Sep 11, 2007

सोनेरी पाणी ! (कथा)

बाहेर अंधार...

रातकिड्यांची मंद किरकिर..

मधूनच प्रकाश मिचकावणारा एखादा काजवा.

घरातही तसा अंधारच. पलिकडल्या देवघरात निरंजनाची मधूनच फडफडणारी ज्योत.. चित्रविचित्र आकाराच्या हलत्या सावल्या तयार करणारी.

आणि इकडे माझ्यासमोर टकमक डोळे करुन माईंची गोष्ट ऐकणारी बच्चे कंपनी.


रोजच्यापेक्षा हे किती वेगळं आहे.

पण छान वाटतयं... भाऊकाकांच्या कोकणातल्या घरात मी सारखा तोच विचार करत होतो..बरं झालं आलो इथे ते..


नाहीतर... वीकेन्ड रमाणीच्या कॉकटेल पार्टीमधे गेला असता. आधी त्याचे शंभर वेळा फोन! त्याच त्या गप्पा. शेअर बाजारच्या आणि त्याला मिळालेल्या नवीन कॉन्ट्रॅक्टच्या. आता फोनवर बोलायचे तेच पार्टीमधे ! मग फोन कशाला ?


मग 'हेजी, आपको तो आनाही है. पार्टीमे रौनक आत्ती हे' वगैरे. साला प्रत्येकाला हेच ऐकवत असेल. कंटाळा कसा येत नाही त्याला ? रौनक कसली लुच्च्या. आधी तुझे ते महागडे मंद दिवे बदलून टाक. मग येईल हवी तेव्हढी रौनक. साला बत्ती लावून उदबत्ती एव्हढा प्रकाश.


पण इथे.. ह्या अर्धवट अंधारातही चांगलं वाटत होतं.. मी वाचण्यापुरता लहान दिवा लावला होता. समोर माई पाचसहा मुलांना गोष्टी सांगण्यात तल्लीन झाल्या होत्या..

खरंच बरं झालं अविदादाला 'हो' म्हटल ते ! म्हणाला "कोकणात घेउन जातोय पोराना नाताळच्या सुट्टीत. गजाची फॅमिली पण आहे.. मग बॅचलर साहेब ? येताय का तुम्ही पण आमच्याबरोबर ? का निता बरोबर काही प्रोग्राम आहे ? नाहीतर पार्टी ठरलेली असेल कुणाकडेतरी.. " वगैरे वगैरे. मग थोडं सणकीतच हो म्हटलं.. नको तेव्हा कुटुंब वत्सल वगैरे असल्याचे दाखवतो.

पण आत्ता माईंची गोष्ट ऐकताना खरचं मस्त वाटत होतं.. ह्या माई म्हणजे भाईकाकांच्याच नात्यातल्या कुणीतरी... लग्नानंतर सहा एक महिन्यातच विधवा झालेल्या. तो आघात त्याना अगदी कोलमडून टाकणारा असणार ! असंख्य संकंट आणि दु:ख अपमानाचे चटके सोसले मग माईंनी.. काकूंनीच मला एका सगळं सांगितलं होतं.. मग शेवटी भाईकाका-काकूंनीच त्याना आधार दिला.

मी असाच कधी गेलो की अगदी मायेने चौकशी करायच्या माई.. कधी कधी तर मुलांबरोबर चक्क माझीही दृष्ट वगैरे काढायच्या. आयुष्यभर झळा सोसूनही त्यांचा चेहरा मात्र नेहमी हसतमुख असायचा .. चेष्टा करायची लहर आली की मिष्किल बोलून दोन्ही डोळे मिचकावायच्या आणि बोळक्या तोंडाने छान हसायच्या.

आताही गोष्ट सांगताना त्यांचा चेहरा खुलला होता.. मी आपला बसलो होतो आरामात पुस्तक घेऊन.. 'मुंबईत वाचायला वेळच मिळत नाही' वगैरे सांगून. पण अंथरुणात पसरलेली पोरं आणि रंगवून गोष्ट सांगणा-या माई बघून पुस्तकात काही लक्ष लागेना. अमाप दु:ख पचवलेल्या माई आजी आणि सुखाची तडस लागलेली ती त्यांची बिननात्याची नातवंडं !

ब-याच दिवसानी गोष्ट वगैरे ऐकायला छान वाटत होतं.. नाहीतर आत्ता त्या बोअरिंग पार्टीमधे असतो.. मला त्या कृत्रिम वातावरणाचा कंटाळा येतो अगदी. साले कॉन्टॅक्ट्स सांभाळायला पण इतकी लफडी. गुदमरायला होतं अगदी .. त्यातल्या त्यात मला आवडायची ती त्याची टेरेस.. गार मोकळा श्वास घेऊ देणारी. त्या उंचीवरून शहराचे असंख्या लुकलुकणारे दिवे दाखवणारी..

