Mar 18, 2013

गुटर्रर्रर्र‘गो’ !


पक्षी सहसा उडू शकतात.

कित्येक तासांच्या अथक सूक्ष्म निरिक्षणानंतर मी हे संपूर्ण वैज्ञानिक असे ठाम मत बनवले आहे. आता पक्षाने किमानपक्षी उडावे ही अपेक्षा विश्वसुंदरीने किमान नाकी डोळी नीटस असावे इतकी माफक नाही का ?

पक्ष्यांबद्दल मला साधारण तेव्हढीच माहिती आहे जेव्हढी त्यांना माझ्याबद्दल. उदाहरणार्थ, मी ‘सहसा उडत नाही’ हे त्यांना माहित आहे.

‘पक्षी उडू शकतात का?’ असा संशय येण्याइतके काही पक्षांचे पाय जमिनीवर असतात ! उदाहरणार्थ कबूतर !

कबूतर हा पक्षीविशेष रस्त्यावरच जास्त फिरत असतो, विशेषत: रस्त्याच्या अगदी मध्यावर. लहान शिकाऊ बालके कसे ‘चाला चाला’ (‘च’ चहातला) करत सराव करतात, तसे ते कबूतर डुलत डुलत, गुबगुबीत ढेरी सांभाळत चालत असते. एकतर रस्त्याच्या मध्यावर असते नाहीतर ‘लंच टाईम’ असेल, तेव्हा म्हणजे दुकानदार वाणी लोक दाणे टाकतात तेव्हा, किराणा धान्याच्या दुकानासमोर!

आता समजा, तुम्ही चारचाकी चालवत आहात आणि लांबूवरून रस्त्याच्या बरोबर मधे असलेले कबूतर तुम्हाला दिसले तर सहाजिकच तुमच्या मनात खळबळ माजते. खरं म्हणजे, झुरळ किंवा माशी वगैरे हवेत काही क्षण संचार करणारे वाह्यात नमुने सोडले तर एकदंर उडणा-या जीवांचे आणि तुमचे काही वाकडे नाही ! प्राण्यांबद्दल तुमच्या मनात असलेली भूतदया तुम्ही ‘एक्स्टेंडेड वॉरंटी’ सारखी पक्ष्यांपर्यंतसुद्धा ताणू शकता.. पण जर ते निमूटपणे उडत असतील तरच!


ह्या क्षणी चारचाकीच्या चाकामागे तुमचे विचारचक्र जोरात धावू लागते. तुमच्या धातूच्या गाडीची आणि तुमच्या पोलादी निर्धाराची अजिबात तमा न बाळगता अशाच एका य:किश्चित कबूतराने मागच्या वेळी(ही) तुमची पिसे काढलेली असतात. तो व मागचे अनेक अपमान आठवून तुम्ही मनातल्या मनात फुरफुरू लागता.

“नाही !” तुम्ही मोठ्या निर्धाराने स्वसंवाद चालू करता “नाही ! हटणारच नाही मी यावेळी… उडाले तर ठीक. नाही तर अंगावरच घालणारे गाडी. काय मठ्ठ, आळशी जमात आहे.”

अशा काहीश्या आक्रमक विचारात तुम्ही असताना तुमची गाडी मात्र कबूतराच्या अजून जवळ आलेली आहे आणि..

ते कबुतर मात्र अत्यंत निवांत आहे !

आता ते थबकून, तिरकी मान करून, रस्त्यावरचेच काहीतरी दाण्यासारखे असलेले टिपावे का टिपू नये ह्या विचारात जमिनीकडे बघत असते. तुम्ही, तुमचा प्रगत मेंदू वगैरे, तुमची गाडी, गाडीचा वेग, भौतिकशास्त्राचे मुलभूत नियम वगैरे अत्यंत क्षुल्लक गोष्टींचा विचार करायला त्याला वेळच नसतो.

आता तुमच्या डोळ्यात खून चढलेला असतो. आज आर या पार ! नाही ! नाही दाबणार मी ब्रेक. गाडी आता काही फुटांवर आहे. आणि तरीही ते कबूतर मात्र, नुकतेच करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झालेला मंत्री जसा पत्रकाराना सामोरा जातो, त्या निर्विकार निगरगट्टपणे वावरत असते.

वास्तविक तुमची गाडी थोडी एका कडेला नेऊन पुढे जाणे तुम्हाला शक्य आहे पण का म्हणून तुम्ही नमते घ्यायचे !

इकडे गनीम (पक्षी: कबूतर) अजूनही शांत आहे. त्याने तो दाणा टिपला आहे व आता मानेला झटके देत तो च्युंगम चघळत चाललेल्या उडाणटप्पूसारखा रस्त्याच्या मध्यरेषेवर चालत आहे. आता मात्र.. तुमचा धीर थोडा थोडा खचू लागतो.

उड ! उड ना लेका. पक्षी आहेस ना ! उड ! प्लिज. भगवान के लिए मेरा रस्ता छोडो.. अगर जिंदगीमे तुम्हे कोई प्यारा है तो तुम्हे उसकी कसम... ए मठ्ठा ! अरे, माझी गाडी जवळ आली.  उड ना आता तरी !  

