Nov 19, 2011

प्रतिभा आणि प्रतिमा !

मी लहान असताना दोनच गोष्टींना (विशेष) घाबरायचो. दोन्ही गोष्टी त्यावेळच्या (म्हणजे कृष्णधवल) टिव्हीवर पाहिलेल्या होत्या. एक म्हणजे ‘कल्पनेचा खेळ’ हे नाटक व दुसरे म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा’ ह्या चित्रपटातील ‘नरसूचं भूत’ !

माझी घाबरण्याची स्वतंत्र शैली होती. मी लपून राहणे, घाबरून दुस-या खोलीत जाणे किंवा डोळे हातानी झाकून बोटांच्या फटीतून पाहणे असे काहीही करायचो नाही तर हे असे घाबरणे अपरिहार्य आहे असे कुठेतरी वाटून घ्यायचो. त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम लागले की मी धडधडत्या छातीने ते डोळे विस्फारून पहायचो. ते नाटक तर ब-याच वेळा दाखवायचे. त्यातली ती वाटोळ्या डोळ्यांची, शून्यात वेडसर नजरेने बघणारी व काहीशी तिरकी मान करून बोलणारी आजीबाई अंधूक आठवते.. त्या लहान मुलीला सारखा येत असलेला ताप (मला बरोबर आठवत असेल तर एक नजर वगैरे लागू नये म्हणून असते तशी एक काळी लहान ‘बाहुली’ होती नाटकात). तसाच तो ‘नरसू’ ! तो मालकाच्या मुलीच्या हट्टापायी माडावर भर पावसात चढणारा आणि तो पडून मरण पावल्यावर त्याचे झालेले भूत… आणि ती गाणे म्हणत फिरणारी त्याची बायको..

काल ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ ह्या टिळक स्मारक मंदीरात झालेल्या कार्यक्रमात, मधे मधे दूरदर्शनवरील जुने दृकश्राव्य तुकडे दाखवण्यात येत होते आणि अचानक ‘कल्पनेचा खेळ’ ह्या नाटकातला काही भाग जेव्हा अनपेक्षितपणे डोळ्यासमोर प्रत्यक्ष बघू लागलो तेव्हा काय वाटले हे सांगणे कठीण आहे !

दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळातले निर्माते, दिग्दर्शक, कलाकार ह्यांच्या गप्पांचा हा कार्यक्रम अगदी तुफान रंगला. सुधीर गाडगीळ सूत्रसंचालन करत असलेल्या ह्या कार्यक्रमात सहभागी झाले होते : विनय आपटे, स्मिता तळवलकर, याकूब सईद, अरुण काकतकर, किशोर प्रधान आणि बी. पी. सिंग. 

आयोजक होते 'दि आर्ट ऍंड म्युझिक फाऊंडेशन'.  त्यांना अनेक धन्यवाद !!!

सुधीर गाडगीळ स्वत: तर त्या काळाचे साक्षीदार आहेतच, पण केवळ मूक साक्षीदार नव्हेत तर, अश्या अनेक कार्यक्रमाची रंगत वाढवण्यात त्यांचा दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळापासूनच मोठा हातभार आहे. त्यामुळे त्यांचे बोलणेही अलिप्त औपचारिक ठेवण्यास त्यांना कसरत करावी लागली असणार.. कारण त्यांनाही मधे मधे जुने संदर्भ, व्यक्ती, घटना आठवत होत्याच. पण त्यांचे संचालन नेहमीप्रमाणेच हुकमी एक्यासारखे व दुस-याला बोलके करणारे..

ह्या सर्वांनाच जुने सोबती भेटल्यामुळे झालेला आनंद त्यांच्या देहबोलीतून जाणवत होता. त्यांचे जुन्या आठवणींत मस्त रमणे, भरभरून उस्फूर्त बोलणे, त्यांचे अफलातून किस्से ऐकणे आणि जुने दृकश्राव्य तुकडे पाहणे हा फार छान अनुभव होता..

