त्याच वेळी...
त्याच वेळी संथामच्या किल्ल्याजवळच्या त्या अरण्यात, एक अश्वधारी पथक विशिष्ट दिशेने दौड करत होते.
दाट झाडीची, काटेरी झुड्पांची पर्वा न करता ते पुढे सरकत होते. सूर्य पूर्ण बुडायच्या आधीच त्या ठिकाणी पूर्ण अंधार पसरला होता. दूर खोल कुठेतरी सूक्ष्म प्रकाश मधूनच दिसत होता. त्या दिशेने ते पंधरा वीस अश्व सावधपणे वाट काढत होते. त्या निबीड वनात साधारण दिशा कळायला त्याना तोच एक मार्गदर्शक होता.
.. हळूहळू तो प्रकाश मोठा होत गेला.. काही मशाली दिसू लागल्या आणि ते अश्वपथक इच्छीत स्थळी पोहोचले. कुणा पूर्वजांनी बांधलेले ते महाकाय मंदिर होते. एकेकाळी भव्य असलेल्या मंदिराचे भग्न अवशेष वृक्षवेलींच्या गर्दीत चटकन लक्षात येण्यासारखे नव्हते. त्या जागी काही लोक आधीच जमले होते. मंदिराच्या राक्षसी आकाराच्या पन्नास एक पाय-यांपैकी एक दोनच एकसंध अवस्थेत होत्या.
त्यात सर्वात वरच्या पायरीवर एक विशेष लक्ष वेधून घेणारा एक वीर होता. त्याच्या जवळच असलेल्या मशालीचा प्रकाश त्याच्या बलवान शरीरावरील युद्धपोषाख उजळून टाकत होता. त्या पोषाखावरील धातूची कलाकुसर मधेच चमकत होती. आधीच ते:जपुन्ज असलेला तो वीर भोवतालच्या काळ्या तमसागरात मार्गदर्शक दीपस्तंभाप्रमाणे भासत होता !
त्याच्या आजूबाजूला चिंताक्रांत चेह-यानी जमलेले लोक म्हणजे संथामच्या भोवतालच्या लहान राज्यांतील महत्वाच्या व्यक्ती होत्या. कुणी सेनानी होता, कुणी मुत्सद्दी होता तर कुणी त्या राज्याचा सर्व अधिकार दिलेला खास दूत. संथामचा कुठलाही पहारेकरी किंवा हेर त्या ठिकाणी फिरकण्याची शक्यता नव्हती. त्यामुळेच अशा निर्जन ठिकाणी सर्व एकत्रित झाले होते.
त्यांना नुकत्याच येऊन मिळालेल्या अश्वपथकास विसावण्याची संधी देऊन तो वीर धीर गंभीर आवाजात बोलू लागला :
"मित्रहो, पुन्हा एकदा आपला जीव धोक्यात घालून इथे जमल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुनश्च आभार मानतो. नुकतेच आतिस्म राज्याचे योद्धे आपल्याला सामील झाले आहेत, त्यामुळे आपल्या सर्व राज्यांच्या एकत्रित सैन्याची ताकद अजूनच वाढली आहे. "
आतिस्म योद्धयांच्या नेत्याने उठून त्याला अभिवादन केले. त्याचा स्वीकार करून तो वीर पुढे बोलू लागला :
"त्यांच्या माहितीसाठी मी पुन्हा काही गोष्टींचा आढावा घेतो. आपण सर्व जाणताच की संथामच्या सम्राटाची क्रूर कृत्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. संथामची प्रजा त्याच्या लहरी कारभाराला, उन्मत्त रंगेलपणाला कसेबसे तोंड देत एकेक दिवस काढत आहे. आपल्या दुर्दैवाने संथाम अतिशय बलशाली राज्य आहे. त्या विशाल सैन्याचा पराभव करणे आपल्याला शक्य नाही ! परंतु त्यांचे राज्य सहन करणे आता तेव्हढेच अशक्य झाले आहे. आपल्या संथाममधल्या सग्यासोय-यांची दौलत अब्रू कधी लुटली जाईल ह्याचा भरवसा नाही... आणि कधी आपल्या राज्यांवर ते सैन्य वावटळीसारखे कोसळेल सांगता येत नाही.."
