Dec 31, 2007

शुभेच्छा !

हे नवीन वर्ष (पक्षी : २००८) आमच्या वाचकांना अत्यंत सुखाचे, उत्तुंग यशाचे व मन:शांतीचे... म्हणजे एकूणच झिम्माड वाटेल असे जावो ही शुभेच्छा !

सरत्या वर्षात आपण दिलेल्या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार !!!

आपले नम्र,

- राफा
- आयशॉट
- राजा, प्रधानजी आणि सेवक
- उंबरकर आणि झुंबरकर
- सुधारक शेणोलीकर काका
- जगू जगदाळे

आणि

राहुल फाटक

Dec 16, 2007

अघटित ! (कथा)

“Love people, use things.. Not vice versa !” - Kelly Ann Rothaus

माणसांवर प्रेम करा नि वस्तू वापरा. माणसांना वापरू नका !

तुम्हाला आवडतात अशी वाक्यं ? ब-याच लोकाना आवडतात ! मग लक्षात ठेवून अशी वाक्य ते डायरीत टिपून ठेवतात. कधी सहज उघडून वाचण्यासाठी.

शिवाय एखाद वेळी, एखाद्या विशेष संभाषणात ही अशी वाक्य मिसळायला छानंच वाटतं. काहीना अशी वाक्य नुसती वाचून, लिहूनही समाधान वाटतं एक प्रकारचं... म्हणजे माणूस म्हणून आपली वाढ झाली आहे, एक प्रकारची परिपक्वता आली आहे... असंच काहितरी !



***

राजेशचा मूड आजकाल सकाळी सकाळी पार बिघडलेला असायचा..

आजही तेच झालं.

त्याचा चेहरा त्रासलेला.. आक्रसलेला असा. दातओठ खात त्याच्या कॉटलगतच्या भिंतीकडे बघत होता.

भिंतीवरच्या त्या घड्याळाकडे !

राजेश जितका चिडला होता तितक्याच शांतपणे भिंतीवरचं ते घड्याळ वेळ दाखवत होतं.. टिक टिक.. त्याचे निरस, निष्प्राण तास नि मिनिट काटे.. संथ लयीत काम करणारा सेकंद काटा.. त्याचा टिक टिक आवाज… तो आवाज शांत वेळी रुममधे स्पष्ट ऐकू यायचा, मोठा वाटायचा. …

टिक टिक टिक टिक.. आवर्तन चालूच होती..

साडेसात ! ठण्ण…

का ? का होतात रोज साडेसात? होतात तर होतात, हे घड्याळ का दाखवतं बरोबर वेळ?

राजेश झोपायचा त्या लोखंडी कॉटला लागून असलेली भिंत इतर भिंतीसारखीच खरबरीत पोपडे उडालेली.. तिच्यावर साधारण चारएक फुटावर एक आडवी फळी ठोकलेली होती. त्यावर काही फुटकळ सामान होतं.. आणि त्या फळीच्या थोडं वर दोन फुटावर ते जुनाट घड्याळ !

त्याने रुम भाड्याने घेतली तेव्हा जुजबी फर्निचरशिवाय फक्त हे घड्याळ होतं तिथं. अर्थातच घरमालकाच्या दृष्टीने अगदीच टाकाऊ. असून नसल्यासारखं.. म्हणूनच त्याने काढून नेलं नव्हतं बहुतेक.

ते एव्हढं जुनं अजूनही मागे पडत नव्हतं, म्हणून टाकून दिलं नव्हतं एव्हढंच. बरं एखादा सुंदर नमुना असता तर ऍंटीक पीस म्हणून तरी किंमत आली असती कदाचित, पण हे होतं अगदीच मामुली. त्यावर कसलीही कलाकुसर नाही कि रंगसंगती नाही. अगदी रेल्वे प्लॅटफॊर्मवरच्या घडयाळासारखं दिसणारं. पांढ-या वर्तुळावर काळे बोजड आकडे नि भाल्यांचे पाते वाटावेत असे मोठे टोकदार काटे…

त्या घड्याळाचा निर्जीव तटस्थपणा राजेशला आवडायचा नाही.

आपली कंटाळवाणी नोकरी, रोज सकाळी लोकल पकडून वेळेत पोचताना होणारी आपली तारांबळ, ऑफिसमधलं मलूल वातावरण.. हे असं वेळापत्रकात अडकलेलं आपलं आयुष्य.. आहे ह्या मद्दड घड्याळाला ह्याचं काही ?

आपल्या मजबूरीची ते घड्याळ जणू मजा बघतं अस राजेशला राहून राहून वाटायचं.. एखाद्या गुलामाला भाले टोचून त्याला पुन्हा एखाद्या अतिश्रमाच्या कामावर लावावं तसं ते घड्याळ आपले काटे टोचून टोचून आपल्याला हैराण करतं आहे अशी स्वप्नही कधी त्याला पडायची ! मग त्या टिकटिकीतून त्याला ते जणू ऐकू यायचं : ‘उठ ! आवर भराभर. साडेसात झाले. चल ! हात उचल.. आठ दहाला डबा भरून तयार नसेल तर गेली आठ सव्वीस ची लोकल !’ असंच काहीसं.

आजही राजेश आपल्या भकास आयुष्यावर चरफडला.. जणू सगळी त्या घड्याळाचीच सगळी चूक असल्यासारखं त्याने पुन्हा एकवार त्याकडे बघितलं… ..

आणि काहितरी पुटपुटत पांघरूण बाजूला भिरकावून तो उठला..


***

त्याच दिवशी दुपारी..

मुंबईतल्या एका पॉश एरियातली एक चकचकीत इमारत.

तळमजल्याला जाड काचेचं दार असलेलं ऑफिस. आत थंडगार वातावरण. बाहेरच्या उन्हाच्या झळा, रहदारी, गर्दी ह्यापासून सुरक्षित नि अलिप्त.

त्या थंड वातावरणात गुबगुबीत खुर्चीत आपला सुटलेला अवाढव्य देह कोंबून एक माणूस बसला होता. बरंच टक्कल पडलेला.. पण त्याची भरपाई म्हणून की काय मागे बरेच लांब केस वाढवलेला.. त्याने लावलेल्या महागड्या सेंटचा उग्र वास त्या कृत्रीम थंडीत मिसळत होता… त्याचा तो केशरी कलरचा भडक शर्ट जेमतेम त्याच्या पोटाचा घेर झाकू शकत होता.

पुन्हा एकदा त्याने फोन टेबलावर आपटलान आणि एक शिवी हासडलीन.. गेल्या एका मिनिटात तिस-यांदा अस होत होतं बहुतेक.

त्याच्या समोर टेबलापलिकडे बसलेला एक किरकोळ माणूस हसून म्हणाला “अरे केसव भाई, कायको अश्रफ का गुस्सा फोन पे निकालता है. पैसे तर त्याला द्यावेच लागतात ना..”

पण त्या टकलू माणसाचं तिथे फारसं लक्ष नव्हतं.. हातातल्या मोबाईल फोनकडे पुन्हा खुन्नस देऊन तो म्हणाला “इसकी तो.. साला चालीस हज्जार चा फोन चालत नाही. रेंजच येत नाही. हे बघ.. बघ ! आता अश्रफचा फोन आला तर त्याला वाटेल मी मुद्दाम कट करतोय..”

“केसव अरे रेंज नाही तर फोनची मिस्टेक काय त्यात ? वो कंपनी को बोलो ना..”

तेव्हढ्यात मोबाईल वाजतो. कुठ्ल्यातरी नवीन पिक्चरमधलं सवंग ‘आयटम सॉंग’ रिंगटोन म्हणून वाजू लागतं. त्या लहान ऑफिसमधे तो आवाज खूपच मोठा वाटतो. पण तो माणूस उत्तर देणार एव्हढ्यात फोन बंद पडतो !

पुन्हा एकदा तो चरफडतो. चिडून अजून दोन चार वेळा फोन आपटतो !

त्या फोनच्या कडा आपटून आपटून घासल्या गेल्या आहेत.. कडांच्या रंगाचं कोटींगही निघाले आहे. पण त्या माणसाला त्याची विशेष पर्वा नाही..

‘xxx की ! अब गया मै ! आता अश्रफचा मगज सरकला असणार.. मीच त्याला सांगितल होतं की मी कदाचित ऑफिसमधे नसेन, तर लेंड लाईन मधे नको.. मोबाईलवरच कर फोन..”

हताश होऊन तो मोबाईल पुन्हा जोरात आपटतो आणि टेबलावर भिरकावतो.

त्या फोनच्या सुंदर मॉडेलची आपटून आपटून पार रया गेली आहे. तो मोबाईल बिचारा निपचित पडून रहातो. पुन्हा उचलून आपटले जाण्याची वाट पहात..

त्या दोघांचे संभाषण चालूच रहाते…



***


राजेश पहिल्यापासून त्याच्या रुमवर एकटाच राहतो.

म्हणजे आईवडील सोलापूरला असतात. कुणी रुममेटही नाही. आणि त्याच्या रागीट स्वभावामुळे बरोबर कुणी टिकणं शक्यही नव्हतं.. शिक्षण चालू असताना हॊस्टेलवर रहात असताना त्याच्याच लक्षात आलं होतं की आपलं सहज कुणाशी पटणार नाही. त्यामुळे पैसे वाचण्याची शक्यता असूनही त्याने भाड्याची रुम शेअर करण्याविषयी विचार केला नव्हता.

आपण चिडचिड करतो म्हणून एकटं रहाव लागतयं, का एकटं रहातोय म्हणून जास्तच चिडचिड करतो हे कधीकधी त्यालाच कळेनासं व्ह्यायच !

एकटाच रहात असल्याने बोलायला कुणी नाही. कोणाशी बोलणार ?

रुमवर भकास शांतता. फक्त डोक्यावर ते घड्याळ आणि त्याची ती अव्याहतपणे चाललेली टिकटिक !

आपण इतके धुसफुसतो, चिडून बोलतो.. एखादा माणूस असता तर आपलं काम थांबवून आपल्या बोलण्यावर काहीतरी तर प्रतिक्रिया दिली असती. अगदी उलट चिडून बोलला असता तो माणूस तरी परवडल असतं.. पण हे घड्याळ नको.

मालकाचं नसतं तर उचकटून फेकून दिलं असतन त्याने ते घड्याळ !

त्या दिवशी रात्री तो कामावरून परत आला.. त्याचं डोक पार उठलं होतं ऑफिसमधल्या कटकटीनी..

जेवून कॉटवर अंग टाकल्यावर त्या घड्याळ्याच्या टिकटिकीने हैराण झाला अगदी..

आणि मग एखाद्या भ्रमिष्टासारखा त्या घड्याळाला बोलू लागला तो.. एखाद्या माणसाशी भांडावं तसं.. अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली त्याने.. आणि मग एकदम निर्वाणीचं, निश्चयाने तो म्हणून गेला: “बास ! आता फार झालं.. उद्या सकाळी उचकटून फेकून देतो तुला.. पार गच्चीवर जाऊन खाली टाकतो.. तुकडे तुकडे होतील तुझे. तिच्यायला.. दिवसरात्र टिकटिक.. टिकटिक..”

आणि.. एकच सेकंद !

एकच सेकंद ते घड्याळ थबकल्याचा त्याला भास झाला.. अर्थात, भासच असणार ! कारण राजेशच्या धमकीने काळजाचा ठोका चुकायला ते घड्याळ काही जिवंत नव्हतं.

हे असंच काहीसं बरळत राजेश केव्हा तरी झोपून गेला…

अर्थात तो झोपला तरी घड्याळाचं काम चालूच होतं.

टिक टिक.. टिक टिक..



***


मुंबई असली तरी दोन वाजलेले असल्याने तुलनेने ब-यापैकी शांतता…

त्या आलिशान फ्लॅटची लिव्हींग रूममधे मंद झिरपणारा चंद्रप्रकाश. काचेच्या एका मोठ्या सेंटर टेबलवर पडलेला एक मोबाईल… मॉडेल नवीन आहे पण.. त्याच्या कडांचा रंग काहीसा घासला गेला आहे !

रात्रीच्या शांततेत तो मोबाईल एकदम किंचाळून वाजल्यासारखा वाजू लागतो.

तेच ते आयटम सॊंग ! तोच रिंगटोन. रात्रीच्या शांततेत तो अजूनच कर्कश वाटतो.

काही सेकंद जातात..

एक खूप जाडसा मनुष्य अडखळत लिव्हींग रुम मधे येतो. टक्कल पडलेला.. मानेवर लांब केस वाढवलेला. त्याच्या फुगलेल्या पोटावर ताणला गेलेला टीशर्ट आहे नि खाली शॉर्टस आहे. पोटापर्यंत आलेली गळ्यातली सोन्याची जाड साखळी मधेच अर्धवट प्रकाशात चमकते आहे.

तो काहीसा अडखळत चालतोय. बहुतेक तो अर्धा झोपेत आहे आणि अर्धा नशेत.

मोबाईल किंचाळतोच आहे.

शेवटी त्या आवाजाने किंचीत सावध होत तो माणूस मोबाईलपर्यंत पोचतो आणि एकदम त्याला धडधडायला लागतं…

अश्रफचा फोन असेल ?

तो नंबर बघतो.. आश्चर्य म्हणजे कुठलाच नंबर नाहीये. नुसताच फोन वाजतोय.

तो थरथरत्या हाताने फोन उचलतो.

‘हालो’ तो काप-या आवाजात म्हणतो.

‘केशव भगनानी !’

तो आवाज ऐकल्यावर भगनानी एकदम दचकतो. हा अश्रफचा आवाज नाही. त्याच्या गॅंगमधल्या कुणाचाही नाही. हा माणसाचा वाटतच नाहीये आवाज.. पण फार खतरनाक आहे. जणू मृत्यूनेच हाक मारली आहे !

पण तरीही… तरीही आपल्या ओळखीचा का वाटतोय ?

‘क.. कोण?’ भगनानीच्या तोंडाला कोरड पडलीये. आता छातीवर मणाचं ओझं ठेवल्यासारखं विलक्षण दडपण आलंय !

“मी बोलतोय !

कोण बोलतय ते कळत नाहीये. पण… तरीही थोडं लक्षात येतंय.
भगनानीला छातीत एकदम कळ आल्यासारखं होतं. हा.. हा आपल्या मोबाईलचा आवाज आहे ?

नो ! नॉट पॉसिबल !

हा आपला फक्त भास आहे. एक भयंकर भास.

तो छातीवर डाव्या बाजूला हात दाबतो..

“आता तू पुन्हा मला कधीच आपटू शकणार नाहीस ! फेकू शकणार नाहीस !”

आपण काय ऐकलं, बरोबर ऐकलं का ते भगनानीला कळत नाही.. पण तो हबकतो.. त्याच्या छातीतली कळ एकदम वाढते.. वाढतच जाते.

… आणि हळूहळू तो खाली कोसळतो.



***


तर.. आपण बोलत होतो त्या वाक्याबद्दल !

ह्या वाक्यातला साधा संदेश एव्हढाच की माणसांवर प्रेम करायच असतं. त्याना स्नेह, आदर, ममता, मित्रत्व अशा सुंदर भावनांनी जोडायच असत.. सुखाची आणि यशाची नवनवीन शिखरं गाठायला एखाद्या शिडीसारखी वापरायची नसतात माणसं !

कारण माणसं म्हणजे काही वस्तू नाहीत ! वापरायला नि वापरून फेकून द्यायला. ती आहेत जिवंत, हाडामासाची, भावभावना असलेली माणसं !

.. आणि वस्तू ?

वस्तूंचं काय ?


***


इन्स्पेक्टर मानकामे आज खूप चिंताग्रस्त चेह-याने बसले होते..

समोर असलेल्या कागदपत्रांवरून त्यांची नजर फिरत होती. पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्टस वगैरे. त्यांच्या दहा वर्षांच्या अनुभवात एकाच दिवशी अशा विचित्र केसेस कधी आल्या नव्हत्या.

मानकामे त्या माहितीतली सुसूत्रता शोधण्याचा प्रयत्न करत होते..

नाव: राजेश चौबळ
वय : २९ वर्षे
मृत्यूची वेळ : रात्री सुमारे २.३०
मृत्यूचे कारण: ...


भयंकर ! रात्री कसल्यातरी धक्याने भिंतीवरचे घडयाळ खिळ्यापासून निसटले असावे. ते अगोदरच सैल झालेले असणार. आधी ते खिळा आणि कॉट यांच्यामधे असलेल्या फळीवर आदळले असणार. त्या जुन्या घड्याळाचे भाग तुटून वेगवेगळे झाले आणि मग ते काहीसे अवजड घड्याळ थेट राजेशच्या डोक्यात पडले. तरीही तो कदाचित वाचला असता पण विचित्र रितीने घड्याळाचे मोठे आणि अणकुचीदार दोन काटे एखाद्या हत्याराच्या पात्यासारखे त्याच्या गळ्यात आणि छातीत घुसले. तेच त्याच्या मृत्युचे कारण आहे.

विचित्र मृत्यू आहे अगदी !


नाही, म्हणजे घड्याळ पडू शकतं निसटून.. पण अगदी एखाद्याने मुद्दाम खुपसावेत तसे ते काटे त्याच्या शरीरात घुसणं म्हणजे... हॉरिबल !

जुजबी चौकशीत तरी राजेशची कुणाशी दुश्मनी असल्याचे काही समजले नव्हते.. त्यामुळे 'विचित्र अपघात' अशीच नोंद करावी लागणार बहुतेक..