मी बरेच वेळा पार्टी सोडून दूर पाण्यात त्या दिव्यांची सोनेरी प्रतिबिंबे हलताना बघत राहतो..

... आत्ताही एक काजवा दिसला आणि मला त्या दिव्यांची नि टेरेसची आठवण झाली.. माईंची गोष्ट पुढे चालली होती...

"आणि बरं का.." माई पुढे सांगत होत्या "एव्हढं बोलून तो काळा पक्षी गेला उडून एकदम.. आला तसाच भुर्रकन ! आणि उडत उडत आकाशात गायब झाला.. थोडा वेळ सगळेच अवाक झाले ! मग त्या राजाच्या गुरुदेवानी सांगितलं.. अरु ! अभ्रा चोखू नाही बाळ.. हां.. तर काय सांगत होते ? हां.. राजाचे गुरु म्हणाले की त्या पक्ष्याची भविष्यवाणी खोटी ठरवायची असेल तर.. "

"वाणी म्हन्जे काय माई" कुणाचातरी पेन्गुळलेल्या आवाजात प्रश्न आला.

"अरे वाणी म्हन्जे तो मॅन नाय का रे आपल्या कॉर्नरच्या शॉपमधे असतो तो. होय की नाही माई?" एक उत्तरही आले मुलांमधूनच.

"हा‍त्तुझी !अरे सोन्या माझ्या.. वाणी म्हणजे तस नाही.. भविष्यवाणी म्हणजे.. उद्या काय होणार ते आजच सांगितलं नाही का त्या काळ्या पक्षाने ? त्या पक्ष्याचे बोलणे कधी खोटे व्ह्यायचे नाही... आणि त्यानं ते काय भयंकर सांगितलं माणसाच्या बोलीत ? की .. राजा ! तुझ्या राजकन्येच्या एका पायाला सहा बोटे आहेत. ते सहावं बोटं गायब केल्याशिवाय हिचं लग्न करु नका नाहीतर.. "

"नाहीतर काय माई.."

"नाहीतर... " माई अडखळल्या " नाहीतर खूप खूप वाईट होईल. लग्नानंतर काही दिवसातच हिचा पती.. "

.. आणि अचानक माई थबकल्या ! त्यांची नजर पार हरवली कुठे तरी.

त्या तशाच शून्यात काही क्षण बघत राहिल्या..

मुलंही गोंधळून त्यांच्याकडे पहात राहिली..

"मग काय झालं माई ?" ह्या प्रश्नाने माई एकदम भानावर आल्या... त्यांच्या डोळ्यात थोडं पाणी तरारल्यासारख वाटलं मला..

मग गडबडीने एकदम हसून त्या पुढे सांगू लागल्या. जणू काही काही क्षणांपूर्वी त्यांची तंद्री लागलीच नव्हती.. जणू काही गोष्टीतला तो 'खूप खूप वाईट' होण्याचा भाग घडणारच नव्हता कधी..

" बरं का.. मग काय झालं.. राजाच्या दरबारात एक मोठा जादूगार होता ! तो म्हणतो कसा "महाराज, ह्यावर एक उपाय आहे. इथून खूप लांब, राज्याच्या उत्तरेला, जंगलापलिकडे ओळीने सात पर्वत आहेत. त्या प्रत्येक पर्वतात एक राक्षस राहतो. सगळे एकापेक्षा एक शक्तीशाली आणि महाचतुर ! त्या पर्वतांच्या पलिकडे एक जादूचं तळं आहे. त्या तळ्याचं पाणी आहे सोनेरी..

“आईशप्पत ! सोनेरी पाणी !!! ”

“मग.. जादूचं पाणी होतं ना ते.. “

माई अगदी रंगवून गोष्ट सांगत होत्या आणि पोरंही तल्लीन झाली होती. माझ्या डोळ्यावर हळूहळू झोप चढत होती, पण गोष्ट पूर्ण ऐकायची उत्सुकताही होती आणि तेही माई आणि पोरांच्या नकळत.. हातातल्या पुस्तकाची तर मी दोन पानंही उलटली नव्हती !

पोरांसाठी गोष्ट असल्याने ‘हॅपी एन्ड’ निश्चीत होता !

गोष्ट चालली होती भराभर पुढे.. मधेच मी पुस्तकात डोकं घालत होतो आणि काही वेळातच माझ्याही नकळत गोष्ट ऐकू लागत होतो. . गोष्ट खूप आवडत होती मुलांना त्यांच्या चेह-यांवरून.

