प्रिय देव,
हाय ! वॉट्स अप ?
सॉरी.. म्हणजे 'साष्टांग नमस्कार !' असं काहीतरी तुझ्या सरावाचं गंभीरपणे लिहीणार होतो. पण लोकप्रिय देवळात (‘जागृत देवस्थान’ फेम) पुजारी सदृश्य घामट्ट लोक असतात ना आणि ते भक्तांना नीट दर्शन घेतलेले नसतानाच अंगणात घुसलेल्या गुराला हाकलावे तसे पुढे ढकलतात ना, अगदी तसेच माझे पत्र ‘टिप्पिकल’ दिसतयं म्हणून न वाचताच पुढे ढकलून देशील असे वाटले.. म्हणून जरा लक्ष वेधून घेतले. तर ते असो.
वॉट्स अप ? ‘वरती’ काय चाल्लंय ? काय कसं काय एकूणात ?
हे असं म्हणजे एक विचारण्याची पद्धत आहे.. कारण तसं एकूणात तुझं बरंच बरं चाललं आहे हे दिसतचं आहे ! माझंही ठीक चाललय म्हण ना. लौकिक अर्थाने (म्हणजे अलौकिक अर्थानेही असेन कदाचित) मी ब-यापैकी सुखी वगैरे आहे.
अर्थातच ही सारी तुझीच कृपा रे बाबा ! (असंही एक म्हणण्याची एक पद्धत आहे तेव्हा लगेच शब्द्श: घेऊ नको ! कारण आम्ही सगळेच जण तुझीच 'प्रॉडक्टस' आहोत तेव्हा थोडा फार ‘मेंनेटन्स’ करण्याची जबाबदारी तुझी नाही का ?) पण नाही, आभार प्रदर्शनासाठी मी हे पत्र लिहीले नाही.
होतं काय की तूच दिलेल्या ज्ञानेंद्रियांचा वापर करून जगात एकूणच जे काही चाललं आहे ते समजतं... बोचणारं, खुपणारं.. मनाला भसकन भोसकणारं. हे सर्व म्हणजे गरिबी, क्रौर्य, अस्वच्छता, अन्याय, धर्मांध/सत्तांध श्वापदं, अंसवेदनशीलता... त्यातून निर्माण होणा-या वेदना, निराशा, चिंता, मनस्ताप, लाचारी, हतबलता वाहणारी माणसं. प्रत्येकाचे ओझे वेगळे.. रस्ते वेगळे, काटे वेगळे.
हे सगळं.. बघवत नाही रे ब-याच वेळा. म्हणून तुला पत्र लिहीण्याचे ठरवले. काहितरी केले पाहिजे ना ? दुस-यांची दु:खं नुसताच पाहत राहिलो तर तुझ्यात आणि आमच्यात काय फरक राहिला ?
रिअली.. थॅंक गॉड की मी देव नाही ! तूझेच आभार तू मला 'तू' न बनवल्याबद्दल !
बरं सर्वात आधी एक गोंधळ दूर कर बघू.. नक्की कुणी कुणाला तयार केलं ?
म्हणजे.. तू आम्हाला का आम्ही तुला ?
आमच्यापैकी काही जणांना हा प्रश्न कित्येक दिवस छळतोय ! तू नसशीलच तर मात्र आमच्यासारखे येडे आम्हीच.. ठार वेडे लोकं असतात ना, ते स्वत:शीच बोलतात, स्वत:च मनात तयार केलेल्या वेगळया जगात राहतात.. अगदी तसेच ठार वेडे आम्ही ठरू.. किंवा महामूर्ख ! हजारो वर्षे लाखो लोक ‘तू आहेस आणि आम्हाला घडवणारा तूच आहेस’ ह्या समजूतीत किती वेळ, अन्न, साधने आणि संधी वाया घालवत आले आहेत बघ.. म्हणजे, असलास तर बघ !
तर, तू आहेस का ? आणि असलास तर का आहेस ?
