Feb 20, 2008

चाकाखालचा रस्ता !

आज रस्ता पहायचा मूड आहे. रस्ता काही खास नाही. नेहमीचाच अयशस्वी !

चित्रातले रस्ते असतात तसा सुबक वगैरे तर अजिबात नाही. काही काही रस्त्यावर आकर्षक कपड्यात सुंदर चित्रे चालतात, लखलखणारी दुकाने असतात.. तसाही नाही. एकेका रस्त्याचे भाग्य असते बहुतेक.

खरं म्हणजे मी चाललोय तो रस्ता काही एकच नाही. 'नेहमीचा रस्ता' म्हणजे अनेक रस्त्यांची साखळी आहे.. जॉइंट फॅमिली असल्यासारखी. पण कळत नकळत सगळ्या मेम्बरांचा एकमेकांवर प्रभाव पडतो आहे असं वाटत राहतं..

हा पूर्ण रस्ता तसा मध्यमवर्गीय आहे. म्हणजे अगदी गंजलेल्या सामानाची दुकानं, फुटकळ खोपटी, देशी दारुचे दुकान वगैरे गोष्टी नाहीत.. तशीच गुळगुळीतपणा, बाजूला बंगल्यांची रांग, दिव्यांचे नवीन खांब, रम्य झाडे वगैरेही नाहीत.

हा तसा ब-याच ठिकाणी ओबडधोबडच आहे. मधेच कधीतरी काही अज्ञात माणसे येउन त्याला जरा डागडुजी करतात. त्यांच्यातला मजूर, मुकादम आणि मालक जवळजवळ सारखेच दिसतात. उकळणारा लाव्हा भरकटत वाहत जावा तसे ते डांबर कसेही पसरवले जाते. मग त्यावर अजस्त्र लाटणी फिरवली जातात. पोळी करणारा शिकाऊ असेल तर कडांना रेखीवपणा न येता वेडेवाकडे आकार होतात तसेच ह्या रस्त्याच्या कडेला पसरलेले डांबर दिसते. दोनेक दिवस रस्त्याचा तो तकाकलेला मेक-अप राहतो. मग पुन्हा तो पार धुळकतो.

ह्या रस्त्यावरचा गोंधळही मेथड इन मॅडनेस असल्यासारखा.. अनेक तालमी घेऊन बसवल्याप्रमाणे चालू असतो... पण त्या चित्रातल्या रस्त्यांपेक्षाही ह्या नेहमीच्या रस्त्यातली चित्रे आज ठाशीव नि सुंदर दिसतात. अगदी आत्ता पुढे असलेली कच-याची गाडीसुद्धा !

ठीक. मग आज गाड्याच पाहू !

तशी खिडकीत बसून माणसांचे नमुने पाहण्याची मौज औरच आहे. पण एव्हढ्या रिकामटेकडेपणाची चंगळ परवडत नाही. त्या बाबतीत लहान सहान दुकानांचे मालक एकदम 'तयार' असतात. बरणीतला जिन्नस झपाझप कागदात बांधून देताना आणि 'कट'कन पुडीचा दोरा तोडतानाही अशा दुकानदारांचे रस्त्यावर अगदी बारिक लक्ष असते.

पण गाड्यांचे स्वभाव नि मूड्स माणसांपेक्षा लवकर वाचता येतात आणि ब-याचदा दिसतात तसेच असतात.

ही समोरची कच-याची गाडी निवांत खडखडत चालली आहे.. एखाद्या गरिबीने मळलेल्या लहानग्या मुलीसारखी ती वाटते. तिला दुनियेची नि तिच्या चकचकीत प्रगतीची काही पडलेली नाही. तिच्यातला काहीबाही जिन्नस मधे मधे खुशाल रस्त्यावर सांडतो आहे. कच-यातल्याच प्लॅस्टीकच्या पांढ-या पिशव्यांमधे भसदिशी हवा शिरली की त्याचे फुगे होऊन त्या उडत आहेत आणि अल्लद तरंगत तरंगत खाली येत आहेत. ती मुलगीच जणू फुंकरी मारून साबणाचे फुगे उडवत मजेत चालल्यासारखी वाटते.

त्या जुनाट गाडीत कच-याची पिवळी पेटी आहे. साखळीने बांधलेली. धूळ कचरा, घाणीने लडबडलेली. मूळचा पिवळा रंग जवळजवळ दिसतच नाहीये इतकी ती माखली आहे. पण तीही निवांत कांगारूच्या पिल्लासारखी गाडीच्या पोटात पहुडली आहे. आत्ता गेलं त्या वळणावर ती एका बाजूला सरकली. कुशीवर वळल्यासारखी... सिमेट्री जराशी बिघडलीच.. पण त्यामुळे तिचं काही बिघडत नाही. पुढच्या वळणावर ती पुन्हा कूस बदलेल कदाचित. पण वळणावर फक्त मीच वळलो. ती कच-याची पेटी ठेवलेली गाडी सरळच गेली...