आणि ही दुसरी भगनानीची केस !

केशव भगनानी
वय : ४७ वर्षे..

पुढे वाचायची गरजच नाही.. माहिती आहे चांगलाच. बी ग्रेड पिक्चरचा हा फायनान्सर. त्यासोबत नाना धंदे आणि लफडी. दोन वेळा ह्याला आपणच वॉर्निंग दिलेली आहे. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची डिपार्टमेंटची खात्रीच आहे!

खर म्हणजे हा भगनानी एक दिवस जायचाच होता.. पण कसा ? तर त्याच्या ऑफिसवर भाडोत्री गुंडांचा अंदाधुंद गोळीबार.. त्याच्या ऑफिसच्या काचेच्या दरवाज्याचा चक्काचूर.. आणि रक्ताच्या थारोळ्यात आत पडलेला भगनानी.

हे असच काहीतरी होणार होतं एक दिवस..

काल भगनानी गेलाच… पण हार्ट फेलने !

रात्री दोन वाजता त्याच्या मोबाईलवर कॉल आला एव्हढंच आठवत त्याच्या बायकोला. तो उठून फोन घ्यायला गेला आणि ब-याच वेळाने तिला जाग आली. बाहेर येऊन पहाते तो जमिनीवर पडलेला. निष्प्राण ! जोरात ऍटॅक आला असणार त्याला. हाक मारायचीही संधी मिळाली नसणार.

आधी वाटलं की, त्याला धमकीचाच फोन आला असणार…

पण तेच फार विचित्र आहे ! कारण…


कारण त्याला रात्री अकरा नंतर कुणीच फोन केलेला नाही फोन कंपनीच्या रेकॉर्डप्रमाणे ! दोनदा रिपोर्ट मागवून खात्री केली आपण…

मग… त्याचा मोबाईल वाजलेला त्याच्या बायकोने ऐकला कसा ? त्याचा मोबाईल वाजलाच कसा ?

विचारात असतानाच मानकामेनी घडयाळात पाहिलं.. दोन सतरा ! बरीच रात्र झाली… आता घरी जायला हवं..

दुस-या ऑफिसरला चार्ज देऊन मानकामे बाहेर आले. दोन कॉन्स्टेबल बसून आपसात आरामात कुजबुजत होते ते एकदम सरळ झाले. मानकामेनी त्यांच्याकडे पाहिलं न पाहिलं करुन, पोलिस स्टेशनच्या आवारात असलेल्या आपल्या जुन्या मोटरसायकलकडे पाहिलं..

आणि त्यांच्या चेह-यावर लगेच त्रासिकपणा आला.

..अगदी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे दोनचार किक्स मारुनही मोटरसायकल चालू होईना.

xxx तिच्या.. आता साताठ वर्ष झाली वापरतोय साली ही मोटरसायकल. आधी नीट चालायची.. आता गेल्या काही दिवसातच फार त्रास देते आहे. नवी घेऊ शकतो की आपण स्वत:च्या पैशातून.. अगदी सहज. पण मग डिपार्टमेंटच्या डोळ्यात लगेच येतं आजकाल ..

नेहमीप्रमाणे सुरू होईचना तेव्हा शेवटी तडकून त्यानी मोटरसायकलला दोन चार लाथा मारल्या !

.. अजून दहा मिनिटानंतर, मानकामे अगदी घामाघूम झाल्यावर, ती एकदाची चालू झाली..

मानकाम्यानी मग पुन्हा एकदा तिला एक शिवी हासडली… आणि रात्रीच्या निर्मनुष्य रस्त्यावर त्यानी ती जुनी मोटरसायकल अगदी भरधाव सोडली.



***

हं.. वस्तूंचं काय ?

दचकू नका.. बरोबरच आहे तुमचं ! वस्तूंचं काय एव्हढं ? त्या फक्त हव्या तश्या वापरायच्या. बिघडल्या, तर दुरुस्त करायचा प्रयत्न करायचा. ते शक्य नसेल तर सरळ फेकून द्यायच्या.. आणि त्या जागी नवीन वस्तू आणायच्या ! ..कदाचित अजूनच उपयोगी आणि वापरायला सोप्या.

फारतर एखाद-दुसरी वस्तू आठवण म्हणून जपून ठेवायची. बास ! एव्ह्ढाच काय तो अपवाद !

बरोबरच आहे अगदी.. वस्तूंचं त्यांचं आयुष्यच मुळी माणसांच्या उपयोगासाठी. अर्थात, आयुष्य कशाला म्हणायच म्हणा.. निर्जीव निष्प्राण वस्तू त्या !

पण तुम्ही एखाद्या वेळेस वैतागलात आणि..

अं.. समजा, तुमचा कॉम्प्युटर प्रतिसाद द्यायचा बंद झाला, म्हणून किबोर्डच्या किज रागारागाने आपटून आपटून वैताग व्यक्त केलात.. किंवा टिव्हीवर सगळीकडे नुसते भिकार कार्यक्रम आहेत असं पाहून, कंटाळून अक्षरश: रिमोट फेकून द्यावासा वाटला.. एखाद वेळी दिलातही फेकून !

फार कशाला, नीट ठिणगी न पाडणा-या स्वयंपाकघरातल्या साध्या लायटरवर भडकलात आणि दातओठ खात ओट्यावर आपटलात तो दोनचार वेळा ..

तर ?

तर काय ? त्या निर्जीव वस्तू काय करणार... निमूटपणे तुमचं वागणं सहन करण्यापलिकडे !

पण.. काही सांगता येत नाही ! आता कल्पना करा ना.. मानकामे भरधाव निघाले त्यांच्या मोटर सायकलला शिव्या घालत घालत..

पण समजा, मोटरसायकल १०० च्या स्पीडला असताना एखाद्या मोक्याच्या क्षणी अगदी अनपेक्षितपणे हॅंडल लॉक झालं .. किंवा त्यांनी दाबला नसतानाही जर अचानक करकचून ब्रेक लागला तर ?

.. तर काय होईल त्यांचं ? राजेश किंवा भगनानीसारखंच काहीतरी ??? नक्कीच !

छे ! कल्पनाही करवत नाही…

म्हणून आपलं सहज सांगावस वाटलं...

Love people.. and if possible, love things too !

माणसांवर प्रेम करा.. आणि जमलंच तर.. निर्जीव, निष्प्राण वस्तूंवरही !


*****


Dec 6, 2007

वेगमर्यादापुरुषोत्तम आणि व्यक्तिमत्व !

असं ब-याच वेळा होतं..

म्हणजे काय की मी रस्त्यावरून बाकीच्या नागरिकांचे विविध घटनात्मक आणि प्रासंगिक हक्क सांभाळत माझा गाडी हाकण्याचा हक्क बजावत असतो. आणि माझ्या पुढे गाडी चालवणारा एक कुणीतरी बाबाजी कळत नकळत कलाकारी करुन माझ्या मस्तिष्काचे तापमान वाढवण्याचे यथाशक्ती प्रयत्न करत असतो. कधी कधी एखादी स्त्रीशक्ती फेम आदिमायाही त्या वाहनाला चालवत असते !

मी आता भारतीय रस्त्यांवर चालवायला चांगला(च) रुळलो आहे. (ह्या वाक्यावरून अगदी ब्रिटीश परगण्यात मी 'पला बडा हूँ' असा अर्थ घेऊ नका.. अमेरिकेतून वापसीनंतरही अडीच वर्षे झाली म्हणून म्हटले) तर ह्याचा अर्थ असा की अष्टावधानी राहणे व कुठूनही कुठलेही वाहन अथवा जिवंत ऐवज कुठल्याही वेगाने आडवा किंवा उभा येऊ शकेल हे गृहीत धरणे मला जमायला लागले आहे. अर्थातच वाहतुकीचे सर्व - 'जवळजवळ सर्व' म्हणू म्हणजे साधारण ९९.८५ % - नियम पाळणे हे काही बदललेले नाहीये. 'व्हेन इन रोम' हे शक्यतो चांगल्या बाबतीतच वापरावे !

तर अशा नगांकडून एकंदर काही माफक नियम किंवा सौजन्याची अपेक्षा मी करत नसतोच. पण मला त्यांच्या आडमुठेपणाचे अतिशय कुतूहल वाटते ! त्याच्यासमोर रस्ता मोकळा आहे. मला वाट देणे थोड्याश्या प्रयत्नांनी शक्य आहे. तरी 'उजव्या लेन' (जरा कल्पनाशक्ती वापरा) मधून हे बाबाजी साडेतीन किंवा पावणेचार च्या स्पीड ने चारचाकी हाकत असतात. रस्ता असा विचित्र असतो की भरकन डावीकडून ओव्हरटेक करणे (जे मूळातच चूक आहे) ते शक्य नसते. काही वेळा हा इसम त्याच्यापुढे दोन तीन गाड्यांचे अंतर ठेवून चालवत असतो. अशा वेळी डावीकडून ओव्हरटेक केलाच तरी तेव्हाच तो वेग वाढवून आपल्याला उजव्या लेन मधे येऊ देणार नाही अशीही शक्यता असते.

तात्पर्य, तो रस्त्याचा बादशाह असतो. आपण मांडलिक राजा असल्याप्रमाणे वागायचं असतं. संयत हॉर्न वगैरे क्षुद्र गोष्टींचा तो त्रास करून घेत नाही. रस्ता अडवण्याच्या महान कार्यापासून तो अजिबात विचलित होत नाही. अशी अडवणूक करताना (त्याच्या डोक्याच्या स्कॄची 'पिळवणूक' आकाशातला बाप करील काय ?) शिवाय 'मोबाईल कानाला लावलेला असणे' किंवा 'शेजारी बसलेल्याशी निवांतपणे गप्पा मारणे' अशा मोहक गोष्टीही तो कधी कधी करत असतो. मग अशा वेळी विधायक मार्गाने निषेध नोंदवावा का कायदा हातात घ्यावा, ह्याचा मी माझ्या त्या दिवशीच्या मन:स्थितीनुसार (आणि त्या बाबाजीच्या आकारानुसार !) विचार करत बसतो.

पण, हटकून अशा वेळी मला य! वर्षांपूर्वी वाचलेला एक लेख आठवतो..

जेव्हा इंटरनेट बोकाळलेले नव्हते तेव्हा (म्हणजे जग जवळजवळ रिमिक्सगाणीमुक्त होते तेव्हा आणि महाराष्ट्र आजच्यासारखाच टॅंकरमुक्त नव्हता तेव्हा ) एक ऍंटी व्हायरस संचेतन / आज्ञावली तयार करणारी कंपनी होती.. अतिशय वेगाने तिची भरभराट झाली होती, होत होती. तिच्या मुख्य कार्यकारी अधिका-याची ती मुलाखत होती. अर्थातच कंपनीतल्या कुठल्याही अत्यंत महत्वाच्या जागेसाठी शेवटची मुलाखत घेण्याचे काम तो स्वत: करायचा.

त्त्याने असं म्हटलं होतं की - हमखास काही कारणाने (लंच मिटींग वगैरे साठी) मी त्या उमेदवाराला बाहेर दूर कुठेतरी नेतो व त्याला गाडी चालवायला लागेल असे बघतो. बोलताना त्याच्या गाडी चालवण्याकडे माझे अतिशय बारिक लक्ष असते.. जे असेल ते असो, पण त्या निरीक्षणावरून जे संकेत मिळतात त्यांचा, त्याला निवडण्यामधे किंवा न निवडण्यामधे खूप वाटा असतो.

मला तेव्हा वाचून गंमत वाटली होती. कदाचित तेव्हाची ती CEO जगतातली एक नवीन फॅशन असेल, कदाचित मुलाखत रोचक करण्याची ती युक्ती असेल.. पण तेव्हा मला त्याचे म्हणणे काहिसे पटले होते.. आजकाल मला ते जास्तच पटते !

म्हणजेच एकूणात, गाडी चालवण्याच्या पद्धतीवरून माणसाचे साधारण व्यक्तीमत्व कसे आहे त्याचा काही बाबतीत अंदाज बांधता येतो असे मला वाटते.

आता ह्या बाबत काही मुद्दे आधी बघितले पाहिजेत :
१. गाडी चालवणे हे एक कौशल्य आहे, कलाही आहे. त्यामुळे एखाद्याची चित्रकला वाईट असेल किंवा एखाद्याला गुलाबाचे कलम करता येत नसेल किंवा फ्य़ुज बदलता येत नसेल तर लगेच तो माणूस अकार्यक्षम आहे असे अनुमान आपण काढत नाही, तसेच असे निरिक्षण म्हणजे काही लिटमस टेस्ट नव्हे. काही बाबतीत ढोबळ संकेत त्यावरून मिळू शकतात / शकतील एव्हढेच.
२. काही विशिष्ट बाबतीतलेच ठोकताळे आपण त्या निरिक्षणावरून बांधू शकतो. उदा. अर्थातच एखाद्याला वडा सांबार आवडते की नाही हे काही आपण जाणू शकत नाही :)
३. एखाद्याचा चेहरा किंवा पेहराव पाहून जे आपण प्राथमिक अंदाज बांधतो व ते जसे कधी कधी अगदी चुकीचे ठरू शकतात तसेच इथेही होऊ शकते. उदा. दुस-याला त्रास न देता पण अतिशय संथ गाडी चालवणारा प्रत्यक्षात 'डॅशिंग' (म्हणजे डॅश मारून जाणारा नव्हे !) असू शकतो. शिवाय वरिष्ठ किंवा जो कुणी बरोबर असेल त्यानुसार त्याच्या चालवण्याच्या पद्धतीत त्या वेळी चांगला वाईट फरक पडू शकतो.


मग ड्रायव्हिंग वरून जर अंदाज बांधायचे झाले तर साधारण बाबतीत ? त्या ड्रायव्हरच्या स्वभाव, व्यक्तिमत्वाच्या कुठल्या गोष्टी कळू शकतील ? त्यामागचे तर्कशास्त्र काय ?

मला असे वाटते की खालील गोष्टी पाहता येतील :

१. शिस्तबद्धता : वाहतुकीचे किती व कुठले नियम तो पाळत आहे. तो नियमाचा मतितार्थ आणि गरज समजून घेऊन पाळत आहे का बिनडोकपणे ? (आजकाल काही दुचाकी वाले असे करतात. उजवीकडे वळताना हात का दाखवायचा असतो ह्याची काही कारणे आहेत. ते काम ब्लिंकरनेही होऊ शकते, माफक व एक्दोनदाच हात दाखवला (कोटी अपेक्षित नाही :) ) तरी चालू शकते पण असा विचार न करता काही लोक फाडकन लांबलचक हात बाहेर काढतात. काही इंचावर असलेल्या दुस-या दुचाकीस्वाराच्या कानफटात बसायची थोडक्यात चुकते पण तो बिचारा भांबावतो निश्चित. शिवाय हात काढणा-याच्या चेह-यावर "नियम पाळला तरी हे क्षुद्र असे विचित्र नजरेने बघताहेत माझ्याकडे. खरोखरच शहराची स्थिती म्हणजे आजकाल.." असे भाव असतात. शेजा-याना भुंकून भुंकून बेजार करणारा राक्षसी कुत्रा 'पाळल्यासारखे' हे नियम 'पाळतात'.)

२. Driving is a co-operative effort. बाकीच्यांच्याही गाडी चालवण्याच्या हक्काचा तो आदर करत आहे का ? का एक मर्दूमकी दाखवण्याची संधी किंवा शर्यत म्हणून तो त्याकडे पाहतो ? पादचा-याना तो कस्पटासमान तर लेखत नाही ना ? अडवणूकीचे धोरण ठेवून रस्त्यातील वाहतूकीच्या प्रगतीला तो अडथळा तर बनत नाही ना ?

३. SWOT Analysis (Strengths, Weaknesses, Opportunities & Threats) नजिकच्या व दूरच्या भविष्यातील संधी आणि आव्हाने : तो अर्धा सेकंद, २ सेकंद, १० सेकंद, १ मिनिट, अर्धा तास ह्यानंतरच्या आसपासच्या स्थितीबद्दल काही अंदाज बांधतो आहे का ? केव्हा वेग वाढवावा, अडथळे आधीच कसे ओळखावेत वगैरे त्याला समजते आहे का ? उदा. तो समोरुन येणारा ट्रक रस्त्याचा तो अरुंद भाग अडवणार आहे तेव्हा थोडे आधी थांबून ट्रकला जाऊ द्यावे हे त्याला कळते आहे का ? का घाईघाईने जाउन ट्रकला खिंडीत गाठून दोन्ही दिशेला वाहतूकीची कोंडी करत आणि भांडत बसण्यात त्याला रस आहे ?
पुढच्या एखाद्या रस्त्यावरच्या स्थितीचा तो अंदाज बाधतो आहे का ? त्यानुसार नेहमीचा मार्ग बदलतो आहे का ?
आपल्या गाडीची क्षमता आणि आकार ह्याचे फायदे तोटे त्याला माहित आहेत का ? त्यानुसारच तो गाडी चालवतो आहे का ?

४. सहज शक्य असले तरी पुढे जाण्याची संधी तो संथपणामुळे किंवा सुरक्षिततेला नको एव्हढे महत्व देऊन गमावतो आहे का ? (त्याचे risk appetite किती आहे आणि calculative risk घेण्याची त्याची तयारी आहे का ?)


