Dec 15, 2013

चित्रपट संवाद - भाग ३ (अब रोज रोज तो आदमी जीत नही सकता ना...)

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट.

‘व्हिडीओ फिल्म मॅगझिन’ ही कल्पना तेव्हा नवीन होती. अशा पहिल्या वहिल्या मॅगझिनच्या (‘लहरें’) एका ‘अंकात’ फिल्म इंडस्ट्रीतल्या एका सुप्रसिद्ध जोडगोळीतला सुप्रसिद्ध एक कुणी मुलाखत देत होता...

त्या एकाच्या नेहमी बरोबर असणारा दुसरा मात्र ह्या मुलाखतीच्या वेळेस हजर नव्हता. ह्याचे कारण आता सर्वांनाच माहीत झाले होते. त्या दोघांची जोडी फुटली होती. एक प्रदीर्घ आणि अत्यंत यशस्वी अशी भागीदारी संपुष्टात आली होती.

तो ‘एक’ म्हणजे सलीम खान होता. ‘सलीम-जावेद’ मधला सलीम!

मैत्री आणि लेखनातील भागीदारी संपुष्टात आल्याला काही काळ लोटला असला तरी कडू चव अजूनही त्याच्या जीभेवर रेंगाळत होती. त्यामुळे शब्दही टोकाला विष लावलेल्या बाणांसारखे निघत होते.  

मुलाखतकाराचा थेट प्रश्न आला ‘आता तुम्ही वेगळे झालात.. जावेदना यश मिळत आहे तसे तुम्हाला मिळत नाहीये अशी इंडस्ट्रीत चर्चा आहे.. काय म्हणणं आहे तुमचं?’
(खरं म्हणजे कुणी चर्चा करो वा ना करो, वास्तव तेच होतं. गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होती.)

सलीम निर्ढावलेपणाने व आत्मविश्वासाने उत्तर दिले:
“एक संस्कृत श्लोक आहे…”


(सलीमने तो श्लोक सांगितला. इथे त्याच्याबद्दल दोन क्षण मला आदर आणि कणव वाटून गेली. बिच्चारा! आता सलमानचा बाप असणे हा त्याचा घोर अपराध आहेच पण माणूस अगदीच ‘ऑप्शन’ ला टाकण्यासारखा नाही तर!)..

सलीम पुढे सांगता झाला:
“…ह्या श्लोकाचा अर्थ असा की रथापासून चाक वेगळं होतं तेव्हा काही काळ ते रथाच्या पुढे वेगात जातं.. यथावकाश, त्या चाकाची गती मंदावते पण रथ मात्र पुढे जात राहतो… थोडक्यात, जावेदला हे तात्कालिक यश मिळालं असेलही.. पुढे काय होतं ते पाहूयात’”

पुढे जे सलीमला अपेक्षित होतं तसं झालंच नाही. सलीमचा रथ केव्हाच भंगारात निघाला (‘कब्जा’, ‘तूफान’ वगैरे दिव्य चित्रपट लिहील्यावर काय होणार?). जावेदचं स्वयंभू ‘चाक’ मात्र दिवसेंदिवस गतिमानच होत राहिलं. हा इतिहास आहे!

जावेद हा दोघांमधे सरस आणि अस्सल टॅलेंटचा घडा होता/आहे असं माझं मतं आहे!

सलीम मुख्यत: जावेदच्या चमकदार कल्पनांचे टेनिस चेंडू परतवत असावा, जेणेकरुन खेळ सुरु राहील व जावेदसारखा खेळीया उत्तेजित होऊन अजून प्रतिभाशाली स्ट्रोक्स मारेल! सीन लिहिण्यात दोघांचा हातखंडा असावा. ‘कॅरेक्टर’ उभे करण्यात सलीमचा वाटा असावा. पण ‘तडाखेबाज संवाद लिहीणे’ हे जावेदचे बलस्थान होते/आहे हे निर्विवाद!

