आभाळ पार काळंवडलेले.
अवतीभवती काळोखे पाणी..
काळ्या लाटांवर लाटा..
होडीत मी एकटाच.
लूकलूक किना-याच्या दिशेने..
माझे हात विलक्षण तंद्रीत वल्हे चालवताहेत
डोक्यात समोरच्या किना-याचीच स्वप्ने
परकेपणाने पाण्याचा अडसर दूर लोटत,
होडीचे टोक स्पष्टपणे किना-याच्या दिशेने..
अचानक…
नजरेच्या कोप-यातून जाणवते काहीतरी..
भलत्याच दिशेला पाण्यात उगवतो
कुणा एकाचा हात..
बुडू न पाहणा-या,
मरायची तयारी नसलेल्या
कुणाचा तरी हात
एकवार खाली जातो आणि..
पुढच्याच क्षणी पाणी कापत पुन्हा वर उंचावतो. तीव्रतेने.
फास टाकल्यासारखा एखादा भोवरा
त्याच्या देहाला खाली खेचतो आहे बहुतेक
त्याच्या तडफडीने चेकाळल्यासारखा
अवतीभवती मृत्यू खळाळतो आहे त्याच्या
त्या झगड्यातून मृत्यूशी सामना करते आहे
त्याची ती तीव्र जीवनेच्छा
फण्यासारखा हात काढून..
‘कुणाला अजून जगायचे आहे रे ?’
कुणीतरी जणू अदृश्य प्रश्न केलाय आणि..
त्यासरशी झरकन वर केल्यासारखा त्याचा तो हात !
आणि मग मला चक्क ऐकू येते..
त्याची ती मूक हाक.. निर्वाणीची !
मी दचकतो..
छे छे !
अजून बधीरता आली नाही कानांना ?
अजून निबरता नाही मनाला.. ?
छ्या.. काय पोचणार मग तू त्या उबदार रौशन किना-याला..
असे भरकटून चालते का कुठे ?
पण..
तो माझ्या दिशेने आशा लावलेला हात तर स्पष्ट दिसला मला
आणि त्याच्या आत्म्याची केविलवाणी हाकही ऐकू आली नीट
आता ?
मी माझा मार्ग बदलून त्याच्या दिशेने जायचे ? मदतीला ?
मी ?
मीच का ?
दुसरा कुणीतरी येईलच तो पूर्ण बुडण्याआधी..
येईलच ?
माझी ही चिमुकली होडी. त्याला अन मला एकत्र पेलू शकणार नाहीच..
नक्की?
माझ्याच प्रश्नांच्या ओझ्यानी होडी जड झालीशी वाटते..
त्याच वेळी दूर किना-यावर काहीतरी चकाकते.. भुलवते.
विसर त्याला..
भरकटू नको..
आता ह्या टप्प्यावर भावनेच्या भोव-यात अडकू नकोस..
बुडशील त्याच्यासारखाच..
दिशा बदलू नकोस..
क्षण, दोन क्षणांचा मोह..
मग अचानक अनपेक्षितपणे..
माझ्याच आत आत खोलवरून
काहीतरी उसळते..
प्रकाशाची तीव्र रेषा असावी तसे काहीतरी..
सर्व संभ्रमांची जळमटे फाडून..
कुठलीतरी टोकदार बळकट भावना..
दया ?
माणूसकी ?
न्याय ?
नक्की ओळख लागत नाही..
पण..
कौल नि:संदिग्ध असतो !
माझा हात कष्टाने का होईना उठतो
होडीची दिशा बदलते..
पाणी खरवडल्यासारखे वल्हे चालते
किना-याकडून आता होडीचे टोक वळते
त्याच्या दिशेने..
हळू हळू वेग वाढतो..
आता नजरेच्या कोप-यात किनारा.. आणि तो स्पष्ट समोर.
…
लांबवलेला माझा हात
तो कसाबसा धरतो..
घट्ट कृतज्ञतेने..
…
एक होडी अन आता दोघेजण..
वाढलेले ओझे.
माझे मन डगमगते..
पण दोघांचा भार उचलतही होडी स्थिर आहे.
..
तो थोडा सावरतो. हळूवार कण्हतो..
"देवासारखे आलात .. "
असेच काहीतरी..
आता मात्र माझ्या मनाचा राग राग..
अनावर त्राग्याने डहुळते सर्व.. गढूळ गढूळ होते..
ती मघाचची भावना अस्पष्ट.. विझल्यासारखी होते..
छे…
किना-याकडे जायला आता किती लांबचा पल्ला..
केवढा वळसा पडला..
ह्याच्यामुळे मार्ग बदलावा लागला !
मीच सापडलो ह्याला ?
कण्हत तो पुढे बोलतो.. तुटक तुटक..
“पाण्यात खडक आहेत मधेच.. माझ्याकडे न येता तसेच सरळ जाता तर..”
त्याला धाप लागते..
“..तर, खडकावर आपटून माझ्यासारखीच.. तुमचीही होडी फुटली असती कदाचित.. पण तुम्ही माझ्याकडे.. मला वाचवायला.. देवासारखे.. आता.. आता भिती नाही..”
त्याच्या बोलण्याचा अर्थ माझ्या दमलेल्या मनात उलगडतो !
आणि अंगावर सरसरून शहारा फुलतो..
