तर, प्रसंग नेहमीचाच.. कारण
‘पात्रं’ तीच!
जवळचे चित्रपटगृह... ब-यापैकी चांगला चित्रपट... मी..
आणि आजूबाजूला निवांत
बोलणारी लोकं!
लक्षात घ्या, सामान्य
प्रेक्षक म्हणून (इथे काही मित्र ‘अतिसामान्य!’ असे 'धुमधडाका'तल्या अशोक सराफ सारखे
ओरडतील! सच्चे मित्र हे असेच असतात) मला चित्रपट (व पॉपकॉर्न, सामोसे इत्यादी) चा
आस्वाद घ्यायला आवडते/आवडले असते. मी काय तिथे पोलीसगिरी करायला जात नाही की संस्कृतीरक्षणही.
पण दोन चार वेळा दुर्लक्ष केल्यावरही दोन रांगापर्यंत ऐकू जाईल एव्हढ्या मोठ्या
आवाजात कुणी बोलत असेल तर कवटी सरकतेच.
तर, एक सीट सोडून एक
जोडपे बसले होते. (म्हणजे कॉलेज युवक-युवती. ‘गोईंग स्टेडी फॉर लास्ट फोर डेज’
वाटले). त्यांच्या गप्पा चालू होत्या. चित्रपटाविषयीच असं नाही.. जनरल ! बॅकलॉग
पूर्ण करणे चालले असावे. अर्थातच युवती कित्येक जास्त फुटेज खात होती. त्यांना सभ्य
भाषेत आवाज दिला तर त्यांचा आवाज जवळजवळ बंद झाला. इंटर्वल नंतर पूर्णच. कारण ते
परत आलेच नाहीत! वायफळ गप्पा मारणे जास्त महत्वाचे असावे तिकीट फुकट जाण्यापेक्षा.
माझ्या आणि त्यांच्या
मधे असलेल्या सीट्वरच्या तरुणाच्या नजरेत माझ्याविषयी आदर दिसू लागला होता.
काही वेळाने
त्यांच्या दोन रिकाम्या सीट्स च्या पलीकडून मोबाईल चिवचिवला आणि वही हुआ जिसका डर
था!
मोबाईल धारी एक लोद्या होता खुर्चीत घट्ट रुतलेला. त्याने निर्विकारपणे व
निर्ढावलेपणाने फोन ‘रिसिव्ह’ केला आणि मस्तपैकी बोलायला सुरुवात केली. जणू
त्याच्या लिव्हिंग रुम मधे प्रोजेक्टर लावला होता आणि आम्ही त्याच्या दयेवर आयुष्यातला
पहिला चित्रपट पहायला दाटीवाटीने कोप-यात बसलो होतो. मी ‘शुक-शुक’ करुन, माझ्या
शेजारच्या तरुणाने टिचकी वाजवून त्याला आमच्या भावना पोचवायचा निष्फळ प्रयत्न केला
पण.. ! फोनवरल्या अदृश्य पलिकडल्याशी त्याचे तात्विक मतभेद होऊन, त्यांचे दोघांचे समाधान होऊअन मग त्याने एकदाचा फोन बंद केला. ह्या नुकत्याच संपलेल्या परिसंवादाचा त्याच्या बरोबरच्या दोघांना 'रिपोर्ट' देऊन तो अखेरीस शांत झाला आणि चित्रपट पाहिला
न पाहिला करत पुन्हा निवांत खुर्चीत जेव्हढा पसरू शकेल तेव्हढा पसरला. रीळावरची
फिल्म तुटावी तशी माझी ‘लिंक’ खटकन तुटली होतीच.
‘मी त्याला आवाज
देणार आहे!’ मी शेजारच्या तरुणाला म्हटले.
‘हो ना, अगदी
oblivious असतात अशी लोकं’ तो पुटपुटला. आता oblivious चा अर्थ लावून आत दिवा पेटायला
अर्धा सेकंद लागला (मराठी माध्यम!), पण तरीही त्या तरुणाच्या नजरेतला माझ्याविषयी दुणावलेला
आदर मी टिपलाच.
चित्रपट संपल्यावर मी
घाईघाईने लोद्याच्या दिशेने सरकलो. ते तिघे निवांत बाहेर पडत होते.. सीनेपर काही
बोज असण्याचा काही संबंध नव्हताच. पण त्याला कटहरे मे खडे' करायला मी आतूर होतो. पण
वो तीन थे आणि मी अकेलाच. (माझ्या बाजूच्या सीटवरचा तरुण वैचारिक पातळीपुरताच
असावा. ‘बाहेरुन पाठिंबा’ टाईप. तसाच प्रसंग आला असता तर त्याला जमेस धरणे म्हणजे
नसलेला हातचा धरण्यासारखे वाटले जे मी शाळेत अनेक वेळा केले होते).
आता, मी साधारण दीड इसमांना भारी पडू शकतो
(ऍव्हरेज धरले तर) त्यामुळे झटापटीची वगैरे वेळ आली असतीच तर मी ‘सगळे काय येता
एकदम अंगावर.. दीड दीड करून या!’ असे ओरडलो असतो.
शेवटी त्यांना गाठून लोद्याच्या पाठीवर
थाप मारून त्याला 'शुभ नाव' विचारले. त्याने आश्चर्यचकित होत होत सांगितले. त्याच नावाचे माझ्या ओळखीचे
लोक चांगले सुशिक्षीत, सुसंस्कृत व उच्च पदावर वगैरे असलेले असल्याने हाच नेमका
कार्टा कसा निघाला हा विचार मला पहिलेप्रथम चाटून गेला. ‘पत्रिकेत काय अक्षर आले होते नावासाठी’
हा प्रश्न विचारायचा मोह टाळून मी ‘हॅज इट ऑकर्ड टू यू..’ अशी प्रस्तावना केली
(झापायला इंग्रजी बरी असते. नुसतीच ‘बरी’ नाही तर अगदी चांगली ‘पुरते’).
