Mar 19, 2015

‘ड्यानल’ आण्णांच्या पिक्चर बरोबर आमचं 'बॉंडींग' होईना !



हो, खरी गोष्ट आहे! कदाचित ऐकून धक्काही बसेल काही जणांना. जे असेल ते असो, पण ह्या डॅनियल क्रेगच्या बॉंडपटांचे आणि आपले सूर काही जमत नाहीत बुवा! आता ह्या वाक्यातच लेख संपायला हवा पण ‘जे असेल ते असो’ म्हणजे नेमके काय ते सांगणे भाग आहे.

पहिले प्रथम मेरा कमसीन बचपन कैसे गुजरा यह कहानी.

मी शाळेत असताना, आमच्या एका श्रीमंत नातेवाईकांच्या घरी VCR होता. तेव्हा VCR हा शब्दही कुणाला फारसा माहीत नव्हता. फारच अपवादात्मक असायचं VCR घरी असणं (म्हणजे जवळजवळ आजच्या virgin च्या कमर्शियल स्पेस ट्रॅव्हल इतकच अप्रूपाचं!) त्यावेळी त्यांच्याकडे गेलो असताना मी व्हिडिओ कॅसेटवर पहिला बॉंडपट पाहिला: गोल्डफिंगर.


अर्थातच मी पाहिलेला पहिला! पण पहिल्यावहिल्या ‘डॉ. नो’ आणि दुस-या ‘फ्रॉम रशिया विथ लव्ह’ नंतरचा हा तिसरा चित्रपट बॉंडपटाच्या ‘टेम्प्लेट’ चा उत्कृष्ट नमुना होता. जेम्स बॉंडची विविध करामती असलेली गाडी, बिन्धास्त हॅंड्सम बॉंड, त्याला भेटणा-या ललना (त्यातल्या मुख्य ललनेचं नाव द्वयर्थी! जे तेव्हा (अर्थातच) कळले नव्हते. किसिंग सिन्सही ‘एफेफ’ करण्याचा काळ तो.. हाय! नंतर प्रत्येक बॉंडपट वेगवेगळ्या कारणासाठी वीसेक वेळा पाहणे झाले तेव्हा ब-याच गोष्टींचा पाया पक्का झाला! तर ते असो), अतिमहत्वाकांक्षी योजना असलेला व्हिलन, रम्य लोकेशन्स आणि त्याहून रम्य एकूणच जीवनशैली, अमानुष ताकदीचा व्हिलनचा उजवा हात असणारा भिडू वगैरे. माझ्या मर्मबंधातला बॉंडपट त्यामुळेच कायम ‘गोल्डफिंगर’ राहील!

अर्थातच लहानपणी किंवा पौगंडावस्थेत पाहिलेले आणि आवडलेले आपण ब-याच वेळा उगाच ऍनालाईज करत बसत नाही. त्या त्या त्याची वेळची गंमत वेगळी असते, ती जपून ठेवायची असते म्हणून. (‘चांदोबा’ मधे नेहमी माणसांची व गावांची नावे आणि चित्रेही बहुदा ‘साऊथ’ स्टाईलची का असायची हा प्रश्न आत्ता पडतो.. तेव्हा पडला नाही!).

