जे सांगायचे आहे ते २६/११ च्याच निमित्ताने.
गेल्या दोन वर्षांत, जेव्हा जेव्हा आठवण होत होती, विषय निघत होता तेव्हा तेव्हा मनातला खदखदणारा अंसतोष डोकं वर काढतच होता.
कसाब अजून जिवंत का ?
दोन वर्षांपूर्वी २६/११ चा जो अभूतपूर्व हल्ला मुंबईमधे झाला, तो भ्याड, निर्घृण, नियोजनपूर्ण आणि तरीही सर्वसामान्यांस भयभीत करणारा random असा होता.
अपेक्षा काय होती ?
(‘पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकून एकदाचे संपवा त्याना’ असा सोप्पे सर्वसाधारण जनमत बाजूला ठेवले तरीही) :
लोकांच्या भावनेचा आदर करून, ज्या अतिरेक्याला जिवंत पकडले आहे त्यासंबंधी विशेष कायदा नसेल तर तसा लवकरात लवकर करून (तासांच्या / दिवसांच्या हिशेबात)
खटला न चालवता त्याला मृत्यूदंड देणे ! अभूतपूर्व हल्ल्याला उत्तर म्हणून अभूतपूर्व असे शौर्य, कार्यक्षमता व निर्धार दाखवण्याची सहाजिक अपेक्षा !
झाले काय ?
सर्वांनाच माहित आहे. पोकळ वल्गना, लाल फीत, उद्वेगजनक दिरंगाई वगैरे. वर मिडीयाने दिलेल्या बातम्या. बिर्याणी मिळते वगैरे. जखमेवर तिखटमीठ चोळल्यासारख्या. ज्या मंदपणाने आणि असंवेदनशीलतेने सत्तेतले जबाबदार लोक ह्याबाबत मुलाखती देत होते/असतात (किंवा त्याहून वाईट म्हणजे संपूर्ण मौन बाळगत असतात.. मग लोकक्षोभ किती का होईना) ते भयंकरच आहे.
आज काय परिस्थिती ?
रीतसर खटला चालून कसाबला फाशीची शिक्षा झालेली आहे.
पण अंमलबजावणी केव्हा होणार ? माहित नाही.
त्याला इतके दिवस जिवंत का ठेवला आहे ? माहित नाही.
कारणे काय असू शकतील ?
काही व्यूहात्मक कारण असू शकेल का ?
खरे म्हणजे सरकारकडे डोके आणि मन ह्यापैकी कुठलाही ऐवज आहे अशी पुसटशी शंकाही येत नाही त्यामुळे ह्या पातळीवर कुणी विचार करत असेल असे वाटण्यासारखी परिस्थिती नाही. तरीही आंतरराष्ट्रीय संबंधांचा, दहशतवादाचा ज्यांचा अभ्यास आहे अश्या तज्ञ मंडळींच्या सल्ल्यानुसार त्याला जिवंत ठेवला आहे असे गृहीत धरू !
पण का ?
मुद्दा असा आहे की पटण्याजोगे खरे (किंवा खोटे सुद्धा) कारण लोकांना देण्याचीही तसदी सरकारने घेतलेली नाही.
हे अक्षम्य आहे !
लोक रक्त आटवून सांगत आहेत की त्याला लवकर फाशी द्या. ब-याच लोकांना हेही कळते की तो काही पाकपुरस्कृत दहशतवादावर कायमचा उपाय नव्हे. पण ते प्रतिकात्मक आहे ! आमच्यावर हल्ला केला तर आम्ही एकजुटीने मुकाबला करू व सर्वोच्च शिक्षाच हल्लेखोरांना देऊ (छुपे युद्ध पुकारले तर तात्काळ व चोख प्रत्युतर देऊ. उघड युद्ध केलेत तर कायमचा बंदोबस्त करु)
कसाबच्या फाशीने हा संदेश जाणार आहे. जायला हवा. कसाब राक्षस आहेच. पण अर्धशिक्षीत, बेकार युवकांना राक्षस बनवून पाठवणारे नराधम आज पाकिस्तानात आहेत. नाहीतर कसाब व इतरांना मरणाची फिकीर नव्हतीच व त्यांचा अंतही त्याना माहीतच होता. (ताजमधल्या हल्ल्यातून वाचलेली एक फिरंगी वयस्कर महिला म्हणाली होती ‘की आता मला त्यांची कीव येते… ‘doped-up kids who were brainwashed and made into dispensable robots’)
आता मात्र भारत सीमा ओलांडून लष्करी व निर्णायक कारवाई करेल अशी भिती वाटल्याशिवाय पाकिस्तान सरकार त्यांना लगाम घालणार नाही. कमीतकमी सहाय्य तरी करणार नाही. (कारण दीर्घ काळ चालणा-या अशा उघड युद्धात आपले काही खरे नाही हे त्यांनाही माहित आहे)
मग कसाब जिवंत का ?