‘शोले’ च्या वेळचा एक किस्सा आहे. (वाचा: ‘शोले : द मेकिंग ऑफ अ क्लासिक’). ‘शोले’ मधे धर्मेंद टाकीवर ‘टाईट’ होऊन चढतो तो सीन सलीम-जावेद मधे चर्चा होऊन नीट बांधला गेला होता, पण प्रत्यक्षात लिहायचा मात्र राहून गेला होता. वेळ जात होता. आज-उद्या करता करता तो सीन लिहायचे राहून जात होते. पाणी डोक्यापर्यंत आले होते.. मग एक दिवस तो सीन जावेदने बंगळूर एअरपोर्टवर पोहोचेपर्यंत घाईघाईत गाडीत लिहायला घेतला. एअरपोर्टला गेल्यावर थोडा वेळ होता तेव्हा असिस्टंटला चेक-इन करायला पिटाळून गाडीच्या बॉनेटवर जावेदचे तो सीन घाईघाईत लिहीणे, खरे तर अक्षरश: खरडणे, चालूच होते. तो आख्खा सीन लिहून झाला आणि मगच उड्डाणाला केवळ काही मिनिटे राहिली असताना जावेद विमानात बसला.

इतर अगणित संवादांबरोबरच त्या सीनचे संवाद हासुद्धा शोलेचा एक ‘हायलाईट’ आहे! (‘मगर ये अंग्रेज लोक जाते कहा है’ , ‘इन जेल, बुढिया चक्की पिसिंग ऍंड पिसिंग ऍंड…’ ‘मौसीसे कौन शादी करेगा सालों’’).

निर्मात्यांशी धीटपणे बोलणी करणे (आणि त्यांच्या म्हणजे लेखक जोडगोळीच्या खणखणीत असलेल्या नाण्याला तसेच खणखणीत मानधन वाजवून घेणे) ह्यातही सलीमचा महत्वाचा वाटा असावा.

काय असेल ते असो, पण सलीम-जावेद ह्या जोडगोळीने इतिहास घडवला.. यशस्वी व अतिलोकप्रिय चित्रपटांची रांग लावली. कथा/पटकथा ह्याबरोबरच ‘सलीम-जावेदचे संवाद’ हा परवलीचा शब्द झाला होता. लोकप्रियतेच्या परिसीमेची आणि चित्रपटांच्या जंगी यशाची ती गुरुकिल्ली होती!

हिंदी चित्रपट संवादांविषयी लिहीताना ‘सलीम-जावेद’ विषयी न लिहीणे म्हणजे त्यांच्याच ‘दीवार’ ची कथा ‘विजय’च्या पात्राशिवाय सांगण्यासारखे आहे.

इथे मी ‘कितने आदमी थे’, ‘तेरा क्या होगा कालिया?’ किंवा ‘मेरे पास मॉं है’ अशा अनेक सुपरिचित संवांदांविषयी विस्ताराने लिहीत नाहीये कारण बाकीचे कैक संवाद दुर्लक्षिले जातात जे ह्या जोडगोळीच्या विलक्षण प्रतिभेचे भक्कम पुरावे आहेत.




एक वेगळाच ‘ह्युमर’ हेही सलीम-जावेदच्या संवादाचे चटकन लक्षात न येणारे / राहणारे वैशिष्ट्य!

‘मजबूर’ मधे फिश टॅंक घ्यायला आलेला अमिताभ दुकानदाराला विचारतो की ‘सगळे मासे सारखेच दिसताहेत.. ह्यांच्यात नर मादी कसे ओळखायचे?’ तेव्हा तो दुकानदार म्हणतो:

“आसान है साहब. जो तैर रही है  वह मादा है और जो तैर रहा है वह नर है!”

‘सीता और गीता’ पाहताना ह्याचा प्रत्यय ठायी ठायी येतो.. एरवी चित्रपट पहाताना निसटून जाऊ शकतील अशी ही रत्न, हिरे, माणकं नीट वाचा!

“साला अपना बॅडलकही खराब है”

"नीचे आजा, बेटी!"
"उपर आजा, मोटी!"

दारु पिऊन हेमा मालिनीपाशी मन मोकळं केल्यावर धर्मेंद्र सुधारायचे ठरवतो आणि दुस-या दिवशी सकाळी आयुष्यात प्रथमच देवळात येतो. धर्मेंद्र देवाला उद्देशून म्हणतो:
“उस्ताद!” 
( ‘दीवार’ च्या ‘आज खुश तो होंगे तुम’ असं देवाशी डायरेक्ट संवाद साधण्याची गंगोत्री इथे होती का?) 
“उस्ताद! मै थोडा लाईनसे आऊटलाईन हो गया था…. उस्ताद, मै अब दारुको हात नही लगाऊंगा.. दारु पिउंगा भी नही!”

