Apr 14, 2012

पकडा-पकडी !


मी: नमस्कार. आपण बनसोडे बोलताय का ?
बनसोडे: बोला.
मी: मी संरजामे. आपण सर्पमित्र, प्राणीमित्र वगैरे असल्याचं ऐकलं. आमच्या बाल्कनीत..
बनसोडे: ते सर्पमित्र वेगळे ! ते छंद वगैरे जोपासतात. लोकसेवा वगैरे. आपला व्यवसाय आहे, आधीच सांगतो !
मी: सांगा ना.
बनसोडे: च्च. तसं नै. लोक नंतर पैशे द्यायला कटकट करतात. म्हणून आधीच सांगतो. लोकांनी पैसे नाय दिले ना तर मग पकडलेला साप तसाच सोडून येतो आपण. मग बसा बोंबलत !
मी: काय सांगताय ?
बनसोडे: मग ? स्वच्छ व्यवहार असतो आपला. क्याश ऑन डिलिवरी !
मी: यू मीन पिक अप ?
बनसोडे: तेच तेच. असं बघा, पकडायचे रेट ठरलेले आहेत. बिनविषारीचे २०० रुपये. विषारीचे ४०० रुपये. पिल्लांचे ५० रुपये..
मी: पिल्लांचे ५० रुपये. विषारी की बिनविषारी ?
बनसोडे: दोन्ही साठी. काये, आपला कुटूंबप्रमुख पोत्यात जाताना पाहून पिल्लं गपगार बसतात, गडबड करत नाहीत असा आपला अनुभव आहे..
मी: म्हणजे गल्लीतल्या दादाला पोलिस व्हॅनमधे बसताना पाहून पंटर लोक कसे संत होतात तसचं.
बनसोडे: करेक्ट. त्यामुळे पिल्लं पकडण सोपं आहे. तर पिल्लं ५० रुपये. झालंच तर मग अजगराचे ५०० रुपये !
मी: मगरीचे किती घेता ?


फोन पडल्याचा आवाज आला. कदाचित बनसोडेही पडला असावा.