कालच आमच्या ‘एन्गेजमेण्ट’ ची ‘ऍनिव्ह’ असल्याने नॉस्टाल्जिक होण्यात वेगळाच मज़ा आला ! (माझ्याच ब्लॉगवर मी स्वत:विषयी किती कमी लिहीले आहे हे अलिकडेच मला जाणवू लागले आहे. तसे लिहीण्यासारखे खूप काही आहे असा गोड गैरसमज तसाच ठेवून सध्या हा लेख पुढे लिहीता होतो! )

खरे म्हणजे अश्या कार्यक्रमांचे चिरफाडीच्या जवळ जाणारे ‘विश्लेषण’ वगैरे करु नये. त्याचा आनंद घ्यावा आणि मोकळे व्हावे. नव्हे, तो साठवून ठेवावा आणि कधीतरी त्या आठवणीची कुपी उघडून त्याचा मंद सुंदर गंध घ्यावा व ताजेतवाने व्हावे. त्यामुळे असे संगतवार सांगणे किंवा ताळेबंद मांडणे म्हणजे त्या वेळी घेतलेला मज़ा कमी करण्यासारखे आहे. पण तरीही सर्वात चित्तवेधक गोष्टी सांगण्याचा मोह अनावर होतो आहे.

पहिली गोष्ट म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे गदगदून येऊन भरभरून बोलणारे सर्व जण. दूरदर्शन माध्यमच मुळी त्यावेळी सर्वांना नवीन होते त्यामुळे त्याविषयीचे कुतूहल, औपचारिक/अनौपचारिक शिक्षण, काहितरी नवीन व उत्तम करण्याची उर्मी, बीबीसी च्या तोडीचे काम करण्याचे अप्रत्यक्ष आव्हान व अपेक्षा; तरिही साधने व आर्थिक पाठबळ मात्र तुटपुंजे ! पण त्यामुळेच उपलब्ध गोष्टींतून व सरकारी चौकटीत सर्जनशीलता दाखवण्याची जिद्द ! ह्या सा-याचे दर्शन ह्या सगळ्यांच्या बोलण्यातून होत होते..



शिवाय एकंदर सूर हाच होता की “आता ढीगभर यश मिळालेले असू देत पण त्यावेळची मजा काही औरच होती आणि दूरदर्शन व तिथल्या त्या वेळच्या सिनियर लोकांचे संस्कार ह्यामुळे कलाकार व माणूस म्हणून एक भक्कम पाया आम्हाला घडवायची संधी मिळाली.. आमच्या यशाचे पूर्ण श्रेय दूरदर्शनमधल्या त्या दिवसानांच !”

दृकश्राव्य तुकडे पाहताना तर बहार आली .. चिमणराव व मोरूचा संवाद, कुमारांचे गायन, माडगूळकरांच्या आवाजात ‘जोगिया’, ह्दयनाथ व लता मंगेशकर ह्यांचे ‘शब्दांच्या पलिकडले’ मधले दर्शन अशा कितीतरी विविध व सुंदर चित्रफितींचे तुकडे पाहता आले. (होय, अर्थातच ‘कल्पनेचा खेळ’ ही !). मधेच दाखवलेली ‘व्यत्यय’ ही पाटीही टाळ्या घेऊन गेली.

सुरुवातच झाली ती प्रक्षेपण सुरु व्ह्यायच्या वेळी दाखवल्या जाणा-या तुकड्याने. दूरदर्शनच्या फिरणा-या लोगोचे ऍनिमेशन व त्यावेळी वाजणारी ‘सिग्नेचर ट्यून’ ! ती फीत संपताच दिवे लागल्यावर ज्या टायमिंगने व उस्फूर्तपणे स्मिता तळवलकरांनी ‘मुंबई दूरदर्शन केंद्राच्या बॅंडीन्चनल चार वरून व पुणे सहप्रक्षेपण केंद्राच्या… ‘ ही घोषणा केली त्याला तुफान टाळ्या मिळाल्या (हे ‘बॅंडीन्चनल’ इंग्रजीमधे मूळात काय असू शकेल ह्याचा शोध घेण्याचा मी आत्ताही प्रयत्न करत नाही आहे !).

नॉस्टाल्जियाचे एकामागोमाग एक असे झटके येत होते.. कधी ‘बबन प्रभू व याकूब सईद’ ह्यांनी ‘हास परिहास’ मधे घातलेला ‘पी. जें.’ चा मॅड धुमाकूळ बघून गदगदायला होत होते.. तर आयत्या वेळच्या अडचणींमुळे झालेली दिरंगाई व धावपळीचा किस्सा ऐकायला मजा येत होती. “कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे लाइव्ह टेलिकास्ट चाललेले असताना खालच्या मजल्यावर दुस-या भागाचे साऊंड मिक्सिंग चाललेले होते व पहिला भाग अगदी संपता संपता दुसरा भाग कसा वेळेत ‘लाईव्ह फीड’ ला दिला गेला” हे ऐकताना त्यांना तेव्हा वाटलेल्या ‘थ्रिल’ ची कल्पना येत होती.

