Jan 6, 2012

शाळा !

तर एकंदर दिवस नॉस्टाल्जिक होण्याचे आहेत. नुकतेच आमच्या शाळेच्या आमच्या बॅचचे स्नेहसंमेलन २४ डिसेंबरला पार पडले. माझी शाळा पार्ल्याची 'पार्ले टिळक विद्यालय' ! (अगदी रमाबाई बालमंदीरापासून ते दहावीपर्यंत). त्या स्नेहसंमेलनात पूर्ण वातावरणातच नॉस्टाल्जिया भरलेला होता. (माझ्या मेंदूच्या काही पेशींना मी अजूनही शाळेत आहे असेच वाटते).

कार्यक्रम सुनियोजित असला तरी मी काही 'perform' करायचे ठरवले नव्हते. आदल्या दिवशी झटका आला आणि सुचेल तसे खरडले.. त्यातला काही भाग तिथे वाचताना फार फार आनंद झाला (शाळा सोबत्यांना आणि सोबतिणींनाही ऐकत असताना होत असावा असे त्यांच्या चेह-यावरून तरी वाटत होते :)).

मला वाटते आपल्या सर्वांच्याच शाळेच्या आठवणींत कित्येक समान धागे असल्याने ते माझे लिखाण इथे प्रकाशित करत आहे :

***
मागे वळून पाहताना :

आपण आता सगळेच प्रौढ व साक्षर आहोत. तेव्हा थोडा चावटपणा करायला हरकत नसावी. शाळेचे दिवस आठवताना जाणवतं की आपल्या शाळेत ३ प्रकारच्या मुली होत्या (हे मी नंतर समस्त मुली माझी सामुदायिक धुलाई करतील ही शक्यता लक्षात घेऊनही बोलतोय). मुलींचा पहिला प्रकार म्हणजे ‘आपल्यावर कोणीतरी लाईन मारतोय’ ही जाणीव असलेल्या मुली. (‘अच्छा हे कार्ट बघतयं का सारखं मग त्या दिशेला बघायलाच नको’ इ. विचार असलेल्या). दुसरा प्रकार म्हणजे ‘आपल्यावर कुणीतरी लाईन मारतोय’ ह्याची जाणीव नसलेल्या मुली. आणि तिसरा प्रकार म्हणजे ‘लाईन मारणे’ म्हणजे काय हेच माहीत नसलेल्या मुली ! म्हणजे ‘दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते’ एव्हढ्यापुरताच ‘लाईन’’ शी संबंध असणा-या मुली !

आपल्या शालेय जीवनाची सुरुवात प्राथमिक शाळेत झाली. ‘अभय कमळ बघ’ वगैरेने. ही साक्षरतेची काना मात्रा नसलेली पहिली पायरी. शिक्षण मंडळाला कानामात्रा नसलेलं दुसरं फूल मिळत नाहीये. गेली कित्येक वर्षे अभय आपला कमळ बघतोय !

..आणि माध्यमिक शाळेत काय काय व्हायचे ?