त्यामुळेच बॉंडपटाचा नंतर सरधोपट होत गेलेला फॉर्म्युला, रापचिक युवती दिसली रे दिसली की डोरे डालणे व पहिल्या दुस-या सिनमधे ‘तोंडओळख’ करुन मग संबंध अधिक दृढ करणे, टूरिस्टासारखे (ब्रिटीश सरकारच्या खर्चाने) जग फिरणे ह्या सगळ्यातून वेळात वेळ काढून आरामशीर हेरगिरी करणारा आणि womaniser वगैरे विशेषणांनी नावाजावे असा कपड्यांसारख्या शय्यासोबतीच्या ललना बदलणारा, शिवाय काही क्षणांपूर्वीच जीवावर बेतले असतानासुद्धा अगदी ‘विट्टी विट्टी’ डायलॉग सुचून ते मारणारा बॉंड, मनीपेनी आणि ‘एम’ बरोबर त्याचा सुरुवातीचा सीन (त्या आधी त्याचे हॅट फेकणे), नेमकी सुरुवातीला ‘क्यू’ ने दाखवलेली गॅझेट्स आश्चर्यकारकरित्या नेमकी त्या मिशनमधेच (चित्रपटामधेच) बरोब्बर वेळी उपयोगी पडणे वगैरे अश्या अनेक त्याच त्याच गोष्टींनी भरलेला अशक्य व अचाट कल्पनाविलास असणारा बॉंडपट. आणि हो हा टोणगा ब-याच वेळा ख-या नावानेच वावरतो. व्हिलनला MI-6 चे बिझिनेस कार्ड द्यायचेच फक्त बाकी ठेवतो हा. त्या व्हिलन लोकांना बरोबर माहीत असते ह्याचे नाव आणि पुर्वपुण्याई. ते आपले एक्सरेंतून त्याची बंदूक पाहून, फोटोवरुन बॅकग्राउंड चेक करुन मोकळे. पण हा उगाचच जेम्स बॉंड फ्रॉम युनिवर्सल एक्स्पोर्ट्स म्हणून वावरतोय.

तर आपण बोलत होतो मला क्रेगचे बॉंडपट का आवडत नाही ते. काही ढोबळ मुद्दे मांडतो. त्यांचा सामुदायिक इफेक्ट गणिती बेरजेपेक्षा कित्येक जास्त होतो. (‘वन प्लस वन इज ग्रेटर दॅन टू’ स्टाईल)

१.     पहिले म्हणजे त्या टोण्याचा लूकच आवडत नाही हो. इथे कुणाच्या रुपाला नावे ठेवायचे प्रयोजन नाही आणि मला तसा अधिकारही नाही. (हॅंडसम किंवा हंक ची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. मला असे म्हणायचे आहे कि बॉंड म्हणून तो विशेषत्वाने पटत नाही). त्याचे निळे डोळे आणि टग्या लूक हे खरे म्हणजे त्याचे प्लस पॉईंट्स. पण त्याचा तो pout फार आडवा येतो. म्हणजे लहान मुलाच्या हातातून मोठ्या भावंडाने खेळणे हिसकावून घेतले तर धक्क्या॔तून बाहेर आल्यावर, मोठ्यांदा भोकाड पसरण्याआधी ते मूल जसे आधी खालचा ओठ बाहेर काढते तसा क्रेगचा कायम खालचा ओठ असतो (तोंड बंद असताना).


शिवाय माझ्या कल्पनेतला बॉंड साकारणारा आयडियल नट हा ‘डॉं. नो’ मधे शॉन कॉनरी त्या ब्लू टीशर्ट मधे दिसतो तसा फिट आहे (लिन अँड मीन). 
,
शक्यतो बॉंडकडे बघण्याचा प्रयत्न करा!



शर्ट काढल्यावर बार्बी डॉल सारखी प्लास्टीकी बॉडी आणि हंक असण्याच्या नावाखाली कमरेवर मसलदार बल्की डबा नको. क्रेग मधे काही तरी विचित्र 'रोबोपण' आहे खास.

