Jul 19, 2015

सांगतो ऐका!

पुण्यात भर वस्तीत डेक्कनसारख्या मध्यवर्ती भागात घडलेला हा प्रकार! मी स्वत: अनुभवलेला. कुणाही संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यात टचकन पाणी आणेल असा. ह्या भीषण वेगाने होणा-या बदलाला सामोरे जायला आपण तयार आहोत का?

डेक्कन च्या चौकात एक पुस्तकांचे दुकान. नुकतेच नवीन रुपात आलेले. तिथे दुसरी भेट. मी व माझी धर्मपत्नी (पक्षी: बायको).

मागच्या म्हणजे पहिल्या भेटीत ह्या सगळ्याची सुरुवात झालीच होती. त्यावेळी मी चार पुस्तके विचारली. त्यातले एकच मिळाले (इतके काही मी वेगळे वाचत नाही गडे!). एक आऊट ऑफ प्रिन्ट होते (असणारच होते, पण आशा वेडी असते). एकाची एकच प्रत व ती डिफेक्टिव आहे म्हणून नम्रपणे सांगण्यात आले वगैरे. पण हे सगळे शोधताना, विम्बल्डनचे बॉल बॉइज व गर्ल्स जितकी तत्परता दाखवत नसतील इतका चुटपुटीतपणा तिथला इसम दाखवत होता. इथेच माझ्या मनात खळबळ उडाली होती! पुस्तक उपलब्ध नाही म्हणताना तो खजील होत होता (पुन्हा खळबळ!) शेवटी ते एक पुस्तक मिळाल्यावर त्याला माझ्यापेक्षा जास्त आनंद झालेला दिसला (खळबळीचा क्लायमॅक्स!) ह्याविषयी राजच्या ब्लॉगवर वाचले असूनही हा अनपेक्षित अनुभव मी कसाबसा पचवला होता.

घाबरत धडधडत्या अंत:करणाने परवा पुन्हा गेलो. ३-४ पुस्तके घेतल्यावर बिलिंग काऊंटरला. तेव्हढ्यात तोच इसम आला. मला ओळखलेसे वाटले. 'हॅलो सर' अशा भावार्थाचे काहीतरी पुटपुटला. (पुन्हा मंद खळबळ चालू! सौजन्य, तेही गि-हाईकाशी?)

मग झालेला हा संवाद. आतडे पिळवटून टाकणारा:

मी: अं.. वेळ काय आहे तुमची?
(उत्तराची सुरवात 'दुपारी १-४ बंद असते' अशीच असणार अशी पूर्वानुभवावरून खात्री).
तो: सर, सकाळी ७ ते रात्री ९.
(वेडा कुठला. मराठी पुस्तकाचे दुकान आणि मराठी कळत नाही! तू कधी जागा असतोस ते नाही विचारलं! वेळ विचारली वेळ! दुकानाची!)
तो (माझा साशंक चेहरा पाहत): हो सर आणि सकाळी आम्ही खरचं सातला चालू करतो.
(आता माझा बांध फुटायचा बाकी होता. सकाळी ७ ला चालू? म्हणजे फिरायला येऊन घरी परतताना दुकानात डोकावू पाहणा-या वाचनप्रिय मंडळींची, ऑफिसला जाता जाता ठराविक पुस्तक पटकन खरेदी करु इच्छिणा-यांची किंवा गर्दीची वेळ टाळू पाहणा-या वयस्कर व्यक्तिंची अश्या ह्या सगळ्या लोकांची सोय! गि-हाईकांची सोय? देवा अजून काय काय ऐकवणार आहेस)
मी: रंदबधीमसते?
तो: सर?
मी (भावनातिरेकाने कोरडा पडलेला घसा किंवा दाटून आलेला गळा.. ह्यापैकी काहीतरी एक ठीकठाक करत): बंद कधी असते? म्हणजे कुठल्या वारी?
(बरं झालं आज आलो. आज चालू आहे म्हणजे आज वारी तर बंद नसते. नाहीतर खेप पडली असती. फोन करायला पाहिजे होता.).
तो: सर, सातही दिवस चालू असते.
मी: ...
(इथे डोळ्यापुढे अंधारी आली बहुतेक त्यामुळे मी काही बोलू शकत नव्हतो).
मी (मनातल्या मनात तेही हळू पुटपुटत): कु.. कुठल्या शहरात तुमचे दुकान आहे माहीत आहे ना? (मनातले ऐकू गेले की काय त्याला )
तो: ('चुपके चुपके' मधे 'आप गाते भी है' असं शर्मिला टागोरने विचारल्यावर धर्मेंद कसा मान खाली घालून 'कसचं कसचं' असा हसतो, तसा मंद हसत व टरटर करत प्रिंट झालेल्या बिलाचे चिटोरे फाडत): सर, तुमचे इन्वॉईस.
आले की नाही पाणी डोळ्यात?