सवाल सरळसोट आहेत त्यामुळे आडवळणी उत्तरे नकोत. आणि देणारच असशील उत्तरे, तर शक्यतो मराठीतच दे. शाळेत संस्कृत 'स्कोरिंग' म्हणून ठीक होते, आता आठवत नाही त्यामुळे कळणारही नाही. शिवाय संस्कृतमधे ‘डबल मिनिंग’ वाले डायलॉग फार असतात ! उगाच लफडा नको.
हां , आता हा प्रश्न मनात ठेवूनही, तसे सवयीने अजूनही हात जोडले जातात तुला ! समोरचा विचित्र वागला तरी जुनी ओळख अशी लगेच विसरायची नसते ना.. पण हळूहळू तेही बंद होईल बघ. आणि हे बघ, उगा फाटे फोडू नकोस हां.. धर्म वगैरे पुढच्या गोष्टी आहेत रे! उगाच आमचे बघून ह्या प्रश्नाला राजकीय रंग फासून आखाडा करु नकोस साध्या गोष्टीचा. प्रश्न तू आहेस की नाही हा आहे ! तू म्हणजे अज्ञात, अदृश्य शक्ती वगैरे.. उगाच ‘आमच्यातल्या चांगुलपणा म्हणजेच तू’ वगैरे डोस नको देऊ.. आमच्याबाहेर कुठेतरी आहेस का हा प्रश्न आहे !
मग, आहेस का तू ?
काहीच उत्तर आले नाही तर, 'उत्तर येऊ न शकणे' हेच कदाचित उत्तर असेल ! वर्तमानपत्रात जमिनीच्या मालकीविषयी वगैरे जाहिरात देतात तसेच काहितरी. कुणी उत्तर नाही दिले म्हणजे आपले आपण काय ते करायला मोकळे ! पण मग तू नाहीस असेच समजावे लागेल. तो सवाल ये है के जवाब आएगा या नहीं !
तुझा 'बॅड पॅच' चालू आहे का ? तसं असेल तर फारच लांबलाय तो ! कारण बरेच दिवस, महिने, वर्षे बघतो आहे की तुझे जितके गुणगान चालले आहे त्याच्या एक लक्षांशही महिमा दिसत नाही तुझा. प्रत्येक वेळेला झिरोवर आऊट म्हणजे काय ? चमत्काराशिवाय नमस्कार होणे बंद होईल बघ एक दिवस.
का उलट आहे ? नुकत्याच स्वर्गात निवडणूका वगैरे होऊन तू पाच वर्षे (म्हणजे आमची कोट्यावधी वर्षे. आयला ती एक वेगळी गोची आहे. पण आम्हीच तयार केलेली बहुतेक) आसन घट्ट केले आहेस आणि आता आम्ही मतदार काशीला गेलो काय किंवा काशीत गेलो काय !
बाय द वे, एक सहज म्हणून विचारतो, स्वर्गात 'उप-इंद्रपद' वगैरे नसतं का ? नाही, कारण एव्हढया बाला तिथे अहोरात्र डान्स करत असतात पण अजून बंदी आली नाही म्हणून विचारलं !
पण तरी तुझं बरं चाललयं असं दिसतयं... चालणारचं रे. बघ ना ! वेगवेगळी नावं, रंग, झेंडे आणि इमारती आहेत तुझ्या नावाने. वेगवेगळ्या उद्देशाने वेगवेगळी लोकं तुझं अतोनात मार्केटींग करत आहेत. दिवसेंदिवस ग्राहकवर्ग वाढत आहे आणि उत्पादनांच्या किमतीसुद्धा. 'मोक्ष' किंवा 'मुक्ती' इतके विकले गेलेले दुसरे उत्पादन नसेल !