काही क्षणानंतर..
बनसोडे: (आवाजात कंप) तुमच्या.. तुमच्या बाल्कनीत मगर आहे ?
मी: नाही हो. जनरल माहिती म्हणून विचारलं. तसं आमच्या बाल्कनीत काय एकूणच आमच्या सोसायटीत कधी कोण आढळेल काही सांगता येत नाही. परवाच ‘किंकाळी’ सिरियलचा स्टार रुपेश कुमार आला म्हणून लोक जमा झाली. खर म्हणजे समोरच्या ‘शिवानी प्युअर व्हेज’ मधून पावभाजी पार्सल मागवल होतं कुणीतरी, ते द्यायला त्यांचा पो-या आला होता. पण दिसत होता डिट्टो रुपेशकुमार. बरं, अजून कशाचे काय चार्जेस आहेत.
बनसोडे: बाकी काही नाही. पकड्यातच सोडणं पण आलं बरं का..
मी: पैसे दिले तरी ?
बनसोडे: च्च.. तसं नै. जिथून पकडला तिथे नव्हे हो.. ते पैसे दिले नाहीत तरच ! हे मी दूर, जंगलात सोडून यायचे चार्जेस म्हणतोय.
मी: सोडायचे चार्जेस पण त्यातच पकडता का ? छान ! बर आमच्या कडे या ना पकडा पकडी खेळायला..
बनसोडे: आ ?
मी: नाही. आय मीन पकडायला. फक्त तुम्ही पक्षीमित्र पण आहात ना ?
बनसोडे: का?
मी: नाही, बाल्कनीत आमच्या एक कबूतर आलयं.
बनसोडे: क्क्याय ? मघाशी मगर म्हणालात !
मी: अहो ते मी अवांतर माहितीसाठी विचारलं.. माणसं कशी दुकानात काजू कतली, डबल डेकर बर्फी, स्पेशल मलई बर्फी वगैरे सगळी चौकशी करतात मग पाव किलो बाकरवडी नेतात, तसं ! तुमचा व्यवसाय आहे. सवय हवी अशा गोष्टींची !
बनसोडे: अहो पण कबूतर बाल्कनी मधे येणारच..
मी: हो ना.
बनसोडे: हो ना काय ?
मी: येण्याचा प्रश्न नाही. अहो पण ते जात नाहीये.
बनसोडे: का ?
मी: एक मिनिट होल्ड करता का ?
बनसोडे: का ?
मी: कबूतराला विचारून येतो !
बनसोडे: चेष्टा ? व्यवसायाची वेळ आहे ही माझी आणि चेष्टा ?
मी: मग ? आता ते जात का नाही ते कस सांगू ! बरं, एक मिनिट होल्ड करा.
बनसोडे: नको. कशासाठी होल्ड ?
मी: अहो होल्ड करा हो फोन. फोन पकडायचे चार्जेस नाहीत ना वेगळे ?
बनसोडे: पुन्हा चेष्टा ? माझी व्यवसायाची वेळ आहे. फोन ठेवा.
मी: अहो. नको एक मिनिटात बघून आलो आहे का गेलयं कबूतर.. पण ना खरंच तुमची मदत.. नाही, म्हणजे सेवा.. म्हणजे सशुल्क सेवा हवी आहे.
बनसोडे: कबूतर पकडायला ?
मी: हो.
बनसोडे: मी सरपटणारे प्राणी पकडतो !
मी: आणि सरपटणारे पक्षी ?
बनसोडे: क्क्याय ?
मी: अहो, त्याला बहुतेक काहीतरी झालंय. उडता येत नाही आहे बिचा-याला. इकडून तिकडे सरपटत फिरतंय बाल्कनीत गेले अर्धा तास.
बनसोडे: कितव्या मजल्यावर रहाता तुम्ही ?
मी: पाचव्या.
बनसोडे: पाचव्या मजल्यावर सरपटत वर चढलं का कबूतर ?
मी: होल्ड करता का ?
बनसोडे: नको.
मी: अहो, कबूतराला नाही विचारायला जात आहे. बेल वाजलीये.
बनसोडे: हं करतो होल्ड..
मी: (एक मिनिटाने) हा बोला आता
बनसोडे: बोला काय ? किती वेळ लावलात.
मी: अहो पलिकडच्या ‘विंग’मधले साळवी होते. सातव्या मजल्यावरून त्यांना आमच्या बाल्कनीत काहीतरी फिरताना दिसलं. ते आले होते विचारायला. साळवी म्हणजे आय टेल यू. कावळ्यासारखी नजर आहे.
बनसोडे: कावळा सोडा हो. कबूतर पकडा.
मी: नाही, तुम्ही पकडा ना. तुमचा धंदा आहे ना.
बनसोडे: व्यवसाय ! व्यवसाय म्हणा !
मी: हो. व्यवसाय म्हटलं की प्रशस्त वाटतं ना. आजकाल बाल्कनीला म्हणूनच बिल्डर लोकं टेरेस म्हणतात. म्हणजे स्क्वेअर फूट तेव्हढेच. पण प्रशस्त वाटतं ना !
बनसोडे: हे बघा. तुम्हाला नक्की माहीत आहे ते कबूतर आहे ?
मी: गुड पॉईंट. होल्ड करा.
बनसोडे: नको हो. होल्ड नको. तुम्ही कुठेही हलू नका. फक्त उत्तर द्या.
मी: अं… अहो, आवाज करत नाहीये गुटर्गू वगैरे. उडत नाहीये. फक्त रस्त्यावर किंवा वाण्याच्या दुकानासमोर येरझा-या घातल्यासारखं फिरतयं बाल्कनीत. तेव्हढं सोडलं तर बाकी कबूतराचं कुठलंच लक्षण नाहीये.
बनसोडे: देन हाव डु यू नो इट इज अ कबूतर.
मी: मी लहानपणापासून अज्ञात बेटावर राहतोय का बनसोडे ? आसपासचे सगळे प्राणीपक्षी नीट ठावूक आहेत मला. तुमच्यासारखा सशुल्क प्राणिमित्र नसलो म्हणून काय झालं ? आता त्याला दिसत नाहीये का इजा झालीये हे मला कसं कळणार. तसं आत्तापर्यंतही कुंड्यांना धडकलं नाही एकदाही येरझा-या घालताना.
बनसोडे: कुंड्या ?
मी: बाल्कनीतल्या. लवकर या हो तुम्ही. साळवींनी आत्तापर्यंत सोसायटीत काय काय सांगितलं असेल. त्यांची नजर कावळ्याची आहे आणि जीभ जिराफाएवढी ! आत्तापर्यंत सोसायटीत मीच आमच्या बाल्कनीत सरपटतो आहे अशीही आवई उठली असेल.
बनसोडे: बरं बरं येतो. पत्ता सांगा.
मी: सांगतो. अं.. काय हो. पकडलेलाच साप पकडायचे किती चार्जेस असतात तुमचे ?
बनसोडे: क्क्याय ?
मी: नाही पकडलेला एखादा साप घेऊन या ना येताना. ‘सरंजाम्यांच्या बाल्कनीत कबूतर पकडलं’ हे ऐकायला कसं प्रशस्त वाटत नाही ना ! त्या ऐवजी ‘सरंजाम्यांच्या बाल्कनीत साप पकडला’ हे कसं भारदस्त वाटेल ना लोकांना ऐकायला. पब्लिसिटी स्टंटची फॅशनच आहे आजकाल. तुम्ही लपवून आणा साप आणि मग मिरवत मिरवत नेऊ बाहेर गेटपर्यंत तो ‘पकडलेला’ साप. तेव्हढीच पब्लिसिटी. काय ?
बनसोडे: अहो क.. काय काय..
मी: टिव्ही चॅनलला पण सांगू कुठल्या तरी.  असं करा, अजगरच आणा ! अजगर उडत आला असं सांगू आणि कबूतर सरपटत..