(जाता जाता हेही सांगायला हरकत नाही की पाहिल्या पाहिल्याच चेहरा नावडतो असे अलिकडचे उदाहरण माझ्यासाठी म्हणजे रणबीर कपूर. (काही मुलींनो, पुढे वाचू नका!) काय त्याच्यात आईवडिलांच्या चेह-यांच्या फिचर्सचे विचित्र मिश्रण झाले आहे म्हणून का, तो माजोरड्यासारखा वागतो बोलतो म्हणून का, कपूर आडनावाबरोबर येणारे फायदे त्याला फुकट मिळाल्याच्या बाकीच्यांवरच्या अन्यायाचा राग म्हणून का,  त्याला काही बॉडीच नाही म्हणून का (athlete philosopher ह्या उत्तम नटाच्या व्याखेतले काहीच फिट होत नाही हो), एक विचित्र मंद लूक कायम चेह-यावर लुकलुकत असतो म्हणून का किंवा कुठल्याही ठोस कारणाशिवाय पोरी कुठल्याही ‘नवीण’ रॅंडम ऍक्टरला ‘स्वीट’ किंवा ‘क्यूट’ हे लेबल देऊन टाकतात आणि समिक्षक वगैरे लोक वासरात लंगडी गाय ह्या न्यायाने ‘मोस्ट प्रॉमिसिंग न्यू टॅलेंट’ ठरवून टाकतात म्हणून का (तुम्हाला स्वत:ला काही स्टँडर्ड आहे की नाही! का व्हॉट्स ऍप वर कुठल्याही शेअर ला दहा बारा आयकॉन आणि ऑसम वगैरे दाद देणारे असतात तसे झालेत समिक्षक?) असेल ते असो.. तो डोक्यात जातो ही खरी गोष्ट!)
२.     बरं आता चित्रपटाविषयी नक्की ठरवा काय हवे आहे ते. उत्तम ऍक्शन पट पहायचा आहे. मस्त! जरुर पहा. पण मित्रहो त्याला बॉंडपट म्हणू नका (‘कॅसिनो रॉयल’ मधला पहिला थरारक पाठलाग मस्त होताच होता). तुम्हाला भंपकपणा किंवा केवळ मनोरंजन नको आहे. विचारप्रवर्तक, अंतर्मुख करणारं, सामाजिक अन्यायाला किंवा समस्येला वाचा फोडणारं , अगदीच मेलोड्रामाटिक हवे असेल तर बळंच ‘स्त्री जन्मा तुझी हीच कहाणी’ छाप काही पाहायच आहे? जरुर पहा. पण बॉंडपटाकडून भलती अपेक्षा कशाला!
एक उदाहरण देतो. तुम्हाला सत्यनारायण करायचा आहे ना? करा!!! देवावर विश्वास नाही म्हणता आणि/किंवा अशी पूजा अंधश्रद्धा वाटत्ये? मग करू नका. जाऊही नका कुणी बोलावले तर! बरं तुम्ही फार देव देव न करणारे आहात का? पण पुजा साहित्याचे ते सुंदर रंग, गंध, फुलं, पानं, दिवे, समया मोहून टाकतात? मन प्रसन्न आणि शांत होते? घरी त्या निमित्ताने चार लोक आले की बरे वाटते? मग जरुर करा सत्यनारायण. मुद्दा काय तर ठरवा एकदा काय ते. एकदा ठरले की मात्र सत्यनारायण सत्यनारायणासारखाच करा. केळ्यांच्या कापांचा छान वास लागलेला तुपाचा शिरा प्रसाद म्हणून असू देत. तिथे उगाच जुनाट परंपरा मोडायच्या म्हणून आणि हेल्दी खायचे म्हणून ग्रीन सलाड किंवा बॉइल्ड एग्ज प्रसाद म्हणून ठेवू नका. तात्पर्य, बॉंडपट हा बॉंडपटाची व्यवच्छेदक लक्षणे असलेलाच हवा!
३.     “क्रेग आल्यावर मॅच्युअर्ड झाला हं बॉंड फायनली !” हे विधानच बालीश आहे. बॉंडपट हा आमचा ‘चांदोबा’ आहे. त्यात न्युक्लिअर फिजिक्स टाकून तो ज्ञानामृत पाजणारा होईल पण मग तो चांदोबा राहील का? ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट (उदा. देव आनंद व जिच्याकडे पहात रहावे वाटते अशी साधना असलेला ‘हम दोनो’) रंग फासून नव्याने रंगीत स्वरुपात आणण्याचा आततायी आचरटपणा जो चालू झाला आहे ना तसे वाटते. अरे त्याची वेगळी मजा आहे. ती घ्या ना.