हे अर्थातच गणिती किंवा ठोक पद्धतीने करायचे विश्लेषण नाही. एकाच दिवशीच्या निरीक्षणावरून अनुमान काढणेही पूर्ण बरोबर नाही.. परंतू वर दिल्याप्रमाणे चालकाच्या व्यक्तिमत्वाच्या काही पैलूंचा आणि विशिष्ट परिस्थितींमधे त्याच्या प्रतिक्रियांचा अंदाज नक्की बांधता येईल / येतो असे मला वाटते. चालकाचा common sense ही कळू शकतो (हा गुण आजकाल फार कॉमन राहिलेला नाही).


थोडक्यात नाडीपरीक्षेसारखीच ही गाडीपरीक्षाही उपयुक्त ठरु शकते.

व्हॉट से ?

Dec 4, 2007

(घरच्याघरी) विनोदाची बनवाबनवी - १





रॉबर्ट: बॉस !

अजित: येस राबट ?

रॉबर्ट: बॉस, इसको गद्दारी करते हुए हमने रंगे हाथ पकडा है ! आप कहे तो इसको लिक्वीड ऑक्सिजन मे डाल दूँ ?

अजित: नो राबट. वो आयडीया बहोऽऽऽत पुराना हो चुका है..

रॉबर्ट: तो फिर ?

अजित: उसे साफ्टवेर प्रोजेक्ट मे डाल दो. क्लायेंट उसे जीने नही देगा और पीएम उसे मरने नही देगा !


- राफा

Nov 23, 2007

नोकरी आणि हिंदी शिणुमाचे ड्वायलॉक !

१. जुनी नोकरी :

भगवान के लिए मुझे छोड दो !


२. नवीन नवीन नोकरी :

जैसा मैने सोचा था, बिलकुल वैसाही पाया तुम्हे !



३. न मिळालेली नोकरी :

तुम मेरी दोस्ती तो क्या दुश्मनी के भी काबिल नही हो !



४. नोकरीत हातात नारळ मिळणे (अर्थात Lay-off !) :

वही हुआ जिसका डर था !



५. (चांगले उमेदवार न मिळाल्याने) अगतिक झालेली HR वाली:

बाबू, पूनममासी की रात को अगर तुम पहाडी पे न आये, तो मै कूदकर अपनी जान दे दूंगी !



६. आंतरराष्ट्रीय कंपनीत पहिला दिवस (Induction) :

हमारा फैला हुआ कारोबार है... और ये देखो, जहांतक नजर जाये, सब अपनी ही जमीन है !



७. (नको ते) लाड पुरवणारी कंपनी :

तुम्हे काम का बोझ बहुत है । ऐसा करो, कुछ दिनोंके लिए स्विट्झर्लैंड हो आओ !



८. employee about to abscond (to US ?) :

इससे पहले के किसीको कानोकान खबर हो, हम इस मुल्क से हजारो मिल दूर होंगे !



९. Best employee award घेता / देताना :

मैने क्या किया है, एक अच्छे शेहेरी होने के नाते ये तो मेरा फर्ज था की...
.. काश इस देश का हर नौजवान इसी तरह सोचे तो..



१०. Quality Audit :

तमाम गवाहोंको मद्दै नजर रखते हुए ये अदालत इस नतिजेपे पहुची है की..


११. अनपेक्षितरित्या व प्रमाणाबाहेर वाढलेला प्रोजेक्टचा स्कोप :

मैं तुम्हारे बच्चे की ... !!!

 

-- राफा


Oct 17, 2007

स्ट्रासबूर्ग प्रकाशचित्रे - २

धुके दाटलेले, झकास झकास !

(त्या सकाळी हवेतला रोमॅंटिकपणा वाढला होता.. आणि कामाचा मूड पार पळाला होता :) )

आंधळा मारतोय डोळा..

गॉगल घालून (तरी) आपण राजबिंडे वगैरे दिसू ह्या गैरसमजूतीत...

ट्राम !


लहानश्या कालव्याशेजारील लहानशी सुंदर वाट..

सुंदर त्यांचे घर ! खिडक्यांबाहेर कुंड्यांमधे भरून वाहणारी फुले.. अंगणातले तरतरीत गुलाबही माना उंचावून बाहेर आमच्याकडे पहात होते..




Oct 2, 2007

मुक्काम पोस्ट स्ट्रासबूर्ग

सध्या मुक्काम पोस्ट स्ट्रासबूर्ग (फ्रान्स) !
(इथल्या लोकांचा उच्चार "स्त्रास्बूख".. ह्या शेवटच्या ’ख’ चा उच्चार घशातून आणि अर्धवट करायचा :) ) :


इथली काही प्रकाशचित्रे :


कॅथेड्रल :






बातो मुश (अर्थात बोटीतून फेरफटका) :




’टिंबर फ्रेमिंग’ पद्धतीचे सुंदर घर :





युरोपियन पार्लमेंट :





कॅथेड्रल मधील सुंदर वर्तुळाकार काचचित्र (युरोपमधील बहुदा सर्वात मोठे) :


हे दुसरे कॅथेड्रल:


chateau de andalou वरून दिसणारे चिमुकलेसे सुंदर गाव:

chateau de andalou (ऑन्द्लू चा किल्ला :) )


Sep 11, 2007

सोनेरी पाणी ! (कथा)

बाहेर अंधार...

रातकिड्यांची मंद किरकिर..

मधूनच प्रकाश मिचकावणारा एखादा काजवा.

घरातही तसा अंधारच. पलिकडल्या देवघरात निरंजनाची मधूनच फडफडणारी ज्योत.. चित्रविचित्र आकाराच्या हलत्या सावल्या तयार करणारी.

आणि इकडे माझ्यासमोर टकमक डोळे करुन माईंची गोष्ट ऐकणारी बच्चे कंपनी.


रोजच्यापेक्षा हे किती वेगळं आहे.

पण छान वाटतयं... भाऊकाकांच्या कोकणातल्या घरात मी सारखा तोच विचार करत होतो..बरं झालं आलो इथे ते..


नाहीतर... वीकेन्ड रमाणीच्या कॉकटेल पार्टीमधे गेला असता. आधी त्याचे शंभर वेळा फोन! त्याच त्या गप्पा. शेअर बाजारच्या आणि त्याला मिळालेल्या नवीन कॉन्ट्रॅक्टच्या. आता फोनवर बोलायचे तेच पार्टीमधे ! मग फोन कशाला ?


मग 'हेजी, आपको तो आनाही है. पार्टीमे रौनक आत्ती हे' वगैरे. साला प्रत्येकाला हेच ऐकवत असेल. कंटाळा कसा येत नाही त्याला ? रौनक कसली लुच्च्या. आधी तुझे ते महागडे मंद दिवे बदलून टाक. मग येईल हवी तेव्हढी रौनक. साला बत्ती लावून उदबत्ती एव्हढा प्रकाश.


पण इथे.. ह्या अर्धवट अंधारातही चांगलं वाटत होतं.. मी वाचण्यापुरता लहान दिवा लावला होता. समोर माई पाचसहा मुलांना गोष्टी सांगण्यात तल्लीन झाल्या होत्या..

खरंच बरं झालं अविदादाला 'हो' म्हटल ते ! म्हणाला "कोकणात घेउन जातोय पोराना नाताळच्या सुट्टीत. गजाची फॅमिली पण आहे.. मग बॅचलर साहेब ? येताय का तुम्ही पण आमच्याबरोबर ? का निता बरोबर काही प्रोग्राम आहे ? नाहीतर पार्टी ठरलेली असेल कुणाकडेतरी.. " वगैरे वगैरे. मग थोडं सणकीतच हो म्हटलं.. नको तेव्हा कुटुंब वत्सल वगैरे असल्याचे दाखवतो.

पण आत्ता माईंची गोष्ट ऐकताना खरचं मस्त वाटत होतं.. ह्या माई म्हणजे भाईकाकांच्याच नात्यातल्या कुणीतरी... लग्नानंतर सहा एक महिन्यातच विधवा झालेल्या. तो आघात त्याना अगदी कोलमडून टाकणारा असणार ! असंख्य संकंट आणि दु:ख अपमानाचे चटके सोसले मग माईंनी.. काकूंनीच मला एका सगळं सांगितलं होतं.. मग शेवटी भाईकाका-काकूंनीच त्याना आधार दिला.

मी असाच कधी गेलो की अगदी मायेने चौकशी करायच्या माई.. कधी कधी तर मुलांबरोबर चक्क माझीही दृष्ट वगैरे काढायच्या. आयुष्यभर झळा सोसूनही त्यांचा चेहरा मात्र नेहमी हसतमुख असायचा .. चेष्टा करायची लहर आली की मिष्किल बोलून दोन्ही डोळे मिचकावायच्या आणि बोळक्या तोंडाने छान हसायच्या.

आताही गोष्ट सांगताना त्यांचा चेहरा खुलला होता.. मी आपला बसलो होतो आरामात पुस्तक घेऊन.. 'मुंबईत वाचायला वेळच मिळत नाही' वगैरे सांगून. पण अंथरुणात पसरलेली पोरं आणि रंगवून गोष्ट सांगणा-या माई बघून पुस्तकात काही लक्ष लागेना. अमाप दु:ख पचवलेल्या माई आजी आणि सुखाची तडस लागलेली ती त्यांची बिननात्याची नातवंडं !

ब-याच दिवसानी गोष्ट वगैरे ऐकायला छान वाटत होतं.. नाहीतर आत्ता त्या बोअरिंग पार्टीमधे असतो.. मला त्या कृत्रिम वातावरणाचा कंटाळा येतो अगदी. साले कॉन्टॅक्ट्स सांभाळायला पण इतकी लफडी. गुदमरायला होतं अगदी .. त्यातल्या त्यात मला आवडायची ती त्याची टेरेस.. गार मोकळा श्वास घेऊ देणारी. त्या उंचीवरून शहराचे असंख्या लुकलुकणारे दिवे दाखवणारी..

मी बरेच वेळा पार्टी सोडून दूर पाण्यात त्या दिव्यांची सोनेरी प्रतिबिंबे हलताना बघत राहतो..

... आत्ताही एक काजवा दिसला आणि मला त्या दिव्यांची नि टेरेसची आठवण झाली.. माईंची गोष्ट पुढे चालली होती...

"आणि बरं का.." माई पुढे सांगत होत्या "एव्हढं बोलून तो काळा पक्षी गेला उडून एकदम.. आला तसाच भुर्रकन ! आणि उडत उडत आकाशात गायब झाला.. थोडा वेळ सगळेच अवाक झाले ! मग त्या राजाच्या गुरुदेवानी सांगितलं.. अरु ! अभ्रा चोखू नाही बाळ.. हां.. तर काय सांगत होते ? हां.. राजाचे गुरु म्हणाले की त्या पक्ष्याची भविष्यवाणी खोटी ठरवायची असेल तर.. "

"वाणी म्हन्जे काय माई" कुणाचातरी पेन्गुळलेल्या आवाजात प्रश्न आला.

"अरे वाणी म्हन्जे तो मॅन नाय का रे आपल्या कॉर्नरच्या शॉपमधे असतो तो. होय की नाही माई?" एक उत्तरही आले मुलांमधूनच.

"हा‍त्तुझी !अरे सोन्या माझ्या.. वाणी म्हणजे तस नाही.. भविष्यवाणी म्हणजे.. उद्या काय होणार ते आजच सांगितलं नाही का त्या काळ्या पक्षाने ? त्या पक्ष्याचे बोलणे कधी खोटे व्ह्यायचे नाही... आणि त्यानं ते काय भयंकर सांगितलं माणसाच्या बोलीत ? की .. राजा ! तुझ्या राजकन्येच्या एका पायाला सहा बोटे आहेत. ते सहावं बोटं गायब केल्याशिवाय हिचं लग्न करु नका नाहीतर.. "

"नाहीतर काय माई.."

"नाहीतर... " माई अडखळल्या " नाहीतर खूप खूप वाईट होईल. लग्नानंतर काही दिवसातच हिचा पती.. "

.. आणि अचानक माई थबकल्या ! त्यांची नजर पार हरवली कुठे तरी.

त्या तशाच शून्यात काही क्षण बघत राहिल्या..

मुलंही गोंधळून त्यांच्याकडे पहात राहिली..

"मग काय झालं माई ?" ह्या प्रश्नाने माई एकदम भानावर आल्या... त्यांच्या डोळ्यात थोडं पाणी तरारल्यासारख वाटलं मला..

मग गडबडीने एकदम हसून त्या पुढे सांगू लागल्या. जणू काही काही क्षणांपूर्वी त्यांची तंद्री लागलीच नव्हती.. जणू काही गोष्टीतला तो 'खूप खूप वाईट' होण्याचा भाग घडणारच नव्हता कधी..

" बरं का.. मग काय झालं.. राजाच्या दरबारात एक मोठा जादूगार होता ! तो म्हणतो कसा "महाराज, ह्यावर एक उपाय आहे. इथून खूप लांब, राज्याच्या उत्तरेला, जंगलापलिकडे ओळीने सात पर्वत आहेत. त्या प्रत्येक पर्वतात एक राक्षस राहतो. सगळे एकापेक्षा एक शक्तीशाली आणि महाचतुर ! त्या पर्वतांच्या पलिकडे एक जादूचं तळं आहे. त्या तळ्याचं पाणी आहे सोनेरी..

“आईशप्पत ! सोनेरी पाणी !!! ”

“मग.. जादूचं पाणी होतं ना ते.. “

माई अगदी रंगवून गोष्ट सांगत होत्या आणि पोरंही तल्लीन झाली होती. माझ्या डोळ्यावर हळूहळू झोप चढत होती, पण गोष्ट पूर्ण ऐकायची उत्सुकताही होती आणि तेही माई आणि पोरांच्या नकळत.. हातातल्या पुस्तकाची तर मी दोन पानंही उलटली नव्हती !

पोरांसाठी गोष्ट असल्याने ‘हॅपी एन्ड’ निश्चीत होता !

गोष्ट चालली होती भराभर पुढे.. मधेच मी पुस्तकात डोकं घालत होतो आणि काही वेळातच माझ्याही नकळत गोष्ट ऐकू लागत होतो. . गोष्ट खूप आवडत होती मुलांना त्यांच्या चेह-यांवरून.

गोष्टीतला तो सोनेरी पाणी आणायला गेलेला गरीब पण हुशार तरुण एकेक पर्वत पार करत होता... कुठला राक्षस त्याला युद्धाचे आव्हान देई, तर कुठला खूप अवघड कोडे घालत असे.. सगळे अडथळे पार करत तो तरुण पोचला सोनेरी पाण्यापर्यंत !!

... तहान लागल्यासारखी वाटली म्हणून मी आत गेलो स्वैंपाकघरात.. काही सेकंद फ्रीज शोधल्यावर खजील झालो थोडा.. माठातलं गार पाणी पिऊन परत येताना, काहीसा नवीन जागेचा अंदाज नसल्याने अंधारात काहीसा ठेचकाळत, बुटक्या दाराला डोक आपटंत असा परत आलो.. घरात निजानीज झाली होती केव्हाच..

मी परत येऊन बसलो तेव्हा माई गोष्टीचा शेवट सांगत होत्या.. आता त्यांचा स्वर मला काहिसा कापरा वाटला.

".. आणि ते सोनेरी पाणी घातल्यावर राजकन्येच्या पायाचं सहावं बोट झालं गायब ! मग राजाने त्या तरुणाशी तिचं लग्न लावून दिलं ! राजाच्या गुरुदेवांनी दोघाना हजार वर्षं आयुष्याचा आशीर्वाद दिला... आणि मग ती दोघं खूप खूप सुखासमाधानात आणि आनंदात राहू लागली !!"

मध्यरात्र उलटून गेली होती.. तरिही कुणीतरी कुरकुरलेच "आज्जी, आजून एक गोष्ट.. "

"नाही रे बाळा.." थकलेल्या माई म्हणाल्या "उद्या सकाळी सगळे समुद्रावर जाणारात ना.. मग निजा आता"..

तशी एक दोन कच्चीबच्ची आधीच झोपली होती.. 'हॅपी एन्ड' न ऐकताच ! बाकीची मुलंही आडवी झाली.. त्याना सारखं करुन माईही लवंडल्या बाजूला.

त्यांचा थकलेला कृश देह पाहून कणव आली एकदम..

उठून विचारलं " माई, अंगावर काही घालू का पांघरायला ?"

"घालतोस ? घाल हो. आत्ता उकडतयं पण पहाटे कधी गार होतं.. झोप हो तूही आता"

"नाही.. बसतो जरा बाहेर दिवा घेऊन.."

"किती दिवसानी येता रे बाबानो.. आता पुढच्या वेळी येशील तेव्हा छान लग्न करुन ये हां .... निता ना रे नाव तिचं ? छान.. सुखी रहा " असचं काहीसं बोलत माईंचा डोळा लागलाही..

जवळचं पांघरुण उचलून त्याना घालायला गेलो.. आणि..

अचानक ते लक्षात आलं ! .. आज इतक्या वर्षानी ! सर्रकन काटा आला अंगावर !!

मी त्यांच्याकडे पाहिलं.. शांत चेह-याने निजलेल्या माई... ब-याच वर्षानी डोळे भरुन आले ते थांबेचनात..

त्याना घाईने पांघरुण घालून उठत होतो तरी डोळ्यातलं पाणी पडलंच खाली.. माईंच्या सहा बोटे असलेल्या डाव्या पावलावर ! .. कितीही इच्छा असली तरी ते सोनेरी मात्र असणार नव्हते !!

