प्रतिवाद केला होता. परंतु न्यायालयाने ह्यावर विशेष टिपण्णी करताना ‘मेड इन चायना’ वस्तूंना ‘काडीमोड’ दिला तर बहुसंख्य अमेरिकन लोकाना आदिमानवाप्रमाणे नैसर्गिक अवस्थेतच वस्त्र, निवारा व असंख्य वस्तूंशिवाय रहावे लागेल असे म्हटले होते.

ह्या सर्व पार्श्वभूमीवर, आता पेनसिल्वेनियातल्या मॅगी मरे ह्या महिलेने ‘गवतकापणी यंत्र’ अर्थात ‘लॉन मोवर’शी केलेला विवाह कायदेशीर ठरतो का ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



- राफा

http://rahulphatak.blogspot.com/




 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा

21 comments:

Anonymous said...

Rahul,
This is ultimate.
My stomach started paining with laughter.

Hemant

हेरंब said...

राफा, जबरदस्त... !! कसले चिमटे (उर्फ लाथा) काढले आहेस. अगदी गल्ली ते दिल्ली सगळ्यांना छान ठोकलं आहेस. खूप छान.

सौरभ said...

एकदम झकास..अशक्य भारी लिहिल आहेस..मजा आली खुप वाचताना.

अनिकेत वैद्य said...

:D :D :D

राफा said...

Thanx All :)

@हेमंत : पोट दुखायचे थांबले का ? :). प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार !

@हेरंब: येस, चिमट्यांनी गेंड्याच्या कातडीला काही फरक पडत नाही रे. लाथांनीच काही फरक पडला तर :) ! तुझा ब्लॉग ओझरता पाहिला. ब-याच वेळा माझ्या 'write only' mode ची खंत वाटते. (स्वत: छान छान लिहीणारे इथे प्रतिक्रिया देऊन जातात तेव्हा नेहमीच ही भावना दाटते.)


@सौरभ : 'अशक्य भारी' हे आवडलं :). खूप धन्यवाद !

@अनिकेत : आता 'शब्दांच्या पलिकडले' वगैरे का ? म्हणून फक्त चिन्हे काढली आहेस :). ठांकू ठांकू !

अपर्णा said...

एकदम लोटपोट...अगदी कॅलिला पण कव्हर केलंत...सॉलिड आहे तुमचा पेपर... आता वार्षिक सभासदच होतेय....(मणजे चकटफ़ु फ़ॉलोअर) नाहीतर उगाच बिलं पाठवाल आणि मग आली का पंचाईत???

राफा said...

थॅंक्स अपर्णा !
नाही बिल नाही. पहिले वर्ष पेपर फुकट आहे मग तर हरकत नाही ना ? :)
अगदी कॅलिला पण कव्हर केलंत >>> आता कामासाठी 'अंडरकव्हर कॉप' सारखं फिरावं लागतं ना कुठे कुठे.. :)
btw, ओळख नसली तरी मला 'अरेतुरे' च केलेलं आवडेल..
(स्वगत : च्यायला, फोटो बदलला पाहिजे. फार वयोवृद्ध, ज्ञानी वगैरे वाटतोय की काय !)

अपर्णा said...

नाही रे फ़ोटो बदलू नकोस..प्लीज..छान आलाय....(हो फ़ोटो छान येतो नाहीतर छान तर आपण सगळेच दिसतो...ही ही...उगाच तू शेवग्याच्या झाडावर चढशील आणि पडशील... आणि मग बाकीचे फ़ोटु खरंच खराब येतील) जाऊदे कसला पीजे आहे....एक वर्षानंतरचं नंतर बघु....ही ही...:)

राफा said...

@अपर्णा : ...आणि मग बाकीचे फ़ोटु खरंच खराब येतील >>>> LOL ! (ह्याचीच सवय जास्त आहे ;) )

Jayanti said...

hahahahahahahah
Akadum BHaree..
:-D :-D :-D

राफा said...

Thanx Jayanti :)

Parag said...

Masta!
:D :D

राफा said...

Dhanyawaad Parag :)

Raj said...

LOL.. pharach masta. :D

राफा said...

Thanx Raj :)

Unknown said...

raphaa, zabari jamalay paper!!! mastach!

राफा said...

श्रेयस, मंडळ आभारी आहे :)

अमोल said...

जबर्या मस्त जमून आलाय तुझा पेपर...आज शुक्रवार तसही काम नाहीये आणि त्यात माझ्या मित्राने तुझा ब्लॉग id दिला मग काय आत्तापर्यंतचा वेळ मजेत... keep it up!

राफा said...

अमोल, Thanx ! तुझा शुक्रवार सार्थकी लागला हे वाचून आनंद झाला.
खरं म्हणजे शुक्रवार 2nd half हा सर्वांना (officially) सर्फिंग करायला द्यायला हवा कॉर्पोरेट जगतात ! कर्मचा-यांच्या चित्तवृत्ती उल्हसित होऊन 'विकेंड' चे स्वागत करायला छान मनोभूमिका तयार होईल :) आणि विकेंड छान गेला की सोमवारी उत्साहाने हजर होतील बेटे ! बरोबर ना?

Anonymous said...

wonderful.......keep on writing

-----Vasudha

राफा said...

Hi Vasudha, Thanx a lot for your feedback.