  1. गोलमेज परिषदा व्ह्यायच्या; क्लिष्ट कलमे असलेले ऐतिहासिक तह व्ह्यायचे. इतिहासातल्या लोकांना किती दूरदृष्टी होती पहा. भविष्यात शिक्षकांना पेपर काढणे सोयीचे जावे म्हणून प्रत्येक तहाच्या वेळी त्यांनी किमान पाच कलमे ठेवण्याची काळजी घेतली होती. प्रत्येक कलमाला एक मार्क असल्यामुळे, किमान पाच मार्कांचा प्रश्न घालता यावा म्हणून !
  2. एखाद्या मुलाने गृहपाठ वगैरे न करण्याचे स्वातंत्र्य वारंवार घेतले तर बाई वर्गाबाहेर ‘चले जाव’ म्हणत त्याचा स्वातंत्र्य लढा मोडून काढायच्या. (शिक्षकांबद्दल आदरयुक्त भिती असायची.. काही शिक्षकांच्या बाबतीत भितीयुक्त भिती असायची.. ते सोडा).
  3. गाळलेले शब्द भरायला लागायचे, संधी मिळताच समास सोडवायला लागायचे ! जोड्या जुळवा वगैरे प्रश्न असायचे (काही जण ‘जोड्या जुळवा’ ह्याचा भलताच अर्थ घ्यायचे) बरं काही गोष्टी नुसते सांगून शिक्षक ऐकायचे नाहीत, संदर्भासहीत स्पष्टीकरण लागायचे !
  4. तेव्हा उसाच्या रसाचा फूल ग्लास ५० पैसे होता पण कवितेचे रसग्रहण फुकट असायचे ! काही शिक्षिका कविता अशा शिकवायच्या की आपल्याला कविता शिकवताहेत का त्या कवीला धडा शिकवताहेत कळायचे नाही !
  5. मुख्य परीक्षेआधी तोंडी परीक्षेला तोंड द्यावे लागायचे. आयत्या वेळी पाठांतर करताना तोंडाला फेस यायचा आणि मग कवितेची ओळ विसरल्यावर बाईंचा ‘फेस’ पाहून नीट पाठ केलेले पुढचेही विसरायला व्ह्यायचे.
  6. वर्गावर्गात बाकावर बॉल बेअरिंग ने क्रिकेट खेळले जायचे किंवा पुस्तकाचे पान उघडून शेवटचा आकडा बघून त्या बॉलला किती रन्स काढल्या ते ठरायचे. चाळीस, पन्नास असे शेवटी शून्य असलेले पान आले तर एक विकेट जायची !
  7. आपल्याला आता रोजच्या व्यवहारात बहुमूल्य ठरते आहे, ती माहिती पाठ करायला लागायची उदा. मॅंगेनीजच्या खाणी कुठे सापडतात ! बेडूक मोठा होताना अर्भक-डिंभक वगैरे अवस्थांमधून जातो ! वगैरे
  8. संस्कॄतमधे प्रथम पुरुष, मध्यम व उत्तम पुरुष असे फक्त पुरुषच असायचे. स्त्रिया फार नसायच्याच.
  9. ‘स ला ते’, ‘स ला ना ते’ म्हटले की विभक्तीचे सारखे प्रत्यय यायचे मग ‘त ई आ’, ‘त ई आ’ असे नृत्याचे वाटावे असे बोल आणि ‘चा ची चे’ ही असायचे.
  10. पूर्ण साक्षर झाल्यावर त्याचा पहिला उपयोग कुणी उत्तम निबंध लिहायला करायचा तर कुणी कर्कटकने बाकावर आपले नाव कोरायला.. म्हणजे पुढच्या पिढ्यांना कळावे म्हणून की ह्या बाकावर अमुक तमुक महाशय बसायचे.
  11. अभ्यासात कुणी पुढे कुणी मागे असायचा. काही तुकड्यात अभ्यासात पुढे आणि फारच पुढे असे दोनच प्रकार असायचे ! पण शिक्षकांची टोपण नावे ह्या विषयावर परीक्षा घेतली असती तर सर्व इयत्ताच पैकीच्या पैकी मार्क मिळवून पहिली आली असती !
  12. फारच नाठाळपणा केला तर पर्यवेक्षकांकडे तक्रार केली जायची. किरकोळ गुन्ह्यांसाठी प्रगती पुस्तकात लाल शेरा मिळायचा. म्हणजे वर्तणूकीच्या ‘अधोगती’ची नोंदही ‘प्रगती’ पुस्तकातच व्हायची.
  13. समूह गान स्पर्धा, वार्षिक समारंभ, एनसीसी परेड आणि डॉज बॉल नि वॉली बॉलची प्रॅक्टीस काय काय चालू असायचे ! काही धूर्त मुले व्यायामाच्या शिक्षकांच्या शिकारीच्या गोष्टी ऐकत झाडाखाली सावलीत बसायची. गुडघा फुटला तर कापूस आणि लालसर औषध थापले जायचे.
  14. मधेच ‘दासीपुत्र:’ चा अर्थ अमुक तमुक धड्यात शेवटी काय दिला आहे ह्याची चर्चा कुजबुजत व्ह्यायची.
  15. ‘कर्ता ओळखा’ ला उत्तर म्हणून चुकून क्रियापद सांगितलं तर बाई ‘कर्म तुझं !’ म्हणायच्या !
  16. सुट्टीत निळे पांढरे ठिपके ग्राऊंडवर भिरभिरताना दिसायचे. शाळा भरायच्या आधी दप्तराचे स्टंप व्ह्यायचे. सुट्टीत क्रिकेट खेळताना कॅच घेण्यासाठी डाईव्ह मारली तर शर्ट मळेल ह्याची कुणाला चिंता नसायची ! पाणी पिताना अक्वागार्ड चे आहे का वगैरे फालतू भानगडी नसायच्या.
  17. रोज प्रार्थनेच्या वेळी शेवटी निशे:ष जाड्या पहा म्हटल्यावर वर्गातल्या सर्वात गुटगुटीत मुलाकडे सगळे वळून बघायचे आणि तोही दोन चार जणांना समोर बघ नाहीतर सुट्टीत धूऊन काढेन असे नजरेनेच सांगायचा. अशी ही धूऊन काढणारी वॉशींग मशीन प्रत्येक तुकडीत एक दोन असायची.
  18. अमृततुल्य हे विशेषण चहाऐवजी बाबूच्या वडापावला समर्पक होतं. शिवाय पंचाहत्तर पैशाचा सामोसा पाव, ‘रघुवीर’कडे मिळणारा काजू कंद, एक्स्ट्रॉ स्ट्रॉंगची गोळ्यांचे पाकीट म्हणजे सुबत्तेची परमावधी होती.
  19. वाचनाच्या तासाला लायब्ररीमधून पेटी आणताना मधे थांबून, सर्वात चांगली पुस्तके वर्ग-मॉनीटर व त्याच्या/तिच्या मित्राने/मैत्रिणीने काढून घेतलेली असायची. मग पेटीतून हवे ते पुस्तक मिळवता मिळवता वाचनाचा तास संपायचा!
आपल्यावेळी हे असं सगळं व्हायचं..