***


Aug 29, 2007

कन्फ्युजन तो है अटर !

आजकाल मला फार म्हणजे फार प्रश्न पडतात.. अंधा-या गुहेत अगदी घरच्या ओढीने वटवाघुळे उडत येऊन लटकावीत तसे हे प्रश्न येऊन माझ्या मेंदूत येऊन लटकून राहतात.

माझा मेंदू अंधारा असावा का ? आणि हे पहिल्याच दिवशी कळल्यामुळेच ' वर्षभर काय उजेड पाडणार आहेस ते दिसतंच आहे' असे शाळेत माझ्या एका वर्षीच्या खवट वर्गशिक्षिका म्हणाल्या असतील का ?

बघा ! सुरु झाले प्रश्न..

ज्या अतिप्रचंड वेगाने आजकाल रटाळ, निरस कौटुंबिक सिरियल्स येत आहेत, त्याहीपेक्षा जास्त वेगाने हे प्रश्न येत असतात. एकेका प्रश्नाच्या निरर्थक अद्भुततेने मुग्ध होत असतानाच पुढचा प्रश्न येतो. कधी कधी एक पुरला नाही तर पकडापकडीत साखळी केल्यासारखे चारपाच प्रश्न एकत्र येऊन मला 'आऊट' करतात.


आता 'कुछ रिश्तोंके नाम नही होते' च्या धर्तीवर 'कुछ सवालोंके जवाब नही होते' अस मी आपलं मला समजावत राहतो. पण प्रश्न थांबत नाहीत.. हेच पहा :


स्वर्गात पुण्य कमावलं तर त्याचं पुढं काय होतं ?

म्हणजे ऑलरेडी मोक्ष मिळाला असल्याने ते पुण्य 'कॅरी फॉरवर्ड' कसे करणार ?

बरं, स्वर्गात पापे केली तर मग काय करतात ? (लब्बाड ! लगेच अप्सरांचा 'विषय' आला की नाही मनात ?)

तर त्या स्वर्गातल्या पापांचे काय होते ? काहीच नाही होतं असं असेल तर हे म्हणजे अगदी भारतासारखं नाही का ? म्हणजे "जर (एकदाचे) तुम्ही 'पोचलेले' असलात की काहीही केलतं तरी फरक पडत नाही" असंच नाही का ? मग भारतालाच स्वर्ग का नाही म्हणत ? अमेरिकेत जाण्यासाठी लोक कशाला एव्हढे 'मरत असतात' ?

रिक्षात आजकाल संगीत का वाजवत नाहीत ? त्या भयाण संगीताची अनुपस्थिती सुखावह असूनही मला 'झकसी चकसी' असं काहितरी स्टिरीओफोनिक ऐकू न आल्याने रुखरुख का लागते ? (खड्ड्यांमधे रिक्षा आपटून ताल धरला जातो त्याने समाधान मानावे का ? .. कदाचित भरपूर खड्डे असलेल्या रस्त्यावर संपूर्ण 'कायदा' ही वाजत असेल ... पण रिक्षावाल्यांचा 'कायद्या' शी एव्हढाच संबध का असावा ? )

रिक्षा मधे पाशिंजरच्या डोक्याला लागेल असाच आडवा बार का असतो वर ? त्याना गिराव्हिकाचं डोकं वाचेल असं रिक्षांच धड (पक्षी : 'बॉडी' ) नसतं का बनवता आलं ? की रिक्षात हेल्मेट घालून बसायचं ?


चालू पीमटीमागे उभे राहिल्यावर तोंड काळे होते (आणि आत बसल्यावर डोळे पांढरे होतात ) तरी सुद्धा 'पीमटी वापरा प्रदूषण टाळा' असा निरागस निर्लज्जपणा करायला ते कुठे शिकले असावेत ?

सीट कव्हर घट्ट बसलेली एम ८० कुणी पाहिली आहे का ? (डीलर ने तरी ?)

ब-याचदा बायका रस्त्याने चालताना, लहान मुलाना ट्रॅफिकच्या बाजूला ठेवून आपण स्वत: अजागळपणे भलतीकडेच बघत का जात असतात ?

'पाणी आडवा पाणी जीरवा' ! पण कुठे अडवा आणि कुठे जिरवा ? ह्या असल्या वाह्यात संदिग्ध पाट्या लिहिणा-याना लिहिण्यापासून अडवले पाहिजे मग तरी त्यांची 'जिरेल' का ?

उजव्या लेनमधून ट्रॅफिक अडवत चालवणारे मारुती ८०० वाल्याना आपण प्रकाशाच्या वेगाने जातोय असं का वाटत असतं ? आपल्या पुढे जाणारे सायकलवाले ते बघत नाहीत का ?

चहा 'टाकू का' विचारतात आणि कॉफी मात्र 'करु का' असे का ?


हे आणि असेच कितीक प्रश्न !


आता मला हे सगळे प्रश्न 'पडतात' का माझ्यासमोर हे प्रश्न 'उभे राहतात' ?

हाही एक प्रश्नच आहे !

Aug 17, 2007

रेड ऑन एन्टीबी !

खूपच दिवसानी रेड ऑन एन्टीबी (एन्टेबी ?) पाहिला... आणि पुन्हा एकदा तेव्हढाच आवडला ! वेगवेगळ्या कारणांसाठी. अर्थातच सर्वात महत्वाचे कारण म्हणजे ह्या सत्यघटनांमधले थरारनाट्य आपल्यापर्यंत पोचवण्यात चित्रपट कमालीचा यशस्वी होतो.

१९७७ चा असला आणि टि.व्ही. साठी बनवलेला असला तरी आजही त्याची निर्मीतीमूल्ये चांगली वाटतात... उत्तम दिग्दर्शक व अभिनेते आहेत... बराचसा चित्रपट डॉक्युमेंटरीच्या शैलीत आहे आणि म्हणून(ही) प्रभावी वाटतो.

चित्रपट ज्यावर बेतला आहे तो घटनाक्रम साधारण असा होता :

जून २७, १९७६ रोजी एअर फ्रान्सचे विमान अथेन्सहून पॅरीसला जाण्यासाठी सुटले. ते विमान आधी तेल अवीव हून निघाले होते.. साधारण अडीचशे प्रवासी असलेल्या ह्या विमानाचे अपहरण पॅलेस्टीनी (PFLP) व जर्मन अतिरेक्यांनी केले. मधे लिबीयात इंधनासाठी थांबून ते विमान थेट युगांडात एन्टीबी विमानतळवर उतरवण्यात आले.

त्या ४ अपहरणकर्त्यांना अजून अतिरेकी नव्याने येऊन मिळाले. विमानतळाच्या एका इमारतीत सर्व प्रवाशाना कोंबण्यात आले. इमारतीभोवती स्फोटके लावली गेली. अतिरेक्यांची मुख्य मागणी जाहीर करण्यात आली की वेगवेगळ्या देशात (मुख्यत: इस्त्रायल मधे) कैदेत असलेल्या चाळीस पॅलेस्टीनींची सुटका करावी नाहीतर ओलीस ठेवलेल्या प्रवाशांना ठार मारले जाईल.

ह्या सर्व प्रकाराला युगांडाचा सर्वेसर्वा (राष्ट्राध्यक्ष/लष्करशहा) इदी आमीन ह्याचा पाठींबा होता. युगांडाच्या लष्करातील सैनिकही ह्या इमारतीभोवती पहाऱ्यास होते.

लवकरच इस्त्रायलचे नागरिक व ज्यू (सुमारे १००) सोडून बाकी प्रवाशांची मुक्तता करण्यात आली. अतिरेक्यांनी त्यांची मागणी पूर्ण करण्याची मुदत वाढवून १ जुलै ऐवजी ४ जुलै केली.

अतिरेक्यांशी चर्चाही न करणाऱ्याचे धोरण असलेल्या इस्त्रायल पुढे हा मोठाच पेच होता. त्यात आंतरराष्ट्रीय राजकारणाची गुंतागुंत तर होतीच पण अंतर्गत परस्परविरोधी मतांचा दबाव आणि चुकीच्या पद्धतीने परिस्थिती हाताळल्यास लोकक्षोभाचीही भिती होती.

पण अखेर...

इस्त्रायलने जे केले त्याला लष्करी कारवायांच्या इतिहासात क्वचितच तोड सापडेल !!!

जुलै ३ ला, तुटपुंज्या वेळात आणि अतिशय गुप्तपणे आखलेल्या लष्करी कारवाईचा आरंभ झाला. अडीच हजार मैल प्रवास करुन इस्त्रायलची २०० सर्वोत्तम सैनिक/कमांडोज ची तुकडी ३ विमानानी युगांडात उतरली... थेट एन्टीबी विमानतळावर !

अतिरेक्याना मारुन प्रवाशांची सुटका करणे हे या मोहिमेचे मुख्य लक्ष्य होते. अर्थातच मधे पडलेच तर युगांडाच्या सैनिकाना गारद करणे ('neutralize' हा शब्द मला आवडतो) हा भागही आधीच ठरवला गेला होताच

वेगवेगळ्या कारणांसाठी इस्त्रायल असे काही करेल अशी सुतराम शक्यता नव्हती. अचानक झालेल्या हल्ल्याने अतिरेकी व युगांडाचे सैनिक गडबडले.. त्या धुमश्चक्रीत सर्वच्या सर्व ७ अतिरेकी मारले गेले. २० युगांडन सैनिक गारद झाले. दुर्दैवाने एक इस्त्रायली कमांडो कामी आला व १०० प्रवाशांपैकी तीन मारले गेले. ही लढाई सुमारे अर्धा तास चालली होती. पाठलाग करु नये म्हणून विमानतळावरच्या युगांडाच्या ११ मिग विमानांनाही (म्हणजे एक चतुर्थांश युगांडन हवाई दल !) नष्ट करण्यात आले !

हा सर्व घटनाक्रम इतका सनसनाटी, थरारक आणि आश्चर्यकारकही आहे की बघून थक्क व्हायला होते.. मुळात सत्य घटनाच एव्हढ्या नाट्यपूर्ण आहेत की काल्पनिक प्रसंगांची जोड देण्याची गरजही नाही. चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'Raid on Entebbe' हे हॉलिवूड version आहे असे कुठे जाणवत नाही. एकतर सुरेख दिग्दर्शन, अभिनय आणि दुसरे म्हणजे सत्य घटनांशी बरेचसे प्रामाणिक राहणे यामुळेच चित्रपट जमला आहे. (ह्या घटनेवरच आधारित दुसरा चित्रपट म्हणजे - इस्त्रायलचे जे version आहे - 'व्हिक्टरी ऍट एन्टिबी' तोही मी पाहिला होता. त्यात बर्ट लॅंकेस्टर, ऍंथनी हॉपकिन्स वगैरे अभिनेते असूनही त्यापेक्षाही 'Raid on..' च अतिशय सरस झाला आहे !)

एक घटनाक्रम म्हणून एकाच वेळी जो थरार आणि सुरसता (युद्धस्य कथा.. ) आहे त्यात मला रोचक/महत्वाच्या वाटलेल्या गोष्टींपैकी काही :

  • अथेन्स विमानतळावर सुरक्षा रक्षकांचा संप अतिरेक्यांच्या पथ्यावर पडणे
  • एका इस्त्रायली कंत्राटदाराने एन्टीबी विमानतळ बांधल्याने त्याच्या अंतर्गत रचनेची माहीती ('मिलिटरी इन्टेलिजेन्स' साठी) उपयोगी पडणे. तसेच सुटका झालेल्या प्रवाशांच्या मदतीने अतिरेक्यांची रेखाचित्र काढून कमांडोजना ती तोंडपाठ करवणे.
  • एकीकडे नमते घेतल्याचे दाखवून.. अतिरेक्यांशी चर्चेस तयार होऊन, त्यांची मागणी ऐकून घेऊन, मुदत वाढवून घेऊन.. दुसरीकडे, प्रवाशांच्या सुटकेसाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करणे (अशक्यप्राय वाटणार्या लष्करी कारवाईचीही तयारी करणे)
  • चित्रपटात चार्ल्स ब्रॉन्सन म्हणतो तसे यशस्वी मोहिमेचे मर्म : ' स्पीड, सायलेन्स ऍंड कम्प्लीट सरप्राईज !'
  • इदी आमीन वापरायचा तशीच काळी मर्सिडीज विमानातून आणून ती कारवाईत वापरणे - ह्या युक्तीला दाद द्यावी तितकी कमीच ! (इदी आमीन कधीतरी येऊन परिस्थिती बघून जायचा / प्रवाशांसमोर नाटकी भाषणबाजी करून नक्राश्रू ढाळायचा .. त्यामुळे इमारतीच्या दरवाजाबाहेर असलेल्या अतिरेक्याना वाटते की त्या विक्षिप्त इदी आमीनचीच शाही स्वारी आली आहे एव्हढ्या रात्री.. पण आत काही इस्त्रायली सैनिक असतात. तशाच मर्सिडिजमुळे अगदी जवळ जाईपर्यंत अतिरेक्याना संशयच येत नाही )
  • "परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण असणारे अतिरेकी (जरा संशय आला तरी नि:शस्त्र ओलीस लोकांवर सेकंदात गोळ्यांचा वर्षाव करण्याच्या परिस्थितीत असलेले), स्फोटकानी वेढलेली इमारत, युगांडन सैनिकांचे सहकार्य" विरुद्ध "अडीच हजार मैल प्रवास करुन आलेले, अनोळखी देशात नि तुलनेने अपरिचित इमारतीत शिरून एकाच वेळी अतिरेक्यांचे शिरकाण आणि प्रवाशांची सुरक्षा व सुटका अशी अतिअवघड जबाबदारी असलेले इस्त्रायली सैनिक" !
  • एक राष्ट्र म्हणून ठाम उभे राहणारे इस्त्रायल. अतिशय कणखर , अतिरेक्यांपुढे न झुकणारे आणि आपल्या नागरिकांच्या सुटकेची विलक्षण काळजी असणारे नेतृत्व ! ज्याला act of war म्हणता येईल (दुसर्या देशाच्या हवाई हद्दीत विमाने घुसवून, उतरवून, सैनिकी कारवाई करणे) असे धाडस योग्य कारणासाठी, कुणाची परवानगी घेत न बसता व नंतरच्या आंतरराष्ट्रीय विरोध व निंदेला न घाबरता आत्मविश्वासाने करणे.. खरोखरच ह्या छोट्या राष्ट्रापासून किती तरी शिकण्यासारखे आहे ! (आपल्या व त्यांच्या असंख्य गोष्टीत (parameters) फरक असला तरी, 'पोलादी नेतृत्व', 'आपल्या देशातील नागरिकांची काळजी व संघभावना' व 'एक राष्ट्र म्हणून स्पष्ट व ठाम भूमिका' ह्या गोष्टींचे महत्व व आवश्यकता वादातीत नाही का ?)
  • विमानाचा फ्रेंच पायलट व कर्मचारी ह्यानी सुटका केली असता जायला चक्क नकार दिला ! 'अजूनही कैदेत असणारे १०० प्रवासी हीसुद्धा आमचीच जबाबदारी आहे' अशी भूमिका पायलटने घेतली आणि त्याच्या सहकार्यांनी त्याला पाठींबा दिला व ते तिथेच राहिले.. ह्या शौर्याबद्दल व आपल्या व्यवसायाशी असलेल्या निष्ठेबद्दलही त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच, पण नंतर सुटका झाल्यावर एअर फ्रान्सने नेमक्या ह्याच कारणासाठी पायलटला काही दिवस चक्क सस्पेंड केले होते !

असा हा नाट्यपूर्ण 'रेड ऑन एन्टीबी' जरुर मिळवून पहा !

घटनाक्रमाची अधिक माहिती :

http://en.wikipedia.org/wiki/Operation_Entebbe

चित्रपटाविषयी अधिक माहिती :

http://www.imdb.com/title/tt0076594/


Jul 31, 2007

उलटे जगा !

नाही, कृपया गैरसमज करुन घेऊ नका.
'किंग सोलोमन्स माईन्स' मधल्या त्या वन्य जमातीसारखं झाडाला लटकून "उलटे" जगा असा अर्थ अभिप्रेत नाहीये..

किंवा ही क्षुद्र मानवयोनी त्यागून 'वेगळ्या' जगात प्रवेश करुन तिथल्या पद्धतीप्रमाणे 'लटका' असही म्हणायचं नाहीये..


आता असं बघा,
"आत्ता तर शहात्तरावं लागलयं, अजून काही वर्षांनी येईल समज"
किंवा
"आज शून्य वर्षांचा झालो, आता ह्यापुढे असेल तो बोनस !"


अशासारखी वाक्यं ऐकायला मिळाली तर गोंधळ उडेल ना अंमळ ? हे 'उलटं जगा' मुळे होईल !

तर, उलटं जगा म्हणजे 'लिव्ह बॅकवर्डस' ह्या अर्थी ! अमेरिकेत असताना मला एका फिरंगी सहकाऱ्याने सांगितलेली ही कल्पना.. त्याला त्याच्या मित्राने सांगितलेली ! 'ऐसा होता तो कैसा होता' टाईपच्या ह्या विचाराचा गाभा असा की आपण आयुष्याचे टप्पे उलट क्रमाने जगलो तर ? ...

म्हणजे जन्मल्या जन्मल्या जर्जर वार्धक्य, ती आजारपणं, ते रिकामपणं, त्या संध्याछाया ( काहीतरी बरचं करायचं राहून गेल्याची चूटपूट वगैरे.. ) मग वय वाढेल (?) तसं उलट येत येत पन्नाशी, चाळिशी..