बरं.. इथे 'एकदा मोफत वापरून बघा मगच विकत घ्या' चीही सोय नाही की 'नमुन्या'चीही अपेक्षाही नाही, तरी लोकं आपली 'कॉन्सेप्ट' विकत घेताहेत ! प्रत्येक दिवसाचा हफ्ता फेडताहेत ! 'शेवटचा हफ्ता' फेडल्यावर तरी काहितरी हातात मिळेल म्हणून आशेवर राहताहेत!
ओके. तर सुरुवातीपासून सुरु करुयात. लेट्स स्टार्ट फ़्रॉम द बिगिनिंग.. अ व्हेरी गुड प्लेस टू स्टार्ट!
बघ ना, माणूस जन्माला येतो ह्या जगात ( बिच्चारा !) त्या आनंदाच्या क्षणी त्याला काही बोनस गुण देण्याऐवजी तू चक्क आधीच्या जन्माची थकबाकी त्याच्यावर लादतोस ? (उगाच नाही सगळे रडत रडत येत !) म्हणजे तो बिचारा अशा पापांचे उणे गुण घेउन जन्माला येतो, जी पापे त्याने जेव्हा केली, तेव्हा तो आत्ता आहे तो नव्हताच ! टू मच यार !!!
सॉरी.. यार, दोस्त वगैरे आजकालची उद्गारवाचक स्टाईल आहे रे. चिल !
पण हे अंमळ अति आहे असे नाही वाटत का ? हे म्हणजे एखाद्याचे सेव्हींग अकाउंट उघडताना बॅंकेने आधी दुस-याचे कर्ज फेडा असे सांगण्यासारखे आहे. प्रत्येकाचे अकाऊंट असे जबरी निगेटीव्ह बॅलन्स ने चालू का करतोस बाबा ? देव आहेस का सावकार ?
एकूण तू 'तर्कापलिकडला' आहेस ह्याविषयी मात्र एकदम सहमत !
आमची अशी एक समजूत आहे बर का.. की आम्ही काही कुकर्मे करतो त्याची नोंद पाप खात्यात होते आणि त्यानुसार पुन्हा आम्ही जन्ममृत्यूच्या फे-यात अडकतो किंवा असेच काहीतरी...
पण बघ, आम्हाला बुद्धी तूच देतोस, शक्ती देतोस, युक्ती देतोस आणि शेवटी काही काही भाग्यवंत विजेत्याना 'बंपर ड्रॉ' सारखी मुक्तीही तूच देतोस... जर तूच सर्व करतोस, तर मग आमची गरज काय ? का आम्ही फक्त खेळणी म्हणून हवे आहोत ? बरं तसे जर नाही म्हणालास तर तू हे सगळे काहीबाही करतोस ही आमची समजूत चुकीचीच आहे म्हणायची..
मग आमचे आम्हीच काय ते करायचे नि भोगायचे म्हण की ...
पण मग... तू कशाला हवा ?
बरं अमुक अमुक ह्याला मुक्ती मिळाली आहे ह्याची खात्री तरी काय ? तो आपला मेल्यावर शांतपणे - म्हणजे मेल्यावर सर्वसाधारणपणे पडतात तसा - पडलेला असतो. तो थोडाच ओरडून सांगणार आहे की
"काळजी करु नका, आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार मला स्वर्गाचा व्हिसा मिळाला आहे... पाच वर्षांत सिटीझनशीप मिळेल. या कधी त्या बाजूला आलात तर !"
किंवा
"मुक्ती वगैरे काही नाही, दुबईत जॉब देतो सांगून खोट्या एजंटने लावावा तसा मला चुना लावला गेलाय आणि पुढचा जन्म मला बिहारमधे किंवा युगांडात घ्यावा लागणार आहे"
हे असे नसलेले काही दाखवून लोकाना लुबाडणार्याला आमच्यात भोंदू किंवा भामटा म्हणतात. अर्थात तुझ्या नावावर सर्व व्यवहार चालतात त्यामुळे तुला माहित असणारच !
आम्हाला मुक्ती हवी आहे आणि त्यासाठी तुला आमची भक्ती आम्ही देऊ करतो... हं.. हे थोडं खंडणीसारखं झालं नाही का ?