बी. पी. सिंग ह्यांच्या ‘एक शून्य शून्य’ ची चित्रफीत मात्र उपलब्ध नव्हती त्यामुळे (दुर्दैवाने) सी. आय. डी. ह्या त्यांच्या १५ वर्षे चाललेल्या विक्रमी (१११ मिनिटांचा ‘सिंगल शॉट’ असणारा एपिसोड हा विश्वविक्रम कालच समजला ! तोही सिंगल टेक ओके !) सिरियलचा आढावा घेणारा एक ‘टीझर’ दाखवण्यात आला (‘दुर्दैवाने’ अशा साठी म्हटले की माझ्या मते ‘सिर्फ चार दिन’ ही पोलीस तपासकामाची थरारक शॉर्ट फिल्म व ‘एक शून्य शून्य’ ही मालिका, हे त्यांचे सर्वोत्तम काम आहे असे माझे मत आहे, ज्यावर सीआयडी चे सर्व भाग अगदी आरामात कुर्बान !)

काही दिवसांपूर्वी समीरण वाळवेकरांनी अतिशय तळमळीने लिहीलेल्या, व ब-याचशा परखड असलेल्या लेखाची आठवण झालीच मधे तरी केव्हा.. ‘टीआरपी’ च्या खोट्या बंधनात अडकलेल्या व कलेपेक्षा धंद्याला महत्व देणा-या वाहीन्यांविषयीचा त्यांचा लेख आजच्या वाहिन्यांच्या उणीवांवर नेमके बोट ठेवणार होता.

आज कुणीही पपलू उठतो व टिव्हीवर कुठल्या तरी वाहीनीवर काहीही करतो (‘इनोदी’ लिखाण, रटाळ मालिकांत भिकार अभिनय, न ‘दिसणारे’ दिग्दर्शन, रिऍलिटी शो इत्यादी.) हे आपण पाहतोच आहोत. प्रसंग साजरा करायला आज सर्वात महत्व आहे. चुका करायला काहीच हरकत नाहीत पण मूळात सकस, दर्जेदार व उत्तम तेच देण्याची किती जणांची इच्छा व पात्रता आहे हा मुद्दा आहेच. हा मुद्दा दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात किती महत्वाचा होता हे काल फारच जाणवले.. किंबहुना ह्या सहाजणांपैकी एकाने जेव्हा अशी गर्जना केली की ‘आज आम्ही पुन्हा दूरदर्शनवर एकत्र आलो तर महिन्याभरात ह्या सगळ्या बाकीच्या वाहिन्या बंद होतील’ तेव्हा त्यात काही कल्पनाविलास वाटला नाही. त्या विधानाला सर्वाधिक टाळ्या पडल्या व सुधीर गाडगीळ म्हणाले त्याप्रमाणे जोरदार टाळ्यांतून ‘प्रेक्षकांनी वाहिन्यांच्या सुमार दर्जाच्या कार्यक्रमांना दिलेली ती अप्रत्यक्ष नापसंतीच’ होती (प्रश्न एक का अनेक वाहिन्या हा नाही, तर सुमार दर्जाच्या मालिका व कार्यक्रम आणि शेवटी लोकांना ‘सुमार’ हेच ‘स्टॅंडर्ड’ वाटू लागेल की काय ही भिती हा मुद्दा आहे. पिठ कालवलेले पाणी ‘दूध’ म्हणून प्यायची सवय लागलेल्या अश्वत्थाम्याला जेव्हा बरी परिस्थिती आल्याने जेव्हा खरे दूध दिले गेले तेव्हा त्याने ते चव न आवडून थू थू करुन टाकलेच ना ? एकदा चव बिघडली की सुधारणे अवघड.)

दुस-यांचे चांगले काम पाहणे व त्याला मनमोकळी दाद देणे, सर्वांमधे एक स्नेह, एक मोठे कुटुंब असे नाते असणे (८ हजार लोकांच्या नफेखोर कंपन्यांमधे ढोल पिटवून सांगण्यात येण्या-या ‘बिग फॅमिली’ संकल्पनेपेक्षा खूपच अस्सल असे काही), त्यांच्यातली देवाणघेवाण (हा सांऊड दे रे, हे फुटेज वापर माझे वगैरे) हे खूपच भावले.