असं करत करत सळसळते (किंवा मुसमुसलेले वगैरे ) तारुण्य... तेव्हा प्रेमात पडणे (नि उभं राहणे, पुन्हा पडणे वगैरे)

आणि..

आयुष्याच्या अगदी शेवटचा टप्पा म्हणजे बालपणं !!!

तेव्हा एककलमी कार्यक्रम म्हणजे केवळ शिट्या मारणे ! 'करणे' काहीच नाही.. पूर्वी संस्थानिक जसे नुसते 'असायचे'... 'करायचे' काहीच नाहीत तसंच. म्हणजे एकंदर बर्याच लहान मुलांसारखं.. आपल्या अर्ध्या चड्डीला मॅचींग टी-शर्ट कुठला वगैरे भानगडी इतरानी सांभाळाव्यात.. आपण असेल त्या कपड्यात (नाहीतर तसंच !) फिरत रहायचं चकाट्या पिटत..

मस्त ना ?

मला तर कल्पना एकदम आवडली.. आधी ताटातला नावडता पदार्थ (उदा. 'सोप्प्या पाककृती' तून बघून, खूप कष्ट घेऊन केलेली एखादी भयप्रद भाजी वगैरे) एकदाचा संपवून, मग चढत्या क्रमाने उत्तमोत्तम पदार्थांचा चवीने आस्वाद घेत अगदी शेवटी अत्यंत आवडता (गोड) पदार्थ खावा तसंचं काहीसं !

आयुष्याच्या शेवटी नो चिंता, नो डेडलाईन्स, नो जबाबदारी, नो ऑफिस, ना खंत ना खेद.. फक्त शिट्या मारणे ! आनंदात बागडणे !

नाहीतरी म्हातारपणं म्हणजे दुसरं बालपणं असं म्हणतातचं ना, पण ते खरखुरं बालपणं असलं तर काय मज्जा ना.. म्हणजे कुठल्याही गोष्टीला उशीर होतोय म्हणून पळापळ चाललेली नाहीये (असलीच तर दुसर्यांची .. आपण निवांत !) , आपल्या वाह्यात गोष्टींचे कौतुक होतयं ("आमच्या वरचे आजोबा कसे शिंकतात ह्याची इतकी छान नक्कल करतो ना.. दाखव रे !") , आपली काळजी मायेने आणि उत्साहाने घेतली जाते आहे, आवडते पदार्थ आणि खेळणी कमीअधिक प्रमाणात कांगावा करुन पदरात पाडून घेता येत आहे वगैरे..

ही फॅन्टसी प्रत्यक्षात आली बरीच उलथापालथ होईल ना ? वय ठरवण्याचीही पद्धत ठरवावी लागेल.. म्हणजे त्या वर्षीच्या सरासरी आयुष्यमानानुसार जन्माच्या वेळी एक वय ठरवायचे (उदा. ८०) आणि मग कमी करत करत शून्यावर आणायचे. मग उणे एक, उणे दोन असे मोजत रहायचे. हाच तो बोनस !

आपण तरूण असताना मुलं होतील ती म्हातारी ('दुसरे बालपण' फेम) ! त्या 'चिमुकल्यां' ची आपण वेगळ्या प्रकारे काळजी घ्यायची.. पण त्यांच्या उपजत अनुभवाचा (!) फायदा मात्र त्याना आणि आपल्याला होणार.. आपण लहान झालो की ते तरूण होणार आपली काळजी घ्यायला.. आणि तेव्हा त्यांच्या मुलांचे म्हणजे आपल्याच नातवंडाचे पांढरे केस पाहून आपल्याला गंमत वाटेल !

आता काही अनुत्तरीत प्रश्न आणि मुद्दे आहेतच ह्या फॅन्टसी मधे.. पण आज जरी ही फक्त कल्पना असली तरी काही सांगता येत नाही ! अनेक अद्भुत कल्पना विज्ञानाच्या सहाय्याने प्रत्यक्षात आल्या आहेत, येत आहेत.. कुणी सांगाव, ह्या धर्तीची कल्पना कुणीतरी राबवेलही अमुक एक वर्षांनी !

तर तोपर्यंत तरी 'सुलटच' जगूयात !!! :)




Jul 12, 2007

कोडे - अजब यंत्र !

एक यंत्र आहे (मशीन ! मशीन ! )
मी त्या यंत्रावर १२० असा काऊंटर देतो (enter करतो).
(म्हणजेच मी त्या यंत्राला १२० 'युनिट्स' काहितरी काम करायला सांगतो आहे. बरोबर ?)
तर मग ते मशीन थोडा वेळ चालते. आणि बंद होते.
आत दुसऱ्या वेळी मी ९० 'युनिट्स' असा काऊंटर enter करतो..
आश्चर्याची गोष्ट अशी की ९० हे १२० पेक्षा कमी असूनही दुसऱ्या वेळी ते यंत्र जास्त काम करते.

हे कसे काय ???


उत्तर इथेच सांगा किंवा मला इथे धाडा : rahulphatak28@gmail.com
अर्थातच ज्याना डोके चालवायचे असेल त्यानी कॉमेन्टस बघू नका :)

टीप : 'counter' आणि 'Units' ह्याना मराठी प्रतिशब्द आधी वापरून मग कंसात इंग्लिश शब्द द्यायला आवडले असते पण नेमके शब्द पटकन सुचले/सापडले नाहीत. (कोडे तुम्हाला घालायची घाई !!! :) )

Jul 7, 2007

चल धन्नो !

चल धन्नोऽऽऽऽ ! आज तेरी बसंती की इज्ज्त का सवाल है !!!

‘शोले’ किती वेळा पहिला ? गणती नाही ! किती वेगवेगळ्या प्रकारे त्याचा विचार केला ? मोजदाद नाही ! एक वेळ अशी होती (कदाचित आजही) की संवादाशिवायही असलेला तुकडा काही सेकंद ऐकवला (ध्वनी / पार्श्वसंगीत) तरी मी सीन कुठला ते सांगू शकत असे..

तो शेवटी एक चित्रपट आहे, एक व्यावसायिक चित्रपट आहे .. आत्यंतिक यशस्वी, एक वेगळेच वलय असलेला, पुन्हा न होऊ शकणारा पण तरीही शेवटी एक चित्रपट आहे !

आफ्टर ऑल इट्स अ मूव्ही ! तरीही …

तरीही... एका मोठ्या क्लायमॅक्स ची सुरुवात होताना ..
म्हणजेच बसंती गावाबाहेर वीरुची तळ्याच्या काठी वाट पहाताना गब्बरच्या टोळीतले डाकू तिला गाठतात तेव्हा ..
जेव्ह्या त्यांच्या अभद्र प्रतिमा तळ्याच्या पाण्यात उमटलेल्या दिसून वीरुच्या स्वप्नात रमलेल्या तिला खाडकन जाग येते तेव्हा …
आणि लगबगीने ती तिच्या टांग्याच्या दिशेने पळते तेव्हा ..
आपल्या लाडक्या धन्नो घोडीवर चाबूक चालवून ती तिला साकडं घालते तेव्हा …

टु बी प्रिसाईज,

ती जीवाच्या आकांताने ‘चल धन्नो, आज तेरी बसंती की इज्जत का सवाल है !’ म्हणते तेव्हा …

तेव्हा… प्रत्येक वेळी ... माझ्या डोळ्यात सटकन पाणी येतं ! हाताच्या मुठी वळल्या जातात .. ‘रौंटे खडे हो गये’ असा काहीतरी अनुभव येतो .. दर वेळी तशाच अंगाला झिणझीण्या येतात आणि मी आर. डी. च्या पार्श्वसंगीतात थडथडणारा पं. सामताप्रसाद यांचा तबला ऐकू लागतो .. श्वास रोखून तो पाठलाग पाहू लागतो !

नाऊ प्लीज ! डोन्ट गेट मी रॉंग ! लाऊड, बटबटीत अतिप्रंसग किंवा हिंसा हे खोटे आहेत, चित्रपटाचा भाग आहेत हे उमजण्याच्या वयानंतर प्रगती करत करत आता मी शांतपणे चॅनल चेंज करुन त्या प्रसंगापासून ‘डिटॅच’ होऊ शकतो ! (आणि ह्याउलट म्हणजे मी(ही) पहायच ते आणि पहायच तेव्हा पहातोच ! हिडीसपणा आणि कल्पना दारिद्र्य नसलेले उन्मादक गाणे किंवा प्रसंग हिंदी चित्रपटाच्या चौकटीचा भाग म्हणून काहिही वावगे न वाटता इतर कुणाहीप्रमाणे एन्जॉय करतोच ! )

तर मग हाही हिरॉईनच्या पाठी गुंड लागणे (आणि बहुतेक वेळा योग्य वेळी हिरो येणे) हा बराचसा 'घिसापिटा'च प्रसंग ना ?
पण मग ह्याच प्रसंगात झिणझिण्या येण्यासारखं असं काय आहे कळत नाही ! काहीतरी आत होतं हे खरं ! आणि प्रत्येक वेळी का ?

हेमा मालिनी बसंतीच वाटते म्हणून ?

का अधाशी, रानटी डाकू तिच्या मागे लागल्याची 'नॅचरल रिऍक्शन' म्हणून ?

का मेलोड्रॅमॅटीक, स्टाईलाईज्ड आणि तरीही अतिशय जमून गेलेल्या प्रसंगाला नकळत दिलेली दाद म्हणून ?

हे सगळ आहेच ! नक्कीच !

पण कदाचित अजून काहितरी असतं / आहे ह्या प्रसंगात, जे दर वेळेला भिडतं !

चल धन्नो !!! येस ! तो आक्रोश ! तोच बरचं काही सांगून जातो.

ती हाकच सांगते की बास ! दॅट्स इट ! धिस इज ‘द’ मोमेन्ट !

धन्नो ! ‘भाऽऽऽग’ !

अगं माझ्या पाठी हे लांडगे लागलेत ! तुला आजवर आपल्या हाताने मोठं केलं, ओला चारा खाऊ घातला, मायेने कुरवाळलं ! आज आत्ता त्या सगळ्याच मोल मला हव आहे.. माफ कर मला अशी वसुली केल्याबद्दल ! पण काय करु ? आज पायाखालची जमीनच सरकली आहे.. आज तेरी बसंती की इज्जत का सवाल है !

कदाचित प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग येतो ! आर या पार ! हे हे... ते ते... अजूनही काही काही.. सगळं सगळं केलं .. कष्ट उपसले, डोक चालवलं, काळजी घेतली, नियम पाळले … त्याचं फळ आत्ता, ह्या क्षणी हवय ! नाहीतर सगळ व्यर्थ !

बसंती फाटलेल्या आवाजात चित्कारते: 'भाऽऽग' !!!

विचार करु नकोस धन्नो, विश्वास ठेव माझ्यावर आज समरप्रसंग आहे.. पळत सुट बेफाम ! रस्ता जाईल तिथे ! वाट फुटेल तिथे ! दगड धोंडे, काटेकुटे ह्याची पर्वा न करता, उर फुटेपर्यंत फक्त पळत सुट ! तुझ्या मालकिणीची अब्रू धोक्यात आहे ! ह्या पेक्षा मोठ कारण तुला काय हवयं ? आज तेरी बसंती की इज्जत का सवाल है !

धन्नो मन लावून धावू लागते… तिच्या नालेला ठेचाळत मागे जाणाऱ्या एकेका दगडाकरता एकेक मात्रा मोजत तबला थिरकु लागतो !

ते आहेतच मागे ! आता ही कुठे जाते ? हीला गाठायचीच आणि सरदाराला खूश करुन टाकायचे ह्या मस्तीत, ह्या जिद्दीने घोडेस्वार मागे लागलेलेच असतात.. टांग्याला हात घालायचा प्रयत्न करत .. एक तर पोचतोही टांग्यात .. पण बसंती प्रसंगावधान राखून टांग्याच्या एका बाजूचा दिवा त्याच्या टाळक्यात हाणते ! तो घरंगळतो बाजूला …

पाठलाग चालूच आहे !

अजून संकट सरलेलं नाही .. श्वास आहे तोपर्यंत धावायच आहे धन्नो ! माझ्याबरोबर टांग्याचं ओझ वहात, मागे घोड्यांवर बसलेल्या जनावरानां मागे टाकायच आहे… माझा वीरु येईलच तोपर्यंत ! (तो निघालाही आहेच ! धनगर पोराने दाखवल आहे त्या दिशेला .. ज्या दिशेला टांगा आणि त्या मागून घोडेस्वार गेले आहेत ! झपाट्याने झणाणणारं गिटार वाजतय … मनाला थोडी आश्वासक वाटणारं.. उभारी देणारं .. पण, तरीही शेवटी धोक्याचं संगीत मिसळतय त्यात … )

इकडे धन्नो धावत्ये .. सर्व शक्ती एकवटून धावत्ये !

आणि … एका खडकाला आपटून टांगा कलंडतो .. टांग्यापासून सुटून धन्नो पुढे जाते !
पण तिचं भान सुटलय !!! डोक्यात एकच लक्ष्य त्या मुक्या जनावराच्या … धावायचंय ! मालकिणीला सोडवायचयं ! आणि त्यासाठी … धावायचयं !

ह्या एकाच वेडाने संमोहीत झाल्यासारखी बिचारी धन्नो धावत पुढे निघून जाते ! तिला हे जाणवतंच नाही की आता तिचं धावण व्यर्थ आहे.. तिला दूर जाताना पाहून तस्सच काळजात चर्र होतं दर वेळेसारखं...

आणि जणू काही हा नव्यानेच धक्का बसल्यासारखा मी उदास होतो ! ‘भाऽऽग’ च्या वेळी आलेल्या झिणझिण्या अजून गेलेल्या नसतात !


...

आणि मग काही वेळाने मी वास्तवात परत येतो ..

ओह येस.. अफकोर्स, आफ्टर ऑल इट्स जस्ट अ मूव्ही !!!

Jun 27, 2007

यादों की बारात !

राहुल देव बर्मन !!!

२७ जून !

आज 'पंचम'चा जन्मदिवस !

आज दिवसभर त्याच धुंदीत राहणार ! रोज एक 'ट्रॅक' सतत चालू असतोच.. पण आज विशेष !!!

असंख्य गाण्यांच्या अगणित आठवणी... अनुभवलेले असंख्य सुंदर क्षण ! अनेक कार्यक्रम, मुलाखती, खास 'किस्से'. महाजालात तर अतिशय जबरदस्त नि सुंदर माहिती उपलब्ध आहे..

काय करु ? randomly आवडती गाणी झरझर लिहू ? मग एखादे अत्यंत आवडते निसटले तर ? हरकत नाही... हा काही 'ज्ञान' दाखवायचा दिवस नाही...

अप्रतिम अनुभव देणारी,
मनाला उभारी देणारी,
झिंग चढवणारी,
नाचायला लावणारी,
वेगळ्याच जगात घेऊन जाणारी,
ठेका धरायला लावणारी,
आसमंतात रोमान्स पसरवणारी,
विविधरंगी
विविधढंगी
गाणी देणाऱ्या पंचमची आठवण अजूनच तीव्र होण्याचा हा दिवस ! कृतज्ञ होण्याचा दिवस !

पार्श्वसंगीताने अनेक चित्रपटांतील प्रसंगाना वेगळी उंची देणारा आर डी हा एक वेगळाच आवडीचा विषय !

काय लिहू ? किती लिहू ?

ह्म्म्म्म... आवडती गाणी लिहायला सुरुवात केली आणि...

फिझूल आहे प्रयत्न !!! :)..

तरीही ह्या आठवड्यात/ गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा (काही काही हजराव्यांदा) ऐकलेली, अजूनही काहितरी नवे सापडणारी, पुन्हा नव्याने आवडलेली नि भिडलेली random गाणी :

यादोंकी बारात - टायटल सॉंग - both male and female versions
यहा नही कहूंगी - मि. रोमिओ
राह पे रहेते है - किशोर - नमकीन
क्या यही प्यार है - रॉकी
मेहबूबा - शोले
संग मेरे निकले थे साजन - फिर वोही रात
जिया ना लागे मोरा - बुढ्ढा मिल गया
इश्क मेरा बंदगी है - ये वादा रहा
राजा बना मोरा छैला कैसा - गरम मसाला
प्यार करता जा - भूत बंगला


बास... हाही खटाटोप फिझूल वाटतोय..

एखादे गाणे हवे असल्यास मला जरुर मेल करा : rahulphatak28@gmail.com

जय पंचम ! :)

Jun 14, 2007

आंधळा मागतो एक डोळा, आणि देव देतो गॉगल !

क्षणभराचे काम, युगायुगांचा विसावा
'देव' हा इसम बहुतेक भारतीय असावा !

गार्‍हाणी नेऊन त्याच्या दारी
मारे आपण हाकाट्या पिटतोय
तक्रारीची खिडकी बंद करून
तो आत चकाट्या पिटतोय !

'प्रोजेक्ट विश्व' पेलायची लायकी
ह्याचाच शेवटी प्रश्न उरतो
देवाच्या 'वर' कुणीच नाही तर,
त्याचे 'अप्रेजल' कोण करतो ?

हे विश्व म्हणजे काय 'पीमटी' आहे ?
की कुणीही भाड्याने चालवावी !
देवाच्या हातात किल्ल्या देऊन ,
आपण आपली लाज का घालवावी ?