जन्म मृत्यूचा फेरा तू निर्माण केलास.. आता त्याची दहशत दाखवून तुला भक्तीरुपी खंडणी आम्ही द्यावी आणि मुक्ती प्राप्त करावी अशी योजना आहे का ? प्रत्येकजण ह्या महाकाय विवरातून बाहेर पडायचा प्रयत्न करतोय पण ठराविक मार्गाने वर जाणार्यांनाच जर तू वर काढणार असशील तर मूळात खड्डा खणायचाच कशाला ? दुस-यांसाठी खड्डा खणणारा स्वत: त्यात पडतो हे तुला माहित नसेल असे कसे म्हणू !
मला अगदी खरे काय वाटते सांगू ? तुम्हा देव लोकांत काहीतर गेम चालू आहे. गेम म्हणजे गँगस्टर मूव्हीसारखा ‘गेम बजाया’ वाला गेम नाही रे.. गेम म्हणजे संगणकावर खेळतात ते खेळ. ज्याची जास्त भक्ती लोक करतील त्याला जास्त पॉईंट्स ! मग पुढारीच दंगली घडवून आणतात तसे तर तू, म्हणजे वेगवेगळे देव, आपल्या हस्तकांकरवी आमच्यावर संकटे तर आणत नाहीत ना ? म्हणजे आम्ही तुझ्याकडे धाव घेणार. अमुक झाले तर अमुक देव. तमुक झाले तर तमुक देव. शिवाय महिन्याप्रमाणे भक्तीचे बोनस पॉईंट्स. तुमचे आसन घट्ट आणि 'टॉप स्कोरर्स' च्या लिस्ट मधे कुणाकुणाचे नाव वर झळकते आहे आणि आम्ही.. !
बरं ते जाऊ दे.
असं बघ.. सगळी तुझीच माया आहे ना ? मग बी पॉझिटीव्ह ! बघ जरा कुठल्याही शहरातल्या, गावातल्या वृतपत्राकडे. बघ वाचवतात का त्या बातम्या... तेही प्रसन्न सकाळच्या वेळी. नाही ना ? मग नसतील वाचवत तर मग घे ना सगळ्या वृत्तपत्रांचा नि टिव्हीचा ताबा. दाखव तुझी माया ! रोज सकाळी पेपर वाचताना आम्ही रामराज्यात राहतोय असे वाटावे ही माया तू सहजी निर्माण करु शकणार नाहीस का ? पण नाही ! हवं तेथे 'मायेने' वागणा़-यातला तू नाहीसच.
आता सांसारिक कर्तव्ये पूर्ण करता करता भक्ती करावी अशी अजून एक आमची समजूत आहे. तूच वेळोवेळी तसा 'डोस' दिलास ना ! पण 'हे करता करता ते' म्हणजे काय ? तो काय साईड बिझनेस आहे का ? मग उलट का नाही.. म्हणजे आम्ही फूल टाईम भक्ती करतोय (थोडक्यात चकाट्या पिटतोय) आणि तू आमच्या सर्व ऐहिक इच्छांची आपोआप काळजी घेतो आहेस, असे का नाही ? इस हाथ ले उस हाथ दे ! (आणि नको तिथे सेन्सॉरशीप नको. ‘ऐहीक’ म्हणजे ‘फुल मेगा पॅकेज’ बरं का !)
आता खरोखरच तू न दिसल्याने 'काय कुठे गायब ? काय तुझा पत्ता ?' असं विचारायची वेळ आली आहे. तू चराचरात आहेस (म्हणजे कसा आणि कुठे ते देवाला म्हणजे तुलाच ठाऊक ). त्यामुळे पत्र लिहिल्या लिहिल्या तुला सहज वाचता येईल अशी अपेक्षा.