अशक्य !!! :)

‘काला पत्थर’ मधे संवादांची आतषबाजी आहे. त्यावेळेस सलीम-जावेद आणि अमिताभ मधे काहीसा बेबनाव असल्याचे सांगितले जाते. अमिताभ आणि शत्रुघ्न मधे तर तणावपूर्ण संबंध होते (जे पडद्यावरही त्या चित्रपटात दिसून येते किंवा चित्रपटातील संघर्षांच्या प्रसंगाना अजून धार आली आहे असे वाटते तरी). काही असे, पण त्यामुळे अमिताभला जरी काही खास संवाद असले तरी प्रचंड झुकते माप शत्रुघ्न सिन्हाला मिळाले आहे.  ज्याला ‘ऑथर बॅक्ड’ रोल म्हणतात तसा मिळाला आणि संवादांची आतषबाजी करायला भरपूर दारुगोळा सलीम-जावेद कडून मुद्दाम दिला गेला. मग शॉटगन सिन्हानेही अप्रतिम अदाकारी करून त्याचे चीज केले. (बहुदा 'काला पत्थर' आणि 'नरम गरम' ह्याच चित्रपटांत मला शत्रुघ्न फार फार आवडला आहे. बाकी ठीकठाकच!)

ह्या चित्रपटात एका ‘टिपिकल हिंदी फिल्म स्टाईल’ प्रसंगात जंगलातून एकट्या जाणा-या नीतू सिंग वर काही गुंड अतिप्रसंग करायचा प्रयत्न करतात. आणि योग्य वेळी शत्रुघ्न येऊन त्यांना पिटून पळवून लावतो. आता ह्या तशा त्या काळच्या दर सिनेमाआड दिसणा-या प्रसंगात सलीम-जावेद काय कमाल करतात पहा 

(एक तर नीतू सिंग ही जेल मधून पळून आलेल्या शत्रुघ्नचीच खबर पोलीसांना देऊन इनाम मिळवण्याच्या मीषाने जंगलातून एकटी कुणाला कळू न देता चालली आहे हा उत्तम पटकथेचा नमुना).

तर ह्या प्रसंगात एंट्रीचे आणि शेवटचे वाक्य शत्रुघ्नचे पूर्ण कॅरेक्टरच उभे करते…

मोक्याच्या क्षणी एंट्री घेतल्यावर तो गुंडांना म्हणतो:

“तन्ना, इस लडकीको तो मै बचा लूंगा.. मगर इस घने जंगलमें तुम लोगोंको मुझसे कौन बचाएगा?”

पळून जाणा-या गुंडाना पाहून, काय होऊ शकले असते ह्या विचारात सटपटलेली नीतू सिंग त्वेषाने त्यांचा धिक्कार करत, त्यांच्या दिशेने दगडं फेकत म्हणते “आओ हरामजादो, अब क्यों भाग रहे हो, अब आओ..”

ह्यावर शत्रुघ्न शांतपणे म्हणतो:

“उनके जानेका इतनाही गम है बालिके, तो वापस बुला ले?”

धिस इज सलीम जावेद!

आता शत्रुघ्न आणि अमिताभच्या तोंडचे संवाद लिहील्यावर बाकी सीन्सचे संवाद लिहायला प्राणवायू कितीसा उरणार? पण नाही.. शशी कपूरलाही बॅटींग करायला दिली आहे! फिल्मी स्टाईल ‘ग्लॅमरस’ फ्रिलांस पत्रकार वगैरे असणा-या परवीन बाबीला, कोळशाच्या खाणीत इंजिनिअर म्हणून काम करणारा शशी कपूर ‘कोयला’ ह्या विषयावर शास्त्रीय (!) माहिती कशी देतो पहा:

“कोयला दो किस्म का होता है। पहले किस्म का कोयला काला होता है। दुसरे किस्मका कोयलाभी काला होता है । इसलिए दोनो किस्म के कोयले एक जैसे होते है । कोयलेकी दलाली मे हात अक्सर काले हो जाते है । कोयलेके कई इस्तमाल होते है । कोयलेसे बच्चे चेहरेपे मुंछे बनाते है । जवान लोग दिवारोंपर मिठी मिठी प्यारी प्यारी बातें लिखते है।..”