मी थोडक्यात त्याला
व्यथा सांगितली आणि ‘कुणाचा रे तू’ ह्याचे इंग्रजीत धर्मांतर काय होते ह्याचा
विचार करु लागलो. शिवाय ‘स्नेक इन द मंकीज शॅडो’ वगैरे कुंग फू पटातले पवित्रेही
आठवू लागलो. पण काय आश्चर्य! लोद्याचा चेहरा दीडेक फूट पडला. कदाचित असे वर्मावर
बोट (किंवा अगदी रोवून गुडघा) ठेवण्याचे कुणाच्या मनात येईल अशी त्याची अपेक्षाच
नसावी. युद्धात सरप्राईज ऍटेक ला एव्हढे महत्व का असते ते मला लगेच पटले.
त्याला नाव
विचारण्याच्या माझ्या एकंदर पद्धतीत काहीतरी जाणवून त्याचे दोन मित्र आधीच चार पाच
फूट लांब चालू लागले होते. ‘आपला काय संबंध’ अशा थाटात ! (सच्चे मित्र असणार).
लोद्याने (‘पडलेला चेहरा’ फेम) दिलगिरी व्यक्त केली पुटपुटून.
‘नाही, आम्ही तुला
सभ्यपणे सांगायचाही प्रयत्न केला’ हे ऐकल्यावर तर ‘सिन्सियर अप्पोलोजी’ सुद्धा
व्यक्त केली. ‘भगवान के लिए मुझे माफ कर दो’ छाप भाव मला त्याच्या गटाण्या डोळ्यात
दिसले.
मग मीही जास्त ताणले
नाही. उगाच ‘त्यांच्या गुन्हेगारी कारकिर्दीची सुरुवात एका निरागस लोद्याला
फटकवण्यापासून झाली’ असे काहीतरी माझ्या चरित्रात यायचे पुढे मागे.. शिवाय त्याच्या
अनपेक्षित शरणागतीने मी एव्हढा हबकलो की ‘फिर ऐसा मत करना’ स्टाईल एखादे वाक्य
फेकायचेही विसरलो. फक्त ‘उतू नको, मातू नको.. वाजला मोबाईल घेऊ नको’ असा चेहरा
करून पाठीवर अजून एक थाप मारून त्याची पाठवणी केली. (मुळात मोबाईल सायलेंट वर
टाकणे म्हणजे टूच मच!)
त्याचे ‘सच्चे मित्र’
आता दिसेनासे झाले होते. कदाचित आता ते थेटरबाहेर उभे राहून ‘किधर गया था बे तू’
असे करुन वर त्यालाच झापणार असतील. ‘अर्ध्या तासात दोन दोनदा झापून घेणे
लोद्याच्या नाजूक तब्येतीला झेपेल का’ हा विचार आणि पुन्हा ‘स्नेक इन द मंकीज शॅडो’
पहावा का हा दुसरा विचार, अशा दोन विचारांचे ओझे घेऊन मी पार्किंग लॉट कडे चालू
लागलो.
तो लोद्या माझ्यावर
बसला असता तर माझ्या ‘दीड इसमां’च्या ऍव्हरेजचे काय झाले असते आणि मी पुन्हा बोलू
शकलो (चित्रपट चालू नसताना) असतो का हा तिसरा विचारही माझ्या मनात त्याच्या मोबाईलसारखा
चिवचिवून गेला!
6 comments:
Jhakaas...Madhun madhun too much kinva did did fut karun ya hi mast fodni... Awadle...
मस्त. एकूणात लोद्याचं पात्र गुंतागुंतीचं आहे. म्हणजे त्याला खरच जाणीव नव्हती की लोकांना त्रास होतोय की अजून काही?
बाय द वे, हल्ली जेन्युइन विनोदी लेख गुलबकावलीच्या फुलाइतके दुर्मिळ झाले आहेत तरी लिहीणे चालू ठेवावे ही इणंती.
@Dev, मंडळ आभारी आहे :)
@Raj,
मन:पूर्वक आभार.. हौसला आफजाईजुई बद्दल!!!
होय, लोद्या कॉम्प्लेक्स होता खरा ! म्हणजे इतकी जर संवेदनशीलता आहे तर कुणी तरी टाकून टाकून बोलेपर्यंत ती जागी का होत नाही :)
'जेन्युइन विनोदी' ह्या विशेषणाबद्दल खरेच मनापासून आभार! लोकांना आजकाल जे विनोदी वाटते त्यावरून आपण साक्षर तरी आहोत की नाही अशी कधी कधी शंका येते! लिखाण चालू ठेवण्यावर काम चालू (रस्ता बंद न करता) आहे तेव्हा लिखाणाची वारंवारता वाढेल अशी आशा आहे.
चिअर्स.
अहाहा! मजा येण्यात आल्या गेली आहे. :D
कंसमामा विशेष भारी. खूप दिवसांनी खुदुखुदु हसले वाचता वाचता. माझीही अशीच मनीषा आहे, एखाद्या तरी लोद्याला उपदेश झोडायची. ऍवरेजची बोंब आहे, पण आवाजावर आणि लुकवर निभावून जावे... इन्शाला, देख लेंगे!
@Meghana,
मंडळ आभारी आहे!!! :)
Post a Comment