Dec 20, 2010

लोकशाहीचा लोचा आणि बकासूर !

मुलांनो,

आज मी तुम्हाला बकासुराची गोष्ट सांगणार आहे !

अरे अरे ! किती ओरडताय ! विधानसभेत आहोत का आपण ? डस्टर कुणी पळवले इथले ?

गोष्ट ऐकायची आहे ना ? ऐका तर. एकचक्रा नगरीच्याबाहेर जंगलात एक बक नावाचा एक बोनाफाईड राक्षस रहायचा. तोच बकासूर ! तो एकचक्रा नगरीच्या लोकांना अतिशय त्रास देत असे.

नाही बरे ! आपल्या वाढदिवसाची पोस्टर्स लावून आपला मनमिळावू व सात्विक चेहरा सतत दाखवण्याइतका काही तो क्रूर नव्हता... तो फक्त माणसे व पाळीव पशू वगैरे पकडून खाऊन टाकी ! पालिका कर्मचा-यांना स्वप्नात दृष्टांत झाल्यासारखे ते अनधिकृत बांधकामे एके दिवशी अचानक पाडू लागतात त्याप्रमाणेच, तो लोकांची घरे पाडून टाकी, नासधूस करी पण अगदी रोजच्या रोज.

हो अगदी रोजच्या रोज ! आपण कसे पेपरमधे रोजच्या रोज राजकारण्यांचे घोटाळे वाचतो, आणि मग रस्त्यावर त्यांचेच ‘आमचे तडफदार नेतृत्व’ अश्या लेबलाखाली कुठल्यातरी दिशेला एक बोट केलेला होर्डींगवरचे फोटो बघतो नि खाली त्यांच्या ‘शुभेच्छुक’ रानदांडग्या बगलबच्च्यांचे फोटो पहातो आणि त्याचा कसा रोजच्या रोज आपल्याला वैताग होतो… अगदी तस्सेच एकचक्रानगरीतले लोक वैतागून गेले होते अगदी.

मग ह्यावर त्या लोकांनी तोडगा, म्हणजे ज्याला आधुनिक सुसंस्कृत समाजात आपण ‘मांडवली’ म्हणतो, तो काढला.



लोक म्हणाले “हे राक्षसा, आमची स्थिती ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ म्हणजे साधारण भारतीय लोकशाहीतल्या सुजाण नागरिकासारखी झाली आहे. तर रोज रोज आम्ही भयाच्या छायेत जगण्यापेक्षा आपण असे करुया का साप भी मर जाये और लाठी भी न टुटे ? .. म्हणजे काय की आम्ही तुला रोज गाडाभर अन्न, दोन रेडे व एक माणूस जंगलात आणून देऊ” (मुलांनो, ही तुमच्या लाडक्या ‘मॅक्डी’ सारखी ही ‘कॉम्बो’ ची पद्धत तेव्हापासूनची बर का. फक्त त्या काळी त्याबरोबर ‘टॉय’ मात्र द्यायचे नाहीत.) आणि ह्या अन्नाच्या बदल्यात तू आम्हाला अजिबात उपद्रव देणार नाहीस. किंबहुना इकडे फिरकणारही नाहीस”

अवघड वाटतय का समजायला चिमुरड्यांनो ?

म्हणजे थोडक्यात असं बघा की “तुझी ‘न्युइसंस व्हॅल्यू’ लक्शात घेउन आम्ही तुला खंडणी देऊ व ‘पीस ऑफ माईंड’ विकत घेऊ” अशी ऑफर त्या लोकांनी बकासूराला दिली. कळले ना आता ?

बाकी काही असो, अहिंसेवर मात्र बकासुराचा अगदी पहिल्यापासून विश्वास ! जसा की आपल्या राज्यकारण्यांचा मूल्यांवर, नैतिकतेवर, महापुरुषांच्या विचारांवर, अंधश्रद्धा निर्मूलनावर विश्वास असतो. मग बाकी काही असो. (म्हणा सत्य साई बाबा सुट्ट्यो. चमत्कार ! हा बघा माझ्या हातात खडू आला !)

तर मग बकासुराने विचार केला की एव्हढे कष्ट करून अन्न मिळवण्यापेक्षा हमखास होम डिलिव्हरी घेणे कधीही चांगले!॒ तो लगेच तयार झाला.