कुमार गंधर्व आणि भीमसेन ह्यांच्या स्वर्गीय गायनाने शाळा भरायची ! अनेक कानसेन निर्माण करणारी ही कल्पना आजही सुचायला अवघड नि पचायला जड जाऊ शकते, ती तेव्हा प्रत्यक्षात उतरवणारी आपली शाळा! संगीत प्राणप्रिय झाले ते त्यामुळे आणि तेव्हापासून !

आता कुणीतरी भेटतं.. बोलता बोलता विषय निघाल्यावर म्हणतं “आह, तू पार्ले टिळक मधे होतास ? जबरीच !”. मग नकळत मनात एक कप्पा उघडतो. कप्पा नव्हे तर कुपीच. ती कुपी अलगद उघडून ह्या सगळया आठवणींचा मंद सुगंध अनुभवताना समाधी लागते.

मला वाटतं इथे जमलेल्या सगळ्यांनाच शाळेच्या आठवणींनी अधूनमधून गदगदून येतं. ‘काय मस्त दिवस होते’ असं वाटतं. आत्ताची आजची जगण्याची लढाई लढताना ते असं वाटणं एक अदृश्य बळ देतं.

आणखी काय बोलू?

शब्दच संपले...

- राफा
***


 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा

12 comments:

Unknown said...

...
भन्नाट...

BinaryBandya™ said...

‘दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते’ एव्हढ्यापुरताच ‘लाईन’’ शी संबंध असणा-या मुली !

mastch ...

सुंदर झालाय लेख ..

Manali Satam said...

शेवटी शाळा ही शाळा असते...!!! :)

Sagar Kokne said...

