Jul 31, 2007

उलटे जगा !

नाही, कृपया गैरसमज करुन घेऊ नका.
'किंग सोलोमन्स माईन्स' मधल्या त्या वन्य जमातीसारखं झाडाला लटकून "उलटे" जगा असा अर्थ अभिप्रेत नाहीये..

किंवा ही क्षुद्र मानवयोनी त्यागून 'वेगळ्या' जगात प्रवेश करुन तिथल्या पद्धतीप्रमाणे 'लटका' असही म्हणायचं नाहीये..


आता असं बघा,
"आत्ता तर शहात्तरावं लागलयं, अजून काही वर्षांनी येईल समज"
किंवा
"आज शून्य वर्षांचा झालो, आता ह्यापुढे असेल तो बोनस !"


अशासारखी वाक्यं ऐकायला मिळाली तर गोंधळ उडेल ना अंमळ ? हे 'उलटं जगा' मुळे होईल !

तर, उलटं जगा म्हणजे 'लिव्ह बॅकवर्डस' ह्या अर्थी ! अमेरिकेत असताना मला एका फिरंगी सहकाऱ्याने सांगितलेली ही कल्पना.. त्याला त्याच्या मित्राने सांगितलेली ! 'ऐसा होता तो कैसा होता' टाईपच्या ह्या विचाराचा गाभा असा की आपण आयुष्याचे टप्पे उलट क्रमाने जगलो तर ? ...

म्हणजे जन्मल्या जन्मल्या जर्जर वार्धक्य, ती आजारपणं, ते रिकामपणं, त्या संध्याछाया ( काहीतरी बरचं करायचं राहून गेल्याची चूटपूट वगैरे.. ) मग वय वाढेल (?) तसं उलट येत येत पन्नाशी, चाळिशी..

असं करत करत सळसळते (किंवा मुसमुसलेले वगैरे ) तारुण्य... तेव्हा प्रेमात पडणे (नि उभं राहणे, पुन्हा पडणे वगैरे)

आणि..

आयुष्याच्या अगदी शेवटचा टप्पा म्हणजे बालपणं !!!

तेव्हा एककलमी कार्यक्रम म्हणजे केवळ शिट्या मारणे ! 'करणे' काहीच नाही.. पूर्वी संस्थानिक जसे नुसते 'असायचे'... 'करायचे' काहीच नाहीत तसंच. म्हणजे एकंदर बर्याच लहान मुलांसारखं.. आपल्या अर्ध्या चड्डीला मॅचींग टी-शर्ट कुठला वगैरे भानगडी इतरानी सांभाळाव्यात.. आपण असेल त्या कपड्यात (नाहीतर तसंच !) फिरत रहायचं चकाट्या पिटत..

मस्त ना ?

मला तर कल्पना एकदम आवडली.. आधी ताटातला नावडता पदार्थ (उदा. 'सोप्प्या पाककृती' तून बघून, खूप कष्ट घेऊन केलेली एखादी भयप्रद भाजी वगैरे) एकदाचा संपवून, मग चढत्या क्रमाने उत्तमोत्तम पदार्थांचा चवीने आस्वाद घेत अगदी शेवटी अत्यंत आवडता (गोड) पदार्थ खावा तसंचं काहीसं !

आयुष्याच्या शेवटी नो चिंता, नो डेडलाईन्स, नो जबाबदारी, नो ऑफिस, ना खंत ना खेद.. फक्त शिट्या मारणे ! आनंदात बागडणे !

नाहीतरी म्हातारपणं म्हणजे दुसरं बालपणं असं म्हणतातचं ना, पण ते खरखुरं बालपणं असलं तर काय मज्जा ना.. म्हणजे कुठल्याही गोष्टीला उशीर होतोय म्हणून पळापळ चाललेली नाहीये (असलीच तर दुसर्यांची .. आपण निवांत !) , आपल्या वाह्यात गोष्टींचे कौतुक होतयं ("आमच्या वरचे आजोबा कसे शिंकतात ह्याची इतकी छान नक्कल करतो ना.. दाखव रे !") , आपली काळजी मायेने आणि उत्साहाने घेतली जाते आहे, आवडते पदार्थ आणि खेळणी कमीअधिक प्रमाणात कांगावा करुन पदरात पाडून घेता येत आहे वगैरे..