त्यावेळी सगळे संत आणि आजकालचे सगळे भोंदू असा सूर कोणाचाच नव्हता (माझ्याही लेखाचा नाही) पण ह्या कार्यक्रमात बोलताना त्यावेळच्या कामातील चा एक सच्चेपणा आणि सकसपणा ‘दाखवण्याची’ गरजच वाटत नव्हती कुणाला.. ती निष्ठा, प्रामाणिक धडपड, अगदी चालूगिरीतला किंवा आयत्या वेळच्या तडजोडींमधलाही एक निरागसपणा, सहका-यांमधील अकृत्रिम आपुलकी हे सर्व स्पष्ट जाणवत होते.. त्या सर्वांनी सांगितलेल्या घटनांतून, किश्यांतून व त्यावरच्या त्यावेळच्या लोकांच्या प्रतिक्रियांतूनच सर्व उमटत होते (आणि उगाचच ‘आमच्यावेळी असं नव्हतं’ असं रडगाणं नव्हतं)

अनेक कार्यक्रमांचा (प्रतिभा आणि प्रतिमा, शब्दांच्या पलिकडले, खेळियाड, सुंदर माझं घर, गजरा) व व्यक्तींचा (सुहासिनी मुळगावकर, स्मिता पाटील, विश्वास मेहेंदळे) उल्लेख सुखावून गेला.

याकूब सईद ह्यांचे आत्ताचे रुप पूर्ण वेगळे.. ‘तुळतुळीत पूर्ण टक्कल, बुल्गानिन पांढरी दाढी, ब्लेझर घातलेली तशी शांत बसलेली बुटकी मूर्ती’ म्हणजेच; ‘काहीश्या पिंजारलेल्या केसांचे, ‘हायपर’ अभिनय करणारे, शिडशिडीत त्यामुळे आहेत त्यापेक्षा उंच भासणारे ‘हास परिहास’ च्या चित्रफितीत बबन प्रभूंबरोबर दिसणारे तरुण याकूब सईद’ हे उमगायला व पटायला अंमळ वेळच लागला.. शेवटी मात्र त्यांनी जुन्या ढंगातला अंगचा मिश्किलपणा (वात्रटपणा) दाखवलाच एक दोन किस्से सांगून..

त्यांनी सांगितलेला एक धमाल किस्सा असा :

अचानक एका दुपारी असे झाले की हिंदी चित्रपटातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा (जी त्यावेळी खासदारही होती) अमेरिकेत का कुठेतरी मृत्यू झाला आहे असे सांगून त्यावर इंदीरा गांधींची प्रतिक्रिया घेण्याची जाबाबदारी याकूब ह्यांच्यावर टाकली गेली.. हे गेले एअर पोर्टला. सोबत कॅमेरामन व साऊंड रेकॉर्डीस्ट. तिथे पोलीस कमिशनर हजर. त्यांनी विचारले ‘अरे यहा क्या कर रहा है?’. याकुबनी त्यांना बातमी सांगितली व इंदीरा गांधीची प्रतिक्रीया घ्यायला आलोय हेही. ‘अच्छा अच्छा. जाओ. जाओ.’ .

आत दिलीप कुमार ही एअर पोर्टवर. त्याने विचारणा केल्यावर त्यालाही याकुबनी बातमी सांगितली व त्याची मोघम प्रतिक्रियाही रेकॉर्ड केली. मग ते थेट पोचले ते इंदिरा गांधीचे विमान नुकतेच उतरले तिथे.. शिडीवरून उतरून खाली पोचताच इंदीरा गांधीनी ‘तुम्ही कोण’ हा प्रश्न केला. ह्यांनी सांगितले ‘मी दूरदर्शन वरून आलो आहे. असे असे झाले आहे. तर तुमची प्रतिक्रिया..’ बाईंनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली.. त्यावर समाधान मानून हे परत निघाले.

वाटेत देव आनंदकडे जाऊन त्याची प्रतिक्रिया घेतली. मग विचार करुन मग याकूब साहेब पोचले त्या अभिनेत्रीच्या बंगल्यावर. उद्धेश हा की तीचा जिथे वावर होता त्या बंगल्याची, बेडरुम वगैरेची काही दृश्ये घेऊन मग स्टुडिओत परत जायचे. तर तिथे तिचा मुलगा आरामात चहा पीत होता !

