May 25, 2008

तिसरा हल्ला ! - भाग १

तो काळ कुठला होता.. कोण जाणे.

मनाच्या वेगाने भूतकाळात प्रवास केलात किंचीत तर त्या आसपासच केव्हातरी.

पण तेव्हाही मानव असाच होता. आजच्यासारखाच. महत्वाकांक्षी, पराक्रमी, उपद्व्यापी, लोभी, तामसी. देहाने थोडा मोठा पण आकार तोच. आणि विकारही तेच.. आणि त्या देहात गुणावगुणांचा विसंगत संगम घडवणारे मानवी मनही तसेच !

...

त्या दिवशी सायंकाळी...


बेभान वारा भयाण आवाज करत होता, बेफाम वेगाने धुळीचे लोटच्या लोट उठवत होता.. त्या वा-याच्या वेगाला न जुमानणारा 'संथाम' च्या राजधानीचा प्रचंड किल्ला बुलंद दिसत होता. गेली कित्येक वर्षे अंगावर ओरखडाही उठता तो तसाच ठामपणे उभा होता. रोजच्याप्रमाणे आजही त्याच्या राक्षसी भिंती तापवून सूर्याची किरणे आता निवत चालली होती. खंदकातल्या तापलेल्या पाण्यात राहून खवळलेल्या मगरीही काहीश्या शांत होत होत्या.

किल्ल्याच्या भोवती सर्व बाजूने विस्तिर्ण असे मोकळे पटांगण होते. उत्तरेकडे किल्ल्याजवळ बाणाचा मारा पोचेल इतक्या अंतरावर कुठल्यातरी देवतेची मूर्ती होती. मूर्ती कसली, निसर्गाच्या चमत्काराने मानवी आकार प्राप्त झालेली एक मोठी शिळाच. किल्ल्याच्या एकूण आकाराच्या मानाने ती दगडी मूर्ती अगदीच नगण्य दिसे. परंतु, उत्सवाच्या दिवशी किल्ल्याइतकेच किंबहुना जास्तच महत्व त्या दगडाला येत असे.

पूर्वेकडे काही अंतरावरच एक भयंकर अरण्य सुरु होत होते, आणि तिथेच संथामचे अतिसामर्थ्यशाली राज्य संपत होते.

त्या सायंकाळी.. त्या अरण्याच्या दिशेला किल्ल्याच्या एका झरोक्यातून पाहत एक व्यक्ती उभी होती..

सम्राट !

संथामचा सर्वेसर्वा सम्राट ! घोर पराक्रमी सम्राट. कुशल सेनानी सम्राट.. आणि दुर्दैवाने अत्यंत क्रूर सम्राट !

आता काही वेळातच अंधाराचे साम्राज्य सुरु होणार होते.. पण, दिवसा मात्र त्या विशाल भूमीवर फक्त सम्राटाचे राज्य असायचे. संथामच्या म्हणजेच सम्राटाच्या आक्रमणापासून आत्तापर्यंत वाचलेली, तुरळक छोटी राज्ये होती पण अगदीच नगण्य. दुर्गम भुगोलामुळे थोडी अधिक सुरक्षित राहिलेली. पण सम्राटाच्या राज्याच्या विषारी छायेत भयग्रस्त. कधी आक्रमणाचा सर्प सीमा ओलांडून त्यांना गिळंकृत करेल ते सांगता येत नव्हते.

किल्ल्याच्या पूर्वेला अरण्य असल्याने त्या सीमेच्या बाजूने हल्ला होण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. त्यामुळे तिथे संरक्षणासाठी अगदीच कमी सैन्य तैनात असे. अर्थात संथाम वर हल्ला करून आपल्याच मृत्यूला आमंत्रण कोण देणार !

त्या भयंकर अरण्याच्या आतील काही भागात सूर्यप्रकाशही पोचू शकत नसे. हिंस्र पशूंचा मुक्त वावर, आणि वाट चुकल्यावर जन्मभर त्या अरण्यातच फिरत रहाण्याची भिती अशा कारणांमुळे त्या बिकट रानात पाऊलही टाकण्याची कुणाची छाती होत नसे.

अगदी सुरवातीच्या भागात लाकूडतोड चाले.. तीही दिवसाच.

त्या सायंकाळी किल्ल्यातल्या त्या सर्वात उंच दालनातल्या झरोक्यातून, अरण्याच्या दिशेहून परतणारे काही लाकूडतोडे पाहत सम्राट उभा होता. त्याच्या मजबूत देहावरची अत्यंत उंची राजवस्त्रे आत पोचणा-या वा-याने फडफडत होती. शांतपणे बाहेर बघणा-या सम्राटाच्या मनात मात्र खळबळ माजली होती. गेल्या काही दिवसांत घडलेल्या विलक्षण घटनांचा विचार त्याच्या मनात येत होता. तेवढ्यात त्याच्या मागे कुणीतरी येऊन उभे राहिल्याचे सम्राटाला जाणवले.

