Nov 10, 2013

चित्रपट संवाद - भाग १

'चित्रपट संवाद', म्हणजेच देशी विदेशी चित्रपटांतील लोकप्रिय  पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे अत्युत्तम पण तुलनेने कमी माहीत असलेले संवाद ह्याविषयी लिहीण्याचे डोक्यात बरेच दिवस होते.

पण ते डोक्यात आल्यापासून दोन भित्या (भिती चे अनेकवचन) माझ्या डोक्यात आहेत

१. अनेकोत्तम चित्रपट अनेक वेळा बघितल्यावर ‘अतिपरिचयात अवज्ञा’ होऊन अत्यंत प्रिय अश्या चित्रपटातले अत्यंत प्रिय संवाद जर मी लेखात अंतर्भूत करायचे विसरलो तर हे पोस्टल्यानंतर फक्त जीभ चावणे हेच हातात (खरं म्हणजे तोंडात) राहील.

२. एव्हढ्या चित्रपटांतून नेमके संवाद स्मरणशक्तीला साक्षी ठेवून शोधायचे.. मग त्यातून हा सर्वसमावेशक असा लेख कसा काय तयार होईल?

ह्या भित्या (अनेकवचन) घालवायला मी खालील उत्तरे शोधली

१. चुकले तर चुकले.. आपण लेखाचे सिक्वेल लिहू ! (म्हणूनच हा भाग एक :) )

२. हा काही परिक्षण/समीक्षण इत्यादी प्रकारचा लेख नाही. त्यामुळे गप्पा मारताना आपण कुठे मुद्देसूद बोलतो? तर तसेच विस्कळीत स्वरूप राहू दे की. तात्पर्य, हे नुसते रसग्रहण, सौंदर्यास्वाद आहे असे समजावे.

तर मुद्दा आहे चित्रपटातील संवादांचा. त्या ऑलरेडी पावरबाज संवादांचे तुम्हीही फ्यान असाल त॔र सोन्याहून पिवळे.. जर उल्लेख केलेला चित्रपटच पाहिलेला नसेल तर उर्वरित लेख वाचायचे बंद करून आधी चित्रपट पाहून आनंद लुटावा ही विशेष विनंती… लेख वाचण्याचे प्रि-रिक्विझिट म्हणून नव्हे… तर एका चित्रपटप्रेमीने दुस-या चित्रपटप्रेमीला केलेला प्रेमळ आग्रह म्हणून (जेणेकरुन एका उत्तम चित्रपटाचा तुम्ही आनंद लुटू शकाल)

चित्रपटांच्या इतिहासाकडे पाहिले तर सुरुवातीला ते ‘मूक’ असत.. मग संगीत आले आणि मग संवाद. खरं म्हणजे चित्रभाषा कमीत कमी शब्दांमधे भावना व आशय पोहोचवत असेल तर ते दिग्दर्शक, नट (व संवादलेखकाचेही) यश म्हणायला हवे…संवादलेखकाचेही अशासाठी किती कुठे किती हवे आणि कुठे थांबायचे ह्याचे भान हवे त्याला, दिग्दर्शकाला आणि एडीटरलाही.

अशा परिस्थितीत, जर मॉडर्न चित्रपट जर संवादाशिवाय असेल तर ते अतुलनीय धाडस म्हणावे लागेल… ह्याचे एक अत्युत्तम उदाहरण म्हणजे 'ब्लॅक होल' हा लघुपट! 

एकही संवाद नसताना माणसाच्या हव्यास/लालसा ह्यावर यथोचित टिप्पणी करणारा हा लघुपट आहे.


अर्थात भारतात, ज्याला पूर्ण लांबीचा चित्रपट म्हणता येईल असे मूकचित्रपटाचे अलिकडच्या काळाचे ‘पुष्पक’ हे अप्रतिम उदाहरण म्हणता येईल.. संपूर्ण चित्रपटात अभावानेच संवाद आहेत.. पूर्ण चित्रपट कथा/पटकथा, अभिनय आणि पार्श्वसंगीत ह्यांनी तोलला आहे इतकेच नव्हे तर मनोरंजक व आनंददायी बनवला आहे.

ह्या प्रकारचे पुष्पक हे अत्यंत उत्तम (आणि कदाचित भारतात मुख्य प्रवाहातले एकमेव) उदाहरण असले तरी अनेकदा पाहिल्यावर माझे असे मत बनले आहे की दोन तीन बटबटीत प्रसंग टाळले असते आणि कमल हसनने अजून नैसर्गिक/सहज अभिनय केला असता (त्याने अनेक प्रसंगात सुरेख अभिनय केला आहे हे मान्य करुनही) तर हा आंतरराष्ट्रीय ‘मास्टरपीस’ म्हणून गणला गेला असता!

पण मला ह्या चित्रपटातली सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे संवाद ‘टाळण्याच्या’ ज्या युक्त्या दिग्दर्शक/पटकथा लेखकाने वापरल्या आहेत त्याला तोड नाही. (मला वाटते कमलाकर नाडकर्णी ह्यांनी चित्रपट ह्याच्या म.टा. मधे केलेल्या परिक्षणात ह्याचा उल्लेख केला होता). दुसरे असे की चित्रपट पाहिल्यावर हे उमगते की जर शब्दांशिवाय प्रेम, भिती, उत्सुकता, निराशा, आशा ह्या आणि अजून कितीतरी भावना जर व्यक्त होऊ शकतात तर आपण मग रोज इतकी बडबड का करतो? तर ते असो.