आता एक लालभडक ट्रक आलाय समोर. ट्रक आणि लॉरी मधला लिंगभेद कसा ठरवतात कोण जाणे ? त्याच्या मागच्या बाजूला छान वेलबुट्टी, मोर वगैरे काढले आहेत. मागे दोन्ही बाजूला लटवलेल्या साखळ्यांची टोकं हिंदकळत आहेत. कानातल्या डूलांसारखी. त्यामुळेही त्या ट्रकमागे लिहीलेले 'चल मेरी रानी' अगदी शोभतयं. त्या खाली लिहीलेल्या 'सुरक्षित अंतर ठेवा' ला आता मजेदार अर्थ येतोय. त्या 'रानी'चा मर्यादाभंग होणार नाही ह्या बेताने मग जरा अंतर ठेवून मागे रहावेसे वाटते. ही डूल घातलेली रानी डुलत डुलत 'देश महान' असल्याचा संदेश देत गावोगाव फिरत्ये आपली.

एक मर्सिडीज घरंगळल्यासारखी पुढे गेली... रस्त्याला अजिबात न दुखावता. जणू रस्ता अदृश्य आहे आणि तिच्यासाठी उलगडतो आहे आयत्या वेळी ! ती आहे अगदी काळीशार. स्पॉटलेस ब्लॅक ! काळ्या साडीत अतिशय देखणी हिरॉईन असावी तशी. आपलं सौष्ठव सगळे नीट पहात आहेत ह्याची कल्पना असलेली तरीही खानदान मोठं असल्यामुळे आपला आब राखून जाणारी. पावसात भिजलेली अशी काळी मर्सिडीज पहाणं म्हणजे... पण आज पाऊस नाही.

पण ही विशिष्ट मर्सिडीज जरा फारच अलिप्तपणे चालली आहे. गूढ आणि काहीसे निष्ठूर तिच्या पोटात आहे असं वाटत राहतं. बाकीच्याना न कळू दिल्यासारखं सावध ती एका पांढुरक्या जीर्ण बंगलीसमोर थांबली. एखाद्या संपन्न जीवन जगलेल्या वृद्धाला शांत, हळूवार मृत्यू यावा तशी ती काळी मर्सिडीज वाटते.. जणू 'काळ'च त्यात बसून आला आहे.. कोण रहात असेल त्या बंगलीत ?

डावीकडून एक 'एसयूव्ही' उन्मत्त सांडासारखी जाते. काही तरल विचार यायला लागले की अशी उधळलेली वाहने जणू त्या विचारांनाच घासत, ठिणग्या उडवत गेल्यासारखी जातात. अंधूकसं दिसलं पण तिच्यातला चक्रधारी बहुतेक एक किरकोळ इसम होता. त्या प्रचंड धूडामधे तो अगदीच सूक्ष्म वाटला. एकंदर त्याला पाहून त्या जगत नियंत्याची आठवण होते. परिस्थिती त्या माणसाच्या कधीही हाताबाहेर जाईल असे वाटत राहते. कदाचित गेलीही असेल ! त्या एसय़ूव्ही चे चक्र योग्य वेळी वळवणे त्याला जमेल का ? ब्रेक पर्यंत त्याचे पाय तरी पोचत आहेत का सहजी ? मग का तो एव्हढ्या जोरात चालवतो आहे? जगाचा अंत जवळ आला आहे का ?

अशी अनेक चित्रे दिसतात... गाड्यांचे स्वभावधर्म त्या जाता जाता दाखवून जातात, कधी त्यांच्या मनातले ऐकवून जातात.

ती बसला करकचून थांबायला लावणारी आडमुठी संथ सायकल..
रिटायर्ड स्मग्लरची वाटावी अशी एक अवाढव्य पसरलेली जुनी गाडी..
ती तेलपाणी खाउन पिउन सुखी असणारी पापभीरु चारचाकी...
एखाद्या बोजड सफारीवाल्याला कशीबशी रेटणारी, थकलेली दुचाकी...
पोटात माणसे कोंबून तृप्त झालेली 'लाल पिवळी'..

गाड्यांची हलती चित्रे बघता बघता गुंग होत मी इच्छीतस्थळी पोचतो !

7 comments:

Nandan said...

wa! surekh lihila aahes. lekh vachatana ha parichchhed comment lihitana vishesh aavadala mhanun uddhrut karen asa tharavat hoto, pan vachoon poorN hoito sagaLaach lekh tya category madhe modatoy asa jaaNavala :)

Ekandarit tula 'rasta' sapadala aahe asa mhaNayala harkat nahi :)

संवादिनी said...

avadala lekh..

आजानुकर्ण said...

beautiful! vachayala kasa kay visaralo :(

Anonymous said...

he he masta re. smagaler lokani retire honyachi kalpanacha sahiye. :) ajachi chakkara vasula zali tuzya blogvarachi.

meenu

अपर्णा said...

हा लेख एकंदरीतच खूप आवडला. इतकं बारकाईने निरिक्षण करून ते योग्य शब्द आणि उतार्‍यात मांडू शकणे यासाठी १० पैकी १० ...
तुझ्याबरोबरचा हा प्रवास आवडला....असे लेखही लिही नं? वाचायला आवडेल...:)

राफा said...

Thanx a ton Aparana !

राफा said...

Nandan, संवादिनी, आजानुकर्ण, Anonymous:

Pratikriyanbaddal khup khup abhar!!!

(Reply dyayla khup ushir zala pan better late than... :) )