Feb 11, 2008

कोण आहे रे तिकडे - २

महाराज: कोण आहे रे तिकडे ?

प्रधानजी: मी महाराज ! अजून तरी आहे मी ! हा घ्या पुन्हा एकदा मुजरा करतो !

महाराज: मुजरा ? प्रधानजी, काय तवायफ आहात की बारबाला ? पण कुठे उलथला होतात ? तुम्हाला कधीपासून हाक मारतो आहे.

प्रधानजी: अहो चौथ्यांदा सांगतोय महाराज ! मी इथेच आहे ! प्रश्न असा की माझं उत्तर तुम्हाला ऐकू का येत नाहीये..

महाराज: हं.. काय सांगू...मला जरा आजकाल कमीच ऐकू येतंय !

प्रधानजी: का महाराज ?


महाराज: अहो आमच्या महालाच्या पाठीमागच्या साईडलाच कुणीतरी कसलातरी मांडव घातलाय आणि स्पीकरच्या भिंतीच्या भिंती उभ्या केल्या आहेत ! गेले दोन दिवस कुणी काही बोललं तरी मला नुसतं ‘ढपाक टपाक’, ‘ढपाक टपाक’... ‘ढपाक टपाक’ च ऐकू येतं ! काय त्रास आहे ह्यांचा !

प्रधानजी: अच्छा म्हणून तुम्ही कानाडोळा केलात होय माझ्याकडे .. पण काय त्रास झाला महाराज ? वर्गणी जास्त मागितली का या वर्षी ? काय करणार महाराज.. चंदा है पर धंदा है ये ! पण मग मांडववाल्यांबरोबर मांडवली करायचीत ना !

महाराज: च्च च्च ! वर्गणीचं नाही हो काही एव्हढं ! त्यासाठी सरकारी अनुदान दिल आम्ही ! पण एकंदरच ध्वनीप्रदूषण किती वाढतय ! देशापुढील तो एक वाढता प्रश्न आहे. ह्या प्रश्नावर कुणीच आवाज उठवत नाही !

प्रधानजी: महाराज ! आवाज कुणाचा !

महाराज: कुणाचा म्हणजे ??? अर्थातच आमचा !


प्रधानजी: तस नव्हे. एकदम तलवार काढू नका. आता निवडणूका एव्हढ्यात नाहीत अजून.. आवाज कुणाचा म्हणजे कुणाकुणाचा ! म्हणजे कुणाकुणाचा आवाज तुम्हाला त्रास देतो आहे अस विचारतोय मी !

महाराज: किती आवाज सांगू ! ह्या ध्वनीप्रदूषणाविषयी ऐकायला कान देण्याची कुणाची तयारी नसते ! पण आता ह्या प्रश्नाला कान नाही तर तोंड देण्याची वेळ आता आली आहे !

प्रधानजी: महाराज, बरोबर आहे तुमचं.. पण उत्सवाचे दिवस असेच असणार ! एखादा दिवस ..

महाराज: एक दिवस, एक आठवडा असं नसतं ते ! कधी ह्या धर्माचा उत्सव तर कधी त्या धर्माची प्रार्थना ! का तुमचा देव बहिरा आहे का लोकं बहिरी आहेत ! ह्याना कुणी थांबवायला गेलं की धर्म बुडाला म्हणून बोंब मारतात !

प्रधानजी: मी पण गेल्या वर्षी त्याना हेच सांगत होतो नाचता नाचता ! ए ढपाक टपाक ढपाक टपाक (नाचतो)

महाराज: प्रधानजी ! अहो तुम्ही तरी त्यांच्या तालावर नाचू नका ! प्रश्न फक्त एखाद्या उत्सवाचा नाहीये ! उदासपणे, मरगळल्यासारखा उत्सव साजरा करा अस कोण म्हणेल ? अहो हीच तर आमच्या जनतेसाठी आनंद लुटायची सुवर्णसंधी !

प्रधानजी: हो ना महाराज नाहीतरी आपल्या राज्यात अश्या संध्या फार कमी मिळतात !

महाराज: प्रधानजी ! हं.. पण अशा उत्सवात मोठ्या आवाजाने लोकाना त्रास होवू नये हा साधा विचार कुणाच्या मनात येत नाही ? त्याना त्यातून कसा मिळणार आनंद ? कधी थांबणार हे ध्वनीप्रदूषण ? कुणी आजारी माणूस असेल, म्हातारंकोतारं असेल, लहान मूलं असतील त्यांना किती तो त्रास ? माझ्या कानाचा पडदा गच्चीवर वाळत घातलेल्या पंच्यासारखा फडफडतोय !

प्रधानजी: पण महाराज.. आत्ता काय ह्याच एकदम ? सगळे उत्सव संपले आता.. तुमचं बोलणं म्हणजे आत्ता जुनाच एपिसोड चुकून दाखवल्यासारख वाटतंय !

महाराज: अहो, उत्सवाच्या काळात ऐकण्याच्या मनस्थितीत फार कमी लोक असतात म्हणून आत्ता बोलायचं ! बोललं तरी त्या स्पीकरच्या ‘भिंतींच्या’ आवाजात आमचाही आवाज ऐकू येईनासा झालाय !