अश्या गोष्टी 'आऊटसोर्स' करून,
कधीच फळ मिळत नाही..
आता बसा बोंबलत, देवाला
आपला ऍक्सेंट कळत नाही !

काही देवमाणसांकडून तो
थोडी माणूसकी घेईल काय ?
विश्वविधाता वगैरे राहू देत
साधा माणूस तरी होईल काय ?

त्याच्यावर ठेवू विश्वास, पण
त्याचा आपल्यावर बसेल काय ?
'गॉड अट वर्क' ही पाटी
स्वर्गात तरी दिसेल काय ?

देवांचे देवांसाठीचे ते राज्य
तीच तर त्याची लोकशाही !
वरवर लोकांसाठी सर्व अवतार
पण तो मूळचा पडला शेषशाही !

- राहुल फाटक


***

Jun 8, 2007

लिखाण-ए-गंमत

ब्लॉग चालू करताना मनामधे इस्टमन + फुजी + टेक्नीकलर विचार होते. 'रोजी' जे सहज उस्फूर्त वाटते ते सटासटा लिहून काढायचे आणि मग 'रोटी'च्या कामाला लागायचे (हा क्रम उलटाही होऊ शकतो) .. पण असा एक (सरळसोट व नेक) इरादा होता.. म्हणजे आहे !

आता इथे गंमत सुरु होते.. the fun begins !

ब्लॉगविश्वात मी 'नवीण' असल्याने पोस्टावे काय हा थोडा 'झोल' आहेच.. तर माझी एकंदर लिखाण-ए-गंमत आधी सांगतो !

एक तर होतं काय की इतक्या वेगाने इतके विचार येत जात असतात की त्या वेळी समोर वेळ आणि किबोर्ड उपलब्ध असेल तर ठीक नाहीतर अनेक विषय तसेच राहतात.. (कथांच्या आयडीयाच्या कल्पनांची एक वेगळी फाईल करून ठेवली आहे त्या 'निसटून' जाऊ नयेत काळाच्या ओघात म्हणून !)

आता जे लिहायचे तो विषय एखाद्या वाईन (किंवा गेलाबाजार लोणच्यासारखा) असेल तर पडून राहिल्यामुळे त्याला अजूनच चव येते, खुमारी येते.. पण काही काही तात्कालिक/प्रासंगिक विषयही असतात.. मनावर त्या घटनेचे, दृश्याचे किंवा कलाकृतीचे जे ठसे उमटलेले असतात, जे संस्कार/आघात झालेले असतात ते ताजे असतानाच मन:पटलाचे छायाचित्र घेणे चांगले ना.. एकदा 'टेंपो' गेला की गेला (मग ट्रकभरून आयडीया सुचल्या तरी काय उपयोग ? :) सॉरी मोह आवरला नाही !) ..

पण मग जेव्हा लिहायची वेळ येते तेव्हा the squeaky wheel gets the oil ह्या न्यायाने भलताच कुठलातरी आक्रस्ताळा विषय गर्दीतून वाट काढत पुढे येतो आणि एखादा हळूवार विषय 'पुढच्या वेळची' वाट पहात बसतो.

बरं.. वेळ आणि किबोर्ड (आणि उर्मी, स्फूर्ती, प्रेरणा हया साळकाया माळकाया) असला तरीही अजूनही लिखाणाचा वेग कमी पडतो. ('बरहा' करी दमला शुभांगी !). अजूनही minglish बर्याच जास्त वेगाने लिहीले जाते शुद्धलेखनाचा प्रश्न नसल्याने.. (नंतर वाचताना बाजार उठतो ते वेगळं) ह्यावर अर्थातच झरझर टाईपणे आणि मग शुद्धलेखन तपासून दुरुस्त्या करणे हाच उपाय आहे.. विचारांच्या वेगाने कधीच लिहीता येणार नाही पण अगदी ते stop-motion video सारखे तुटक तुटक वाटता कामा नये (त्या प्रकारात 'मज्जा' असली तरी लिखाणाच्या बाबतीत तसे नाही !)

अजून एक 'गंमत' माझ्या मते सर्वांच्याच बाबतीत होते.. एखाद वेळी अगदी भरपूर भरभरून लिहायचे असते पण मग खूप वेळ अजिबात काहीच न लिहून झाल्यामुळे सुरुवात करणे एकदम मुश्किल होते ! (त्याला काहीही म्हणा.. भावनिक तुंबा उर्फ emotional choke-up, किंवा writer's block वगैरे ... 'जो राईटतो तो राईटर' अशी व्याख्या केली तर मी त्यात बसेन काय ? :) )

पण हे म्हणजे सौजन्य सप्ताहात एखाद्या कारकूनाने सुहास्य वदनाने खिडकी उघडावी आणि समोर एकदम खूप लवकर येउन ताटकळलेला आणि बराचसा कावलेला, करवादलेला प्रचंड जमाव दिसावा तसे होते.. मग एकदम खिडकी तरी लावली जाते ! ... किंवा मग त्यातल्या त्यात जास्त nuisance value असलेल्याचे काम आधी करावे लागते !

म्हणजे लिखाणाच्या संदर्भात 'उपद्रव शक्ती' वाला विषय आधी घेतला जातो ... म्हणजे 'आता जर लिहीले नाही तर त्रास होईल' असा ! शिवाय अशा वेळी मला 'सुरुवात होण्यासाठी'; झटकन 'लोकप्रिय' होणारा, 'ताजा' विषय 'निवडण्याची' चूक होण्याची मला फार धास्ती वाटते.

lets start at the beginning.. a very good place to start... असे असले तरी एकंदर कोर्या कागदावर लिखाणाची/चित्राची सुरुवात करणे ही फार जालीम गोष्ट आहे !

आता ब्लॉगबाबतीत..

तर.. अजूनही ब्लॉगवर casually पोस्ट होत नाहीये.. बाकी बऱ्याच गोष्टी 'शिस्तीत' आणि 'लाईनीपरमाने' पार पाडायची सवय असल्याने निदान ब्लॉगला तरी 'हवे ते नि वाटेल तसेच' नको का करु द्यायला ? i think i should learn to relax... mentally i.e :) पण तसं होतं नाहीये..

कधी cleverly लिहीलं जातंय. खोटं ह्या अर्थी नव्हे.. जे आतून वाटत नाही असं खोटं मी लिहीत नाही (आणि कधीही लिहीणार नाही !!! :) ) .. म्हणजे थोडसं 'आता आकर्षक पॅकमधे' असं होतयं. वाईट अर्थी नाही. पण लोकं जर वेळ काढून वाचत आहेत (घडी घडी कि रिपोर्ट हमें .. :) ) तर 'वाचणेबलच' पोस्टावे असे वाटते.. मग उगाच जे झरकन लिहायचे, 'खरडायचे' ते राहूनच जाते. उस्फूर्त unedited लिखाणाची गंमत देता घेता येत नाहीये. वहीच्या मागच्या बाजूला झरकन काढलेल्या छोट्याश्या घर आणि झाडाच्या चित्राची गंमत वेगळी असते ना ?


(माझ्या मते हे विस्कळीत, अमुद्देसूद लिखाण हीही एक चांगली सुरुवात नाही का ? )

तुम्हाला काय वाटते एकूणात ? काय काय पोस्टावे ? 'आकर्षक पॅक मधले' का... काहीही.. ?

कळावे, (आणि कृपया कळवावे :) )

राफा

May 24, 2007

निबंद - पावूस !

पावूस !
- आयशॉट उरफ राफा (सहावी 'ड')
पावूस हा माजा आतिचशय आवडीचा रुतु आहे. पावूसामुळेच शेतात आंबेमोर भात व कणकेचे पिठ पिकते म्हणुनच आपण सगळे जेवू शकतो. पाउसाळ्यात मुख्यतवे गळीत हंगाम असतो. पाउसाळ्यात जास्त करून पावूस पडतो, हिवाळ्यात थन्डी पडते व उन्हाळ्यात ऊन पडते. त्यामुळे वरशभर कुठला ना कुठला रुतु पडिक असतो. 'रिमजिम पडती श्रावण गारा' हे गाणे आतिशय रोमहर्शक आहे. आमचा रेडियो गेल्या वरशी भिजल्याने बिघडला आहे त्यामुळे गाणे नीट ऐकू नाही आले तरीही आतिचशय आवडले.
पाउसाची सुरुवात रोमहर्शक असते. आधी कडाक्याचा उन्हाळा पडतो. पेपरमधल्या वृत्तपत्रात बातम्या येउ लागतात. 'उन्हाळा कमी होता की काय म्हणून आता पावसाने मारलेली आहे' अशी बातमी तर नेमीच असते (‘दडी’ हे लिहायचे राहिले ते कंसात लिहिले आहे ). सबंध आसमंत वातानुकुलित झालेला असल्याने खूप धूळफेक होत असते. (‘वात’ म्हणजे वारा हे कालच कोरडे सरानी शिकवले. कधी कधी ते ‘पोरांनी वात आणलाय ह्या’ असे म्हणतात त्याचा अर्थ मात्र कळत नाही.) अशा हवामानात सर्व पक्षी कोकीलकूजन करायचे थांबवून झाडांमधे गुपत होतात. काळे ढग जमल्यामुळे आकाशात थेटरमधे उशिरा गेल्यावर असतो तसा काळाकुट्ट अंधार होतो व मधेच डोअर किपरने लखकन बॅटरी मारावी तशी वीज चमकून जाते. सगळीकडे शेतकरी आभाळाला डोळे लावून बघत असतात आणि शेतकरण्या त्यांच्याकडे बघत असतात. अशा मंगल वातावरणात वरूण राजाचे आग मन होते.
भारतात पाउस अंदमान येथे बनतो. तो वळत वळत केरळ गावात आणि तिथून वळत वळत पुणे शहरात येतो. म्हणूनच त्याला वळीव म्हणतात किंवा काहीजण वळवाचा पाउस ही म्हणतात. (आम्ही समोरच्या गोगटे काकाना त्यांच्यासमोर 'काका' आणि इतर काळी 'तात्या विनचू' म्हणतो तसेच हेही दोन सन्मानार्थी शबद आहेत)
काल पुण्याच्या शहराच्या आत पाउस पडला. पुणे हे प्राचीन व प्रेकशणीय शहर आहे. तिथे शिन्दे छत्री, शनिवारवाडा, सिटी प्राईड, पर्वती, काकडे मॉल अशी पर्यटन स्थळे आहेत. ह्यातल्या काही ठिकाणी घरचे लोक मला रविवारी पर्यटनाला नेतात.
काल पाउसाबरोबर गाराही पडल्या. गोगटे काकानी बराचश्या जमवून त्यांच्या घरच्या माठात टाकल्या. ते कुठलीही फुकट गोशट वाया घालवत नाईत.
अंत्या आतिशय बावळट आहे. तो बाबांचे हेलमेट घालून गारा वेचायला आला होता. मग मीही छतरी घेऊन गेलो. पण छतरी उलटी करुन गारा वेचल्याने ती फाटली. समोरच्या मंगूने नवीन शरटं घातला होतान तर तसाच भिजायला आला आणि चिखलात घसरून पडला. (तो घरी गेल्यावर त्याच्या कानफाट नावाच्या अवयवावर त्याच्या बाबानी निरघुण प्रहार केले ते त्याना अजिचबात शोभत नाही.) एका दिवसात मंगूला एव्हढे मोठे गालगुंड कसे झाले हा प्रश्न वर्गात दुस़ऱ्या दिवशी सर्वाना पडला.
असा हा रोमहर्शक रुतु मला आतिचशय आवडतो !
***


 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा

May 22, 2007

आज !

'आज'चा दिवस रोज येतो.

पण 'आज' त्याच्यासारखा तोच !

कालच्या 'आज' पेक्षा वेगळा आणि उद्याच्या 'आज'पेक्षाही.

कारण आज ह्या दिवशी तो राजा आहे. उगवतानाच तो आपला स्वभाव दाखवून देतो. येतानाच तो स्वत:चा 'मूड' बनवून येतो. आपल्याला त्याच्या मूड प्रमाणेच वागायला लावतो.. निदान काही वेळ तरी.

कधी सुंदर अतिशय आवडत्या अश्या गाण्याने उठवतो (आपणच लावलेल्या मुझिक सिस्टीमच्या 'गजरा' ने ) तर कधी काही कारणाने अलार्म झालाच नाही म्हणून धडपडत उठवतो..

अगदी आपल 'रुटीन' असलं तरीही 'आज' त्यात आपले रंग मिसळतो. कधी कधी तर त्याच्याच आजच्या वेगळेपणाचा रंग व्यापून राहतो दिवसभर.. आपलं जणू अस्तित्वच नसतं.

एके दिवशी नेहमीपेक्षा थोडी उशिराच जाग आल्यासारखं वाटतं आणि सरसावून थोडं उठावं तर लक्षात येतं की आज सुट्टी आहे .. आह ! हे 'फिलींग' मुद्दाम ठरवून उशीरा उठण्याने कधीही येत नाही .. मग त्या आनंदात उशीवर पुन्हा डोकं टेकताना आठवतं... काल नाही का, तो सुंदर चित्रपट पाहून आपण किती उशिरा झोपलो. हं चला, म्हणजे 'आज' चा मूड सुखद धकका देण्याचा दिसतोय. त्याच्या पोतडीत दिवसभरासाठी काय काय जमती आहेत ते हळूहळू दाखवेल तो.. छान मैफल जमवेल दिवसभर..

मग पडल्या पडल्या 'नवरे' नावाच्या वेठबिगारांच्या मनात असेच काहीसे प्रगल्भ विचार : आह ! आज सुट्टी ! आता उगाच लहान कारणांवरून चिडचिड करायची नाही आपणही. ते सिलींगवर कोपऱ्यात लहानसं जळमटं दिसतयं.. त्या विषयी नापसंती नकॊ दर्शवायला उठल्या उठल्या. किंबहुना आपणच काढू ते चढून.. शाब्बास ! थोडी साफसफाई, बागकामात बायकोला मदत, व्यायामाला पुन्हा एकदा सुरुवात वगैरे. मग संगीतमय आंघोळ, मग आपणच उत्कृष्ट सा. खिचडी करु. बायकोभी क्या याद रखेगी ! खादाडीची अशी पारंपारिक सुरुवात करून ते पार कुठेतरी एक्झॉटीक डिनर पर्यंत 'आज' चे प्लान्स ! लगे रहो ! आता १० मिनिटात उठायचे !

'बायको' ही जमातही असाच काहीसा विचार करते : जरा नवऱ्याला आरामात उठू देत.. अजून ५ मिनिटानी उठवूच.. मग जरा प्रापंचिक कटकटी सांगण्याऐवजी त्याच्या आवडीच्या विषयावर आपणहून बोलू. म्हणजे फायनान्स, भारतीय क्रिकेट संघ वगैरे.. आपणहून ब्रेकफास्ट करतो म्हणाला तर करु देत. ( नंतर लंच आणि डिनर चांगली होतील त्यामुळे 'कॉम्पनसेट' होईल..) खरचं.. पण 'आज' चा जमलेला मूड सांभाळला पाहिजे, टिकवला पाहिजे. पाच मिनिटे झाली. उठवाव ह्याला आता ! किती वेळ झोपायचं सुट्टी असली तरी..

वगैरे..

ह्या उगवलेल्या सुट्टीच्या 'आज' ने दिलेले शुभसंकेत पाळण्याचा मग सर्वजण प्रयत्न करु लागतात. आणि मग ही साठा उत्तराची कहाणी..

पण ह्या 'आज' चं काही सांगता येत नाही. तो आज असा आहे.. उद्या ?

कधी नव्हे ते सकाळी पाणी गेलं किंवा भलत्याच कुणीतरी चुकून आपल्या दारावरची बेल सकाळी सकाळी कर्कश्य वाजवून आपल्याला उठवलं की समजावं की 'आज' चा मूड काही ठीक नाही. सुरुवातीला तरी त्याच्या कलाकलाने घेतलं पाहिजे. जरा तबियत जमली की मग दोस्ती होईल (बरं, ह्या प्राण्याला आपण 'काल' भेटल्याचं आठवत नाही कधीच.)

कधी कधी 'आज' नुसताच आपला फुरंगटून येतो. परकरी मुलीसारखा. म्हणजे नक्की काय बिनसलेलं असतं कळत नाही. काही नेमकं त्रासदायक, तापदायक अस काही होत नसतं. ज्याकडे बोटं दाखवता येईल अशी नापसंत गोष्टही घडलेली नसते पण तरिही काहीतरी चुकतं असतं.. एकूण 'आज' चं एकदंर लक्ष नाहीये एव्हढं आपल्याला कळत राहतं. 'बात कुछ जमी नही' असं रात्री झोपेपर्यंत वाटत राहतं

कधी कधी 'आज' असतो अगदी कृष्ण धवल.. अगदी शार्प कॉन्ट्रास्ट ! म्हणजे पहिला अर्धा दिवस रखरखीत गेल्यावर उरलेल्या दिवसात आनंदाचे एव्हढे शिडकावे होतात की पहिल्या अर्ध्या दिवसाची आठवणही राहत नाही. अशा 'आज' चं 'दुभंग व्यक्तिमत्व' पाहून आपण चकित होतो.

असे कितीतरी 'आज'...

म्हणजे रात्रीशी भांडून आलेला अगोदरच वैतागलेला 'आज'..