एकच सांगतो ! आमचं वर्तमान जर असंच राहिल तर तुझं भविष्यही कठीण आहे आणि आमच्या इच्छांना काही भविष्य नसेल तर भूत होऊन तुझ्याशी वैमनस्य घेण्याखेरीज आम्हालाही काही पर्याय नसेल !
तुझाच अतिनम्र,
राफा (तू निर्माण केलेल्या एका देहाचे नाव बरं !)
ता. क. १ : Yours faithfully असंही लिहायची पद्धत आहे एक, आता ‘फेथ’ वर ‘फुल्ली’ मारण्याआधी तुझे उत्तर येण्याची अपेक्षा !
ता. क. २: सोबत एकवीस रुपयाची मनीऑर्डर करणार होतो पण पुन्हा पत्ता काय लिहायचा हा प्रश्न.. त्याऐवजी कोप-यावरच्या देवळात दानपेटीत टाकीन म्हणतो !
19 comments:
मस्तच!! भन्नाट झाला आहे लेख
Anonymous, प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक आभार !
(पण जरा नाव लिहा की.. उगाच देवाने लिहील्यासारखं वाटतयं :) )
Really nice, excellent use of English words. Cool. Joy to read
Anonymous, तुम्ही दुसरे Anonymous असाल तर तुमचेही मन:पूर्वक आभार :) ..
Dev, Thank you very much sir ! :)
tu kahihi lihilas tari te jam bharee watat rao!!!!
lihit raha.. :)
Avani, tu thor ahes !
(ata he lihilele pan jam bhari watatay na ;)) wachat raha.. :)
bhari abhiprayabaddal abhari ahe jam !
कसला सणसणीत (लगावलेस!!! ) लेख झालाय :)
मी वाचलेल्या काही उत्कृष्ट लेखांपैकी एक आहे. वाक्यावाक्यास टाळ्या पडल्या, जसा काही शोलेच पहायला मिळाला. शब्दांचा फार खुबीने वापर करून बरीच भडास काढली आहे बाबा... मला भीती वाटली ती ही की हे पत्र वाचून देव असला तरी बाहेर येणार नाही... बाकी गेम खेळायचं थांबतील कि नाही ते तो देवच जाणे... बाकी ओम फट स्वाहा
Awesome....
Sakhi, Abhishek व इंद्रधनू : मस्त प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक आभार !
@Sakhi : तुझी प्रतिक्रिया दणदणीत :)
@Abhishek : मला भीती वाटली ती ही की हे पत्र वाचून देव असला तरी बाहेर येणार नाही... >>> LOL
कडक येकदम...
होतात कुठे राव तुम्ही ? ( हा प्रश्न मलाही -म्हणजे तुझा ब्लॉग सोडून कुठे कुठे भटकलो !)
लई मजा आली...
सागर, मन:पूर्वक आभार !
होतात कुठे राव तुम्ही ? >>>> हा प्रश्न मधे मधे मीही मला विचारतो ;)
(वेळ मिळेल तसे 'तळघरातले' (archives) मधले लिखाणही वाचा असे आवर्जून सांगेन. पुन्हा एकदा धन्यवाद!)
'देवास पत्र' आणि ते पण इतके मनापासून मोकळे.....अगदी खरच देवाने ते वाचले असेल का रे? जर असेल तर नक्कीच उत्तर देईल....तुला दर्शन द्यावे देवाने नाहीतर email तरी करावीच... असे वाटले.....
तू लिहिताना सर्वांच्याच मनातले लिहिले आहेस,आणि एखादा प्रश्न खरा मनापासून आल्यावर उत्तर नक्कीच अपेक्षित आहे....आणि इतके सारे प्रश्न माझ्या पण मनातले अनेक तू ह्या पोस्ट मध्ये सहज विचारलेस.
नुसतेच लिहिणारे खूप असतात पण इतरांच्या मनातले ओळखून ते सहज सोप्या शब्दात मांडू शकणारे कमी......:)
श्रिया, पुन्हा एकदा मन:पूर्वक धन्यवाद.