प्रधानजी: खर आहे महाराज. मिरवणुकीतले काही लोक तर ऐकण्याच्याच काय तर चालण्याच्या परिस्थितीतही नसतात... पण ह्या विषयी जनजागृती व्ह्यायला पाहिजे !

महाराज: अगदी बरोबर म्हणालात !

प्रधानजी: झालं तर मग.. मी आत्ताच लाऊड स्पिकर लावून लोकाना जागृत करायचे आदेश देतो!

महाराज: प्रधानजी !!! तुम्ही... तुम्ही म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहात ! आत्ता मी तुम्हाला ध्वनीप्रदूषणाविषयी सांगितल आणि तुम्ही लाऊड स्पिकर लावायच्या गोष्टी करताय ?

प्रधानजी: महाराज टेक इट लाऊडली .. म्हणजे आपल ते, टेक इट लाईटली ! पण तुम्ही ध्वनीप्रदूषीत झालात म्हणजे काय ?

महाराज: (‘सांग सांग भोलानाथ’ च्या चालीवर )
कान कान गेला काऽऽन ! पडदा फाटेल का ?
कानामधे शिट्टी वाजून बहिरा होईन काय ?

कान कान गेला काऽऽन !

माझ्या घराशेजारी
भलामोठा स्पीकर
आवाज त्याचा आदळून
उठेल कारे डोकं..

गेला काऽऽऽन ! गेला काऽऽऽन !

प्रधानजी: बास बास महाराज.. कळला तुमचा मुददा ! ह्यांची आवाजी बंद करायला हवी आहे ! आपल्या लोकाना बेशिस्तीची सवय झाली आहे. कुठलाही नियम पाळायचा नाही हाच नियम झाला आहे हल्ली !

महाराज: म्हणजे काय ?

प्रधानजी: आता आपण शिस्तीत विचार करु. एकेक आयटम सॉंग घेउ आता !

महाराज: कायऽऽऽऽऽऽ ?

प्रधानजी: नाही एकेक आयटम घेउ अस म्हणायच होत. सवयीने…

महाराज: छान !

प्रधानजी: काय आहे महाराज लोकाना कळतंय पण वळत नाहीये. आता बघा, वनस्पतींवर सुद्धा कर्कश्य संगीताचा वाईट परिणाम होतो अस सिद्ध झालय !

महाराज: काय म्हणताय काय ?

प्रधानजी: खर आहे महाराज. आपले शास्त्रज्ञ वेळ जात नसला की अधून मधून प्रयोगही करतात. असाच त्यानी प्रयोग केला की काचेच्या दोन बंद खोल्यामधे प्रत्येकी एक अशा एकसारख्या वनस्पती ठेवल्या.

महाराज: हा कसला प्रयोग ?

प्रधानजी: ऐका तर खर ! मग त्यानी एका खोलीमधे मंद मधुर शास्त्रीय संगीत लावलं तर दुसऱ्या खोलीत कर्कश्य असे संगीत.

महाराज: कर्कश्य म्हणजे ?

प्रधानजी: म्हणजे ज्यात नुसते ढणाढणा बडवत असतात आणि शब्द काही माती का दगड काही कळत नाही !

महाराज: माती का दगड कळत नाही ? हां हां.. म्हणजे हार्ड रॉक ! बर मग काय झाल ?

प्रधानजी: काय आश्चर्य सांगायच महाराज. थोड्याच दिवसात त्या मधुर मंद संगीताकडे झेपावत पहिल्या खोलीतली वनस्पती वाढली आणि दुसऱ्या खोलीतली वनस्पती कर्कश्या संगीतापासून दूर विरुद्ध दिशेने वाढायचा प्रयत्न करत करत बिचारी कोमेजली !

महाराज: काय म्हणताय काय ? म्हणजे जे झाडांना कळतं ते आपल्यातल्या काही जुन्या खोडांना कळत नाही ?

प्रधानजी: कळत महाराज. पण मूळ मुद्दा हाच आहे की परंपरेच्या नावाखाली ते मनमानी करतात ! कुठलेही बंधन त्याना नको आहे. पण हे ध्वनिप्रदूषण उत्सवापुरतेच मर्यादित नाही महाराज ! ह्या गोंधळात सुजाण नागरिकांची मुस्काटदाबी होऊन त्यांचा आवाज बंद झाला आहे !

महाराज: ते काही नाही ह्या सगळ्यावर ताबडतोब कडक कायदेशीर कारवाई करा.

प्रधानजी: ताबडतोब कडक कायदेशीर कारवाई ? अवघड आहे महाराज !

महाराज: आता काय झालं ?

प्रधानजी: नाही, कारवाई कायदेशीर केली तर ती ताबडतोब असणार नाही ! आणि कडक केली तरी ती कायदेशीर असणार नाही !

महाराज: हं...

प्रधानजी: त्यापेक्षा तुम्ही जनहित याचिका दाखल करा.

महाराज: म्हणजे काय होईल.

प्रधानजी: म्हणजे मग पटापट कारवाई होईल महाराज.