मग बिचारे गावातले लोक एकेक करून जंगलात जावू लागले. हो, हो. बाकीच्या लोकांना दु:ख व्ह्यायचे. आपल्याला पेपरमधे वाचून होते तितकेच पळभर. ‘मला काय त्याचे’ असे आपण म्हणतो ना तसेच ते लोक म्हणायचे आणि ‘माझ्यावर वेळ येईल’ तेव्हा बघू असे म्हणत आला दिवस ढकलायचे.

तर एके दिवशी काय झाले, पांडवांना आश्रय देणा-या ब्राम्हणाची पाळी होती, बकासूराला ही सर्व सामग्री द्यायची ! पण भीम म्हणाला ‘डोन्ट वरी’. अं ?? हो हो ‘बी हॅपी’ पण म्हणाला बरं. मग त्या घरातल्या कुणा व्यक्तीऐवजी, गाडाभर अन्न व रेडे घेऊन भीमच गेला आणि मग शेवटी त्याने बुकलून काढून बकासूराचा वध केला.

आता कट टू : वर्तमान.

कॅलेंडरची पाने फडफडत सिनेमामधे काळ पुढे सरकतो की नाही ? आपण तसेच फडफडत पण मागे जाऊ.

म्हणजे मनातल्या मनात आजचे वर्तमानपत्र घ्या बघू बाकावर.. त्यावर कालचे टाका. त्यावर परवाचे. मग त्या आधीची सगळी एकेक टाकत जा.. अहो आश्चर्यम. मघाशी हातात प्रकट झालेल्या खडूपेक्षाही मोठ्ठा चमत्कार वाटला ना !

त्याच त्या बातम्या आहेत आलटून पालटून असे वाटते ना ?

जणू आधीच्या दिवसाच्याच पुन्हा छापल्यासारख्या.
रोज त्याच. फक्त नावे आणि संदर्भ बदललेले.
‘खोसला का घोसला’ पाहिला असेल ना ? त्या भाषेत सांगायचे तर ‘सेम का सेम. चेंज का चेंज’.

बातम्या आहेत:
भ्रष्टाचाराच्या.
आधीचा घोटाळा बरा अशा नवनवीन घोटाळ्यांच्या.
अतिभोंगळ कारभाराच्या.
हलगर्जीपणाच्या.
धडधडीत अन्यायाच्या.
झुंडशाहीच्या.
निर्लज्ज समर्थनाच्या.
गुंडगिरीच्या.

आणि हे सर्व करणा-यांचे हसरे माजोरडे चेहरे.

तर चिमुकल्यांनो, ह्या बातम्यांबरोबरच जखमेवर मीठ म्हणून काही भयानक भुक्कड व चोथा विधानेही वाचायला मिळतात की नाही:

ह्या प्रकरणी लक्ष घालू..
चौकशी समित्यांच्या स्थापना..
विकासकामांचे आश्वासन..
महिलांनी पुढे यायला हवे..
आदिवासींनी वर यायला हवे..
भारताला महाशक्ती बनवायला हवी..

झालंच तर,

कोकणचे कॅलिफोर्निया !
मुंबईचे शांघाय !

काय वाट्टेल ते ! जोड्या लावायला शहरे कमी आहेत का जगात ? ‘भूगोलाचा भलताच भुक्कड उपयोग’ ह्या धड्यात आपण ते शिकू लवकरच. सध्या म्हणा, साता-याची सॅनफ्रन्सिस्को करायला हवी !

पण लक्षात आले का मुलांनो ? तुमच्या आजोबांच्या काळात जे प्रश्न सुटायला हवेत ते तुम्ही आजोबा झालात तरी सुटतील की नाही शंका आहे.

विविध स्तरावरच्या विकास कामांना जसे की पिण्याचे पाणी, वीज, रस्ते व इतर पायाभूत सुविधा, शिक्षण, रोजगार ह्या बाबतीत ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशी अवस्था आहे. बाकीच्या अत्यंत महत्वाच्या पण चर्चेच्या वेळी ‘टॉप टेन’ मधे नसणा-या पर्यावरण, लोककलांची घुसमट वगैरे बाबींबद्दल बोलायलाच नको.