उपस्थित लोकांपैकी अनेकांनी खेदाने माना हलवल्या.
"ह्यावर निर्वाणीचा उपाय आपण निवडला. थेट सम्राटावर हल्ला ! दुर्दैवाने आपले २ ही हल्ले अयशस्वी ठरले. दोन्ही हल्ल्यांचे सूत्र एकच होते : धाडसी आणि अत्यंत शूर अशा निवडक योद्ध्यांबरोबर मी किल्ल्यातील आपल्या हेरांच्या मदतीने आत प्रवेश मिळवायचा. अचानक हल्ला करुन थेट सम्राटापर्यंत पोचायचे. आणि मग मी त्याला पारंपारिक द्वंद्वाचे आव्हान द्यायचे !... माझे द्वंद्वयुद्धातील नैपुण्य तुम्हाला माहित असले तरी सम्राटही अतिशय बलशाली नि कुशल योद्धा आहे, त्यामुळे ह्या योजनेत धोका जरुर होता. सम्राटास दूर करायचा तो एकच वैध मार्ग होता. "
"सदैव कपटनिती करणा-या सम्राटास मारायचे मात्र नितीमत्ता सांभाळून ? " एक तरूण संतापून म्हणाला..
त्याला थांबायची खूण करून वीर पुढे बोलू लागला : "एकदा सम्राट मृत्यूमुखी पडला असता की त्या गोंधळाचा फायदा घेऊन किल्ल्यावर वर्चस्व प्रस्थापित करणे ही पुढची योजना होती. सम्राटाची जुलमी राजवट नापसंत असलेल्या लोकांची मदतही त्या मोक्याच्या क्षणी अपेक्षित होती.. पण.. पण सम्राटापर्यंत पोचण्याआधीच आपले दोन्ही प्रयत्न फसले !"
"होय" दुसरा एक योद्धा म्हणाला "दुस-या हल्ल्यामधे तर ह्या अरण्यापर्यंत येणारे एकमेव गुप्त भुयार वापरून जखमी अवस्थेत माघार घ्यावी लागली. आपला किल्ल्यातील शेवटचा हेरही पकडला गेला आणि ती गुप्त वाटही शत्रूला ज्ञात होऊन बंद केली गेली आहे"
हे भाषण ऐकून सर्व योद्धयांवर निराशेचे अदृश्य मळभ पसरले ! आजूबाजून अंधार मनात शिरला नि अजून गडद झाल्यासारखा वाटू लागला. मशालींच्या ज्योतीही अस्वस्थपणे फरफरू लागल्याचा भास होऊ लागला.
थोडी उसंत घेऊन तो वीर निग्रहाने पुढे म्हणाला "आता सर्व मार्ग संपले आहेत. त्यामुळे त्या राक्षसाचा थेट वध करण्याखेरीज दुसरा मार्ग दिसत नाही !"
हे ऐकल्यावर काही आश्चर्योद्गार निघाले.
शेवटी, ब-याच जणांच्या मनातील शंका एका सरदाराने बोलून दाखवली "पण आपण ठरवले जरी तरी हे शक्य वाटत नाही. किल्ल्याच्या सर्व वाटा बंद झाल्या आहेत. किल्ल्यात आपला एकही हेर उरलेला नाही. शासकाच्या देखरिखीखाली निष्णात योद्धे सम्राटाचे अहोरात्र संरक्षण करत आहेत. आणि मुख्य म्हणजे दोन फसलेल्या हल्ल्यांमुळे शत्रू अधिकच सावध झालेला आहे !"
"होय ! मला कल्पना आहे" वीर म्हणाला "ह्यासाठीच मी अंतिम योजना तयार केली आहे.. सम्राटावर तिसरा आणि शेवटचा हल्ला !!"