महाराज: ते काही नाही ! मी महाराज आहे ना ? मीच जनहित याचिका दाखल करु ? एकेकाला कडक शिक्षा करा.

प्रधानजी: कुठली महाराज !

महाराज: एकेक गुन्हा सांगा, मी शिक्षा सांगतो.

प्रधानजी: ठीक मी आजच दवंडी पिटवतो

महाराज: ऑं ?

प्रधानजी: नाही, हळू आवाजात पिटवतो ! पहिला गुन्हा : वेळीअवेळी कर्कश्य गाणी लावणे विशेषत: अर्थहीन, अश्लील गाणी देवासमोर किंवा पुजेच्या ठिकाणी लावणे !

महाराज: अश्या लोकांच्या कानाखाली खुद्द आमच्या हातून आवाज काढण्यात येईल ! पुढचा गुन्हा सांगा …
प्रधानजी: गणेशोत्सवात स्पीकरच्या भिंतीच्या भिंती उभारुन देवाला इतक बहिरं करुन सोडणं की तो वैतागून सर्वसामान्यांची गा-हाणी ऐकेनासा होतो !

महाराज: ह्यावर एकच शिक्षा ! त्या लोकाना डोलबायच्या स्पिकरच्या भिंतीत चिणून मारले जाईल !

प्रधानजी: महाराज पुढचा गुन्हा म्हणजे मोठ्मोठ्याने हॉर्न मारत गाडी चालवणे अथवा उभी करणे !

महाराज: त्याना हॉर्नवर सुळी द्या !

प्रधानजी: आ ?

महाराज: अहो बैलाच्या हॉर्नवर म्हणजे शिंगावर सुळी द्या !

प्रधानजी: शेवटचा गुन्हा जरा खाजगी आहे. राणीसाहेबांच्या..

महाराज: आ ? राणीसाहेबांच्या खाजगी गोष्टी तुम्हाला काय माहीत !

प्रधानजी: नाही तस नाही. राणीसाहेबांचे एक काका, भैय्यासाहेब त्यांच नाव.. ते आमच्या शेजारी रहातात. माझी बायको सांगते की ते आंघोळीच्या वेळी ..

महाराज: तुमच्या बायकोच्या ?

प्रधानजी: नाही हो ! भैय्यासाहेब त्यांच्याच आंघोळीच्या वेळी …

महाराज: काय करतात ?

प्रधानजी: आंघोळ करतात ! ते सोडा .. पण शिवाय मोठ्या भसाड्या आवाजात गातात हो ! तेसुद्धा क्लासिकल... म्हणजे आपण क्लासिकलच गातो असंच भैय्यासाहेबांना तरी वाटतं ! त्यांचे ते भिजलेले सूर ऐकून घशाला कोरड पडते हो आमच्या !

महाराज: मग जलमंत्र्यांना सांगून पाणी पुरवठा बंद करायचा त्यांचा ! एकदा नळाचं पाणी पळालं असतं की त्यांच्या तोंडचही पळालं असतं..

प्रधानजी: अहो तेही केलं .. तर नळाकडे पाहून त्यानी मेघमल्हार राग असा आळवायला सुरुवात केली की घाबरून आम्ही पाणीपुरवठा पूर्ववत केला ! आता तर त्यांचा स्वत:च्या गाण्यावर फारच विश्वास बसलाय.. गाता यावं म्हणून ते तीनतीनदा आंघोळ करतात ! महाराज आजूबाजूची प्रजा संत्रस्त झाली आहे हो !

महाराज: होय अशा तक्रारी फार येत आहेत आजकाल ! ह्यावर एकच शिक्षा, एकच उपाय !

प्रधानजी: कोणता महाराज ?

महाराज: त्यांना दहा दिवसाची मुदत द्या.. तेवढ्या अवधीत जर त्यांचे गाणे थांबले नाही तर भैय्यासाहेबांचे आंघोळीच्या बादलीत विसर्जन करा ! बोला गणपती बाप्पा …

प्रधानजी: मोरया !!!


***

10 comments:

संवादिनी said...

chaan avadala..

antarnad said...

lekh aavadalaa...mast jamalaay

पूनम छत्रे said...

chhaan lihila aahes. 'ghadalay bighadalay' cha screenplay hou shakel ha :)

राहुल फाटक said...

संवादिनी, antarnad, पूनम : धन्यवाद !
पूनम :)

मिलिंद छत्रे said...

ह.ह.पु.वा.

कान नाही तोंड द्यावे लागनार... मांडववाल्याशी मांडवली >>>> कोट्या आवडल्या

मिलिंद दिवेकर said...

मस्त आहे हे नाटुकलं. आम्हाला हे सादर करण्याची परवानगी हवी आहे....

राहुल फाटक said...

धन्यवाद मिलिंद, मिलिंद :)
मिलिंद दिवेकर, जरुर करा प्रयोग. फक्त आवाज माफक ठेवून रात्री दहाच्या आत संपवा :).. आणि मला पहायला बोलवा न विसरता !

Anonymous said...

karandaka gheun janar tara ha lekha.

Meenu

राफा said...

Thanx Meenu :)

सायली said...

मस्त!!!!!