पुन्हा एकदा जोरात फोन (किंवा बनसोडे) पडल्याचा आवाज आला आणि… नंतर फोन बंदच झाला.




- राफा


 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा


28 comments:

Suhas Diwakar Zele said...

हा हा हा ... प्रचंड प्रचंड भारी !!

टिपिकल राफा पोस्ट :) :)

Chaitanya Joshi said...

he he he..maja aali...!!:D

अपर्णा said...

टिपिकल राफा ..:)

>>वाइच ते कमेंटचं सेटिंग नीट करा नं? अगम्य अक्षरं टाइप करायला जाम कंटाळा येतो....

डॉ.कैलास गायकवाड said...

जबरदस्त पंचेस. :)

Raj said...

लय भारी. हहपुवा. :)

इंद्रधनु said...

हा हा हा
>> सोडायचे चार्जेस पण त्यातच पकडता का
एकदम मस्त

Dev said...

बाल्कनीतील कबुतरांना वैतागलेला माणूस, कोणत्याही थराला जाऊ शकतो. कबुतराचा पाय कोणी तोडला ह्याचा कबुलीजबाबाची गरज नाही. माफी देण्यात आली आहे.

तुझ्या "देवास पत्र" ला उत्तर दिलय मी. पोचपावती ???

राफा said...

सुहास, चैतन्य, अपर्णा, कैलास, राज, इंद्रधनू व 'देव' : तुमच्या मस्त प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक आभार !

@सुहास व @अपर्णा : टिपिकल राफा ही दाद पहिल्यांदाच मिळाली ('राफा टिपिकल' होत नाही तोपर्यंत चिंता नाही. तेव्हा टिपिकल चा अर्थ 'हसू आले नेहमीप्रमाणे' असा सोयिस्कर घेत आहे :) )

@अपर्णा : अहो, ते 'सेटींग' नीट करु म्हणजे काय ? ते मुद्दाम तसे आहे ना :). हे म्हणजे नाकाबंदी असताना ते अडथळे दूर करा ना. ८० ने जाता येत नाही म्हणण्यासारखे आहे :). भारी विनोदीच तू. बरं, अक्षरे फारच वाह्यात आली ना ओळखायला तर पहिला आयकॉन आहे ना आपली शेपूट पकडल्यासारखे करणा-या बाणाचा त्यावर टिचकी मारून 'रिफ्रेश' कर ना प्लिज. करशील ना पुढच्या वेळी ?

मि. देव, पोचपावती इथे देत आहे. तुमच्या मानवी अवताराचे नाव काय :) ? (लहानसे उत्तर तिथे देईन सवडीने. मला उत्तर किती उशिरा आले.. तुम्हाला तात्काळ उत्तर का म्हणून !)