मित्रमैत्रिणींनो,
वरील भागातील अतिशयोक्ती व मूळ (ख-या) प्रसंगाला दिलेली फोडणी हा विनोदाचा भाग झाला. पण मी लिहीले आहे ते 'बुकगंगा' च्या सहाय्याने नवीन रुपात आलेले 'इंटरनॅशनल बुक सर्विस' ह्या डेक्कनवरील दुकानाविषयी. वर सांगितलेल्या चांगल्या गोष्टींप्रमाणेच सुधारणेलाही वाव आहेच (उदा. विखुरलेली पुस्तके नीट लावणे एका लेखकाची एका जागी एकत्र अशी, जी पुस्तके गोडाऊन ला आहेत किंवा उपलब्ध नाहीत म्हणून आली की फोन करण्यासाठी रजिस्टरमधे माहिती लिहून घेतली त्यानुसार ती मागवून तत्परतेने त्यावर फॉलोअप करणे इत्यादी). पण इरादे नेक आहेत अशी जाणीव झाली म्हणून हा पोस्टप्रपंच.

विशेषत: मराठी पुस्तकांसाठी जरुर भेट द्या. ईंटरनॅशनल बुक सर्विस/हाऊस (बुकगंगा डॉट कॉम), डेक्कन, पुणे.

11 comments:

Raj said...

अरारारा.. दुपारी दुकान उघड ते ही सात दिवस! आणि वर सौजन्य काय, तत्परता काय!
छ्या अशानं पुण्याचं नाव घालवणार हे लोकं! कुठे १२:०१ ला दुकान बंद करणारे चितळे (ऐकीव माहिती) आणि कुठे हे!
परंप्रेची चाड आजकाल लोकांना राहिलेली नाही हेच खरं.:)
लिंकाळल्याबद्दल अनेकु आभारु, असे वदला एक ब्लॉगरु :)

Gouri said...

राजची पोस्ट आली तेंव्हापासून म्हणते आहे ... आता जयला हवं!
पराडकर असतात का अजून तिथे?

Raj said...

गौरी
पूर्वीचे कुणी नाहीत सगळा नवीन स्टाफ आहे, त्यामुळे थोडं चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं.

राफा said...

राज, वळक्कम :)!
गौरी, सॉरी उशीर झाला रि. द्यायला पण राजनेच उत्तर दिले आहे :) (धन्यवाद राज)

अपर्णा said...

छान लिहिलं आहेस. मला पुण्याचा एकंदरीत काहीच अनुभव नाही पण वाचायला आवडलं :)

Anonymous said...

Mala pan te dukan avadte aani maza hi aasach kahisa anubhav aahe. Mazya aakarakade pahun tyane 'navin diet and exercise che pustak aale aahe. Gheta ka? Vachun tari kahi phayda hote ka te bagha!' aase mhanun mala te vikayacha pratyna kela hota. :) Blog mast aahe.

Anuradha Kulkarni said...

chhan lekh.
Bookganga cha experience kharokhar khup changala ani prompt ahe.
Only thing is the filters on their website:
For example, if you select e-books and then marathi, you lose one of the two filters.
But overall a very good initiative.Only if they could bring again the rare out of stock and out of pront narayan dharap books at least in E-form...
-anu.

राफा said...

Thanks Aparna, Anonymous and Anuradha!

vishal said...

मी: रंदबधीमसते?
तो: सर?
मी (भावनातिरेकाने कोरडा पडलेला घसा किंवा दाटून आलेला गळा.. ह्यापैकी काहीतरी एक ठीकठाक करत): बंद कधी असते? म्हणजे कुठल्या वारी?
>> ह्याच्यावर खूप हसलो.
छान लिहिलंत. बाकी बुकगंगा भारीच आहे.

राफा said...

Thanks Vishal!

Anonymous said...

मस्तच ! पुण्यात जे काही अल्पकाळ राहिले त्यात ह्या दुकानात कधीच गेले नाही :(