‘शान’ मधे पैसे उधार देणारा सेठिया ‘जॉनी वॉकर’ ह्याचे इरसाल संवाद ही ऐकण्याची आणि पहाण्याची गोष्ट:

त्याच्या समोर पैशांची बंडले टाकल्यावर:

जॉनी: “कितने है भाई?”
शशी कपूर: “पुरे तीस हजार”
जॉनी: “तीसही होंगे.. मगर तुम कहते हो तो गीन लेता हूं।” (?)

आता त्याला कुणी काहीच म्हटलेले नसते पैसे मोजून घेण्याविषयी!

पण मोजून झाल्यावर तो वर आणिक म्हणतो:

“पुरे तीस है. देखा, बेकार गिनवाया. मै तो पहलेही कह रहा था।” (!)


‘शोले’ मधे तर सरळ साधा संवादच नसेल असे वाटते.

‘यूंके आप यहा कैसे?’ ह्या बसंतीच्या साध्या प्रश्नावर धर्मेंद्र च्या साध्याश्याच “यूंके, यूंही!” ह्या उत्तराची लज्जत काही औरच.. धर्मेंद्रच्या म्हणजे वीरूच्या पूर्ण कॅरेक्टरचे सार ह्या साध्या संवादात आहे असे वाटून जाते.  (हा संवाद आम्हा काही ‘शोले’ प्रेमी मित्रमंडळींत ‘तकिया कलाम’ म्हणून वापरला जायचा/जातो..)

‘शोले’ मधले हे अजून एक परिचीत रत्न:

“कारखाना बिडी का है.. जब तक चाहा काम किया, नही तो आरामसे बिडी पी ली”

***

‘पंचम’ म्हणजे आर. डी. बर्मन मधे अनेकानेक अलौकीक गुण होते. त्यातला एक विशेष म्हणजे अपारंपारिक वाद्य (किंवा जी ‘वाद्य’ ह्या व्याख्येत बसणार नाहीत अशा वस्तू) वापरून नेमका हवा तो ध्वनी निर्माण करायचा आणि त्या गाण्याला / पार्श्वसंगीताला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवायचे.

ह्या गुणाशी / प्रयोगशीलतेशी साधर्म्य सांगणाराच गुणविशेष म्हणजे ‘अत्यंत चपखल शब्दांचा वापर करणं’ हे (सलीम)जावेदच्या संवादाचे अजून एक वैशिष्ट्य! इतकी सुयोग्य शब्दयोजना की पहिल्यांदा ऐकताना नेमका शब्दार्थ माहीत नसूनही त्या शब्दाच्या नेमक्या ध्वनीमुळे भावार्थ लगेच लक्षात येऊन ‘भा.पो.’ होते!

ही उदाहरणे पहा:

जय आणि वीरु चा धिक्कार करताना गब्बर म्हणतो:

“निकल गयी सब हेकडी इनकी, सब हेकडी? आ थू!!”

किंवा सूड्बुद्धीने धुमसणारा गब्बर ठाकूर ला पकडून आणल्यावर म्हणतो:

“मेरा बस चलता तो वही सालेका टेटवा दबा देता”

किंवा

अट्टल चोराच्याच तोंडी शोभेल असा:

“बाकी आज रातको तिजोरी में झाडू मारके फूट चलेंगे”


अमिताभचा 'ऍंग्री यंग मॅन' हे जावेदमधल्या संतप्त तरुणाचे मूर्त रुप होते असे राहून राहून वाटते. त्या धारदार शब्दांच्या आवाजाला हवेत बोट लावले तर कापून रक्त निघेल अशी परिस्थिती. 

‘जाओ पहले उस आदमी का साईन लेके आओ’, 
‘जब तक बैठने के लिए ना कहा जाए, शराफत से खडे रहो… “ 

ही सुपरिचित उदाहरणे.

***

कळत नकळत काही तत्वज्ञान किंवा साध्या भाषेत ‘चार शहाणपणाच्या गोष्टी’ म्हणता येईल असेही त्यांच्या संवादात डोकावतात.