प्यायलाच पाणी नाही सर्वांना तर पुढे बोलणार काय ?

पालिका, राज्य, केंद्र. कुठल्याही ठिकाणी सरकार कुणाचेही असो. गेली कित्येक वर्षे ह्यात बदल नाही!

आहे का ???

छान ! सगळे कसे एका सुरात ‘नाही’ म्हणालात !

बदल करायचे प्रयत्न राजकारणाबाहेरच्या सूज्ञ लोकानी केले नाही असे नाही बरं, पण बदल झालेला नाही. हव्या त्या प्रमाणात तर नाहीच नाही.

थोडक्यात ह्या सगळ्या राजकारण्यांनी उभ्या केलेल्या ह्या बकासूराच्या भयाच्या छायेत आपण वावरत आहोत !!!

आता मुद्दा कळला ना चिमुरड्यांनो?

वीज कधी जाईल ? किती वेळ जाईल ?
पोलीस दल अत्याधुनिक कधी होईल ?
रस्ता कधी उकरतील ? कधी बुजवतील ? पुन्हा किती तासांनी उकरतील ?
गावगुंड व राजकारणी ह्यातला फरक पुन्हा कधी कळायला लागेल?
परिसरातले एकमेव उद्यान किंवा मैदान कधी बिल्डर घशात घालील ?
शहरांकडे धावणारे लोंढे कधी थांबतील ?
कायद्याची भिती, मग ते साधे सिग्नल तोडण्यासंबंधी का असेना, लोकाना कधी वाटेल ?
पुरोगामी राज्य टॅंकरमुक्त कधी होईल?
बिअरबार चा नि जुगाराच्या अड्ड्यांचा मालक नगरसेवक, आमदार, मंत्री अशी शिडी चढायचे बंद कधी होईल ?
पावसामुळे रेल्वेची यंत्रणा पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोलमडणे कधी थांबेल?
चा-यापासून ते शहीदांच्या शवपेट्यांपर्यंत, ह्या अमुक बाबतीत तरी भ्रष्टाचार होऊच शकणार नाही असे ठामपणे कधी सांगता येईल?

कशाचे काहीच सांगता येत नाही.

होय की नाही ? शाब्बास ! किती छान एकसुरात ‘हो’ म्हणालात.

पण हे असे का ?

कारण सोप्पे आहे. जुने हिंदी सिनेमे पाहता की नाही कधीतरी ? पूर्वीच्या हिंदी सिनेमातल्या व्हिलनचे की नाही एक तत्वज्ञान असायचे : ‘हम बेईमानी का धंदा करते है लेकीन इमानसे’ !

मुलांनो, काय सांगू ! तेव्हढीही सचोटी ह्या लोकात नाही ! ‘हे लोक’ म्हणजे सत्ताधारी ! ‘पावरबाज’ लोक ! राजकारणी, मंत्री, आमदार, नगरसेवक, सरकारी उच्चाधिकारी वगैरे राज्यकारभार व यंत्रणा गुरेढोरे हाकावीत तसे हाकणारे. राजाच असंवेदनशील, अकार्यक्षम, दूरदृष्टी नसलेला व अडाणी असेल तर खालचे लोकही हळूहळू तसेच होणार. चांगले लोक बाजूला पडणार आणि बेफिकीर धनदांडगे उन्मत्त लोक वाढणार. होय की नाही ?

हे कसे होते सांगू का ? बरं.. वह्या उघडा आधी. लिहीण्याआधी समास सोडा चांगला.

हं. लिहा एक उदाहरण. समजा एक हजार कोटीचे कॉन्ट्रॅक्ट आहे अमुकतमुक काम करायचे. समजा एक सुंदर लांब रस्ता बांधायचा आहे मोठ्ठा ! तर त्या एक हजार कोटीचे ह्या लोकांनी ‘दिवाळीची मिठाई’, ‘मुलांना खाऊ’ वगैरे धरून केले बाराशे कोटी !

करतात ना ? करतात की नाही ? किती जोरात ‘हो’ म्हणालात. चतुर आहात ! तुम्हाला माहित आहे सगळे !