कसाबकडून सर्व महत्वाची माहिती आत्तापर्यंत नक्कीच घेऊन झाली असणार. त्याचे documentation झाले असणार विविध स्वरुपात (कबुलीजबाब, पुरावे , माहिती ह्यांची कागदपत्रे, ध्वनिचित्रफीत वगैरे). त्या दृष्टीने त्याचा उपयोग संपला आहे.
त्याला पन्नास वर्षांनी फाशी दिले तरी ‘तो पाकिस्तानी नव्हताच व त्याचा कबुलीजबाब जबरदस्तीने घेतला होता’ असा कांगावा पाकिस्तान करणारच (ह्या नावाचा देश पन्नास वर्षांनी अस्तित्वात असेल असे ढोबळ गृहीत आहे !). तेव्हा ते केव्हाही गळा काढणारच. खोटारडेपणा करणारच. त्यामुळे तेही कारण नाही.
कसाब मुसलमान आहे म्हणून सरकार ‘काळजी’ घेत असेल तर निर्बुद्ध आणि असंवेदनशील ह्याबरोबरच सरकार षंढ आहे असेच म्हणावे लागेल (मुस्लिम संघटनांनी कसाब व पाकिस्तानचा केलेला निषेध बघूनही सरकारला कसाबची फाशी politically incorrect वाटत असेल तर धन्य आहे)
मग मुद्दा असा उरतोच की तो जिवंत का ? एक महिन्याच्या आत त्याला फाशी देणे सोडाच पण दोन वर्षे झाली तरी त्या शिक्षेच्या अंमलबजावणीचे वेळापत्रकही जनतेला माहित नसेल (सुरक्षेच्या कारणासाठी पळे घटका असा मुहूर्त सांगितला नाही तर कुठलीही मोघम माहितीही नाही) तर,
‘सत्ताधा-यांना हजार घोटाळ्यांमधून करोडो पैसे कमवण्यापासून फुरसत नाही’ हा आणि असाच अर्थ निघतो.
लोक पेटून उठून जेलवर हल्ला करून कसाबला चौकात फाशी देण्याची सरकार वाट बघत असावे !
आर. आर. पाटील व एकनाथ खडसे कसाबला भेटून आले (कशासाठी ? पुन्हा ‘माहित नाही’ !) तेव्हा आता नेमके २६ नोव्हेंबरच्याच दिवशी कसाबला फाशी देतील अशी अंधूक आशा वाटली..
बघू .. अजून काही तास शिल्लक आहेत २६ नोव्हेंबर २०१० चे !
सप्रेम नमस्कार.
आपले सहर्ष स्वागत!
'राफा' म्हणजे ‘राहुल फाटक’ चे संक्षिप्त रुप.
'काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम’ हे वचन मी विद्वानांंमधे मोडत नसल्याने मला लागू होत नाही. परंतु अनेकविध कलांमधे अत्यंत रुची व किंचीतशी गती असल्याने ह्या ब्लॉगवर मी ह्या गोष्टींमधे वेळ व्यतीत केलेला तुम्हाला आढळेल: विनोदी लेख/चुटके, ललित लेख, लघुकथा, नाटक, काव्य, चित्रकला व प्रकाशचित्रे.
ह्या ब्लॉगवरील सर्व कलाकृती पूर्णपणे 'ओरिजनल' आहेत.
- राफा
ता.क. फोनऐवजी संगणकावर सर्व लिंक्स नीट दिसतील विषयानुसार.
विषय
आयशॉट
(5)
उपयुक्त
(3)
कथा
(5)
काव्य
(17)
चित्रकला
(10)
झटक्यात..
(16)
पुणे - रस्ते आणि खड्डॆ
(3)
लगोरी
(19)
विनोदी
(33)
संगीत / चित्रपट
(10)
Nov 26, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
सही लिहलयस यार...
कधी डोळे उघडणार ह्यांचे कोणास ठाउक...
कुठलाही चमत्कार घडला नाही :( (घडणार नव्हताच. पण आशा वेडी असते म्हणतात).
कसाबचा खटला हा आता उच्च न्यायालय, मग सर्वोच्च न्यायालय (आणि मग शिक्षा कायम राहिल्यास राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज) ह्याच मार्गाने जाईल !
युद्धसदृश्य स्थिती असे वर्णन सरकारही करते अशा घटनेबाबतचा खटला असा सर्वसामान्य खटल्याप्रमाणे आणि जनमताला पायदळी तुडवत व क्रूर अतिरेक्याला न्यायाची पूर्ण संधी (!) देत चालवण्यात येतो ह्यापेक्षा दुर्दैवे ते काय !
Post a Comment