वीराच्या ह्या उद्गारांनंतर तिथे एकच खळबळ माजली. पुन्हा हात वर करुन सर्वांना शांत करत वीर पुढे सांगू लागला :
"सम्राट शक्यतो किल्ल्यात राहूनच कारभार करत असला तरी दरवर्षी हमखास एका दिवशी किल्ल्याबाहेर येतोच येतो. तुम्हा सर्वांना माहित असेलच की संथाममधे दरवर्षी एका विशिष्ट दिवशी एक प्रथा पाळली जाते आणि ती म्हणजे किल्ल्याबाहेरच्या शिळेला म्हणजेच त्यांच्या देवतेला विविध वस्तूंनी भरलेला घट सम्राटाने अर्पण करणे... ती शिळा म्हणजेच संथामची संरक्षक देवता आहे असा लोकसमज आहे.. एरवी लोकांना तुच्छ लेखणा-या सम्राटालाही त्या लोकश्रद्धेचा अनादर करुन चालत नाही एव्हढे त्या समारंभाला पारंपारिक महत्व आहे. तर त्या समारंभाच्याच दिवशी... "
"व्यत्ययाबद्दल क्षमा असावी " वीराच्याच समोर उभा असलेला एक कृश वृद्ध म्हणाला "पण तुम्ही योजना सांगण्याआधीच माझी एक शंका आहे"
वीराने मान डोलावून संमत्ती देताच तो अनुभवी मुत्सद्दी पुढे बोलू लागला " संथामचा राज्यकर्ता जरी सम्राट असला तरी सर्व कारभार व कारस्थानांमागील चातुर्य आणि योजना मात्र शासकाची असते असाच समज आहे.. आणि तो बराच खराही आहे. मला वाटते, आपण जर निकराचा हल्ला करणारच असू तर तो शासकावरच करावा !"
पुन्हा एकदा तिथल्या लोकात कुजबूज सुरु झाली... उलटसुलट मते आपसात मांडली जाऊ लागली..
आपल्या प्रस्तावाच्या समर्थनार्थ तो वृद्ध सांगू लागला "हत्तीवरील अंबारीतील योद्ध्याशी लढायला जर आपल्या सैन्याला जड जात असेल तर, त्या हत्तीच्या माहुतालाच कंठस्नान घालावे ! ... तसे केल्यास अंकुश न राहिल्याने हत्ती अंदाधुंद होतो आणि मग अंबारीतला योद्धाही निष्प्रभ होतो.. अशा वेळी त्याचा पराभव करणे खूपच सोपे जाते ! मला काय म्हणायचे आहे ते आता आपल्या सर्वांच्या लक्षात आले असेलच ! "
वृद्धाचे बोलणे ऐकून वीराने क्षणभर विचार केला आणि त्याच्या चेह-यावर स्मित पसरले..
तो म्हणाला "महाशय, तुमचा मुद्दा अतिशय तर्कशुद्ध आहे ह्यात शंकाच नाही. पण युद्धशास्त्रातल्या ह्या डावपेचाचा ह्या परिस्थितीत थेट उपयोग होईल असे वाटत नाही ! शासकाचा मृत्यू घडवला तरी सम्राटाची दहशत एव्हढी आहे की तो जिवंत असेपर्यंत, त्याच्या विरोधात असणारे पण नाईलाजाने त्याच्या बाजून लढणारे सरदार आपल्याला मदत करणार नाहीत. अशा परिस्थिती सम्राटाचे निष्ठावान सरदार आपला सहज पराभव करतील.. परंतु ह्यापेक्षाही महत्वाचे कारण आपल्याला माझी पूर्ण योजना ऐकल्यावर कळेलच... "
.. मध्यरात्र उलटून गेली होती.. वीर शांतपणे योजना सांगत राहिला.
त्याच्या शौर्यावर आणि बुद्धिमत्तेवर कुणाचाच अविश्वास नव्हता. पण...
शांततेने व सन्मानाने जगण्याची ती शेवटची संधी होती. सम्राटावरचा तिसरा हल्ला यशस्वी होणे आता अत्यंत आवश्यक बनले होते !
भाग १