तर तसे केले त्यांनी !

बर केले ना ? मग चांडाळांनो, खाल्ल्या लाचेला तरी जागा आणि काम तरी नीट कर ना आता ! दहा लाख लोक त्या रस्त्यावर ठेचकाळत, अडखळत जाणार, वाहनांची वाट लागणार, त्यांना हवा तो वेग घेता येणार नाही, लोकांना पाठीची नि मानेची दुखणी होणार.

पण बेईमानीच्या ह्या धंद्यात सचोटीची बात नको. का ? कारण हे दोनशे कोटी पचवायला किंवा उधळायला त्याना अजिबात वेळ लागत नाही. मग अर्थातच नवीन रस्त्याचे काम असेच झालेले असते की ह्यांचे दोनशे कोटी संपता संपता पुन्हा नवीन रस्ता करण्याची वेळ यावी !

असे पाच वेळा झाले समजा. आता काय झाले पाहू बरे :

१. प्रत्येक वेळी बाराशे कोटी म्हणजे सहा हजार कोटींचे काम झाले जे खरे म्हणजे एक हजार कोटी मधे बराच काळ टिकणारे असे उत्तम दर्जाचेच व्ह्यायला पाहिजे होते.
२. प्रत्येक वेळी दोनशे कोटी असे पाच वेळा, म्हणजे एक हजार कोटी ह्यांच्या घशात गेले उगाचच.

हे झाले एका रस्त्याबाबत आता कल्पनाशक्ती ताणा बघू. गाव, जिल्हा, शहर, राज्य आणि देश.

मुख्य समस्या आहेत खालीलप्रमाणे. लिहून घ्या पाहू. अक्षर नीट काढा रे.

१. कुठल्याही बाबतीत मुळात काम होईल ह्याची शाश्वती नाही. (काम ह्याचा अर्थ सरकारी कार्यालयात चिरिमिरी पातळीचे नव्हे. एकूणच ! मग ते योग्य वेळी आणि जागी वीजनिर्माण प्रकल्प असो, वा भाषाविषयक ठोस धोरण ठरवायचे असो.)
२. भ्रष्टाचार सहन करूनही सामान्य दर्जाचेच काम होईल.
३. ते काम झाले तर कुठलाही विचार / दूरदृष्टी नसलेले, उरकून टाकलेले, जागतिक दर्जापासून मैलोन मैल दूर असलेले असेल.

कित्ती हुशार आहात मुलांनो. किती झटकन मुद्दे लिहून पाठही केलेत.

तर आत्तापर्यंत काय झाले, की थोर, ज्ञानी, द्रष्ट्या लोकांनी समाजजागृती करण्याचा, लोकांना आपल्या हक्कांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. जेणेकरुन एक सशक्त, सुजाण लोकमत तयार होईल. सरकारवर मतपेटीद्वारे आणि इतर वेळी जनमताच्या दबावाने अंकुश राहील वगैरे. (सुजाण असतो तो सशक्त असत नाही आणि उलटही बर का मुलांनो... ‘बेसिकमधे राडा’ नावाच्या धड्यात आपण ते पुढच्या आठवड्यात शिकू)

तर मुद्दा असा की मेंढरागत जगणारे ‘बहुजन’ आणि त्याना ‘जागे’ करण्याचे तुटपुंजे प्रयत्न ह्यांचा मेळ काही बसत नाही. (ह्यात जातीचा संबंध नाही, तर वृत्तीचा आहे बर का रे ! म्हणजे मेंदू न वापरता मागचा ढकलतो तसे पुढे जाणारे लोक. विसरलात ना कालचे सुभाषित : स्वच्छता हीच जात. सुसंस्कृतपणा हाच धर्म.)

बघा बर तपासून इतिहासाचे धडे.

क्रांती वगैरे सोडा, निदान ज्या प्रमाणात उत्क्रांती व्हावी तेव्हढी तरी आपली प्रगती आहे का ?

तर उत्तर ‘नाही’ असेच आहे !

आता आपण एक कल्पनाविस्तार करुयात. होय होय. ‘मी पंतप्रधान झालो तर’, ‘मला जादू आली तर’, ‘लोक रस्त्यावर थुंकायचे बंद झाले तर’, ‘कसाबला फाशी झाली तर’ असे अवघड विषयांवर निबंध लिहीता ना तसेच !

