Dec 5, 2009

आधुनिक शब्दार्थ !

रस्ता :

  • दोन खड्ड्यांमधील सूक्ष्म प्रतल.
  • बांधणा-याच्या पार्श्वभागावर प्रहार करु वाटावासा अनुभव देणारा पृष्ठभाग.
  • भव्य लांबलचक उकीरडा व पिकदाणी.
  • डांबरीकरण झाल्यावर काही तासांतच खणायची जागा.
  • अदृश्य कचरापेटी व दृश्य कचरा असलेली जागा.
  • विचारांची वानवा असल्यावर प्रश्न सोडवण्यासाठी उतरण्याची जागा.
  • लहान मुलास रहदारीच्या बाजूला ठेवून आपण अमानुष वेंधळेपणे भलतीकडे बघत जाण्याचा मार्ग
  • फट दिसेल तिथे वाहन घुसवण्याची जागा
  • वाहने व ते चालवणा-यांच्या हृदयाचे ठोके हे दोन्ही चुकवून, एका बाजूकडून दुसरीकडे, अजागळ हसत, अर्धवट पळत ओलांडण्याची वस्तू


पौड 'रस्ता', पुणे :

  • वेगवेगळ्या खात्यांचा व यंत्रणांचा सामूहिक अत्याचार होऊन उरलेला ‘रस्ता’.
  • लोकांच्या सहनशीलतेचे रोज रुप बदलणारे स्मारक !
  • दगडगोटे पसरलेले अज्ञात शुष्क नदीचे पात्र.
  • पानशेतचा पूर नुकताच येऊन गेल्यासारखी अवस्था असणारी पायवाट.


फूटपाथ:

  • वर्षानुवर्षांच्या सवयीने आलेल्या अज्ञात अंत:प्रेरणेने, चालताना टाळायची जागा !
  • निरनिराळ्या राजकीय पक्षांच्या टपरीरुपी शाखा व उपशाखा असलेला वटवृक्ष.
  • चिनी, तैवानी वस्तूंच्या विक्रीसाठी रस्त्याकडेला सोडलेली जागा.
  • कायदेशीर संरक्षणात बेकायदेशीर धंदे फोफावण्याची जागा.


राजकारण:

  • वाटते ते न बोलणे, बोलणे ते न करणे, करणे ते न बोलणे व ह्या सगळ्याविषयी काहीच न वाटणे.
  • अर्धशिक्षित बेकारांसाठी पुनर्वसन योजना.
  • जे दुस-या चांगल्या लोकानी उतरून स्वच्छ करायला पाहिजे असे काही चांगले लोक सुंदर खोलीत बसून मुलाखतीत बोलतात, ते गटार !


नगरसेवक:

  • पचवता न येणारे गुन्हे करणारा इसम.
  • स्वत:ची गल्ली व गल्ला ह्यापलिकडे विचार न करु शकणारा व बाकी शहराविषयी तुच्छता असणारा.
  • दोनपाच कोटीचे मामुली गफले करणारा सत्तेच्या अन्नसाखळीतील एक क्षुद्र जीव.
  • आमदार ‘इन द मेकिंग’ !


आमदार:

  • गुन्ह्यांत अटक अवघड असलेला नेता.
  • प्रश्नांविषयी जागरूक असल्याचा दावा करत विधानसभेत झोपणारा इसम.
  • मतदारसंघाचे आपले शहर सोडल्यास राज्याच्या इतर भागांविषयी तुच्छता असणारा.


अपक्ष आमदार:

  • केव्हा ‘भाव’ खायचा हे समजणारा इसम (पहा: ‘पिंडाचा कावळा’)
  • स्वतंत्र विचार असलेला तरीही अधेमधे निवडून येणारा नेता.
  • कळपाने राहिल्याशिवाय नि:ष्प्रभ असणारा प्राणी.


खासदार:

  • गुन्ह्यांत अटक अशक्य असलेला नेता.
  • लोकसभेत यायचे टाळणारा, आला तरी झोपेच्या वेळा पाळणारा, व इतर वेळेत किंचाळणारा इसम
  • एकूणातच, सर्वसमावेशक तुच्छता असणारा !


मंत्री:

  • उपद्रवमूल्य असलेला 'आमदार'.
  • दिलेल्या खात्याविषयी संपूर्ण अज्ञान व नैसर्गिक नावड असणारा कारभारी


मुख्यमंत्री:

  • कळपातील इतर प्राणीजनांचा कमीत कमी नावडता प्राणी (पहा: दिलजमाई, घुमजाव, बेरजेचे राजकारण)
  • प्रत्येक भाषणात ‘विदर्भ-विकास’ व ‘फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र’ असे शब्दप्रयोग विलक्षण अलिप्त सफाईने घुसवणारा इसम.
  • अनेक गफले एकजुटीने झाकायची, दिल्लीसमोर वाकायची व राज्यकारभार हाकायची करामत एकाच वेळी करु शकणारा इसम.
  • काय वाट्टेल ते झाले तरी पर्सनली काही न घेणारा, म्हणजेच अंगाला म्हणून काहीही लावून न घेणारा 'प्रोफ़ेशनल' राज्यप्रमुख.
  • ‘सत्य साई सुट्ट्यो बाबा’ असे म्हणून आंधळी कोशिंबिरीचे राज्य घेणारा माणूस.




- राफा

4 comments:

अनिकेत वैद्य said...

राफ़ा,
मस्त रे.
लै भारी. लगे रहो.

खूप मस्त व्याख्या आहेत ह्या.


अनिकेत वैद्य.

राफा said...

धन्यवाद अनिकेत ! (तात्काळ अभिप्रायाबद्दल विशेष आभार :) )

Unknown said...

yathochit vyakhya aahet hya agadi!

(btw, it's a bit "complex" though ! :D)

राफा said...

धन्यवाद श्रेयस !
complex ? ah, i guess it has reference to my recent dialogue :)