ह्यावर याकुबची प्रतिक्रिया :‘अरे जिसकी मॉं मरी वो आरामसे चाय कैसे पी सकता है. कुछ गडबड है. चलो देखते है’. तो (अभिनेता) मुलगा ह्याना म्हणतो ‘अरे इधर कैसे’ तर याकूब त्या गावचेच नाही असे दाखवत : ‘नही इधर से जा रहा था, सोचा मिल लू आपके मदरको, कैसी है वोह ?’ ह्यावर मुलगा म्हणतो ‘एकदम मजेमे. बात करेंगे ?’ (ह्यावर याकूब अर्थातच गार !)..

परत दूरदर्शनवर आल्यावर सगळे जण त्यांच्यासाठी वाट पाहत उभे (मोबाईल वगैरेची सोय अर्थातच नव्हती तेव्हा)…ह्यानी तरीही अभिमानाने सांगितले ‘जे सांगितले होते ते सर्व करुन आलो. इंदीरा गांधीची तर घेतलीच प्रतिक्रिया. शिवाय दिलीप कुमारचीही.. मधेच देव आनंदकडेही जाऊन त्याचीही प्रतिक्रिया घेतली आहे !’

तोपर्यंत सात साडेसात झाले होते. इंदिरा गांधींनी तोवर जे कोण ३-४ लोक भेटले वृत्तपत्रांचे त्या सगळ्यांना हया (न झालेल्या) दु:खद घटनेबद्दल त्यांनी सविस्तर प्रतिक्रियाही दिल्या होत्या (‘हमारी एक एम. पी. भी चली गयी’ वगैरे !) त्यांना जेव्हा बातमी खोटी आहे कळली तेव्हा त्या बेफाम चिडल्या. (‘और उनका गुस्सा मतलब…’ : इती याकूब)..

अखेरीस प्रकरणावर पडदा पडला.. पण त्याआधी दूरदर्शनवर उलथापालथ झाली. काहींची नोकरी गेली. काहिंची बदली झाली (‘सिवाय मेरे’ : इति अर्थातच याकूब. ‘मेरेको क्या ? जो ऑर्डर बोला वो मैने बराब्बर फॉलो किया !)



मुंबई दूरदर्शनच्या पहिल्या वहिल्या कार्यक्रमाचा (२ ऑक्टोबर १९७२) फक्त त्यांनाच माहीत असणार किस्साही त्यांनी सांगितला. राज्यपालांना उदघाटनाला यायला लागलेला उशीर, मग त्यांच्या पी.ए. ना १५ मिनिटे राहीलेली असताना फोन केला असता त्यांचे ‘अच्छा आज है क्या वोह ? मैने ३ तारीख मार्क की है’ असे शांत उत्तर, मग पहिल्याच दिवशी ८ मिनिटे उशिरा चालू झालेला प्रोग्राम, त्यात सुरुवातीला पसायदान, मग बिस्मिलाखांचे वादन मग आशापारेख चे गोपीकृष्ण बरोबर नृत्य, त्यात गोंधळात गोंधळ… चहाचा ग्लास पडून फुटतोय, त्याची काच आशा पारेखच्या पायात घुसत्ये, मग तिचा नाचाला नकार, मग तिच्या मिनतवा-या, एकीकडे बिस्मिलां सांगत आहेत की उशीर झाला त्यामुळे ते नमाज पढायची वेळ झाल्याने चालले आहेत, त्यांना थोपवणे (‘आपही मेरे खुदा हो. थोडा पाच मिनिट बजाओ. फिर जाओ’ : इति याकूब), मग आशा पारेख कशीबशी रजी होणे, तिचा प्रोग्राम चालू, मधेच आवाज होऊन प्रेक्षक उभेच राहणे (‘और उसको लगा कि क्या मेरा डान्स है सब लोग खडे हो गये’ : याकूब साहेब !). मग लक्षात येणे की तीन कॅमेरातला मधला कॅमेराच पडला आहे त्यामुळे घाबरून लोक उभे राहीले आहेत..


