Dec 7, 2011

झटक्यात : शिट्टी !

काल सांप्रत परिस्थितीचा साकल्याने विचार करत असताना अचानक अशी अनुभूति आली की मला अजून तोंडात बोट घालून जोरदार शिट्टी मारता येत नाही. (शीळ घालून गाणी गुणगुणायला फार आवडते पण ते वेगळे).


शिट्टी ठोकण्याचे हे मुलभूत कौशल्य तज्ञ लोकांकडून शिकायचा मी आत्तापर्यंत दोन-तीन वेळा जुजबी प्रयत्न केला पण इतर फालतू कामांच्या गडबडीत (पैसे कमावणे वगैरे) दर वेळी राहून गेले. ब-याच वेळा आपण प्रायॉरिटीज चुकीच्या ठरवतो ते असे !

आता मात्र दररोज पाच मिनिटे सराव करण्याचा मनसुबा आहे (योग्य वेळ व स्थळ पाहून) !

(‘लग्न शिट्टी न मारताच जमवलेस ना' - इति बायको ! )

ता. क. : “ 'स्थळ'  पाहून शिट्टी ! ” ह्यात काहीही कोटी नाही.


- राफा

10 comments:

Nils Photography said...

आईशॉट....
तुम्हाला आली की सांगा....मला पण शिकायची आहे...
theater मध्ये कुणी शिट़टी वाजवली की खुप त्रास होतो.(जळफळाट होतो...)

Shardul said...

.
तोंडात बोट घालून शिट्टी वाजवणे शिकताना -
१. सुरुवातीला गॅलरीच्या कोपर्‍यात भिंतीकडे तोंड करून सराव करावा.
(गॅलरीच्या बाहेरची बाजू निर्जन असणे श्रेयस्कर.)
२. खांद्यावर एखादा नॅपकिन असणे केव्हाही चांगले. म्हणजे हाताची कोपरे ओली झाल्यास कोरडी करता येतात.
३. थोडी चांगली शिट्टी वाजवता येऊ लागल्यानंतर आरशासमोर सराव करावा.
४. आरसा आधीइतकाच स्वच्छ आणि कोरडा राहील असा सराव करावा.
ही उमेदवारी झाल्यावर -
५. रस्त्यावर गजबज असताना इमारतीच्या टेरेसवरून शिटी वाजवून लपून बसावे.
६. लोकांनी मान वळवून वरच्या दिशेने पाहणे हीच यशाची खूण.
७. दगड, चप्पल, आशीर्वाद किंवा लोक स्वतः ; वर येणे हीच कष्टांची पावती.

अभिनंदन आणि शुभेच्छा.

(मी आठवी-नववीत असताना अगदी अनवधानाने बाबांच्या समोर शिट्टी वाजवलेली.. मित्राला बोलावण्यासाठी.. भर रस्त्यात.
तेव्हाचा बाबांचा चेहरा अजूनही माझ्या लक्षात आहे..)

राफा said...

@Think-with-Nil : :))

@essbeev : वाह! तुम्ही तर 'crash course' चालू करायला हवा.. (६ आणि ७ झकास आहेत :) ). मन:पूर्वक धन्यवाद !

Sagar Kokne said...

शिट्टी वाजवून पोरी पटवता येतात हा एक गैरसमज आहे...अर्थात काही पोरी पटत असतील तर शिट्टी न वाजवता येणाऱ्या (माझ्यासारख्या) लोकांची काही हरकत नसावी.

राफा said...

सागर, माझा सध्याचा उद्देश वेगळा आहे ;) (म्हणजे पूर्वीही 'तसा' उपयोग कधी करावा वाटला नाहीच :)).
भरभरून दाद द्यावीशी वाटली आणि नुसत्या टाळ्या वाजवून समाधान झाले नाही किंवा अनपेक्षितपणे आवडत्या गोष्टीचा उल्लेख एखाद्या कार्यक्रमात झाला (उदा. गाणे, किस्सा, चित्रफीत वगैरे) वगैरे वगैरे वेळी जर कडक शिट्टी वाजवावीशी वाटली तर वाजवता आलीच पाहिजे असे वाटते आहे :)

Manali Satam said...

शिटी नव्हे "शिट्टी" मारायला मलाही शिकायचीये... अधून मधून प्रयत्न चालू असतात! पण ते तेवढ्यापुरतेच... सराव करायला हवा! :D
आणि हो, मला शिट्टी मारता येणाऱ्या मुलांबद्दल सॉफ्ट-कॉर्नर आहे!!! :)

राफा said...

@Manali: शिट्टी मारता येणाऱ्या मुलांबद्दल सॉफ्ट-कॉर्नर >>> :)).

प्रसाद said...

येकदम मनातले लिहिलेस ....
मी तर घरातल्या कुकर वर पण जळतो :)

'ता.क'पण एक नंबर

राफा said...

मी तर घरातल्या कुकर वर पण जळतो >>> LOL पश्या !

राफा said...

..आणि अखेरीस तोंडात बोटे घालून सुरेख शिट्टी वाजली आहे !
हे नेत्रदिपक व कर्णसुखद यश मिळवण्यासाठी वेळ जरुर लागला. कधी ह्या अत्यंत महत्वाच्या कार्याचा विसरही पडला हे खेदाने कबूल कराव
ेसे वाटते. प्रयत्नांत खंड पडला, अनेक वेळा फक्त निराशाजनक शांतता व सुस्कारे हाती लागले. पण प्रयत्न सोडले नाहीत.
आता पहिले शिखर सर झाले आहे. शिट्टीची गुणवत्ता व आवाज वाढवणे ही पुढची पायरी !
इतके दैदिप्यमान यश मिळवल्यावर आता मी पुन्हा भुक्कड कामे (जसे की अर्थार्जन वगैरे) करावयास मोकळा झालो आहे ! पण आता दाद देताना टाळीआधी शिट्टी ठोकण्यास तयार झालो आहे !
अहाहा...