जंजीर मधे एक संवाद आहे:

“जो हाथ अंगारे को छुपाता है, अंगारा उसी हाथ को जला देता है”

हा संवाद पाकिस्तानच्या सध्याच्या (किंवा अमेरिकेच्याही) बाबतीत किती लागू होतो! ज्या पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादाचा निखारा जपला गेला, जोपासला गेला आता तेच दहशतवादी शिरजोर झाले आहेत, त्यांचा कट्टर अजेंडा आता ते सरकारवर लादत आहेत, पाकिस्तानात ठिकठिकाणी बॉंबस्फोट घडवून सरकारची झोप उडवत आहेत. त्या ‘निखा-या’चा अजेंडा खुलेआम, सारे जग बघत असताना तरी स्वीकारणे ‘हाताला’ शक्य नाही.  लादेन आणि अमेरिकेच्या बाबतीतही हेच झाले… तर ते असो.


असेच दुसरे संवाद पहा:

जंजीर:
“बारा जंगली कुत्ते मिल के शेर को मार डालते है”

शोले:
“इसलिए के लोहा लोहेको काटता है”

‘गब्बर’ चेही स्वत:चे (अजब) तत्वज्ञान आणि लॉजिक आहे:

“गब्बर के तापसे तुम्हे एकही आदमी बचा सकता है… खुद गब्बर! इसके बदलेमें मेरे आदमी थोडासा अनाज लेते है तो क्या कोई जुल्म करते है?”


***

वाक्यांना असलेला नैसर्गिक रिदम हेही सलीम-जावेद च्या संवादांचे वैशिष्ट्य. त्यात ते संवाद म्हणणारा नट (किंवा नटी) जर प्रतिभावंत असेल, जर त्या कॅरेक्टरची नस नेमकी त्याला सापडली असेल तर मग तो सीन आणि चित्रपट उजळून निघायचा!

उगाच नाही जावेद अख्तर म्हणालाय की ‘आम्ही लिहीलेला एकही संवाद असा नाही जो अमिताभ ने जरा वेगळ्या पद्धतीने म्हणायला पाहिजे होता असे कधी वाटले.. नेहमीच परफेक्ट अशीच त्याची संवादफेक आणि ‘पॉझेज’ असत..’.

अमजद खान ने ‘गब्बर’ चे म्हटलेले संवाद हे ‘रिदम’ पकडण्याचे उत्कृष्ट उदाहरण! आवाजाचे आरोह अवरोह, पॉझेस ह्यांनी आधीच उत्कृष्ट असलेले संवाद वेगळ्याच उंचीवर गेले आहेत..

साध्या संवादांना ‘ट्विस्ट’ ने खुमारी आणणे हे सलीम-जावेद चे अजून एक वैशिष्ट्य.

‘शान’ मधे प्रामाणिक व शूर पोलिस ऑफिसर सुनिल दत्त ‘शाकाल’ च्या त्याच्या काळ्या धंद्यात सामील व्हायच्या ‘ऑफर’ ला नकार देतो. “ह्या पापाच्या चिखलात उगवलेली संपत्ती मला नको आहे असं मी म्हटलं तर?” ह्या त्याच्या सवालावर प्रतिक्रिया देण्याआधी ‘शाकाल’ एक क्षण थबकतो आणि त्याला गर्भीत इशारा देताना म्हणतो:

“मर्जी आपकी! वैसे दुनिया में कोई भी ऐसा नही है जिसने मेरी बातसे इन्कार किया हो… इसलिये की जिसनेभी मेरी बातसे इन्कार किया, वह अब इस दुनियामें नही है।“

***

जावेद स्वतंत्रपणे संवादलेखन करताना तेव्हढाच खुलतो आणि फुलतो.

‘अर्जुन’ मधे अर्जुन च्या तोंडी शब्द घालतो:

“सपने देखनेसे नही टुटने से डरता हूं”

“छोडीये साहब. अपनी किस्मत तो बदल नही सका.. मुल्क की किस्मत क्या बदलूंगा”

‘शिवकुमार चौगुले’ ह्या नेत्याचा ‘एजंट’ बाबूराम ‘अर्जुन’ला म्हणतो:

‘हिरे को खुद अपनी कीमत का अंदाजा नही होता.. हिरे की कीमत या तो जोहरी जानता है या फिर बादशाह.. और शिवकुमार साहब जोहरी भी है और बादशाहभी!”