जाता येता दोन्ही वेळा ट्रॅफिकमधे दमवून हवा काढणारा किंवा,

बरेच दिवस राहिलेली बरीच कामं एकाच दिवशी सटासट करून देणारा,

फ्रिज पासून ते गाडी पासून ते ऑनलाईन अकाऊंट पर्यंत सगळ्या 'यंत्रणा' एकाच दिवशी बिघडवणारा,

निरर्थक.. वांझोटा.. ओशट.. डोक्यातून आरपार जाणारा,

अचानक बऱ्याच वर्षांनी गाठी भेटी घडवून आणणारा,

सकाळच्या 'त्या' बीभत्स बातमीचं सावट दिवसभर प्रत्येक गोष्टीवर असणारा,

एकदम 'स्पॉट लाईट'मधे आणणारा आणि दिवसभर कौतुकाचा वर्षाव करणारा,

'प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल' किंवा 'प्रसन्नता वाटेल' असे काहीतरी छान छान छापील का होईना 'भविष्य' असणारा

'आज' !

चला 'आज' शी मैत्री करुयात ! 'आज'च्या आज ! :)

May 21, 2007

कालवा !

बरेच दिवस कालव्याचा नुसता ओरडाच राहिला
आश्वासनात न्हाऊनही गाव मात्र कोरडाच राहिला

शेवटी गावकऱ्यानी पाण्याचा प्रश्न फारच रेटला
तेव्हा कुठे गावचा नेता 'सीएम'ना येऊन भेटला

सीएम म्हणाले तुमच्या मागण्याना काही अंत नाही
उगा भडकू नका, पाण्याचा प्रश्न एव्हढा ज्वलंत नाही

एक कालवा दिला तर अजून मागण्या वाढतील
लोक काय डोळ्यातले पाणी पिऊन दिवस काढतील

निषेध करा हो पण एक लहानसा चेंज करा
मी जातोय परदेशी तेव्हाच मोर्चा 'अरेंज' करा

मग करु जाहीर की शासन ह्यावर्षी कालवा काढेल
आसपासच्या गावात जरा तुमचंही वजन वाढेल !

मग उडवलेली धूळ जरा खाली बसू द्यात
माझ्या सत्काराचे मात्र लक्षात असू द्यात

नेत्याचेही आता सर्वांगीण विकासाचे धोरण आहे
त्याच्या वाड्याला आता सोन्याचे तोरण आहे

शेवटी एकदाचा कालवा झाला ...

लोक म्हणाले कालव्यात काहीतरी पाणी मुरतंय
अनुदानातून खर्च जाऊन बरचं काही उरतंय

काही असो, शासन जोरात विकास करत आहे
नेत्याच्या घरी आता लक्ष्मी पाणी भरत आहे !

***

May 15, 2007

समुद्र !

मुंबई !

हे शहर म्हणजे एक समुद्र आहे !

माणसांच्या लाटालाटांनी रस्त्यांवर फुटणारा समुद्र.
बसेसमधून भरभरून फेसाळणारा समुद्र.
लोकल्समधे तुंबणारा समुद्र !

रोज उगवतात संपत्तीचे नवे सूर्य ह्या समुद्रातून. आपापल्या परीने काळोख शोषून घेत चकाकतात.. काही वेळा त्या चकचकाटामागेही असतात काळोखात चाललेली काळी कृत्ये. दिवसभर काळोख पिऊन झिंगल्यावर पुन्हा समुद्रात बुडतात ते सूर्य... तरी त्यांचे अंश राहतात रात्रभर चमचमाट करत !

त्यावेळी बराचश्या कोपऱ्यात काळोख कण्हत असतो. त्या चमचमटाने तो दिवसभर दिपून गेलेला असतो... त्या प्रकाशाला आपलं अस्तित्व नको आहे हे त्याला माहित असतं.. नवे नवे कोपरे शोधून तो टिकून राहण्याचा प्रयत्न करत असतो.

हा प्रकाश काळोखाचा खेळ पाहताना समुद्र मात्र दिवसेंदिवस अस्वस्थ होत आहे, कारण त्याची कुणालाच पर्वा नाहीये. इथे प्रत्येकाचे स्वत:चे मंथन अहोरात्र चालू आहे, समुद्रात आपापले अमृत शोधण्यासाठी ! ह्या सततच्या मतलबी मंथनामुळे समुद्र तळमळत असतो

पण तसं आत्ता तरी सगळ ठीक चाललय !

वरवर पाहता ह्या अशांत समुद्रातले उद्रेक कुणालाच कळत नाहीत… सुनामी झाल्याशिवाय !

आज तरी समुद्र शांत वाटतोय.. माशाच्या जन्माला आल्यामुळे न बुडता पोहताहेत सगळे.. कुणी समुद्रातच जन्मला आहे तर कुणी ओढ्यानद्यातून वाहत, भरकटत आलाय, तर कुणी अळणी जीवनाला कंटाळून खाऱ्या पाण्याच्या ओढीने आलाय..

लहान मासे.. मोठे मासे.. अजूनच मोठे, अगदी अजस्त्र मासे.. गिळताहेत एकमेकाना.
अर्थात इथला निसर्गनियमच आहे तो : मोठ्यानी छोट्याना गिळायचं आणि अजून मोठं व्हायच !

ह्या समुद्रापासून दूर पाहिलतं कधी ?

आसपास आहेत तळी, तलाव आणि डबकी ! त्याच गढूळ पाण्यात पोहत आहेत सगळे ! समोरचं दिसत नसले तरीही.. काहीना ओढ लागली आहे समुद्राची.

ते... ते तळं बघा… कोणे एके काळी, कुठल्या तरी देवतेने त्या तळ्यात स्नान केले होते म्हणे… फार प्रसिद्ध आहे ते तळं. आज सगळे तिथे स्नान करतात. एकमेकांची पापं धुतलेलं दूषित पाणी अंगावर घेऊन पुण्य मिळवल्याचा आनंद घेतात !

बाकी अजून लहान लहान डबक्यात शेवाळी माजली आहेत.. पण त्यातच डुंबत आहेत काही आत्ममग्न. त्यालाच समुद्र समजून ! तिथे सर्वांची धडपड चाललेली आहे ती डबक्यातला सर्वात मोठा मासा होण्याची !

आणि ह्या इथे समुद्रात ?

लटपटत जगणारे मासे. त्या समुद्राच्या अवाढव्य आकाराने भेदरलेले.. काय करणार ? पाण्यात जगण आलं नशिबी.. त्यांचे अश्रू कोणाला दिसणार ? का ह्या सगळ्यांच्या अश्रूंचाच बनलाय हा समुद्र ? सगळे पोहत आहेत चवीचवीने एकमेकांची दु:ख चाखत ! ह्याच्यापेक्षा तो बरा. आणि त्याच्यापेक्षा तो. सगळेच पोहताहेत एकमेकाना पाण्यात पाहत.

काही आयुष्यभर समुद्रात राहतात नि गोड्या पाण्याची तहान घेउन जगतात.. तर काही नुसतेच राहतात सगळ्या इच्छा मेल्यासारखे.. पाण्यात अजून गुदमरून जीव गेला नाही म्हणून जगत राहतात..

पण काही झालं तरी समुद्र सोडवत नाही आहे कुणाला !

पोहताना एकमेकाना धडकत रोज नव्या जखमा होतात. त्या अंगावर घेउनच जगत आहेत सगळे. हे खारं पाणीही आजकाल त्यांच्या जखमांना झोंबत नाही… त्याना फक्त पोहायच आहे एव्हढच माहिती. कुठेही, दिशाहीन पोहत रहायचं ! मोठा मासा गिळेपर्यंत, किंवा त्या ‘शेवटच्या जाळ्या’त अडकेपर्यंत..

पण घाई पाहिलीत का ? प्रत्येकाला पोचायचय आहे कुठ तरी… समुद्राचा किनारा नाही आहे सापडत.. खर म्हणजे स्वत:ला कुठला किनारा हवाय हे कुणालाच नाही माहीत !


अशाने समुद्रही कंटाळेल मग एक दिवस..

आणि..

आणि एका सुनामीच निमित्त होऊन फेकून देईल सगळ्यांना … दूर कुठल्याशा किनाऱ्यावर !


***

May 9, 2007

कोण आहे रे तिकडे - १

महाराज : कोण आहे रे तिकडे !

सेवक : महाराज ! मघापासन मी इथच आहे ! अस काय करताय .. मै.. हू… ना… !

महाराज : तोतरं बोलू नकोस रे ! पण खरच, तू आहेस की रे !

सेवक : मग ओरडलात कशाला असे ? एव्हढा मोठा खड्डा पडला पोटात की मला स्वतःलाच पुण्यातला एखादा रस्ता असल्यासारख वाटल !

महाराज : अरे बराच वेळ झाला ना म्हणून मी स्वप्न तर बघत नाही ना ही खात्री केली !

सेवक : स्वप्न ? महाराज अहो झोपताय काय ? काय भुगोलाचा तास वाटला का इकॉनॉमिक्स चा ? पालिकेला गाढ झोप लागली असली किंवा तिने झोपेचं सोंग घेतलेलं असल तरी तुम्ही झोपू नका ! पुण्यात वाहतूक, प्रदूषण, वीजटंचाई हे महत्वाचे विषय आहेत ! तुमचा डोळा लागला तर पालिका नि सरकार अजूनच कानाडोळा करेल ना !

महाराज : खरय तुझ ! आत्तापर्यंत पुण्यनगरीचा इतिहास महत्वाचा होता! आता भुगोलही महत्वाचा झालाय !.. पण आता हळूहळू वाटतय की ह्यामागच इकॉनॉमिक्सच सगळ्यात महत्वाच आहे !

सेवक : किती विषयांतर करताय ! मला तर हा नागरिकशास्त्राचा विषय वाटला होता! छे छे ! इतके विषय आहेत ह्यामधे की मला दहावीला बसल्यासारख वाटतय पुन्हा !

महाराज : आत्तापर्यत पालिका पाचवीला पुजली होती आता दहावीच काय काढलस ! पण सगळे विषय आहेत म्हणालास ते कसे काय ?

सेवक : आता पहिल्यांदा गणिताचं पाहूयात.

महाराज : नको रे ! अजून पेपराच्या आठवणी येतात !

सेवक : अहो महाराज ताटातला नावडता पदार्थ आधी संपवावा मग शेवट गोड होतोय ! आता बघा, ह्यात नगरसेवक, कॊंट्रॅक्टर आणि महापालिका अस त्रैराशिक असतं !

महाराज : काय असत ?

सेवक : त्रैराशिक ! हे असे प्रश्न विचारता मधेच ! तरी तुम्हाला मराठी मिडियम मधे घाला अस मी थोरल्या महाराजांच्या मागे लागलो होतो ! तर काय आहे की ह्या लोकांची समीकरणं अगदी फिट्ट झालेली आहेत. म्हणजे परीक्षेआधीच ह्यांची ‘टक्केवारी’ ठरलेली असते !

महाराज : काय म्हणतोस ?

सेवक : मग काय ? सगळे गुण्यागोविंदाने एकत्र टेंडरचा पेपर सोडवतात ना ! आधी इथे बेरजेच राजकारण होत मग वजाबाकी !

महाराज : कुणाची वजाबाकी ?

सेवक : अहो असतात काही प्रामाणिक अधिकारी ! छान चाललेलं असत सगळं.. हे अधिकारी मधेच मिसप्रिंट असल्यासारखे येतात.. माग त्याना वजा करुन बाकी जे उरत ना त्यात हे सगळे लोक आपापली उत्तरं शोधतात !

महाराज : छे छे ! हे तर भलतच अवघड गणित आहे !

सेवक : आता भूमिती तर ह्याहून अवघड आहे महाराज ! अस बघा, जनतेला सोयीची सरकारी वाहतूक नाही, दरडोई वहानान्ची सन्ख्या, वाहतूक खोळन्बे असा त्रिकोण आहे ! रस्ते उकरण्यात पाणी, वीज, दुरध्वनी या सर्व विभागाचे अधिकारी समान्तर धावतात ! फक्त सुरळित वाहतुकीला ते छेद देतात ! हे सगळे विभाग एकमेकाना काटकोनात बघतात ! फक्त लाच घेण्यात समभुज असतात ! ह्यान्च्या कार्यक्षेत्रातला सगळा परीघ उकरुन ठेवतात, पण कामाची त्रिज्या मात्र सन्कुचित असते एका वेळी !

महाराज : अरे थांब थांब ! हे भयंकर कठीण आहे पण काय रे हे तू मला एकदा सांगितले आहेस असे वाटतय !

सेवक : होय महाराज, ह्या वेळी ऑडियन्स जास्त आहे म्हणून पुनःप्रक्षेपित केल एव्हढच !

महाराज : आमचे प्रधानजी कसे आले नाहीत अजून ?

सेवक : ते पुण्यनगरीचाच दौरा करायला गेले होते ना ते परत आलेत ! तेव्ह्यापासून त्यांच काही खर नाही !

महाराज : का रे ?

सेवक : काय सांगायच ! ते हिंदी शिकताहेत ! त्यामुळे त्यांच्याशी बोलताना झी मराठी बघत असताना मधेच नॅशनल चॅनेल लागल्यासारख वाटत !

महाराज : पण हिंदी का एकदम !

सेवक : अहो परवा टिव्हीवर मुलाखत दिली हिंदीतून. त्यांच हिंदी ऐकून त्याना सचिवानी घाबरत घाबरत सुचवल की अस हिंदी लोकाना कळणार नाही ! विशेषतः हिंदी भाषिक लोकाना ! त्यामुळे त्यानी रीतसर हिंदी शिकावं !

महाराज : अस काय म्हणाले प्रधानजी ?

सेवक : ते बोलत होते त्यांच्या पुण्यनगरीच्या दौऱ्याविषयी.. तर म्हणाले “पालिकेको जो लोगोने तक्रारे की है उस वजह से मेरेकु ये दौरा पडा है ! लास्ट टाईमके वखतमे बहुत बुरा समय था ! ठंडी के मोसम मे मुझे ‘सर्दी’ हुई थी ! लेकीन मै जब पुण्यनगरी गया था तो वहासे निकलनेका मेरा मन नही कर रहा था.. एकदम पैर भारी हो गये थे ! और फिर .. “

महाराज : बास बास ! अरे मला गरगरायला लागल आहे !

सेवक : मग काय सांगतोय का महाराज ! तर मुद्दा काय ? तर प्रधानजीचं अस झाल आहे आजकाल ! शिवाय ते त्याच प्रदेशाचे आहेत त्यामुळे सर्व काही आलबेल आहे असच भासवतील ते तेव्हा सावध रहा ! ते पहा आलेच ते !

प्रधानजी : भाषिक बनाया … भाषिक बनाया … हिंदी ! भाषिक बनाया आपने !

महाराज : प्रधानजी !

प्रधानजी : जी सरजी !

महाराज : अहो काय हे ! कुठली भाषा बोलताय ?

प्रधानजी : सरजी आय मीन महाराज ! महाराजांचा विजय असो !

महाराज : हा आत्ता कसे बोललात ! तुम्ही म्हणे पुण्यनगरीचा दौरा करुन येताय ?

प्रधानजी : जी जनाब !

महाराज : अहो काय हे ! मराठीत बोला बघू ! बर मला दौऱ्याचा वृतांत हवाय !

प्रधानजी : ओह आखो देखा हाल ! सांगतो ना ! अहाहा !

महाराज : प्रधानजी ! फालतू बडबड नकोय .. आम्हाला लोकांच्या तक्रारी येताहेत अजून !

प्रधानजी : अहो महाराज कसल्या तक्रारी ? सांगा पाहू ! मला तर पुण्यनगरीच्या रम्य आठवणीने अजून गदगदल्यासारख होतय !

सेवक : खड्ड्यामुळे बसलेले धक्के अजून आठवत असतील !

प्रधानजी : नाही रे !

महाराज : बर प्रधानजी, तुम्ही वृतांत द्या बघू !

प्रधानजी : महाराज ! पुण्यनगरीची अवस्था बेकार आहे हे तितल्या हवेइतकीच शुद्ध अफवा आहे ! अफवांवर विश्वास ठेवू नका.. पालिकेने मोठ्या मुश्किलिने खड्ड्यामधून मधे मधे रस्ते बांधलेले आहेत ! खरतर ह्या खड्ड्यांच्या माध्यमातून केवढ मौलिक तत्वज्ञान पालिका लोकाना देत असते ! ‘जीवनात कसेही उतार चढाव येत असतात त्याला तोंड द्यायला शिकल पाहिजे’ हेच ते तत्वज्ञान ! भारतीय संस्कृतीच्या ह्याच उदात्त तत्वज्ञानामुळे मोक्ष मिळतो महाराज !

महाराज : अहो पण तुमच्या खडड्यांच्या तत्वद्न्यावरुन गाडी चालवताना पडून मोक्षाऐवजी कपाळमोक्ष होतो आणि त्या खड्डयाना लोकाना शब्दशः तोंड द्यावे लागते त्याच काय ?

प्रधानजी : अहो आपला महाराष्ट्र हा दगडांचा देश आहे ! वाळूचे कण रगडून तेल काढणारे आपण.. आता हे दगड, गोटे आणि वाळू रस्त्यावर असायचेच ! एखाद्या दगडावरून गेले चाक तर जातो तोल ! त्यामुळे आपोआप हेल्मेटचे महत्व चालकाला कळते महाराज ! हिंदीमधे म्हण आहेच सिर सलामत तो पगडी पचास ! आता पुण्यनगरीत तरी पगडीचे महत्व लोकाना माहितच आहे पण सिर चे महत्व आता कळायला लागलय !

