Nov 16, 2013

चित्रपट संवाद - भाग २ (दहीबडा इत्यादी)

तसं म्हटल तर ह्या लेखमालेला (हाही शिंचा फार औपचारिक शब्द) काही ठराविक आकार देता आला असता. काही अभ्यासपूर्ण, मुद्देसूद लेखन करता आले असते. परंतु विस्कळीत गप्पा (एकतर्फी का होईना) मारताना हे मुद्दे गौण ठरतात. 

अभ्यास गप्पा मारताना दिसला पाहिजे. ‘दाखवायची’ गरज भासलई नाही पाहिजे. काय?

नाहीतर, 
संवादाने गोष्ट कशी पुढे जाते, 
त्या त्या पात्राला कसा उठाव व ठसठशीतपणा येतो, 
कमीत कमी  शब्दांचा संवादही कसा आशयगर्भ असू शकतो, 
संवादांमधे बोली भाषांचा वापर 
वगैरे इत्यादींची साधक-बाधक चर्चा करता आली असती आणि त्यात तुम्हाला बौद्धीक मसाज झाला असताही. पण मग मला मजा आली नसती! गप्पा ठोकायला!

तर ते असो. आपण विषयाकडे वळूयात.

आता एखाद्या गावगुंडाने जर रस्त्यावर कोणासोबत अश्लाघ्य भाषा वापरली किंवा ‘असंसदीय’ वर्तन केले तर आपण ते समजू शकतो. परंतु, एखाद्या विद्यार्थ्यांमधे लोकप्रिय असलेल्या, सज्जन सात्विक प्राध्यापकाने जर भर वर्गात एखादा तरल विषय शिकवताना समजा पानाची पिचकारी टाकली किंवा तद्दन बाजारु नवीन फिल्मी गाण्याची ओळ गुणगुणली तर ऐकणा-या/बघणा-या विद्यार्थ्यांची जी अवस्था होईल, अशी अवस्था काही वेळा होते ती मातब्बर लोकांच्या काही अपवादात्मक कलाविष्कारामधून.

आता हिंदी चित्रपटातील घिसेपिटे ड्वायलॉक तर सर्वांनाच परिचीत आहे.

ह्या ब्लॉगवरच्या खालील लेखात त्याचा परामर्श घेतला आहे. (लेख विनोदी आहेत. हसू आल्यास हसावे.)


नोकरी आणि हिंदी शिणुमाचे ड्वायलॉक !


नोकरीआणि हिंदी शिणुमाचे ड्वायलॉक ! - २


पण हे झाले सदाबहार घिसेपिटे अर्थातच चाकोरीबद्ध लेखकाने लिहीलेले चौकटीतल्या संहितेतले अनेक वेळा दळून झालेले 'ड्वायलॉक'!

पण अत्यंत लोकप्रिय चित्रपटातील अत्यंत अतर्क्य संवाद कुठले असा विचार मी करतो तेव्हा हटकून सुरुवातीला ‘गोलमाल’ चे उदाहरण डोळ्यासमोर येते. 


'गोलमाल' म्हणजे अर्थातच ह्रुषिकेश मुखर्जींचा ‘गोलमाल’!
(मी कुठेतरी भूतकाळातच अडकलो आहे. पण खरं म्हणजे नवीन सकस, सुरस आणि सरस काही असले तर दोन्ही हातांनी आणि अंत:करणाने अलिंगन देतो की… पण येत नाही हो समोर असे काही सहसा आजकाल)

तर,

‘गोलमाल’ मधे हिरॉईन बिंदिया गोस्वामी ला तिची मैत्रिण म्हणते

“ले, खा!”
“क्या? ”
“दहिबडा”
“नही रे खाने को जी नही चाहता”
“कया ? दहीबडा खाने को जी नही चाहता ? हं.. अगर लडकी दहीबडा खानेसे इन्कार कर दे तो इसके दो मतलब हो सकते है. या तो धीरे धीरे लडकीसे लडका बन रही है ! ”
(इथे बिंदिया गोस्वामी मैत्रिणीचे नाव घेत ताडकन उठते! समजा.. “अंजू!”)
“नही नही. वो लक्षण तो मुझे भी दिखायी नही देता. तो दूसरीही बात सही है”
“दूसरी बात क्या है”
“जरूर तुझे प्रेम का रोग हो गया है ! …… एक दिन मेरा भी मन दहीबडा खानेको नही चाहा तो दुसरे दिन मुझे पता चला की मुझे बिट्टू से प्रेम हो गया है.. ”


आता बोला!

माझी तर बोलतीच बंद झाली! दोन दहीवडे तोंडात एकदम कोंबल्यासारखी!