विनय आपटेंनी ‘कागद टंचाई’ गज-यासाठी (होय, तोच लक्ष्याचा) बसच्या तिकिटासाठी कागद नाहीत त्यामुळे प्रवाश्यांच्या कपाळावरच कंडक्टर रबर स्टॅंप मारतो त्या सीनचा किस्सा सांगितला.. त्या सीनसाठी बेस्टची बेस हवी होती चित्रीकरणासाठी. विनय आपटे विचारायला गेले तेव्हा निर्मात्यांनी त्यांना वेड्यातच काढले की बस वगैरे काय मागतो.. बेस्टचा नियम असा की एक तर हिंदी चित्रपटाना लावतो तेच भाडे द्या किंवा बस रस्त्यावर आली तर प्रवाशांना ती वापरता आली पाहिजे (एक रुपया तरी भाडे ख-या प्रवाशाकडून). त्यावेळचे बेस्टचे संचालक दूरदर्शनचे व गज-याचे फॅन होते. त्यामुळे डायरेक्ट त्यांची परवानगी कशी मिळविली. आणि मग डबल डेकरमधे खाली खरे प्रवासी (नियम पाळण्यासाठी) व वरच्या मजल्यावर चित्रिकरण हे कसे जमवले हा किस्सा विनय आपटेंनी सांगितला.


असे कित्येक लहान मोठे किस्से ऐकताना मजा आली..


एकंदरीत दीर्घकाळ आठवत राहील असा सुरेख कार्यक्रम झाला !


चला आता माझी थेट प्रक्षेपणाची वेळ संपली आहे.. उद्या भेटूया ठीक अमुक वाजता !


- राफा


7 comments:

I Love my sangli said...

mast... ekadam mast... aawadle.. aani june diwas aathwale.... thanks Rafa............. shivraj katkar, sagnli.

राफा said...

Shivraj, tumachya abhiprayabaddal manahpurvak abhar ! hoy, farach nostalgic karanara karyakram hota to !

राफा said...

चांगले कार्यक्रम अत्यंत गुप्तपणे व अजिबात गाजावाजा न करता दाखवायची (सध्याच्या) दूरदर्शनची सवय आहे. त्यानुसार, वरील कार्यक्रमाची (प्रतिभा आणि प्रतिमा) क्षणचित्रे अचानक काल (३ डिसेंबर) सायंकाळी ६ वाजता डीडी सह्याद्रीवर दाखवली गेली, ते सुद्धा 'मंतरलेले दिवस' ह्या शीर्षकाखाली (म्हणजे टाटा स्काय वगैरे वर कार्यक्रमाच्या सूचीवर नजर टाकतानाही काही कळू नये. कुणाचे दिवस आणि का मंतरलेले ! त्याविषयी info/अधिक माहिती पुरवायची जबाबदारी प्रत्येक चॅनेलची असते, डिश कं. ची नव्हे अशी माझी समजूत आहे) एक तर अत्यंत थोडा भाग वगळून (काही नावे/किस्से वगळायचे म्हणून) - पूर्ण दाखवण्यासारखाच हा कार्यक्रम होता. पण.. असो !

Kiran Sawant said...

Really nostalgic, instantly I went back 25-30 years. Thanks for the memories.

राफा said...

most welcome Kiran !

भानस said...

मस्तच !

एक काळ होता दूरदर्शन फूल टू फार्मात होते. एकापेक्षा एक वरचढ कार्यक्रम सादर होत होते. सुरेश वाडकर अगदी तरूण असताना झालेला श्रावणधारा मनात कायमचा कोरला गेलाय. रवींद्र साठे, उत्तरा केळकर, रंजना पेठे, देवकी पंडित, अजूनही बरेच जण होते.

तेव्हां सगळे कसे मनमोकळे-उत्स्फुर्त असायचे. ( निदान वाटायचे तरी.. ) प्रतिभा आणि प्रतिमा फेम सुहासिनी मुळगावकरांची आठवण आली. किती लहान होते तरी सगळे काल पाहिल्यासारखे डोळ्यासमोर आले बघ... :) वत्यय ची पाटी भन्नाटची होती. आणि स्मिता...प्रदिप भिडे, विनायक देशपांडे, वासंती वर्तक.... OMG! थांबते इथेच.... नाहितर तुझ्या पोस्ट इतकी माझी प्रतिक्रिया व्हायची... :D:D

धन्सं टन रे!

माननिय इंदीरा गांधी कसल्या खसकल्या असतील नं.. :D:D

राफा said...

भानस, तुझ्या भाषेत सांगायचे तर 'धन्यू' :) ! नॉस्टाल्जिया होऊन रमणे हा गुणविशेष आपल्या ब-याचजणांत दडलेला असतो ना..
(आणि प्रतिक्रियेची लांबी कितीही होऊ दे. अजिबात हरकत नाही :) )