एकदम सही....आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन लवकरच होणार आहे आणि तू जे लिहिलेस त्याशी अगदी सहमत आहे...जमल्यास शाळेच्या मित्रांबरोबर 'शाळा' पहायचा विचार आहे...तू पण शक्य असल्यास शाळेच्या मित्रांबरोबरच पहा...

अपर्णा said...

खूप छान झालाय रे लेख...खर तर ते मुद्दे लिहिलेत त्याने हसू याव पण त्याचवेळी डोळे शाळेच्या आठवणीने पाण्याने टचकन भरूनही येतात...
हे वाचन नक्की छान झालं असणार ते पण टाक ऐकायला नक्की आवडेल...या लेखाच्या निमित्ताने तू मुंबईचा आहेस हे कळलं...मला माहित नाही का पण तू पुण्याच्या आहेस असं वाटलं होतं...
"शाळा" पाहिलास की नक्की लिही...

भानस said...

राफा, आजचा दिवस जरा हळवाच जातोय त्यात तुझी टोटल नॉस्टाल्जिक पोस्ट वाचून अजूनच आठवणीचे कढ आले. मात्र हे चांगल्या आठवणींचे ! :)

लेख मस्त खुसखुशीत झालाय. अगदी मोहन जराही कमी पडलेले नाही... :D:D शिक्षकांच्या टोपणनावाची भन्नाट धमाल आम्ही केलीये. आत्ताही हसू आवरत नाहीये. अर्थात या सगळ्या टोपणनावांची उत्पत्ती आमच्यातल्याच काही अत्यंत सुपिक नाठाळ डोक्यातली. :D:D:D

मूड टोटल बदलला रे माझा. धन्यू धन्यू!!

राफा said...

yogesh, BinaryBandya, Manali, Sagar, अपर्णा, भानस : मन:पूर्वक आभार !

शाळेची आठवण आल्यावर गदगदून येत नाही तो/ती विरळाच..

@BinaryBandya : तुझा ID खरंच TM घेण्यासारखा भन्नाट आहे ! :)

@Manali : शेवटी शाळा ही शाळा असते...!!! :) >>> येस ! दोन्ही अर्थाने. १. कॉलेजची मजा वेगळी पण शाळेची वेगळीच. २. 'तुमचं आमचं सेम असते' ह्या अर्थी सगळ्यांच्या मनात भरणारी शाळा एकच !

@Sagar : मस्त आयडिया.. (बरेच जण मुंबईत आहेत पण जमवावे वाटते काहीतरी..)

@अपर्णा : मुळं पार्ल्याची. खोड पुण्याचे (आणि काही फांद्या पिट्सबर्गच्या). 'शाळा' पाहिला की नक्की लिहीन.

@भानस : तुलाही धन्यू ! खरंच गावोगावच्या शाळातल्या शिक्षकांची टोपण नावे व त्याची व्युत्पत्ती/संदर्भासहित स्पष्टीकरण असा ग्रंथ किती सुरस होईल ना :)

shreyas said...

zabrya lekh.. agadi kahrrch gadgadun aal... shaletlya ekhadya mitrala ph karto.. barech divas zale bolun...

श्रिया (मोनिका रेगे) said...

अफाट लिहिले आहेस....वाचताना मजा आली. शाळा हा चित्रपट पाहणारच आहे..पण तुझी 'पार्ले टिळक'पण पार्ल्यात असताना रोजच पहायचे..आणि बाबू बद्दल पण बरंच ऐकले आहे....बटाटेवडे, आणि अळूवडी मस्तच!!!लहानपणी पार्ले टिळक आणि बालमोहन विद्यामंदिर ह्यांचे नाव ऐकायचे..नंतर पार्ल्यात आल्यावर शाळेबद्दल बरंच काही ऐकले आणि प्रत्यक्षात त्या शाळेत गेलेला एक विद्यार्थी रोज सोबत असतो......:P ...तू लिहिले आहेस न,,तसेच बरेच धमाल प्रसंग ऐकत आले आहे गेली काही वर्ष,आणि तुमच्या शाळेत फक्त हुशार विद्यार्थीच वास करतात असा जो समाज होता तो बदलत गेला थोडा म्हणजे मस्ती पण चालतेच....आणि अभ्यास एके अभ्यास असे सगळेच नाहीत हे पण लक्षात आले.....तुझे हे post ....बाकी एकदम सही!!!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!...