पण ते गुबगुबीत ढेरपोटे कबूतर जणू त्याला गाडी धडकली तर गाडीलाच पोचा येईल असे स्थितप्रज्ञ असते. गाडी आता एक फुटावर आहे. गाडीचे चाक अगदी टेकेपर्यंत, तुमच्या भूतदयेचा व सहनशक्तीचा अंत बघत ते तिथेच घुटमळत राहते. तो पाव सेकंद महत्वाचा असतो. गाडी पुढे सरकताना तुमचे बॉनेट कबूतराला झाकते. आता कबूतर गाडीखाली… कधीही चाकाचा स्पर्श त्याला…

शेवटी तुम्हीच गचकन ब्रेक लावता ! दोनचाकी असेल तर ‘कट’ मारता.

थोडे थांबल्यासारखे करून, त्याला ओलांडून पुढे गेल्यावर, तुम्ही धडधडत्या छातीने आरशात मागचे पाहता तर ते कबूतर त्याच निवांतपणे त्याच जागी ‘चाला चाला’ करत असते. तुम्ही अवाक होता! मग मात्र तिथे आधी एकच कबूतर होते का दोन होती ह्या विचाराने तुम्ही काहीसे अस्वस्थ होता.

छे छे भलतेच ! ते गाडीखाली आले नाही ह्याचा अर्थ ‘ते एकमेव कबूतर मधल्या वेळात उडून गाडी पुढे गेल्यावर परत त्या जागी उतरले असणार’ असा फक्त तर्क बांधणेच तुमच्या हातात असते. (तरीही इच्छीत स्थळी पोचल्यावर चाकाला पिसे वगैरे लागली नाहीत ना ह्याची हळूच खात्री करत, तुम्ही उरलासुरला ‘दिल का बोझ’ उतरवता, पण पुढच्या वेळी त्याच्या अंगावर गाडी घालण्याची ‘कसम खाके” च !)

आता सांगा, कबूतर उडते ह्यावर तुमचा कसा ठाम विश्वास बसणार ! पण गोष्ट संपूर्ण सत्य आहे.
फक्त पुराव्यासाठी सुद्धा ती उडताना दिसत नाहीत कारण तुमच्या गाडीखाली येण्याचा अट्टाहास करण्याबरोबरच खाजगी मालमत्तेचा सत्यानाश करणे हे अजून एक त्यांचे जीवनकार्य चालू असते.

आमच्या चिमुकल्या बागेत सकाळच्या प्रसन्न वेळी वाह्यात कबुतरांचा छोटा जमाव जमतो. थोड्याच वेळात तिथे दंगलग्रस्त भागासारखी स्थिती निर्माण होते. नुकत्याच आणलेल्या, कळी फुटायला आलेल्या ऐन तारुण्यातल्या फुलझाडाचा ते सर्वप्रथम समूळ नायनाट करतात. मग कुठल्या झाडांची आधी वाट लावायची ह्यावरून त्या कबुतरांमधे बहुतेक तात्विक मतभेद झाल्यामुळे ते फडफड करून चोचाचोची करतात. त्यात अजेंडावर नसलेल्या भलत्याच रोपट्यांची नासधूस होते. अशी बागेची ‘लोकसभा’ होत असताना एक कबुतर मात्र अगदी सभापतींसारखे अलिप्त असते. त्याचे दुस-या एका कबूतराशी काहितरी वेगळेच गुफ्तगू चाललेले असते. बहुदा गनिम आला की केव्हा उड्डाण करायचे हे ते ‘पक्षीश्रेष्ठी’ ठरवत असावेत. एक आहे मात्र आहे की त्यांच्यात कायम एकी असते. उगाच एखादे कबूतर एक दिवस चिमण्यांशीच सलगी करत उडते आहे असे दिसत नाही … कदाचित जन्मापासूनच त्यांचावर ‘पक्षांतर’ विरोधी कायदा लागू होत असावा.

त्यांनी फूलझांडाची कत्तल केल्याने चिडून मी कबूतरांच्या अंगावर धावून गेलो तरी ‘माझी धाव जमिनीपर्यंत’ हे त्यांना माहित असल्याने ते निवांत असतात. खो खो मधे एखादा अतिचपळ खेळाडू पकडायला येणा-याला शांतपणे जवळ येऊ देत मग झटकन चकवा देतो तसे ते आयत्या वेळी भन्नाट दिशेला उडतात. कबूतराची ती अशी तडफडत उडत असताना केलेली फडफड फार अमानवी आवाज करणारी व धडकी भरवरणारी असते.

बहुदा, कबुतरे माझ्याकडे ‘चालते-बोलते, कधी तरी अंगावर धावून येणारे बुजगावणे’ असे सहानुभूतीपूर्वक बघत असणार. एकदा मी माणूस आहे म्हटल्यावर, उडणा-या सर्व सजीवांपर्यंत (झुरळ वगैरे सोडले तर) पोचू शकणारी माणूसकी माझ्याकडे असण्याची शक्यता खूपच आहे, असाही विचार ते करत असणार.