स्वप्नरंजन म्हणा हवे तर ! तसे करण्यापासून तरी सध्या सरकार आपल्याला रोखू शकत नाही बरे ! कित्ती कित्ती गोड नई ! बोला सत्य साई बाबा सुट्ट्यो (हा बघा खडू गायब झाला) !

आता कल्पना करा कि ह्या बकासूराबरोबर वाटाघाटी झालेल्या आहेत आणि असा तोडगा निघाला आहे, अशी काहितरी ‘सिस्टिम’ अस्तित्वात आली आहे की आपण सांगितले ह्या ‘बकासुराला’ की ये रोज का झमेला हमको नाय मंगता है. किमत बोलो हम पैसा फेकता है. उदा. त्या कामासाठी एक हजारच्या ऐवजी जास्त पैसे हवेत ना ? पाच वेळा तोच भ्रष्टाचार करायचाय ? बर. मूळ एक हजार व प्रत्येक वेळचे दोनशे कोटी पाच वेळा म्हणजे ते एक हजार. एकूण दोन हजार कोटी ना ?

दिले !

राजरोस दिले. अधिकृतरित्या दिले. पावती घेऊन दिले.

पण राक्षसा बकासूरा ! आता मात्र जे काम करशील ना ते असे कर की बास ! एक हजार कोटीमधला शेवटचा रुपया सुद्धा दिसला पाहिजे लख्ख कामामधे. रस्ता बांधायचाय ? असा गुळगुळीत कर की बॉल बेअरिंग टाकले ना तर ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आले पाहिजे.

तुझे डोके व अनुभव पुरेसा नाही ना ? (कसा असणार ? कधी काम केले तर आणभव येणार ना !) हरकत नाही ! आपल्याकडे हुशार, कल्पक व तज्ञ लोकांची काही कमी नाही. त्यांनाच काम दे. त्यांची मदत घे. घेतलेस ना वरचे हजार कोटी ? नाऊ यू मॅनेज !

मुलांनो आता ह्या स्वप्नात सुद्धा हा बकासूर हो म्हणतो बरे. हे स्वप्नरंजन असल्यामुळे ते ह्या भाबडेपणावर आधारित आहे की हा बकासूर गाडाभर अन्न खाऊन वर पुन्हा नासधूस करायला नगरात घुसणार नाही !

पण मुलांनो, आपण केली ना अशी सिस्टीम तयार आपल्याच स्वप्नामधे. मग ऐकेल तो आता.

आता ? आता काय ! मज्जाच मज्जा ! रामराज्य हो रामराज्य!

शेतीला मुबलक वीज व पाणी. योग्य मोबदला थेट सामान्य शेतक-याला.
गावागावात उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधी.
सर्व क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रजानाचा वापर .
गावांचे ‘गावपण’ टिकवून तिथे आधुनिक सुखसोयी.
कष्टकरी वर्गाला सन्मानाने जगायची संधी.
कोर्टकचे-यांची कामे झटपट.
शहराशहरात सार्वजनिक वाहतूकीच्या अप्रतिम सेवा.
प्रदूषण कमीत कमी.
सुंदर बागा व तळी..

काय आणि किती सांगू मुलांनो. सर्व काही चूक आहे ना सध्या, ते अगदी दुरुस्त होणार ! पैकीच्या पैकी मार्क..

शिवाय वाह्यात आश्वासने, समित्या, ‘तडफदार आण्णा दादांची’ पोस्टर्स, रिकामटेकड्या कार्यकर्त्यांची फौज, वेळखाऊ भाषणे ह्यांची गरजच नाही.

जादा का होईना, पर दाम बोलो, फिक्स करो और काम करो !

बघा सहा च्या ऐवजी दोन हजार कोटी मधे काम झाले. रस्ता पाचपट काळ टिकणार.

ह्याचाच अर्थ आता नगरवासियांना, गावोगावच्या लोकांना वरवर अत्यंत खर्चिक वाटणा-या पण दीर्घ कालावधी लक्षात घेतला तर खूपच स्वस्त, अत्युच्च दर्जाच्या कायमस्वरुपी सुविधा मिळायला सुरुवात होईल व अमूल्य अशी मन:शांतीही मिळेल ! त्यांच्या भविष्यकालीन प्रश्नांवर आजच तोडगा काढला जाईल, ठोस निर्णय व अंमलबजावणी होईल.