वरील संवाद लिहीताना संवादलेखकाने काय खाल्ले (किंवा बहुदा प्यायले) असावे? (संवाद लेखक: डॉ. राही मासूम रझा). दहीबड्याचे ‘हे असे’ संदर्भ जर सर्वसामान्य ज्ञानात मोडत असेल तर मग माझेच घोर अज्ञान असणार!


ह्या चित्रपटातील बाकीचे काही अप्रतिम संवाद बघा आणि मग वरील संवादाचे विचित्रपण अजूनच जाणवते.

रामप्रसाद: “आप घडी घडी, घडी मत देखिये”
उर्मिला: “साडे छे बज गये”
रामप्रसाद: “साडे छे तो रोजही बजते है इस समय!”



रामप्रसाद: “… तो भूल जाओ मुझे!”
उर्मिला: “तुम क्या हिस्टरी हो, जो पढू और भूल जाऊ?”


रामप्रसाद: “सांस की तकलीफ हुई थी.. अब नही है”
भवानीशंकर: (वैतागला असल्यामुळे) क्या नही है? सांस या तकलिफ?”


अतर्क्य संवाद शोधायला फार दूर जायची गरज नाही. ‘शोले’ ! हो हो ओरिजनल, रमेश सिप्पीचा, आणि 2D शोले!

‘शोले’ मधला पहिलाच महत्वाचा संवाद कुठला? (म्हणजे ‘अं, ठाकूर साब..’ , आईये जेलर साब, आईये’ व अप्रतिम टायटल म्युझिक झाल्यानंतर)

जेलर म्हणतो

“ठाकूरसाब, आपका खत मिलतेही मैने सोचा, आपने मुझे याद किया है. अगली गाडीसे चला आया.”


म्हणजे काय?

खत म्हणजे काय युरिया खताची पिशवी पाठवली होती का आंब्याची पेटी पाठवल्यासारखी?
काहीतरी ‘खता’मधे लिहीले असणारच ना?
मग ते न वाचण्याजोगी अशी कुठली ‘खता’ केली ठाकूरने? लक्षात घ्या तो 'खत' म्हणतो, 'तार' नाही.

थोडक्यात, सोचा आपने मुझे याद किया म्हणजे काय?

‘गोलमाल’ मधे उत्पल्ल दत्त विधवा बहिणीने (शोभा खोटे) रामप्रसाद समजून त्याच्या डोक्यात काठी हाणते वर म्हणते ‘भैय्या, मैने सोचा की रामप्रसाद है’. त्यावर उद्विग्न होऊन उत्पल दत्त म्हणतो ‘सोचा? सोचा! तुमने सोचना भी शुरु कर दिया!’

असचं काहीसं त्या जेलरला म्हणावसं वाटतं मग!

आता ‘शोले’चे संवाद (अतिलोकप्रिय आणि अतिपरिचित असलेले वगळूनही) ह्याचा स्वतंत्र लेख होईल तेव्हा ती उदाहरणे इथे देत नाहीत. पण वरील संवाद लिहीताना दोन्ही संवाद लेखक लिहिण्याचा शुभारंभ काहीतरी कडू पिऊन करत असावेत हे चित्र मात्र सहज डोळयासमोर येते (‘अच्छे काम की शुरुआत.. कुछ कडवट हो जाय!’)

बाकी मसालापटाच्या लोकप्रियतेचे वेगळे निकष लावून हिट व सुपरहिट अनेक चित्रपट आहेत आणि त्यातले वेळोवेळी अतर्क्य आणि आचरट संवाद लिहावयास कादर खान त्या त्या वेळी समर्थ होता!

पण ह्या व अश्या गोष्टींना (विस्कळीतपणे) धांदोळूया घेऊयात पुढच्या भागात!




क्रमश:



2 comments:

Raj said...

दही बड्याबद्दल सहमत. बहुतेक त्या काळच्या कालेज युवकांमध्ये दही बड्यावरून एखादी मीम फिरत असावी. बरेचदा अशा चित्रपटातले त्या काळचे संदर्भ आता कळत नाहीत. उदा. 'चुपके चुपके'मध्ये असरानी म्हणतो, "इन लोगों को सुधारने का एक ही तरीका है. मिसा!" बरेच दिवस हा बाउन्सर जात होता. नंतर एकदा आणीबाणीवरचं पुस्तक वाचलं, चित्रपट १९७५चा आहे हे लक्षात आलं आणि मग त्यामागे किती मोठा संदर्भ आहे के कळलं.

गोलमालमधलं अमोलचं हिंदी अफलातून आहे. "कुर्ता तो शरीर के उपरार्ध की लज्जानिवारण के लिए होता है." आणि हे संवाद म्हणताना अमोलला जो त्रास होतो तो तो माना वेळावून दाखवतो. :)

राफा said...

@Raj,

मंडळ आभारी आहे ! :)