गोष्टीतला तो सोनेरी पाणी आणायला गेलेला गरीब पण हुशार तरुण एकेक पर्वत पार करत होता... कुठला राक्षस त्याला युद्धाचे आव्हान देई, तर कुठला खूप अवघड कोडे घालत असे.. सगळे अडथळे पार करत तो तरुण पोचला सोनेरी पाण्यापर्यंत !!

... तहान लागल्यासारखी वाटली म्हणून मी आत गेलो स्वैंपाकघरात.. काही सेकंद फ्रीज शोधल्यावर खजील झालो थोडा.. माठातलं गार पाणी पिऊन परत येताना, काहीसा नवीन जागेचा अंदाज नसल्याने अंधारात काहीसा ठेचकाळत, बुटक्या दाराला डोक आपटंत असा परत आलो.. घरात निजानीज झाली होती केव्हाच..

मी परत येऊन बसलो तेव्हा माई गोष्टीचा शेवट सांगत होत्या.. आता त्यांचा स्वर मला काहिसा कापरा वाटला.

".. आणि ते सोनेरी पाणी घातल्यावर राजकन्येच्या पायाचं सहावं बोट झालं गायब ! मग राजाने त्या तरुणाशी तिचं लग्न लावून दिलं ! राजाच्या गुरुदेवांनी दोघाना हजार वर्षं आयुष्याचा आशीर्वाद दिला... आणि मग ती दोघं खूप खूप सुखासमाधानात आणि आनंदात राहू लागली !!"

मध्यरात्र उलटून गेली होती.. तरिही कुणीतरी कुरकुरलेच "आज्जी, आजून एक गोष्ट.. "

"नाही रे बाळा.." थकलेल्या माई म्हणाल्या "उद्या सकाळी सगळे समुद्रावर जाणारात ना.. मग निजा आता"..

तशी एक दोन कच्चीबच्ची आधीच झोपली होती.. 'हॅपी एन्ड' न ऐकताच ! बाकीची मुलंही आडवी झाली.. त्याना सारखं करुन माईही लवंडल्या बाजूला.

त्यांचा थकलेला कृश देह पाहून कणव आली एकदम..

उठून विचारलं " माई, अंगावर काही घालू का पांघरायला ?"

"घालतोस ? घाल हो. आत्ता उकडतयं पण पहाटे कधी गार होतं.. झोप हो तूही आता"

"नाही.. बसतो जरा बाहेर दिवा घेऊन.."

"किती दिवसानी येता रे बाबानो.. आता पुढच्या वेळी येशील तेव्हा छान लग्न करुन ये हां .... निता ना रे नाव तिचं ? छान.. सुखी रहा " असचं काहीसं बोलत माईंचा डोळा लागलाही..

जवळचं पांघरुण उचलून त्याना घालायला गेलो.. आणि..

अचानक ते लक्षात आलं ! .. आज इतक्या वर्षानी ! सर्रकन काटा आला अंगावर !!

मी त्यांच्याकडे पाहिलं.. शांत चेह-याने निजलेल्या माई... ब-याच वर्षानी डोळे भरुन आले ते थांबेचनात..

त्याना घाईने पांघरुण घालून उठत होतो तरी डोळ्यातलं पाणी पडलंच खाली.. माईंच्या सहा बोटे असलेल्या डाव्या पावलावर ! .. कितीही इच्छा असली तरी ते सोनेरी मात्र असणार नव्हते !!

***


46 comments:

Anonymous said...

wah !! khoop sundar katha ahe!!! ekdam touching

Abhi said...

सुंदर!! अप्रतिम गोष्ट!!

Meghana Bhuskute said...

too good man. keep writing.

Anonymous said...

Sundar. khup touching aahe..
- Amruta

Abhishek.Mahadik said...

katha khup chaan aahe.Good writing

राफा said...

Anonymous, अभि, मेघना, अमृता, अभिषेक : तुमच्या अभिप्रायांबद्दल मन:पूर्वक आभार !

Anonymous said...

khup sunder......... tumhi nehmich chaan lihita ... he tar uttam.

Yogesh said...

changala prayatna ahe.

अनु said...

Touching.
Kind of guessed the end..

Cartographer said...

अशक्य!अप्रतीम...
बरेच दिवस वाचत आहे मी तुझा ब्लॉग
छान लीहितोस..!

राफा said...

श्रद्धा, योगेश, अनु, राजीव : तुमच्या अभिप्रायांबद्दल मनापासून आभार !

Unknown said...

rahul,katha mast jamaliye. nehamipramanech aavadali.
hi kath aadhi maaybolivar takali hotis ka? vachalyasarakhi vaatate mhanun mhantale.

Nandan said...

Rahul, katha jara ushiranech vachali. surekh aahe, lihit raha.

राफा said...

श्रेयस, नंदन मन:पूर्वक आभार !
श्रेयस, होय खूप आधी मायबोलीवर पोस्टली होती.

Anonymous said...

khupach sunder ani touching sudha ............