आता पुढे न्या ना स्वप्न.. स्वप्नात काही खर्च येत नाही !

ब-याच मूलभूत समस्या सुटल्या.
शहरांचे बकालीकरण व प्रदूषण थांबले.
हमरस्ते, महाजाल, काटेकोर योजनांप्रमाणे नवीन बांधकामे बांधली गेली.

सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व सुजाणांची सौंदर्यदृष्टी डागडूजी होऊन ‘रिस्टोअर’ झाली ! (काही वाह्यात लोकं राहणारच पण ते अपवाद म्हणून, अगदी कणभर चवीपुरते) . जगण्यातली कुरुपता हा अपवाद झाला. सुंदर बागा, सुंदर रस्ते म्हणजे काय ते समजू लागले. पुरातन वास्तूंचे जतन झाले. श्रमात सौंदर्य दिसू लागले. कामात आपापली जबाबदारी दिसू लागली. मूलभूत प्रामाणिकपणा घाऊक प्रमाणात उपलब्ध झाला.. ओरबाडायची गरज आणि त्यामुळे वृत्ती जवळजवळ संपलीच !

तर ह्या स्वप्ननगरीत अशीच पाच सहा वर्षे जाऊ द्यात.

लोकांना शिस्तीची, नियमांची, स्वच्छतेची, नम्र व सर्वोत्तम सेवेची, न्यायाची, सौंदर्याची सवय लागू दे !

आह! काय छान स्वप्न आहे नाही ?

मग आता स्वप्नाचा पुढचा भाग : एक प्रश्न येईल कुठनतरी कोणाच्या तरी डोक्यात भिरभिरत !

एक ऐवजी दोन हजार कोटी ? म्हणजे अधिकचे एक हजार कोटी ह्या नालायक लोकांच्या घशात का घालायचे ???

शाब्बास !

मुलांनो, चांगल्या गोष्टींची सवय लागलेल्या नागरिकांमधला जो ‘ग्राहक राजा’ आहे ना ? तोच आपला ‘भीम’ ! आपला हिरो ! एकदा का ह्या भीमाला आपली ताकद कळली की मग तो बकासूराला ठोकून काढेल :

“लाच दिल्याशिवाय माझे काम होते आहे पाच वर्षे. हो ह्याच तुझ्या सरकारी खात्यात. तुला मी चिरिमिरी का देऊ ?”
“मी कर देतो आहे पण सरकार माझी काळजी घेत आहे. मी पर्यावरणाची काळजी घेणार. आणि सार्वजनिक मालमत्तेचीही”.
“एखादा थुंकला सार्वजनिक ठिकाणी तर लगेच त्याच्या पार्श्वभागावर फटके पडताना दिसत आहे ना आता. शिवाय दंड. स्वछताही त्यालाच करायला लागते आहे. छे ! मला परवडणार नाही असे थुंकणे कुठेही !”
“आमच्या गावातली रिकामटेकडी पोरं सिगरेटी ओढत बसायची नाक्यावर. पण ते पूर्वी. त्यांनी आता लहान टुमदार उपहारगृहे काढली आहेत. सुबक शिस्तशीर स्टॉल टाकले आहेत स्थानिक वस्तूंचे. कुणी टूर गाईड म्हणून काम करताहेत. का काय ? गाव स्वच्छ सुंदर झालं आमचं. सगळ्या सोयी झाल्या की शहरासारख्याच. आता ते हजार वर्षांपूर्वीचे मंदीर (तेच. जिथे कुणी फिरकायचे नाही ते) आणि आमचा अप्रतिम समुद्र किनारा बघायला देशातलेच काय परदेशी लोक उत्साहाने येतात. छान काही अनुभवायला मिळेल ह्या विश्वासाने !”
“मी माझ्या शेतात केलेल्या प्रयोगांची माहिती माझ्या वेबपेजवर टाकली काय आणि इंटरनॅशनल हिरो झालो राव”

मग हा ‘जागा झालेला’ भीम हळूहळू स्वत:च गाडाभर अन्नाचा आस्वाद घेईल आणि बकासूर आपसूकच शक्तीहीन होऊन मरेल.