सम्राटाने मागे वळून बघितले आणि त्या व्यक्तीला पाहून ब-याच वेळाने त्याच्या मुखावर स्मित उमलले.

"शासक ! वेळ झाली का ?"

"होय सम्राट ! भोजनाची वेळ झाली आहे. सेवक तयार आहे" नेहमीच्या शांत धीरगंभीर आवाजात शासक म्हणाला.

सम्राटाने क्षणभर समाधानाने शासकाकडे पाहिले.

शासक. संथामचा प्रधान ! सम्राटाच्या सर्व कटकारस्थानांमागचा मेंदू. सम्राटाच्या अनेक क्रूरकृत्यांचा साक्षीदार. अत्यंत धूर्त, कारस्थानी. तितकाच संशयी. पण त्याच्या ह्याच गुणामुळे इतर अनेक महत्वाच्या जबाबदा-यांबरोबर अजून एक अत्यंत महत्वाची जबाबदारी सम्राटाने त्याच्याकडे दिली होती : सम्राटाच्या सुरक्षेची !

शासकानेही त्या कामी सर्व बुद्धी पणाला लावली होती. सम्राटाचा संपूर्ण दिनक्रम जास्तीत जास्त वेळ किल्ल्यात सुरक्षित बसून कसा व्यतीत होईल अशी योजना शासकाने तयार केली होती. सम्राटावर हल्ला होण्याच्या सर्व शक्यता लक्षात घेऊन खास सुरक्षित दालने आणि वेगवेगळी शस्त्रे असलेल्या निष्णात योद्ध्यांची खास पथके तयार करण्यात आली होती. सम्राटाचे संरक्षण ही एकमेव कामगिरी त्यांच्यावर होती.

एव्हढ्या योजनेनंतरही, याशिवाय अजून एका प्रकारच्या हल्ल्याची शक्यता होतीच... आणि ती म्हणजे सम्राटाला कपटाने होऊ शकणारा विषप्रयोग !

पण ह्यावरही शासकाने एक युक्ती केली होती : सम्राटाच्या भोजनाआधी एक विशिष्ट सेवक त्या अन्नातील भाग वेगळा काढून त्याचे सेवन करत असे. दररोज तोच सेवक ! खुद्द सम्राटाने त्या सेवकाला धडधाकट पाहिल्याशिवाय तो अन्न ग्रहण करत नसे. ही सर्व बुद्धी शासकाचीच. संशयाला जागा नको म्हणून त्या विश्वासू सेवकाची निवडही खुद्द त्यानेच केली होती.

इतकी काळजी घेऊनही, कडेकोट बंदोबस्त असूनही गेल्या काही दिवसांत सम्राटावर दोन हल्ले झाले होते !!

सम्राटाच्या सुदैवाने.. दोन्ही वेळेला ते साफ फसले होते. पण त्या घटनांनी सम्राटाची जणू झोप उडाली होती. क्षुल्लक कारणांवरून लोकांना अतिशय सहजपणे क्रूर शिक्षा देणारा सम्राट स्वत:च्या जीवावर बेतल्यावर अत्यंत अस्वस्थ बनला होता. मृत्यूच्या कल्पनेने त्याच्या कठोर ह्रुदयाचे ठोके जलद होत होते. स्वत: शूर असूनही अचानक होऊ शकणा-या हल्ल्याच्या कल्पनेने त्याचे सर्वांग घामात भिजत होते. त्याचा एकमेव आधार होता शासक !

त्या परिस्थितही विचलित न होता शासक काम करत होता. आणि म्हणूनच शासकाकडे पाहत सम्राट त्या सायंकाळी सम्राट काहीसा निर्धास्त झाला.. धीम्या गतीने पावले टाकत तो दालनाकडे जाऊ लागला. शासकही अदबीने त्याच्या मागे चालू लागला.

...

सम्राटासमोर आता तो सेवक उभा होता. त्याने अन्न ग्रहण केल्यानंतर आता बरोबर दोन प्रहर उलटून गेले होते. सेवकाने दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकवून सम्राटाला अभिवादन केले. त्याही मन:स्थितीत सम्राटाची मग्रूरी काहीशी उफाळून आली आणि काहीश्या थट्टेच्या सुरात तो सेवकाला म्हणाला "आमचे खास भोजन तुझ्या देहाला अगदी मानवलेले दिसत आहे. तुझी कांती आता अगदी सतेज झाली आहे."

शासकाने मंद स्मित करुन त्या सेवकास जायची आज्ञा केली. तो धिप्पाड सेवक नम्रपणे मागे सरत दालनातून निघून गेला. तो जाताच शासक अदबीने म्हणाला "सम्राट ! आपण भोजन घ्या. त्यानंतर एका अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी बोलायचे आहे ! ".


त्याच वेळी...


(क्रमश:)


No comments: