भाग २
संथामच्या किल्ल्याजवळील देवता.. संथामच्या लोकांचे सर्वोच्च श्रद्धास्थान !
त्या देवतेला घट अर्पण करण्याचा उत्सव रंगात आला होता.
सर्वत्र फुलापानांनी सजावट केली होती. आकर्षक पोशाख घातलेल्या नर्तकांचे नृत्य चालले होते. नानाविध वाद्ये वाजत होती. संथामचे सर्व सरदार तिथे उपस्थित होते. संथामच्या लोकांनी तो सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. देवतेभोवती काही अंतर रिकामे ठेवून वर्तुळाकार गर्दी जमली होती. उन्हात मधेच लखकन चमकणारे भाले घेऊन लोकाना आवरण्यासाठी रक्षक वर्तुळाच्या आतील बाजूस तैनात होते.
अचानक, वाद्यांचा आवाज अजूनच वाढला. लोक उत्सुकतेने पाहत होते. स्थिर पावले टाकत सम्राट देवतेच्या शिळेकडे निघाला होता.. त्याच्या अंगावर अत्यंत उंची वस्त्रे व आभुषणे होती. तो पूर्ण नि:शस्त्र होता. आपल्या दोन्ही हाताने त्याने तो जड घट धरला होता. तो पवित्र घट सुगंधी द्रव्यांनी व निरनिराळ्या दुर्मिळ जिन्नसांनी भरला होता.
सैनिकांच्या सुचनेवरून काहीश्या अनिच्छेनेच लोक सम्राटाचा जयजयकार करु लागले. पण काही वेळापूर्वी नाचणा-या नर्तकांसारखेच त्यांच्याही मनात अनेक प्रश्न नाचत होते... आता त्या पवित्र घटाने तृप्त होऊन देवता संथामचे रक्षण करणार.. पण संथामचे रक्षण म्हणजेच सम्राटाचेही रक्षण असे का ? त्या क्रूरकर्म्याच्या राजवटीपासून लोकांची कधी सुटका होणारच नाही का ? देवतेला सम्राटाचे राज्य पसंत आहे का ?
आता काही पावलेच राहिली होती.. सम्राटाच्या चेह-यावर समाधान पसरले होते. देवतेला घट अर्पण केला की ताबडतोब किल्ल्यात परतण्याची व्यवस्था शासकाने केली होती. घट अर्पण करताना चालत येण्याची परंपरा असली तरी परत जाताना त्याच्या खास अश्वपथकासह त्वरेने किल्ल्यात परतायचे होते..
आता काहीच क्षण..
सम्राट शिळेच्या पायथ्याशी पोचला.. एकवार त्याने तो पवित्र घट मस्तकाला लावला..
आता.. शेवटच्या क्षणी.. सम्राट तो घट शिळेला अर्पण करणार एवढ्यात...
कुठून तरी वेगाने एक बाण सरसरत सम्राटाच्या दिशेने आला.. आणि दुस-याच क्षणी त्याने नेमका वेध घेतला..
त्या पवित्र घटाचा !
प्रथम काय झाले ते कुणालाच समजले नाही.. एका क्षणातच त्या घटाचे लहान तुकडे होऊन त्यातील पदार्थ चारी दिशांना फेकले गेले. सम्राटाचा चेहरा आणि त्याचा पोषाख पूर्णपणे माखला गेला !
एकच गोंधळ झाला. लोक भितीने पळू लागले. सम्राटाच्या रक्षकांना बाण आला त्या दिशेचा निश्चित अंदाज येईना, त्यांनी गर्दीच्या दिशेने अंदाधुंद बाण व भाले सोडायला सुरुवात केली...
एका लयीत चाललेल्या संथामच्या उत्सवात हलकल्लोळ माजला व समारंभाचा पूर्ण विचका झाला..
काही क्षण गेले.. सम्राट अजूनही अपमानाने थरथरत होता. घडलेल्या घटनेवर त्याचा विश्वास बसत नव्हता. शासकाची संरक्षण व्यवस्था, खास सुरक्षा पथक, सशस्त्र रक्षक, शिवाय प्रचंड गर्दीत मिसळलेले हेर .. कशाचाच उपयोग झाला नव्हता !
शासकाने प्रसंगावधान राखून तातडीने सम्राटाचा अश्व मागवला.. आणि काही क्षणातच विलक्षण वेगाने तो सम्राटाबरोबर किल्ल्याच्या दिशेने दौड करु लागला. सम्राटाचा चेहरा घटातून उडलेल्या द्रव्यांमुळे व संतापतिरेकाने विकृत दिसत होता.
झाली होती ती हानी दिसत होती त्यापेक्षाही भयंकर होती.. सम्राटाच्या अपमानापेक्षाही जास्त ! कदाचित कधीही भरून न निघणारी !
ज्या अर्थी सम्राट पवित्र घट देवतेला वाहू शकला नव्हता त्या अर्थी संथामच्या प्रजेच्या दृष्टीने तो अपशकून होता. काही कारणामुळे सम्राट देवतेच्या रोषाला बळी पडला होता आणि म्हणूनच घट स्वीकारण्यास किंवा सम्राटाचे रक्षण करण्यास देवता प्रतिकूल होती.. आता तिच्या कोपामुळे सम्राट कदाचित लवकरच .. ?
राजधानीतून गावागावात ही बातमी पोचणार होती. सर्वत्र हाच निष्कर्ष लोक काढणार होते.
........
........
काही बोलायची आवश्यकताच नव्हती.
किल्ल्यात शिरल्यावर शासक व सम्राट त्या खास दालनाच्या दिशेने जाऊ लागले.. कुठल्याही आणिबाणीच्या प्रसंगासाठीच त्या दालनाची व्यवस्था शासकाने केली होती.
दालनात शिरल्यावर, डिवचलेल्या हिंस्र पशूसारखा संतापलेला सम्राट आपल्या स्थानावर जाऊन बसला. त्याच्या डोक्यात प्रचंड स्फोट होत होते. आपला राग काढायला समोर जर कुणी दोषी मिळाला असता तर त्याने आजवर दिलेल्या क्रूर शिक्षांना लाजवेल असे हाल केले असते त्याचे !
पण आज त्याच्यासमोर कुणीच अपराधी नव्हता, आणि हीच गोष्ट त्याच्या संतापात अजूनच भर टाकत होती.
त्याच्या नंतर दालनात प्रवेश केलेल्या शासकाने तिथला एकमेव दीप प्रज्वलित केला. त्या दिव्याच्या अपु-या प्रकाशात सम्राटाचा चेहरा अजूनच अक्राळविक्राळ दिसू लागला.
मग शासकाने त्या दालनाच्या रुंद अशा भिंतीतली बेमालूमपणे मिसळून गेलेली एक कळ सर्व शक्तिनिशी आत सरकवली. त्याबरोबर त्या दालनाचा एकमेव अवजड दरवाजा बंद होऊ लागला. त्या विशिष्ट धातूंच्या मिश्रणातून बनलेल्या दरवाजाला भेदणे बाहेरच्या कुठल्याही मानवाला वा शस्त्राला शक्य नव्हते.
दरवाजा पूर्ण बंद झाल्याची खात्री करुन शासक सम्राटासमोर आपल्या आसनावर बसला. झालेल्या घटनेनंतर लगेचच त्याने आपल्या भावनांवर ताबा मिळवलेला दिसत होता. त्याचा चेहरा नेहमीप्रमाणेच अतिशय शांत होता. एखाद्या निश्चल जलायशासारखा. पण त्या शांत पाण्यात खोल कुठल्या कारस्थानांचे सर्प फिरत असतील ते पहाणा-याच्या लक्षात यायचे नाही !
त्याच्या समोर बसलेला सम्राट अजूनही झालेला अपमान पचवायचा प्रयत्न करत होता.. एकीकडे तो संतापला होता आणि दुसरीकडे आत्तापर्यंत कधीही न आलेली विलक्षण भिती आणि अस्थैर्याची भावना त्याचं मन पोखरत होती ! शासकाचे अनुभवी डोळे सम्राटाकडे लक्षपूर्वक पाहत होते. त्याचा शांतपणा पाहून सम्राट अजूनच बिथरला.. अंगाला आलेले कापरे अजूनही कमी झाले नव्हते.
"शासक, मला आजचा अपराधी हवा आहे " शांतता असह्य होत सम्राट बरळल्यासारखा ओरडला
सम्राट, मला तुमच्याशी तीन महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत" शासक म्हणाला.
"पण आजच्या घटनेशी.. "
"संबंध आहे ! त्या तीनही गोष्टींचा आजच्या घटनेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहे !" शासक ठामपणे म्हणाला... "तुम्हाला आठवतं ? तुमच्यावर पहिला हल्ला झाला तेव्हा तुमच्या सुरक्षा पथकाच्या प्रमुखाला, 'तेजराज'ला, तुम्ही द्रोही ठरवलंत.. आणि मग.. सर्वांदेखत हाल हाल करून मारलंत ! ... नंतर केलेल्या चौकशीत असं आढळलं की तेजराज प्रामाणिक होता, शूर होता, आपल्या सहका-यात अतिशय लोकप्रिय होता.. आणि मुख्य म्हणजे पूर्णपणे निर्दोष होता. हल्ल्याशी त्याचा काहीही संबंध नव्हता "
"अशा शुल्लक गोष्टींची चर्चा आपण कधीपासून करु लागलो शासक ?" सम्राट ओरडला " त्याच्या मृत्यूचा आजच्या.."
"सम्राट, ही शक्यता तुम्ही लक्षात घेतली आहे का की लोकप्रिय तेजराजच्या कुणा आप्ताने सूड म्हणून आज..."
"असे दु:साहस कोण करेल तर त्याची काय अवस्था होईल हे सर्वाना माहित आहे.. तरीही शंकानिरसन म्हणून त्याच्या सर्व आप्तजनांना पकडून.. " बोलता बोलता सम्राटाला एकदम दम लागला. " ते जाऊ दे. शासक ! तू सांगणार असलेली दुसरी गोष्ट महत्वाची असेल अशी मी आशा करतो".
सम्राटाच्या उद्गारांनी शासक दुखावल्यासारखा वाटला.
पण तरीही सावरून तो पुढे सांगू लागला " ठीक ! आता दुसरी गोष्ट. तुम्हाला माहित आहेच की तुमच्या आधी सेवकाने तुमच्या अन्नातील भाग सेवन करण्याची योजना माझीच आहे !... तो सेवक आपल्या मातापित्यांचा एकुलता एक पुत्र नाही !"
सम्राटाचे मस्तक विलक्षण वेदनेने ठणकू लागले.. तो ओरडला " शासक ! आज तुला काय झाले आहे. ह्या आणिबाणीच्या क्षणी तू काय निरर्थक..'
त्याचे वाक्य तोडत शासक म्हणाला " त्या सेवकाला जुळा भाऊ आहे. आणि ह्या वयातही दोघे तंतोतंत सारखे दिसतात.. ज्याला तुम्ही सध्या पाहत आहात तो जुळा भाऊ आहे"
शासकाने आपले भेदक डोळे सम्राटावर रोखले. सम्राटाचा पार शक्तिपात झाला होता. शासकाची तीक्ष्ण नजर सम्राटामधले अपेक्षित बदल टिपू लागली. ती नजर पाहूनच सम्राटाच्या अंत:र्मनात कुठेतरी धोक्याची घंटा वाजू लागली.
आणि एखाद्या वीजेसारखे शासकाचे वाक्य त्याच्यावर कोसळले : "सम्राट, तो सेवक मृत्यू पावून आता पंधरा दिवस झाले आहेत"
"काय ??" सम्राट हडबडला.. त्या वाक्याचा अनर्थ हळूहळू त्याच्या लक्षात येत होता !
"होय. त्याचे राहण्याचे ठिकाणही गुप्त असल्याने कुणालाच सुगावा लागला नाही. मी लागू दिला नाही ! तेव्हापासून त्याचा जुळा भाऊ संरक्षक सेवक बनून तुमचे अन्न सेवन करत आहे !"
"शा.. शासक " सम्राटाने चवताळून उठायचा प्रयत्न केला पण तो मागेच आसनावर कलंडला..
"ह्या सगळ्याचे उत्तर तिस-या गोष्टीत आहे सम्राट ! पण त्या आधी तुम्हाला काही दाखवायचे आहे " शासकाने काळजीपूर्वक आपल्या पोशाखातील एका कप्प्यात हात घातला आणि एक वस्तू बाहेर काढली. ब-याचशा पारदर्शक पदार्थाने बनलेली ती एक छोटी कुपी होती. जवळ जवळ रिकामीच.. फक्त तिच्या तळाशी विचित्र निळ्या रंगाचे चिकट द्रावण दिसत होते.
सम्राटाचा चेहरा पांढराफटक पडला होता.. त्याने थरथरत हात उचलला आणि त्या कुपीकडे बोट केले
"हे... "
"अगदी बरोबर.. हेच रोज थोडं थोडं ! अन्नामधून ! ... त्या सेवकाचा मृत्यू झाला आणि तुमच्यावर चालू असलेल्या प्रयोगाचा शेवटचा भाग चालू झाल्याची खात्रीच मला पटली ! होय, अत्यंत मंद गतीने होणारा विषप्रयोग !"
"तू ? मला ... ? का !" सम्राट बरळला.
"होय. मी तूलाच !" शासकाच्या बदललेल्या आवेशाने सम्राट दचकला. "मीच अत्यंत योजनापूर्वक तुझ्यावर विषप्रयोग केला ! ह्या दुर्मिळ विषाची हीच खासियत आहे. अगदी नैसर्गिक वाटतो मृत्यू ! हा जुळा भाऊ असलेला सेवकही मीच निवडला होता.. कारण अतिशय सुदृढ व निरोगी असा तो सेवकही तुझ्या आधी मृत्यू पावण्याची शक्यता मी गृहीत धरली असती. आणि झालंही तसंच ! पण त्याच्या बदली त्याच्या भावाला मी किल्ल्यात गुप्तपणे आणल्यामुळेच... त्या सेवकाच्या अचानक तेजस्वी झालेल्या कांतीचे रह्स्य तुला कळलेच असेल.. "
"पण शा... का...? का ?"
शासकाचे निखारे ओकणारे डोळे एकदम निवले.. पाण्याने डबडबल्यासारखे झाले..
"ते माझे प्रायश्चित्त आहे.. आणि एका दुर्दैवी पित्याचा सूडही !" शासकाचे अश्रू ओघळले पण त्याला पर्वा नव्हती "होय सम्राट ! तेजराज माझा पुत्र होता !! ही गोष्ट त्याच्या मातेशिवाय कुणालाही माहित नव्हती. त्याचा भयानक मृत्यू माझ्या ह्या डोळ्यानी पाहताना... " शासकाने डोळे हातानी झाकून घेतले..
सम्राटाला आभाळ कोसळल्यासारखे वाटत होता. सर्वांगास वेदना सुरु झाल्या होत्या.
डोळे पुसून शासक सांगू लागला "मला प्रथमच त्या असंख्य लोकांच्या वेदना जाणवल्या ज्यांना मी निर्दयपणे मृत्यू दिला. केवळ तुझे साम्राज्य टिकावे आणि सदैव तुझेच रहावे म्हणून ! खूप कट कपटकारस्थाने केली केवळ तुझी आणि संथामची सत्ता वाढावी म्हणून... माझ्या पुत्राला मी त्याचा हक्क देऊ शकलो नाही.. पण त्याचा असा मृत्यूही मला टाळता येऊ नये.. ?" शासकाचे डोळे पुन्हा एकवार कठोर झाले. " त्या क्षणापासून सूडाग्नीमधे माझे अ:तकरण जळत आहे. त्या क्षणापासून स्वामीनिष्ठेचा मी फक्त अभिनय करतो आहे"
"शा..." सम्राटाने क्षीण प्रयत्न केला, आणि तो तसाच हताश पडून राहिला.