राफा said...

shreyas व श्रिया, मन:पूर्वक आभार !

@श्रिया : प्रत्यक्षात त्या शाळेत गेलेला एक विद्यार्थी रोज सोबत असतो >>> god bless you :). शाळेच्या सुरस कथा ऐकायला मिळत (लागत) असतील ना !
तुमच्या शाळेत फक्त हुशार विद्यार्थीच वास करतात असा जो समाज होता तो बदलत गेला >>>>> हे झरकन वाचले तेव्हा माझ्या ब्लॉगवरून एकंदर असा समज झाला की काय अशी अडीच सेकंद भिती वाटली :)

प्रसाद said...

वा... छानच ...!
'कर्म' आणि अर्भक - डीम्भक लई भारी !!
शाळा म्हटले की आतमध्ये काहीतरी खळबळ होते आणि बरेच काही आठवते. अनुशासन जेवढे कडक तेवढी क्रांती करण्यात मजा असते हेच खरे :)

आता राहता राहिले 'शाळा' शिनेमा विषयी ...

ditributors चा पाय लागेल आणि शिनेमा पडद्यावर बघायला मिळेल या आशेत वाट पाहत अहिल्येगत शिळा होऊन पडलेल्या अगणित 'शाळा- पंख्यां'पैकी मीही एक होतो. आणि अचानक २ महिन्यापूर्वी 'शाळा' चा स्पेशल शो पुण्यात बघायला मिळाला आणि काय सांगू मित्रा ... काळजात कुणीतरी घर करतंय असे वाटले. केतकी माटेगावकर पेक्षा योग्य शिरोडकर असूच शकत नाही असे प्रकर्षाने जाणवले .... एकूणच चित्रपटाचा शांत 'टोन', रंग, पार्श्वसंगीत अतिशय सुंदर आहे. काय वाट्टेल त्या अडचणी आल्या तरी हा चित्रपट चुकवू नकोस.

राफा said...

ठांकू ठांकू पश्या !

अरे शाळा बघितला मी PIFF मधे :) ! 'शिरोडकर' विषयीच्या तुझ्या मताशी संपूर्ण सहमत ! दीर्घ समीक्षेने ब्लॉगवर चिरफाड नाही करावी वाटली लगेच, त्यामुळे फेसबुकावर टाकले ते इथे पुन्हा पोस्टत आहे (:

***
आत्ताच PIFF मधे 'शाळा' चित्रपट पाहून आलो. 'य' गर्दी होती.. माहौल होता.. एकूण मस्त वाटले. तटतटून पहायचा असल्याने काही जणांप्रमाणे मी सुद्धा कॉलेज स्टाईल खाली बसून पाहीला (अर्धा तास आधी पोचूनही ही अवस्था). कादंबरी वाचल्यामुळे व ती अतिशय आवडल्याने ती बाजूला ठेवून चित्रपटाचा स्वतंत्र विचार करणे माझ्यासाठी अवघड आहे. चित्रपट आवडला.. पहायला मजा आली (जमलेल्या व न जमलेल्या गोष्टींसकट). काही अभिनेते/अभिनेत्री अगदी फिट्ट ! कादंबरीतून बाहेर आल्यासारखे ! उदा. सु-या.
कादंबरीने झपाटून जाऊन चित्रपट काढावा वाटणा-या, आधी ४० निर्मात्यांचे नकार पचवणा-या, जिद्दीने काम करून अनुभवी व नव्ख्या कलाकरांना घेऊन २५ व्या वर्षी चित्रपटाचे दिग्दर्शन करणा-या सुजय डहाकेला सलाम !

***