नुसतेच लिहिणारे खूप असतात पण इतरांच्या मनातले ओळखून ते सहज सोप्या शब्दात मांडू शकणारे कमी......:) >>> that's a big compliment. Thanx a ton !
देवाने अजून तरी इमेल, फोन किंवा बाकी मार्गाने संपर्क केलेला नाही, उत्तर दिलेले नाही.. आता 'येऊन गेलो पण तुम्हीच घरी नव्हतात' असे ऐकायची मनाची तयारी ठेवली आहे :).
Jinkalas re RaPha tu.....
Patra vachatana asa vatat hota ki, devane nakki patra vachala asel, pan kadachit tyachyakade uttar nasel........
पुन्हा एकदा धन्यवाद श्रीप्रसाद.
खरे आहे. खरं सांगायचं तर देव भेटला आणि तो इंद्र वगैरे पपलू असला तर नमस्कार करेनच कारण आधी लाथ घालेन ! (नाकर्त्या राज्यकर्त्यांची परंपरा तेव्हापासूनची !).
इथे मी अतिसामान्य आहे हा वेगळा मुद्दा. मुख्य मुद्दा देवाचे 'ऑडीट' कुणीतरी करायला पाहिजे ना. लई बिल वाढलयं !
भगवान के घर देर है अंधेर नही!!!! राफा उशीर झाला मित्रा.
तू एवढा friendly झालास कि माझ्या system ने ते automatically जंक मेल मधे टाकलं. जरा काही वेगळं दिसलं की दिलं आपलं जंक मध्ये टाकून , system outsourced केली होती , काय करणार कुबेराने पण तेवढेच sanctioned केले. असो.
मला मिळालं कसं पत्र? जंक department ला वाटलं की खूपच कंटाळा आला आहे तर थोडं काम करूया म्हणून ते बसले shredding करायला . आणी “हाय ! वॉट्स अप ?” बघून त्यांची पण दांडी उडली. धावत माझ्याकडे घेवून आले "boss कोणीतरी एकदम solid प्रश्न विचारलेत एकदम realistic (आता boss ची वाजणार म्हंटल्यावर ते काय संधी सोडणार).
बऱ्याच दिवसांनी कोण तरी friendly level ला बोलतोय , जरा मोकळं मोकळं बरं वाटलं. बघु कितपत जमतं ते.
तर झाला असं की काही वर्षान पूर्वी (हो कोटी , तेंव्हा maths वेगळं होतं, खूप कठीण तुला नाही समजायचं बाबा ) माझ्या कडे एक एकदम अफलातून project आला. मीच team बनवायची , design पण माझंच , पूर्ण मीच execute करायचा. धूळ खात पडलेला, प्रत्येक शुक्रवारी timesheet मध्ये काय टाकायचं ह्या विचारांत असलेला PM जेवढा उत्तेजित होईल त्यापेक्षा कितीतरी पटीने मी उत्तेजित झालो. तसा मी इतरांच्या मानाने बऱ्यापैकी creative आणी कामाचा कंटाळा नसणारा देव आहे (कोणता ते तुझं तू समजून घे).
आम्ही प्रोजेक्ट साठी agile technology वापरायची ठरवली. म्हणजे असं की रोज सकाळी मिटिंग भरावयाची , काल काय केलं त्याच discussion करायचं , आजचं ठरवायचं वैगरे. मी आपला रोज नव्या उत्साहाने नव नवीन कल्पना घेवून यायचो , काल जे केलं ते अगदी तंतोतंत आहे बघून खुश व्हायचो. आणि एका गोड गैरसमजात होतो , कि माझी team “Minutes of meeting” टिपून घेतेय. पण इथेच मार खाल्ली …….(so now you know why the operational manual is missing!!!!!!).
मला वाटते तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली.
जसं की……………..