ते पाहिल्यावर शासक अत्यंत समाधानाने हसला. कमरेचे धारदार शस्त्र काढून त्याने सहज हाताला येईल असे ठेवले.. "ही फक्त खबरदारी आहे सम्राट ! तू आता उठूही शकणार नाहीस. तूला माहीतच आहे माझी प्रत्येक योजना निर्दोष राहील अशी काळजी मी घेतो!"
सम्राटाने सर्व शक्ती लावली पण त्याला बोटही उचलता येईना.. सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता.. हृदय मंद होत चालल्याचा भास होऊ लागला.
शासक आता शून्यात पाहून समाधानाने बोलू लागला "आज माझा सूड पूर्ण होईल ! थोड्याच वेळात शत्रूराज्यांचे एकत्रित सैन्य किल्ल्यात प्रवेश करेल. तशी व्यवस्था मी केली आहे. त्यांच्या पहिल्या हल्ल्यानंतर मीच त्यांच्या प्रमुखाशी गुप्त भेटी घेतल्या. त्याच तेजस्वी वीराने मी सांगितल्याप्रमाणे पवित्र घटाचा वेध घेतला ! ह्या राज्याला आता प्रजाजनांची काळजी घेणारा न्यायप्रिय सम्राट लाभेल.. पण त्या आधी.. स्वामीनिष्ठेचा शेवटचा अभिनय मला करायचा आहे. आता थोड्याच वेळात तुझी पूर्ण वाचा जाईल. . मग मी दालनाचा दरवाजा उघडून धावाधाव करेन. अचूक सांगायचे तर अजून एक प्रहरानी तू मृत्यू पावशील ! "
सम्राट असहाय्यपणे ऐकत होता..
"तुझे निष्ठावान सरदारही काही करू शकणार नाहीत ! त्याना शंकाही येणार नाही ! कारण संथामची देवता तुझ्यावर कोपली आहे असाच सर्वत्र समज आत्तापर्यंत पसरला असेल. तिनेच तुझा बळी घेतला अशीच सा-यांची समजूत होईल... आता फक्त काही क्षणच मला प्रतिक्षा करायची आहे"
एव्हढे बोलून, काहीश्या थकव्याने, शासक त्याच्या आसनावर पहुडला आणि त्याने शांतपणे डोळे मिटून घेतले.. थोड्याच वेळात गुप्त कळ पुन्हा दाबून तो अजस्त्र दरवाजा त्याला उघडायचा होता. शिवाय अजून काही वेळाने, किल्ल्यावर ताबा मिळवायला इतर राज्यांच्या सैन्याला मार्गदर्शन करायचे होते !
...
सम्राट आता निश्चेष्ट पडला होता..
त्या दालनात आता फक्त शांतता मंद वाहत होती... त्या शांततेच्या डोहात सावकाश पावले टाकत येत असलेला आपला मृत्यू सम्राटाला ऐकू येत होता.
सम्राटावरचा तिसरा हल्ला यशस्वी झाला होता !
***
10 comments:
utsukata vadhat hoti paN shevati paDali asa vaTala. still well done!! imaginative..
कोहम, दोन्ही प्रतिक्रियांबद्दल Thanx !
Hey tar....khoda pahad nikla chooha asa jhala!
I guess Betrayal is the easiest way to beat the enemy stronger and mightier than you...
आनंद, प्रतिक्रियेबद्दल Thanx !
कोहम, आनंद : खरं म्हणजे मला लिखाणावर फार चर्चा वगैरे करायला आवडत नाही कारण एखादे लिखाण फारसे भावले नाही तर तो दोष अर्थातच माझाच. पण आवडले नाही तर दॅट्स ओके. आधी जे आवडल्याचे तुम्ही लिहीलेत तसेच हे लिखाण काहिसे फसल्याचेही लिहीलेत. पुन्हा एकदा धन्यवाद ! माझ्या सुदैवाने काही किंवा बरेचसे लिखाण ब्लॉग वाचणा-यांना आवडते असे एकंदर वाटते/कळते. त्यामुळे मला आवडण्याबरोबरच वाचकानांही (पक्षी : रसिक :) )ते आवडते ह्याबाबत मी समाधानी आहे. ही कथा लिहीण्याचा आनंद मला मिळालाच.