ही फॅन्टसी प्रत्यक्षात आली बरीच उलथापालथ होईल ना ? वय ठरवण्याचीही पद्धत ठरवावी लागेल.. म्हणजे त्या वर्षीच्या सरासरी आयुष्यमानानुसार जन्माच्या वेळी एक वय ठरवायचे (उदा. ८०) आणि मग कमी करत करत शून्यावर आणायचे. मग उणे एक, उणे दोन असे मोजत रहायचे. हाच तो बोनस !

आपण तरूण असताना मुलं होतील ती म्हातारी ('दुसरे बालपण' फेम) ! त्या 'चिमुकल्यां' ची आपण वेगळ्या प्रकारे काळजी घ्यायची.. पण त्यांच्या उपजत अनुभवाचा (!) फायदा मात्र त्याना आणि आपल्याला होणार.. आपण लहान झालो की ते तरूण होणार आपली काळजी घ्यायला.. आणि तेव्हा त्यांच्या मुलांचे म्हणजे आपल्याच नातवंडाचे पांढरे केस पाहून आपल्याला गंमत वाटेल !

आता काही अनुत्तरीत प्रश्न आणि मुद्दे आहेतच ह्या फॅन्टसी मधे.. पण आज जरी ही फक्त कल्पना असली तरी काही सांगता येत नाही ! अनेक अद्भुत कल्पना विज्ञानाच्या सहाय्याने प्रत्यक्षात आल्या आहेत, येत आहेत.. कुणी सांगाव, ह्या धर्तीची कल्पना कुणीतरी राबवेलही अमुक एक वर्षांनी !

तर तोपर्यंत तरी 'सुलटच' जगूयात !!! :)




7 comments:

Anand Sarolkar said...

asa jar jhala tar lokanchya shevatchya ichha kay majeshir astil na...e.g.m ala 1 Mothha dairy milk pahije! Mala lollipop hava vagaire. Ani shevti Gangajal aivaji..cerelac khau ghatla jail...

कोहम said...

rahul.....ashi ek jahirat TV var pahili hoti....bahutek gadichi hoti konatyatari...mecedez may be....athavat nahi ata

अनु said...

majeshir ahe kalpana.

श्रद्धा कोतवाल said...

राहुल, ' विज्ञानयुग ' नावाच्या मासिकात याच कल्पनेवरची विज्ञानकथा वाचली होती.
एका माणसाकडे, दोन ' जगां ' ची सरमिसळ झाल्याने दुसर्‍या जगातला टेलिफोन बसवला जातो. तो अर्थातच इकडे चालत नाही, त्यामुळे दुरुस्तीच्या निमित्ताने त्या जगातला एक माणूस इकडे येतो. त्यांचं जग हे आपल्या जगाच्या बरोब्बर उलटं चालत असतं.
म्हणजे आपल्याकडचा म्हातारा माणूस हा त्यांच्यासाठी लहान मूल असणे, टेलिफोन कंपनीची पत्रं त्याला उलट्या क्रमाने येणे, म्हणजे पहिले त्याला पत्र येतं ते त्याने बिल भरले नसल्याने टेलिफोन कापला जात आहे, या आशयाचं.
कल्पना सही वाटते पण.

राफा said...

आनंद, कोहम, अनु, श्रद्धा तुमच्या प्रतिक्रियांबद्दल आभार :) !

ह्या कल्पनेवर खर तर कथा लिहायची होती पण.. (सध्या रिकामपणापुढे अजिबात फुरसत नाही हे आहेच :) ) पण ह्याच प्रकारच्या एक दोन कल्पना मनात आहेत बरेच दिवस (भिजत घातल्यात, मोड आले की कथा !!!).. बघूयात !

HAREKRISHNAJI said...

नुकताच एक उलटा कथापट आकाय म्हणे !

Meenakshi Hardikar said...

hushha ! (sadhya sulataMcha jagayacha TharalaMya tyAsAThI....)