तरिही कधी बागेतील दंगल फारच माजली आणि त्यांची जीवघेण्या आवाजातील फडफड असह्य झाली की मी त्यांच्या अंगावर धावून जातो.. पण कुठलीही हिंसा करणे हे माझ्या अजेंडावर नाहीच ह्याचा त्यांनाही खोल कुठेतरी हा विश्वास असणार. त्यामुळेच मी मारे धावून वगैरे गेलो तरी, देशांतर्गत विमान कंपन्याची विमाने घेतात तेव्हढा निवांत वेळ घेऊन मगच कबुतरे सावकाशपणे उड्डाण करतात आणि मी नासधूस झालेल्या फुलझाडांकडे बघत फक्त बुजगावण्यासारखा उभा राहतो !

17 comments:

Anonymous said...

राफा दि ग्रेट ! तुझे लेख वाचले की हेच उद्गार निघतात यार ! फारच आवडला हा लेख ! कबुतराची उपमा, शिर्षक सगळे सगळे आवडले.. काश ये कबुतरलोक्स पढ पाते ! डोळ्यावर पण काळागॉगल असतोच म्हणा !

श्रिया (मोनिका रेगे) said...

मस्तच! माझ्या लहानपणापासून कबुतर ह्या पक्ष्याने खूप साथ दिली आहे...आई म्हणते मी वर्षाची असताना बाल्कनी मध्ये येणारे कबुतर तू म्हणतोस तसे,'शांत निवांत' चालत राहायचे,आणि मी त्याच्या मागे...अर्थात,,, नुकतीच चालायला शिकलेले...असे मातोश्रींकडून कळते.त्याला 'कब्बु' हे मी दिलेले नाव होते तेंव्हा.आजोळ सुटले तेंव्हा ८ वर्षांची होते.मग कोकणात आले आणि कावळे जास्त दिसू लागले.पण तरीही कबुतरे मार्केट मध्ये तू जसे वर्णन केलेस तशी हमखास, आणि मग आमच्या घराच्या गच्चीत येऊ लागली.मिळून घाण करणे ह्या काही पक्षी मित्रांचा नेम आहे,तो हि मंडळी गच्चीत पुरा करत.तुझ्या लेखात तू ज्या काही उपमा दिल्या आहेस ह्या कबुतराला त्या सगळ्या १००% मान्य आहेत. :) लेख एकदम आवडला!

दत्तराज said...

‘पक्षीश्रेष्ठी’ :D

सही टोला लगावलेला आहेस... निवांत वेळी चालणार्‍या पक्षीय खलबतांचा उल्लेख का म्हणूण टाळला? ;)

राफा said...

यो रॉक्स ! अत्यंत मन:पूर्वक आभार !!!

तुझ्या कॉमेंटमुळे लाजल्यासारखे होत आहे ('मान खाली घालून उजव्या पायाच्या आंगठ्याने जमीन उकरणे' फेम :) ).

रच्याकने, डोळ्यावर गॉगल असलेला फोटू सध्या लावला असला ब्लॉगवर तरी मी कबूतरलोक्सपैकी नाही हे नम्रपणे नमूद करु इच्छितो :)

राफा said...

मोनिका, मंडळ आभारी आहे !!!
'कब्बु' नाव मस्त आहे !
(पण हा गुबगुबीत पक्षी ब-याच जणांच्या डोक्याचा ताप होतो हेही खरेच).

राफा said...

दत्तराज ! प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक आभार !

:) आणि होय, पक्षीय खलबते (किंवा प्रेमालाप) हा निवांतवेळीच झाला पाहिजे असाच ठराव कबुतरांत पास होतो बहुतेक..

Anonymous said...

Khupch Chan.

राफा said...

Anonymous, anek dhanyawad !
(tumache naav tari lihayachet :) )

सौरभ said...

तुझ्या बाकिच्या लेखांच्या मानाने हा लेख फारसा नाही आवडला..

राफा said...

वोक्के सौरभ :).. बाकीचे लेख आवडले ह्यात समाधान मानून घेतो.. व्हॉट से ? :)

सौरभ said...

अरे, तुझे बाकिचे लेख भारीच आहेत..:)...पण सारखे षटकार बघायची चटक लागल्यावर चौकार पाहिल्यावर वाटतं तसं वाटलं...:)

राफा said...

सौरभ :))) !

Tejali said...

kabutaranchya asankhya leela! ata kay akarna..aapan pamar manaw! :P

राफा said...

Tejali :) !

अपर्णा said...

मस्त आहे लेख.... मला आधी का दिसला नाही? कदाचीत कबुतरांवर असल्यामुळे असेल .. ते मधलं मधलं हिन्दीपण आवडलं

:)

राफा said...

अपर्णा, ठांकू !!! :)

Anonymous said...

कुठल्याशा ब्रिटीश MP ने कबुतरांना 'उडते उंदीर' म्हटल्याचे आठवले पोस्ट वाचून