एक विलक्षण स्तब्धता येते.. मी वल्हे मारायचेही विसरतो.
वाचवले नक्की कुणी कुणाला ?
मी त्याला.. ?
त्याने मला.. ?
की.. ? कुणीतरी आम्हा दोघांना ?
कुणी ?
मघाशी आतल्या आत उसळलेल्या प्रकाशाच्या रेषेची उब पुन्हा जाणवू लागते.
त्या समोरच्या किना-याला पोचणे आता अचानकच अगदी क्षुद्र वाटू लागते.. अगदीच क्षुल्लक.
आणि..
किना-यापेक्षाही लक्षपटीने तेजस्वी असे काहीतरी माझ्याच आत उजळून निघाल्यासारखे वाटते !
- राफा
ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा
24 comments:
मस्त लिहिल आहेस रे.
खरच छान कलाटणी मिळाली आहे कवितेला.
अनिकेत वैद्य.
प्रचंड सुंदर...
मनापासून आवडलं!
फारच सुरेख...आवडल जबरी!
पण तू एवढं गंभीर कधीपासून लिहायला लागलास हा प्रश्न मात्र पडला.
Sunder..manapasun avadali..kalatani tar ekdum mast ahe
अनिकेत, खूप धन्यवाद ! मनात आले तेच तसे लिहीले (without worrying too much about the 'form'). 'गद्य काव्य' म्हणूयात का ?
श्यामली, हार्दिक धन्यवाद. मधे मधे लिहीतो मी गंभीर. (हसण्यावारी नेऊ नकोस ;)) विनोदीही मी गंभीरपणेच लिहीतो :) (आणि कुठले विनोदी आहे ते कळण्यासाठी 'लेबल्स' उपयोगी पडतात ब्लॉगवर :) )
आल्हाद व स्मित, तुमचे मनापासून अतिशय आभार ! मनापासून दाद आली की पुढील लिखाणासाठी उर्जा मिळतेच :)
Very Nice, Rahul! loved reading it...
Thanx a lot Ambar !
अप्रतिम राहुल खूप दिवसांनी तुझा लिखाण वाचला आज
शिल्पा, खूप धन्यवाद ! दोन लिखाणांमधले अंतर बरेच कमी करणे हा ह्या वर्षाचा (अलिखीत !) संकल्प आहे :)
आत्ताच कोकण ट्रिपेवरुन परततोय. त्यासंबधी पोस्टेन लवकरच. आल्या आल्या इ-पत्रे चेकली. (हे जरा ट्विटर सारखं होतयं का :))
mast lihila aahes.
Kshipra, Thanx a lot !
bhayankar chhaan aahe!
पराग, भयंकर प्रोत्साहनात्मक प्रतिक्रियेबद्दल हार्दिक आभार ! :)
mastch ..
Thanx BinaryBandya !
Apratim lihilay...
वाचवले नक्की कुणी कुणाला ?
Kya baat hai...
Sumedh, मन:पूर्वक आभार !
विनोदी लिखाणाबरोबरच (जे करणे माझे सर्वात आवडीचे काम आहेच) हे लिखाणही वाचले जाते ही सुखावणारी गोष्ट आहे!
Hi Ra...(not Ra..one just Rahul)
I was wondering why don't you become full time writer ?
We really have lack of humorous/creative writers these days.
I have read almost all Marathi blogs but there are very few people who can write with humor and imagination...
(I am not criticizing other bloggers, but writing incident/experiences is one thing and writing article with full imagination is other thing.)
Think about it...
you can make it, I think....
Hi Nilesh,
Thanks a lot again for your kind and encouraging words.
I hope some enterprising chap with the right amount of resources agrees with you (in near future) :)
I have responded to your email with some additional things :).
well, I hope the same...
BTW, I didn't get any mail from you.
hope you are sending mail on right address...
(nilesh1foru@yahoo.co.in)
अप्रतिम......मस्त शेवट...आधी मला कविता वाटली पण तरी नेटाने वाचली आणि प्रचंड आवडलं...(हे जे काही काव्य आणि गद्यच्या मधलं आहे ते....साहित्य म्हणूया.. :) )
अपर्णा, पुन्हा एकदा (खूप खूप) धन्यवाद..
आधी मला कविता वाटली पण तरी नेटाने वाचली >>>>> हे अतिभयंकर म्हणजे प्रचंडच आवडलं :) .. ये ब्बात ! लगे रहो.
हे जे काही आहे त्याला गद्य 'काव्य' म्हणतानाही कसनुसं होत होतं माझं मलाच.. गद्यच म्हटलेले बरे ना ! आजकाल तथाकथित तरल, भावूक, अगम्य कविता (व त्यांचे 'रसग्रहण') वाचायची जाम दहशत बसली आहे मला..
चुकीच्या जागी "पण" पडला वाटतं...उप्स....
उप्स..
पण माझी प्रतिक्रिया/विधान मात्र तेच राहील.. माझ्या ब्लॉगवर मी (परखड) विचार नाही मांडायचे तर कुठे :) .. असो.
(पण आता तुझ्या वाक्यात प्रत्येक दोन शब्दांमधे 'पण' लावून काय काय अर्थ बदलतो (किंवा अनर्थ होतो) ते बघणे आले :) )
Post a Comment