Avani said...

laich bhaaree.. :)

-- Avani Vaidya

सुप्रिया.... said...

लयच भारी......टिपिकल राफा =))

मी २-३ दिवस आधी दिली होती रे कमेंट पण का पोस्ट नाही झाली???

राफा said...

Avani, सुप्रिया : मंडळ अत्यंत आभारी आहे :)

@सुप्रिया : जबरेश्वर शप्पथ, मी होल्ड केली नव्हती कॉमेंट !

Vaibhav Dalvi said...

lai bhaari.....

Abhishek said...

इकडे वाचणारा पण हसून हसून लोटपोट झाला!

राफा said...

Vaibhav & Abhishek : मंडळ मन:पूर्वक आभारी आहे :).

सौरभ said...

नेहेमीप्रमाणेच भारी झालाय..:)

सौरभ said...

३-४ दिवसांपूर्वी comment टाकली होती...ती हरवली बहुतेक...

अपर्णा said...

टिपिकल चा अर्थ 'हसू आले नेहमीप्रमाणे' असा सोयिस्कर घेत आहे :) )
++++




असच आहे अर्थ.....काळजी नको..:)
तू अहो वगैरे काय.....उगा मला का मोठ्ठं करतोयस.....(कार्याने तरी नाहीए अजून....)
बरं जमलं तर मेल आय डी दे मग तुला ते कमेंटचं सांगते...थोडक्यात त्या अगम्य अक्षरांचि गरज नाहीये तू कमेंट मॉडरेशन ~ऒन ठेव नं तेवढं बस आहे...अवांतर -- इतके स्पॅम कमेंट्स येतात का तुला इतर वेळी??? :D :P sorrry jaam ghait lihiley tyamule solid chukaa aahe warchya wakyat...tyacha arth nit laaw mhanje jhal.. :)

राफा said...

अपर्णा, पहिले प्रथम मंडळ सॉरी आहे उशिरा उत्तर दिल्याबद्दल (आभारी असते तर सॉरी का नाही असू शकत मंडळ!)

यू इज म्हणींग राईट. इतके काही स्पॅम कॉमेंट येत नाहीत. त्यामुळे अगम्य अक्षरांचा अडथळा दूर केला आहे.

btw, माझा इ-पत्ता उजवीकडच्या कॉलम मधे छापला आहे बघ.. (तिथेही स्पॅमा स्पॅमी नको म्हणून इमेज स्वरुपात आहे). कधीही मेल कर.

Unknown said...

hi my name is Harsha (harshavardhan Pathak) i liked the way you write. this is very interesting, i am in to light designing of the stage show, open air shows. some times some of the show maker ask me for a scriptwriter, if you are interested we will meet. also chk my F book account. Harshavardhan. pathak.

राफा said...

Thanks a lot Harshavardhan. I have sent a message thru Facebook. Cheers.

प्रसाद said...

हाsss हाsss कार उडवून देतोस बघ तू :D

मी आकडे लावणारा (पक्षी : numerologist) नाही पण 'राफा'चे स्पेलिंग RAFA ऐवजी ROFL असेच असले पाहिजे :)

राफा said...

पश्या !
हाsss हाsss कार >>>> मस्त ! :)

पुन्हा एकदा ठांकू ठांकू !

श्रिया (मोनिका रेगे) said...

मी मोठ्याने संवाद वाचले.........कसली धमाल आली सांगू ...
राफा जमले आहे !!

राफा said...

श्रिया, मन:पूर्वक (मोठ्याने ! मनातल्या मनात नाही :)) धन्यवाद !

Sarita said...

Avadala .. punches expected pan changale hote. Post cha size thoda ajun chota chalala asata.. he mhanje panipuri, bhel, chat .. ekdam avadanare item pan eka pathopath ek khalle ki taste nakki kashachi taste apalyala avadali he lakshat rahat nahi. May be mazya RAM che limitation asel ...

Keep writing

राफा said...

Thanx a lot Chakallas !
(pudhachya veles anapekshit 'punches' ne ghayal karanyacha vayada :) )

Tejali said...

lololollllllllllllllllzzzzzzzzzzzzzzzz....mastch..wid pinch of puneri:P

राफा said...

Tejali !
Thanx a ton for all your wonderful comments (dusarya posts var dilelya comments sathi suddha ! :)) !