राफा said...

सरगम, अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार !

नितिज..... said...

khupacha emotional ... dole ole gelet yaar...
too good...

Anonymous said...

Hello Rahul,

Aavadalee kathaa.

Pu. le. shu.

- JParag

राफा said...

नितिज, पराग : अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार!
पराग, शुभेच्छांबद्दलही खूप धन्यवाद.

SumeetR said...

नेहमीच नाही, पण कधीतरी असे होते!
वाहत रहाति डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे:
-- Excellent, keep it up!

Rupa said...

Its Very Sweet and Short Story,You have Brilliant Art Of writing.

राफा said...

SumeetR, Rupa : Thanx a ton !

Meenakshi Hardikar said...

mast katha. khup avadali.

राफा said...

Thanx Meenakshi !

Unknown said...

KHUPCH CHAN KATHA AHE.. THANKS KEEP IT UP

राफा said...

Vrushali, Thanks!

Mahesh said...

...अमाप दु:ख पचवलेल्या माई आजी आणि सुखाची तडस लागलेली ती त्यांची बिननात्याची नातवंडं !

atishay sunder vakyarachanaa..

राफा said...

Dhanyawad Mahesh.

Anonymous said...

" कितीही इच्छा असली तरी ते सोनेरी मात्र असणार नव्हते !!"

परीकथा जगता येत नाही. हाच काय तो प्रॉब्लेम! :(

राफा said...

alhadmahabal, hmmm...

Yashwant Palkar said...

khup chan aahe ...
dolyasamor maich ubhaya rahilya...

राफा said...

Yashwant, मन:पूर्वक आभार !

neelam said...

manala sparsh karnari katha hoti hi. chan rohul. well done.

Neelam

राफा said...

Thanx a lot Neelam !

भानस said...

मनाला स्पर्शून गेली ! लिहीत राहा !!

Anonymous said...

Awesome story..heart-touching...!!
Keep writing..

श्रिया (मोनिका रेगे) said...

अशी माई सारखी माणसे,ज्यांच्या स्वतःच्या आयुष्यातला आनंद हरवलेला असतो पण तसे इतरांना त्यांच्या वागण्यातून न जाणवू देता ,इतरांच्या मनात सतत आनंद फुलवत राहतात.राफा हि कथा खूपच जिवंत आणि परिणामकारक आहे...जुन्या आठवणींमध्ये हरवले होते,आजी भोवती कथा ऐकण्यासाठी आम्हीं कशी गर्दी करत असू आणि तिच्या अगदी जवळ जाऊन बसण्यासाठी कशी एकमेकांशी ढकलाढकली चाले,,,,,तिने तिच्या सध्या भाषेत किती सारया कथा आम्हां मुलांना सोप्या करून सांगितल्या ते आठवले....आता आजी नाही,पण तिच्या कथांमधून ती आजही भेटते ...माई आजीची कथा ऐकणारी ती सर्व लहान मंडळी आणि अर्थात तू पण खूपच नशीबवान आहात..असं वाटते...

आरती said...

Surekh aahe Katha, aawadali.

राफा said...

भानस, Me, मोनिका, आरती : मन:पूर्वक आभार !

@मोनिका : आजकाल, गोष्ट सांगणारी आजी आणि भान हरपून ती ऐकणारी नातवंडे कुठे गेली कोणास ठाऊक.

श्रिया (मोनिका रेगे) said...

मला वाटते राफा हि गोष्ट सांगणारी आजी आणि तल्लीन होऊन गोष्ट ऐकणारी नातवंडे पण आता गोष्टीतच सापडतील....असा वाटू लागले आहे.
ह्या लहान लहान आनंद देणाऱ्या गोष्टी सापडेनाश्या झाल्या...'कारणे'सर्वांनीच निर्माण केली आहेत,आणि काय!दूरदर्शनचा पगडा..वाचन कमी झाले.मैदानी खेळांसाठी असलेला वेळ इतर क्लासेस च्या खुळाने गिळून टाकला...मुलांचे विश्व मोठ्यांच्या विश्वाशी स्पर्धा करू लागलेसे वाटते....किती काही आम्हाला लहानपणी माहित नसायचे पण त्याची लाज नाही वाटायची कधी....आजकाल सगळे जग जवळ आले...पण त्याचे तोटे कोण बघतो!

Pratima Deshpande said...
This comment has been removed by the author.
Pratima Deshpande said...

भन्नाट. सहाव्या बोटाचा ट्विस्ट एकदम हलवून सोडतो.

राफा said...

Thanks a ton Pratima.
Please also read archived articles..

प्रसाद said...

आवडेश !

राफा said...

पश्या, धन्यवादेश !

Anonymous said...

Khup chaan,,,, sopi pan heart touching story