एक गुंड किंवा स्थानिक ‘दादा’ एका सामान्य मध्यमवर्गीय माणसाला दम देताना कसा बोलेल? ए. के. हंगल च्या घरात नजर फिरवून रंगासेठ (गोगा कपूर) म्हणतो:

“साला मेरा भेजा फिर गया तो ये सब टिनटप्पर उठाके सडकपे आग लगा दूंगा”

(कवीमनाचा लेखक असे लिहू शकतो ही त्याच्या ‘रेंज’ला / अष्टपैलूत्वाला दाद देण्याची गोष्ट आहे… तरल काव्य लिहीणारा गुलजार ‘गोली मार भेजेमें’ लिहीतो तेव्हा ती कौतुकादराची गोष्ट असायला हवी तसंच!)

‘मशाल’ मधे एक सुंदर सीन आणि संवाद आहे. सत्याची कास धरणा-या लढाऊ पत्रकार असलेल्या दिलीपकुमार मुळे ‘आवारागर्दी’ करणारा भुरटा अनिल कपूर सुधारतो, शिकतो… पण परिस्थितीमुळे दिलीपकुमार मात्र वाममार्गाला लागतो.. आदर्शवाद घेऊन परत आलेल्या अनिल कपूरशी बोलताना, ह्या नेमक्या उलट झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना दिलीपकुमार म्हणतो:

“फुटबॉल खेलते ना तुम? हाफ टाईम के बाद ‘गोल’ बदल जाते है ना”


***

चला, आता सलीम-जावेदच्या एका अत्यंत आवडत्या सीन व संवादाचा उल्लेख करुन थांबतो. अत्यंत घिसापिटा, सामान्य वाटणारा प्रसंग सीन चुरचुरीत संवादांची आणि टायमिंगची जोड मिळाली तर ‘क्लिशे’ न होता कसा खुलतो पहा:

‘जंजीर’ मधे स्मग्लर ‘तेजा’ स्विमिंग पूल पाशी बसलेला आहे. त्याची ‘मोना डार्लिंग’ आपल्याच नादात पोहते आहे. ‘तेजा’ला त्याचा सहकारी ‘कबीर’ येऊन सांगतो की त्यांचा एक स्मग्लिंगचा ट्रक पकडला गेला आहे:

कबीर: हमारा एक ट्रक पुलिस ने पकड लिया साहब
तेजा: हं .. इतनी जरासी बात के लिए, तुम मेरे पास चले आए?
कबीर: पिछले बारा सालमे ऐसा कभी नही हुआ
तेजा: हं.. हमारा कोई आदमी पकडा गया?
कबीर: नही. ड्रायवर ट्रक छोडके भाग गया.
तेजा: स्मार्ट बॉय ! ..ये कहा हुआ?
कबीर: अमुक रोड के चेक नाके पे..
तेजा: और उस एरिया का पुलिस अफसर?
कबीर: कोई नया है..
तेजा: हं… एक काम करो, परसों की पार्टीके लिए उसे भी इन्विटेशन भेज दो।
कबीर: जी..

कबीर निघून जातो. आणि मोना पूल मधून बाहेर येऊन तेजाच्या गळ्यात पडून लाडिकपणे विचारते:

मोना: “क्या बात है माय तेजा डार्लिंग?”
तेजा: “कुछ नही, कबीर कह रहा था एक इन्स्पेक्टर को पैसोंकी जरुरत है” (!)





8 comments:

Unknown said...

mast :)

राफा said...

Thanks 'Unknown'.. But what's your name? :)

Anonymous said...

apratim... dil se lihila ahes ekdam.

राफा said...

ठांकू Anonymous! :)

Anonymous said...

majja aali vaachatana mast abhyaspurna lekha sundar.

राफा said...

Ajun ek anonymous! Thanks a lot for your feedback. Tumche nidan pahile naav lihile asatet tar ajun awadale asate. Myktpane comments deta yavyat mhanun anonymous ha option hi thevla ahe. Pan comment vachun anand jasa hoto tasach koni lihili ahe ha suspense drama suddha :)

Unknown said...

Kya baat hai... Sashtang Pranaam ������������

राफा said...

Sashtang Dhanyawad Ketan :) (anek namaskar icons)