मी ज्ञानेंद्रिय दिली पण वापरायची कशी हे तुमचं तुम्हाला ठरवायला लागलं आणि प्रत्येकाने आपली सोय पाहिली. मी तुम्हाला बनवलं पण "मन" सोडून, "मन" हा प्रकार तुम्ही बनवला. मी आहे , पण project च budget कधीच संपलं आहे , so no support आणी मला वरुन order आहे की scrap कर , मी तसा प्रयन्त करून बघितला …but unsuccessful… प्रयन्त अजून चालू आहेत (मनापासून नाही).
धर्म , राजकीय हे शब्द माझ्या शब्दकोशात नाही सापडले. मी असं काही बनवलं होतं का, शी मला पण आता आठवत नाही नीटसं.
'बॅड पॅच' अरे बोलूच नकोस. एवढी छान system पण operation manual आणी copy rights नाही म्हणून प्रत्येक जण आपल्या बापाचीच समजून वाट लावतोय ...किती तडफड
अगदी जन्मल्या जन्मल्या तुम्हाला सगळं समजून घ्यायची घाई होते आणी समजलं नाही की लागता आपले रडायला. आणी attitude तर बघ , काही “नाही समजलं” स्वीकारणं नाही मग काय "मागच्या जन्मी" anyway कोण होतं बघायला ....पचते थाप तुमची. मी शक्ती दिली, बुद्धी द्यायची इच्छा होती आणी युक्ती हि तुमचीच बरंका.
आमचा वर छान चाललंय. तुमच्या एवढी सुंदरता नाही येथे सगळं आपलं निळा आणी पांढरा, पण म्हणून करमणुकी साठी तुमचा वापर नाही रे करत. फक्त वाट बघतोय की कोण माझे खरे efforts समजतोय. एखादा जरा जरी जवळ पोचला की बस आवडतो आपल्याला ... मग त्याचं तिथे आटपला की ...मी घेतो बोलवून ...त्यालाच तुम्ही मुक्ती नाव दिलं का (नाव छान आहे)?
तुमचं वर्तमान तुमचं भविष्य सगळं तुमच्या हातात. तुझ्या सारख्या होतकरू मुलांना घे हाताशी , तसा तुला बरंच चांगला समजलंय …. कर सुरुवात. मी पाठीशी वैगरे काही नाही…… पण निभावून नेण्याएवढी शक्ती आधीच दिली आहे.
राफा , नाव आवडलं तुझं. कशावर फुल्या मारायच्या आणी कशावर नाही हे स्वात्यंत्र तुला मिळाल आहे (yah because of same missing operational manual) बघु कसा उपयोग करतोस ते. दानपेटी , नको ढोंग आहे ते. त्यापेक्षा गरजूला एक तास फुकट शिकव ....काहीही ज्याचा त्याला उपयोग होईल (अगदी भिकाऱ्याला भिक मागायची नवीन ट्रिक सुद्धा चालेल)
चुकून See you then असं आपलं नेहमी प्रमाणे लिहिणार होतो .....पण नाही .....तुझ्याकडून अपेक्षा वाढल्यात आता ...so best of luck!!!!
ता. क : व्याकरण माफी असावी. मराठी असे माझी सुद्धा मायबोली जरी ती type करता न येते !!!!!
As usual Super :) भाषा खूपच आवडली, अगदी मीच लिहितिए असं वाटलं :) I don't write blogs, डायरी मात्र लिहिते कधी कधी. याच विषयावर मी पण लिहिलं आहे पण तुमची पोस्ट नक्कीच उजवी आहे :)
@Dev : प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक आभार ! (दुस-या पोस्टच्या कॉमेंटवर प्रतिक्रिया दिल्याने इथे फक्त आभारप्रदर्शन :) )
@Poonam : प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक आभार पण एक विनंती वि़शेषही :).. ब्लॉग सुरु कर ! डायरीमधला जो भाग प्रसिद्ध करता येण्यासारखा असेल आणि करावासा वाटेल तो जरुर लिही तिथे. आणि मुख्य म्हणजे माझ्यासारखे अनियमित लिहू नकोस शक्यतो ;)
Post a Comment