शाळेत असताना मी सुट्टीत पुण्याला यायचो तेव्हा मराठी पेपरमधे प्रत्येक थेटरच्या स्वत:च्या जाहीराती असत. थेटरला कुठला शो किती वाजता आहे हे कळायचे. बरेचदा एका आठवड्यात एक थिएटरात एक चित्रपट असेच असायचे. आता नेमके उलटे असते. सिनेमा कुठकुठल्या थिएटरना लागलाय ह्याची जाहीरात असते. तर त्या वेळी ‘लिनाचिमं’ च्या (लिमये नाट्य चित्र मंदीर म्हणजेच आत्ताचे विजय टॉकिज) च्या अचाट जाहिराती असायच्या. त्यांच्या मालकांच्या डोक्यातून त्या निघालेल्या असायच्या का हे माहीत नाही पण डोके सुपीक आणि टँजंट होते हे नक्की.. त्यात बॉंडपटासाठी वर मराठीत हमखास असणारी टॅगलाईन म्हणजे ‘एका हातात पिस्तुल व दुस-या हातात ललना लिलया खेळवणारा बॉंड पहा’! (त्यांनी ‘सुपरमॅन’ची जाहीरात ‘अमेरिकन मारुति पहा’ अशी केल्याचे अजून आठवते आहे).
तर बॉंड हा खेळवाखेळवी करणारा एकाच वेळी डॅशिंग, चार्मिंग, राष्ट्रभक्त, छछोर व आरामशीर गडीच पाहीजे. त्याला सर्व विषयांची (pun intended) माहिती पाहिजे. ‘वाईनचा प्रकार आणि ती जेव्हा सीलबंद केली ते वर्ष’ इथपसून ते ‘सोन्याच्या स्मग्लिंगचा आंतरराष्ट्रिय अर्थकारणावर होणारा परिणाम’ इथपर्यंत सर्व माहिती त्याच्या जिभेच्या टोकावर पाहिजे. त्याला व्हिलनने डायरेक्ट ‘उडवून’ न टाकता रीतसर आपली सगळी योजना समजावून देऊन (फॅक्टरीची टूर असते तशी) मग त्याला पलटवार करायची संधी दिली पाहिजे. इत्यादी.
४.     मग लगेच प्रश्न असा पडतो की म्हणजे तेच तेच आणि तेच बघायचे आहे का? जो फॉर्म्युला (अगदी सिन्सच्या सिक्वेन्स पर्यंत) सरधोपट आणि हास्यास्पद वाटतो तोच का हवा आहे? ह्याचे उत्तर म्हणून दोन उदाहरणे देतो. आपण जेव्हा जादू पहातो तेव्हा ते आधीच सगळे खोटे, आभासाचे, हातचलाखीचे असणार माहीत असते. त्यावेळेपुरते आपण स्वाधीन होतो त्या कलाकाराला. त्याची हातोटी अशी कि असा विश्वास टाकल्यावर जादू सुरु असताना आणि नंतर काही वेळ तुम्हाला तो सगळा प्रकार तोचतोच, कंटाळावाणा वाटू न देता उलट नव्या युक्त्यांनी आणि प्रेझेंटेशनने मंत्रमुग्ध करतो, खिळवून ठेवतो, पेचात पाडतो आणि मुख्य म्हणजे तुमचे मनोरंजन करतो.
म्हणजे ‘गॉथम सिटी’ आहे हे मी मान्य करतो पण मग लेका ती सिटी अशी दाखव, बॅटमॅन असा काही उभा कर, जोकर असा काही रंगव (pun intended), गोष्ट हलत्या चित्ररुपात अशी सांग की मजा आ जाए!’ ही आपली धारणा असते/असावी. हे बॉंडपटानांही लागू पडते. (एरवी गबाळा, अव्यवस्थित रुममेट असेल ज्याचे दोष दोस्तीखात्यात आपण माफ करु कारण जेव्हा मित्रांची मैफिल जमेल तेव्हा आपल्या भन्नाट बडबडीने तोच मजा आणणार आहे!)
दुसरे उदाहरण म्हणजे काही (खरोखरचे) हटके हिंदी चित्रपट ज्यांनी त्याच त्याच घिसापिट्या फॉर्म्युलामधे नवनवीन कल्पना, कॅरेक्टर्स, backdrop, संवाद, संगीत ह्यांनी चित्रपट पुन्हापुन्हा बघणेबल केला! पटकन सुचणारे उदाहरण म्हणजे ‘सरफरोश’ (आमिर खान, नसिरुद्दीन शाह, सोनाली बेंद्रे). देशभक्ती, रोमान्स, स्मगलिंग, देशविघातक कारवाया व इतर गुन्हे करणारे व्हिलन लोक, मॉं-पिताजी का प्यार इत्यादी चावून चोथा झालेल्या चौकटीतच उत्कृष्ट मनोरंजक चित्रपट बनवला गेलाच ना. (कमर्शियल हिंदी सिनेमाचे माझे ऑल टाईम फेवरेट उदाहरण म्हणजे ‘जॉनी मेरा नाम’ . हिंदी चित्रपटाचे सर्व अतर्क्य आणि अचाट अंगभूत ‘दुर्गुण’ (हिरो हिरोईन अचानक गाणी म्हणू लागतात हेही आलेच त्यात, ज्याशिवाय आपण हिंदी चित्रपटाची कल्पनाही करु शकत नाही) असूनही अत्युकृष्ट दिग्दर्शन, टेकिंग, संवाद, ‘प्रेझेंटेशन’ , ऍक्टर्स आणि नॉन ऍक्टर्स कडून ‘बरोब्बर काढून घेतलेले’ काम इत्यादी. असो . त्यावर वेगळा लेख लवकरच (!!!) लिहीन म्हणतो आणि ‘ज्वेल थीफ’ वरही आणि… असो!)