अरे, आपण संवादाविषयी बोलतो आहोत आणि गाडी अजून मूक पण बोलक्या चित्रपटांवरच आहे.. हिंदी चित्रपटांविषयी बोलायचे तर संवाद हे त्यांचे बलस्थान व लोकप्रिय होण्याचे एक महत्वाचे कारण आहे… 

‘क्या ड्वायलॉक मारा है’ (‘क्या एन्ट्री है’ च्या चालीवर) हे आपले चित्रपटाच्या दर्जाचे एक मोजमाप असते.

पण इंग्रजी चित्रपटात ह्याइतकेच (किंवा जास्त चतुर/वास्तववादी/नाट्यमयता वाढवणारे) संवाद आढळून येतात.

अगदी ‘गोल्डफिंगर’ ह्या बॉंडपटाचे उदाहरण घ्या ना. 

बॉंड ला पकडल्यावर व्हिलन गोल्डफिंगर त्याला मारण्यासाठी ‘लेझर बीम’ चालू करण्याची आज्ञा देतो.. बॉंडला जखडून झोपवले आहे त्या टेबलाचे लाकूड चिरत तो लेझर हळूहळू बॉंडकडे सरकतो आहे… गोल्डफिंगरचे आता बॉंडकडे दुर्लक्ष आहे.. तो विषय संपला अशा थाटात तो त्याच्या शास्त्रज्ञाशी काहीतरी गुफ्तगू करु लागला आहे… बॉंडला खरे म्हणजे घामटे फुटले आहे.. निर्वाणीचा उपाय म्हणून तो वाटाघाटीचा मार्ग स्वीकारतो.

एक डोळा आपल्याकडे सरकणा-या ‘प्रकाशमान’ मृत्यूकडे ठेवून पण वरकरणी शांत असल्याचे भासवून बॉंड विचारतो

‘डु यू एक्स्पेक्ट मी टू टॉक?’

गोल्डफिंगर चे चित्त बोलण्यातून काहीसे विचलित होते. तो थंडपणे उत्तर देतो: 

‘नो मिस्टर बॉंड, आय एक्स्पेक्ट यू टू डाय!’

  
क्या ड्वायलॉक है बॉस!


अशीच बहारदार वाक्ये अनेक इंग्रजी चित्रपटात आहेत.. विशेषत: जुन्या! 

मात्र एक लक्षात येते की इंग्रजी चित्रपट जरा पन्नासच्या दशकातला असेल तर संवाद चांगले असले तरी ब-याच वेळा शब्दबंबाळ वाटायचे… एका वाक्याचा अर्थ डोक्यात पेटतो ना पेटतो तोवर दुसरे वाक्य सटकन यायचे.. थोडक्यात ‘रिअल टाईम’ मधे सर्व पात्रांना इतके चुरचुरीत संवाद इतक्या फास्ट (ट पूर्ण) बोलायला कसे सुचतात असा सवाल पडायचा.

पण काही चित्रपटांत मात्र उत्कृष्ट संवाद आणि त्याहून उत्कृष्ट टायमिंग असा सुंदर मिलाफ पहायला मिळतो… केस इन पॉईंट: ‘कम सप्टेंबर’!

हा माझ्या अत्यंत आवडत्या चित्रपटांपैकी! (नुसती मादक  ‘जीना लोल्लोब्रिजिडा’ आहे म्हणून नव्हे बरं!) .. 

तसे इथे उल्लेखलेले बहुसंख्य चित्रपट मर्मबंधातली ठेवच!

ह्यात ‘मिडल एज्ड’ रॉक हडसन त्याच्या तशाच मध्यमवयीन प्रेयसीला, (त्याच्याच व्हिला मधे घुसलेल्या) उत्साही पण नवथर कॉलेज तरुण तरुणींना एकत्र पिकनिकला का नेऊ नये हे समजावताना काय म्हणतो? इंग्रजीतच वाचा:

Robert: I can go to jail for what can happen to those girls! 
Lisa: What can happen to them? There are four boys and six girls. That add up to ten, and there`s a safety in numbers.
 
Robert: There`s more than mathematics and adding. Those boys look *quite capable* of dividing and multiplying!
 


आपल्या मराठी चित्रपटांचे उदाहरण घेऊ. (पटकन ‘वाकडोजी धने’ आठवले)

सिंहासन’ हा अनेक अर्थानी ‘युनिक’ चित्रपट म्हणता येईल. 

तर ‘सिंहासन’’ मधे पत्रकार दिगू (निळू फुले) फोनवर बोलत आहे… पलिकडून सवाल येतो 
‘पण असं झालं काय अचानक, मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडायला?’

ह्यावर दिगू मिश्किलपणे म्हणतो 

‘काही नाही, खाऊ नये ते खाल्लं असेल!’


वाह, क्या बात है!
क्रमश:


2 comments:

Raj said...

लै शिनेमांमधले लै संवाद आवडत असल्याने इषय आवडीचा आहे. सिंहासनमध्ये तेंडुलकरांनी कहर केला आहे,
"हे काय गुलाम अली का?"
"नाही, मेहदी हसन."
"तेच ते."
बॉल बाउंडरी के पार. :)

दुसरा - "अहो कैनै, वायगोळा उठला आसल.."

राफा said...

लै शिनेमांमधले लै संवाद आवडत असल्याने इषय आवडीचा आहे >>>> लै झ्याक. तुमचं आमचं जमलं! :)