आता कथेविषयी : ह्या कथेचा प्रवाह व गाभा मला जसा हवा होता तसाच मी ठेवला आहे. तर त्यासंबधी कल्पना अशी होती की चमकदार द्वंद्व किंवा भव्य युद्ध मला शेवटी दाखवायचे नव्हतेच. (त्यामुळेच कदाचित अपेक्षाभंग ?), तर संपूर्ण कल्पनेतले मला जे मुद्दे भावले ते असे :
१. 'तिसरा' हल्ला जो वाटतो तो खरे तर हल्ला नाहीच (बाणाने घेतलेला वेध) आणि तो हल्ला आधीच चालू झालेला असणे (मंद विषप्रयोग)
२. शासकाची बाजू व त्याने योजनापूर्वक केलेला 'विश्वासघात'.
३. 'देवतेच्या कोपा'मुळे (!) सम्राट मेल्यामुळे नवीन राजाला सत्ता ग्रहण करणे सोपे. (त्याचबरोबर निष्ठावान सरदारानाही ते सत्य स्वीकारणे भाग आता पडेल)
४. वेगळ्या काळातली, वेगळ्या पोताची कथा लिहीणे.
अर्थात माझा तुमची दाद मिळवण्यासाठीचा 'हल्ला', काहीशी उत्सुकता निर्माण करण्याइतपत का होईना यशस्वी झाला हे वाचून बरे वाटले. पुढच्या वेळेला निकराने प्रयत्न करण्यात येईल :) !
उत्कंठा वाढवणारी गोष्ट आहे ही ... विशेषतः प्रत्यक्ष सम्राटावर हल्ला न करता त्याच्या घटावर - म्हणजे पर्यायाने त्याच्या आत्मविश्वासावर, प्रतिष्ठेवर, अहंकारावर हल्ला होतो आणि त्याचा आत्मविश्वास खचतो हे वीराच्या उत्कृष्ट डावपेचाचे उदाहरण आहे. पण त्यानंतरचा कथाभाग - म्हणजे शासकानेच हे बदल्याच्या ठिणगीतून (आणि त्यानंतर झालेल्या उपरतीने) घडवून आणलेले असते हा तपशील - मला नाही भावला. पहिल्यापासून मी फार हिंदी सिनेमे पाहिल्यामुळे असेल पण हे जरा फिल्मीच वाटले.. can't help but felt that way
पश्या, आवडलेल्या आणि नावडलेल्या गोष्टी सांगणा-या तुझ्या मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक आभार !
माझे विचार वर लिहीले आहेत ते पाहिले असशीलच (ते तेव्हाच लिहीले आहेत म्हणून बरे :).. खूप दिवस झाले आहेत त्यामुळे माझी विचार प्रक्रिया मुद्देसूद मांडायचा आत्ता कंटाळा आला असता ! ;))
हो मी तुझे विचार वाचले होते. पण तरीही मी माझे विचारही तुला कळवले :)
काही आवडले की आपण नेहमी सांगतोच पण जे आवडले नाही तेही सांगावेसे वाटले कारण तू खिलाडूपणे घेणार याची खात्री होती.
आणि btw, 'आवडले नाही' हे सांगण्याची संधी तू एरवी देतोसच कुठे ?? म्हणून चान्स पे डान्स केला लगेच ;)
पश्या :)
(आता इथे मी 'कसचं कसचं' म्हणत सलज्ज व्ह्यायचा प्रयत्न करत खाली किबोर्ड कडे बघत आहे असा शॉट ;))
हाहाहा .....
आणि हळू हळू कॅमेरा कीबोर्ड वरून खाली सरकत पावलावर स्थिर होईल तेवा पायाच्या अंगठ्याने जमिनीवरचे कार्पेट/जाजम उकरताना/उचकटताना दिसशील ;)
मी पण हाहाहा :)
(ते तर माझे फेवरेट आहे, पूर्वीच्या मराठी हिरवीनसारखे दाराआड उभे राहून पायाच्या आंगठयाने जमिनीवर अर्धवर्तुळ काढत ऐकायचे की आपल्याला उजवायच्या गोष्टी चालू आहेत ;) )
Post a Comment