तर थोडक्यात मुद्दा काय तर बॉंडपटाची चौकट मान्य करून त्यात तुम्ही नवीन आधुनिक तंत्राने, गोष्ट सांगण्याच्या पद्धतीने, धक्का तंत्राने, काळाशी सुसंगत पटकथा आणि चुरचुरीत संवाद, चलाख युक्त्यांनी आणि बॉंड साकारणा-या (नवीन) सुयोग्य नटाने नवीन बॉंडपट कसा ‘फ्रेश आणि अपिलिंग’ बनेल हे आव्हान स्वीकारायला हवे ना. नाहीतर मग टिमथी डाल्टन पेक्षा डॅनिएल क्रेग बरा (आणि किशन कुमार पेक्षा -- अहो तोच तो. महान नट व गुलशन कुमार चा भाऊ -- रणबीर कपूर बरा) असंच म्हणाव लागेल.

बॉंडपटाचे दोष नसलेला आणि भरपूर गुण असलेला चित्रपट चांगला असेलही पण आमच्या नेहमीच्या तराजूत तो ‘बॉंडपट’ राहिलेला नसेल. प्रॉब्लेम आहे तो इथेच!

आता लोकेशन्स साठी, स्टंट्स साठी (आणि ‘अजूनही ढिचक्याव दिसेल मोनिका बेल्लुच्ची’ ह्या आशेने) नवीन येणारा क्रेगचा बॉंडपट Spectre पाहीनही. पण तो माझ्या कल्पनेतला मॉडर्न बॉंडपट असेल की नाही ह्याबाबत खरोखरच शंका आहे.


2 comments:

Hrishikesh said...

(त्यांनी ‘सुपरमॅन’ची जाहीरात ‘अमेरिकन मारुति पहा’ अशी केल्याचे अजून आठवते आहे). ...... That's Crazy..... laughed so loud in the office.....and everyone was wondering if I have gone crazy !!!

राफा said...

@Hrishikesh, Thanks!

(Next time, go home early to read the latest post.. Tell your boss 'am not well.. having a craving for humour :)' . He will be shaken (& stirred))