मग ह्या स्वप्नामधे सरकार, नगरपालिका, पंचायत वगैरे आहे की नको ?

आहे ना. राज्यकारभाराची काहीतरी यंत्रणा ही हवीच. पण ती संरक्षण वगैरे बाबी सोडल्या तर व्यावसायिक तत्वावर हवी. म्हणजे सक्षम, सुजाण प्रमुख शासक व तसाच अधिकारी वर्ग. जे भरपूर मोबदला मिळाल्यावर समाजाच्या व्यापक हिताचाच विचार फक्त करतील.

माहीत आहे मला माहीत आहे मुलानो. हे स्वप्न आहे. आणि पचायला अंमळ कठीण आहे.. नव्हे, काहीसे झोप उडवणारे आहे ! तुम्हाला ते चुकीचे, पुस्तकी, वेडगळ वाटले तरी चालेल. पण त्याला कुठलेतरी लेबल लावून झटकन उडवून लावू नका.

लोकशाही सरकारला बकासूरासारखी खंडणी देण्याइतकी पाळी का आली आहे ? ह्याचा नीट विचार करा..

नुसतेच सगळ्याला नाही म्हणालात तर पुढे अवघड आहे तुमचे ! हे कशालाही सतत नाही नाही म्हणणारे असतात ना ते मग मोठे झाल्यावर नुसते ‘बाहेरून पाठींबा देणारे’ होतात. ना धड आत, ना पूर्ण बाहेर. बुरसट, ओशट असे दिसतात आठाठ दिवस आंघोळी न केल्यासारखे आणि वर राखाडी करडे काहीतरी घालतात.. धड आतल्याना कामे करु देत नाहीत व बाहेर असल्यामुळे जबाबदारीही घेत नाहीत. बाकीचे काही बरोबर असू शकते ही शक्यता विचारात घेण्याचेच डोक्यात येत नाही त्यांच्या मग.

तसे करू नका!

आपल्याला मिळणा-या सुविधा, साधने व समाधान हा नाही तरी आत्ताही अप्रत्यक्षरित्या अत्यंत खर्चिक मामला आहेच की. आपण देतो त्या कराच्या बदल्यात आपल्याला काय आणि कसे मिळते ह्याचा विचार करून पहा ना ?

आणि हो, तुमचे स्वत:चे स्वप्न पहायला तर अजिबात विसरू नका! आज गृहपाठ हाच.

अरे अरे ! पण एव्हढे गंभीर नका होऊ. एक स्वप्न मी पाहिले ते फक्त सांगितले. मी साधा शाळामास्तर आहे रे चिमुरड्यांनो. माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे सांगितले आपले मनात आले ते. (मनात एक आणि ओठावर दुसरे असे असते तर माझी होर्डींग नसती पाहिली तुम्ही रस्त्यावर ?)

चला, गोष्ट तर आवडली ना ना बकासूराची आणि भीमाची ?

आता नागरिकशास्त्राचे पुस्तक उघडा पाहू !



- राफा




 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा

8 comments:

Seema Tillu said...

बकासुर बरा. जेवढी भूक असेल तेव्ढेच खाईल. स्वार्थाचा, निर्लज्जपणाचा कळस आहे. गेंड्याच्या कातडीचे लोक हे. देशाला ख्ड्ड्यात घालतील. असे करण्याची भीती वाटल्याशिवाय हे थांबणार नाही.

राफा said...

असे करण्याची भीती वाटल्याशिवाय हे थांबणार नाही.
>>>> खरं आहे सीमा.

मराठीग्रिटींग्ज.नेट said...

गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०११ साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

राफा said...

मराठीग्रिटींग्ज.नेट, धन्यवाद.
तुम्हालाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

Vinayak Khambayat said...

apratim lihilay RaFa!

राफा said...

Thanx Vinayak !

अपर्णा said...

भ न्ना ट (all bold and stressed)

राफा said...

अपर्णा,

ध न्य वा द ! (bold, underline, emboss etc applied :))