महाराज : अस्स !

प्रधानजी : आता पुढचा मुद्दा लोड शेडींग चा

महाराज : हो ! तुम्ही वीजकपात वाढवत नेणार म्हणून लोक नाराज आहेत !

प्रधानजी : महाराज हे आपल उगाचच कपातल म्हणजे आपल ते .. पेल्यातल वादळ आहे बर का ! आता मला सांगा व्यसन म्हणजे काय ?

महाराज : काय ?

प्रधानजी : काय ?

महाराज : मला काय विचारताय सारख ?

प्रधानजी : नाही सहज समोर होतात म्हणून विचारल .. नथींग पर्सनल ! मी सांगतो ! व्यसन म्हणजे एखादी गोष्ट वारंवार लागण, तिच्यावर अवलंबून असण, ती मिळाली नाही तर अस्वस्थ होण प्रसंगी हिंस्त्र होण वगैरे… आता मला सांगा ह्या पुण्यातल्या आणि अवघ्या महाराष्ट्रातल्या लोकानाच लागलय व्यसन ! विजेचं व्यसन ! लोड शेडींग म्हणजे व्यसनमुक्तीचाच एक प्रकार आहे !

महाराज : काय ???

प्रधानजी : मग काय ! वीज २४ तास पाहिजेच, ती नसली तर निराश होणं , अस्वस्थ होण प्रसंगी विद्युत मंडळाच्या कार्यालयावर हल्ला करण्याएव्हढ हिंस्र होणं हीच व्यसनाची लक्षण आहेत ! तेव्हा हळूहळू वीजेचा डोस कमी करण्याच विद्युत मंडळाने ठरवल आहे !

महाराज : अहो पण मागच्या वर्षी लोक वैतागून विद्युत मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा घेउन गेले तेव्हा तिथे कर्मचारी लोक पत्ते खेळत असताना आढळले.. आजकाल लोक विद्युत मंडळाला ‘द्यूत मंडळ’ म्हणतात !

प्रधानजी : लोकाना फुकट तक्रारी करायची सवयच झालेली आहे ! अहो माझ्या पुढ्यच्या दौर्यात मी खेडोपाडी गेलो होतो.. पुण्यनगरीत ‘वीज जाते’, ‘वीज जाते’ म्हणून लोकं बोंब मारतात महाराष्ट्रात अनेक खेडयात वीज कधीकधी येते !! त्यापेक्षा पुण्यनगरी किती तरी बरी !

महाराज : वाहतूकीच काय ?

प्रधानजी : ह्या बाबतीत मात्र पुण्यनगरीतले लोक सेल्फ़ मोटीवेटेड वाटले.. अजिबात सरकारवर अवलंबून नाहीत.. मला तर अमेरिकेचा दौरा केला होता त्यापेक्षाही भारी वाटले लोक !

महाराज : म्हणजे ?

प्रधानजी : म्हणजे अमेरिकेत ‘ड्रायविंग इज अ प्रिविलेज, वॉकींग इज अ राईट’ अस समजतात.. पण पुण्यनगरीतल्या लोकाना ते केव्हाच समजलय.. मागून ट्रक जरी आला तरी वळून न बघता शांतपणे क्रॉस करताना ते आपली मनःशांती न ढळू देता आपला हक्क बजावतात ! त्यानी कितिही कानाशी येउनही हॉर्न वाजवला तरी ढूंकूनही पहात नाहीत ! चालकवर्ग ही प्रगतीत मागे नाही ! लेनची शिस्त वगैरे असामाजिक विचार पुण्यनगरीत कधी रुजलेच नाहीत पण आजकाल सिग्नलसारख्या जुनाट चालीरितीनाही पूर्णपणे फाटा देण्यात येतो.. लोकशाहीतल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा अविष्कार बघायचा असेल तर दुसरी जागा शोधून सापडणार नाही ! इतके जागरूक नागरिक असल्यावर वाहतूक पोलीस कधीमधी संकष्टीला वगैरे चौकात उभे असतात तेही बंद करायला हवे.. नुसते कटाउट ठेवा हव तर पोलीसांचे !

महाराज : बर प्रदूषणाच काय ? लोक खोकली तरी आजकाल तोंडातून धूर बाहेर पडतो आहे म्हणतात.. नको त्या वयात दम्याचा त्रास वाढतो आहे !

प्रधानजी : दमाने घ्या महाराज ! प्रदूषण अतिधोकादायक पातळी ओलांडून राहिले आहे असे ऐकून होतो.. म्हणून म्हटल बघावे तरी कसे आहेत ते.. ह्याविषयी तर मी स्वतः जाउन निरीक्षण केल .. पौड रोडच्या पुलावर गाडी थांबवून प्रदूषण शोधायचा आटोकाट प्रयत्नही केला पण धूर आणि धूळ इतकी होती की समोरचेच नीट दिसत नव्हते त्यात प्रदूषण वगैरे कसे दिसणार ? ह्या लोकाना कसे काय दिसते कुणास ठाउक !

महाराज : वा ! वा ! एकंदर सर्व काही आलबेल आहे तर पुण्यनगरीत !

प्रधानजी : जी जनाब ! सब कुशल मंगल !
मंगल मंगल मंगल मंगल मंगल मंगल हो !
छाटली झाडे ही, कापल्या टेकड्याही !
वाढल्या गाड्याही हो !
खोकतो चिंटुही, चिंटूचे बाबाही,
चिंटूची आईही हो !

मूड असेल तसे सिग्नल तोडावे
पाहीजे तेव्हा कधीही वळावे,
मनात आले की क्रॉस करावे

संगणकावरी मेणबत्ती लावू रे !
आयटी सिटीचे स्वप्न पुरे होत जाय !
मंगल मंगल मंगल, मंगल मंगल मंगल हो !

***


May 8, 2007

येता का जाऊ ?

दृश्य १ :
स्थळ : पुणे शहरातील एक रिक्षा स्टॅंन्ड. वेळ संध्याकाळी ७.३०.
पात्रे : मी आणि, कुठेही चलायला विचारलं तरी 'नाही !' म्हणून प्रश्न सीमापार धाडण्याच्या तयारीत पहिला बाणेदार रिक्षाचालक ..

पण मी 'यॉर्कर' टाकतो …

मी : तुम्ही कुठे चालला आहात?
रिक्षाचालक : ?? अं !!! (खरं म्हणजे प्रश्नकर्ता तो असायला हवा होता. झालेला गोंधळ समजून घेण्याची धडपड)
मी : नाही. म्हणजे कोथरुडला चालला आहात का?
रिक्षाचालक :अंऽऽऽऽ (ओशाळलेले स्मितहास्य ).. बसा.


दृश्य २ :
वेगळा रिक्षा स्टॅंड. वेगळ्या दिवशी.

मी : तुम्हाला कुठे जायचे आहे?
रि. चा. : (अनवधानाने उत्तर) स्वारगेट ! अंऽऽऽ.. तुमी कुटं चाल्ला ?
मी : ( ते महत्वाचे आहे का वेड्या?) कोथरुड ! असू दे. उगाच तुम्हाला तसदी नको..

(दुसऱ्या रिक्शावाल्याकडे वळतो पुन्हा अनपेक्षित प्रश्नाचा यॉर्कर टाकण्यासाठी)


दृश्य ३ : ह्याच धर्तीवर आगामी (पण सध्या काल्पनिक) संवाद :

मी : तुम्हाला कुठे जायचे आहे?
रि. चा. : अंऽऽ ! मला अं.. अर्रर्र.. तुम्हाला कुठे..?
मी : नवीन लायसंस आहे वाटतं ? मला कुठे जायचय हा सवाल फिजूल आहे. तरीपण आपल्या स्टॅंडवरच्या इतर रि. चा. न्शी गप्पा मारुन झाल्या असतील, शिवाय योगायोगाने रिक्षाही आहेच तेव्हा तुमचा चालवायचा मूड असेल, दिवसभरच्या मग्रूरीचा कोटा पूर्ण झाला असेल, मुहुर्त व रिक्षाचे तोंड असलेली दिशा ठीक असेल आणि तुम्हाला फार वेदना होणार नसतील तर कोथरुडला येणार का ?
रि. चा. : ( पश्चातापदग्ध होऊन, अश्रूपात करत मीटर टाकतो ) बसा साहेब.. अन्या ! मी यानला 'खाली' सोडून येतोरे.

(अर्ध्या वाटेत आल्यवर रडू आवरत)
रि. चा. : साहेब तुम्ही माझे डोळे उघडलेत ( म्हणजे ? हा आत्तापर्यन्त झोपेत चालवत होता की काय ?) मी आता कुठल्याबी गिराइकाला नाय म्हननार नाय !
मी : कसचं कसचं. वास्तविक मैने क्या किया हय? मैं तो अच्छे शेहेरी होने के नाते अपना फर्ज अदा कर रहा था... काश पुणे का हर रिक्शावाला तुम्हारी तरह होता तो इस देश का ..
रि. चा. : ए xxखाऊ.
मी : !!!!
रि. चा. : बगा सायेब ... (एका नाठासाला सायकल चालीवतो का इमान ?
मी : (हुश्श!)


दृश्य ४ :
कट टू : वास्तव

मी : पस्तीस ना ? हे घ्या. थॅंक्यू !!!
रि. चा. : वेलकम सर !!!

मी मूर्च्छीत पडल्याचे न पहाता निघून जातो …


दृश्य ५ :
रिक्षा जवळ येउन थांबताच ‘अतिविशिष्ट’ पेयाचा भपकन वास !

मी : (रि. चा. माझ्याचकडे पहात आहे अशी सोयिस्कर समजुत करुन घेऊन) कोथरुडला येणार का?
रि. चा. :माराष्ट्रात कुठई येउ की ! बसा !
मी : (आत बसत) बर मग आधी यवतमाळला घ्या.


दृश्य ६ :
.....
.....

मी : सावकाश हो...
रि. चा. :च्यायला ह्या खड्ड्यांच्या .. हे खड्डे बुजवणायाना अमेरिकेत नेले पाहिजेत ट्रेनिंगला
मी : का ?
रि. चा. : हेना 'समांतर' म्हणजे काय माहित नाही. खड्डा बुजवायचा म्हणजे वरती उंचवटा करुन ठेवतात...
मी : बरोबर आहे. (तो बिचारा कारुण्याला विनोदाची झालर लावत होता.. पण रिक्षा त्याची आपटत होती !)
....
.....
(अमेरिकेतले आणि भारतातले खड्डे आणि उंचवटे ह्यावर एक परिसंवाद झाल्यावर)

रि. चा. : तुमी किति वर्ष होता तिकडं?
मी : पाच.
रि. चा. : तुमचं शिक्शाण तिथच झालय का ?
(नेमका मोठा खड्डा येउन रिक्षा पुन्हा आपटते.. त्यामुळे 'तिथच' हा शब्द मला ऐकूचं येत नाही.. त्यामुळे त्याचा प्रश्न 'तुमच शिक्शाण झालय का' असा वाटतो. मी त्याचा प्रश्न 'किंवा' ह्या सदरात टाकून पुढच्या प्रश्नाची आणी खड्ड्याची वाट पाहू लागतो !)



***

May 7, 2007

खड्डेमें रहने दो, खड्डा ना 'बुजाओ' !

- राहुल फाटक


दृश्य १)
पात्रे : दोन नागरिक: उंबरकर आणि झुंबरकर
उं: जाम ट्राफिक आहे ना हो रस्त्यात ?
झुं: ट्राफिक जाम आहे अस म्हणा ना सरळ !
उं: हॅ हॅ फारच विनोदी बुवा तुम्ही. पण काय हो चहाचं आमंत्रण दिलतं पण कुठे राहता ते सांगितलच नाहीत !
झुं: सांगतो ना ! तुम्हाला प्रभात रोड क्रॉस खड्डा नं २ माहीत्ये का ?
उं: चांगलाच ! गेल्याच आठवड्यात आमची बायको पडली ना !
झुं: आमची ?
उं: हॅ हॅ फारच विनोदी बुवा तुम्ही. आमची म्हणजे म्हणायची पद्धत आहे आपली.
झुं: आपली ?
उं: फारच वि. बु. तु. !
झुं: पण कशी काय पडली त्या खड्ड्यात ?
उं: अहो मोटारचं दार उघडल आणि उतरायला गेली ती पाच सहा फूट आतच !
झुं: सांगताय काय !
उं: मग सांगतोय काय. तेव्हापासून बायको बरोबर असली की शिडीही घेतो बरोबर. फोल्डींग आहे म्हणून बरं
झुं: बायको का शिडी ?
उं: हॅ हॅ फा. वि. बु. तु. ! अहो शिडी. म्हणजे शिडी घडीची आहे, आमची बायको नाही. बायको साडीची घडी मोडते, स्वत: फोल्ड होऊन साडीत शिरत नाही ! बर मग त्या खड्डयांनतर ?
झुं: त्यानंतर की एक भुयार लागेल.
उं: भुयार ?
झुं: हो ! खालून खड्डे जोडले गेलेत ना त्याचं बनलय रुंद असं .. वरुन कधीतरी कोणीतरी खडी, विटांचे तुकडे वगैरे टाकून जुजबी बुजवतात खड्डॆ.. पण खालून छान भुयार झालय. आत घुसलात की थेट नळ स्टॊप !
उं: सांगताय काय ?
झुं: पत्ता ! हॅ हॅ
उं: हॅ हॅ फा. वि. बु. तु. ! मग पुढे ?
झुं: पुढे एक अमिबाच्या आकाराचा खड्डा येईल. किंवा भूक लागली असेल तर आम्लेटच्या आकारासारखाही वाटेल. तर त्याच्या डाव्या अंगाने चालायला लागा
उं: लागलो ! मग ?
झुं: मग एक महाकाय आकाराचा खड्डा येईल. तिथे उल्कापात वगैरे झाल्यासारखा.
उं: बापरे. तो पार करायचा ?
झुं: हो अगदी सोपं आहे हो. त्या महाकाय खड्ड्यात एक पीमटी बरेच दिवस बंद पडून आहे. तिच्या टपावरून सरळ चालत या.
उं: आलो !
झुं: त्याच्यापुढे एक लहानसा, चिमुकला, रिक्षा पडू शकेल इतपतच खड्डा आहे समोरची बिल्डींग माझी. तो खड्डा मात्र तुम्हाला उतरून चढावा लागेल.
उं: हरकत नाही हो. तुमच्या चहासाठी वाटेल तितके खड्डे चढू !
झुं: ते ठीक आहे. पण ह्या उतारवयात तुम्हाला तरी किती चढवायच आम्ही ! हॅ हॅ
उं: हॅ हॅ फा. वि. बु. तु. !!!


दृश्य २)
पात्रे : खासदार श्री. क.ल. माडीकर आणि पत्रकार बंधू भगिनी.
पत्रकार: मा. खासदार साहेब..
माडीकर: बोला लवकर. मला एलिफंट गॉड फेस्टीवलची तयारी करायची आहे.
पत्रकार: गेल्यावर्षी पेक्षा यंदा खड्डे कमी आहेत अस विधान तुम्ही केल आहे. ह्याला काही तर्कसुसंगत आधार आहे का ?
माडीकर: तर्कसुसंगत. नाईस सांउंडींग वर्ड ! सेक्रेटरी नोट करा आणि अर्थ शोधून काढा. हे बघा, त्या विधानाबाबत तुम्ही राईचा मांऊंटन करत आहेत.
पत्रकार: आपण सध्या वर पर्वताकडे बघण्याऐवजी खाली खड्ड्यांकडे बघूया ! तुमच्या ह्या विधानामागे काही अभ्यास किंवा काही संख्यात्मक पुरावा आहे का ?
माडीकर: अर्थात ! माझ्याच गल्लीत बघा. मागच्या वर्षी दोनशे अडतीस खड्डे होते. ह्यावर्षी फक्त दोनशे पस्तीस आहेत. सर्वात कमी खोल असलेल्या खड्डयात उभं राहून पाहिलत तर बाकीचे सहज मोजता येतात. माझे दोन तासात मोजून झाले. हां, आता तुम्ही त्या खड्डयांमधून मुद्दाम रस्ताच शोधूनच काढलात आणि त्यावर उभं राहून, त्या उंचीवरून मोजलत तर जास्तच खड्डे दिसणार !
पत्रकार: बर एक वेळ तुमचं विधान खरं धरून चालू. पण हे म्हणजे ‘मागच्या वर्षी अत्याचार केला होता, ह्या वर्षी फकत विनयभंग केलाय’ अस म्हटल्यासारख वाटत नाही का ? जनाची तर नाहीच आहे निदान मनाची तरी लाज ?
माडीकर: लाज ! शॊर्ट ऍंड स्वीट वर्ड ! सेक्रेटरी शब्द नोट करा आणि अर्थ शोधून काढा.
पत्रकार: मी सांगतो ना साधारण अर्थ ! आपण केलेल्या चुकीबद्दल, निष्काळजीपणाबद्दल, दिरंगाईबद्दल, वाईट कृत्याबद्दल मनात अपराधीपणाची, शरमेची भावना निर्माण होणे म्हणजे लाज !
माडीकर: इंटरेस्टींग ! अशाच नवनवीन कल्पना आम्हाला जनतेकडून हव्या आहेत.
पत्रकार: अहो खड्ड्यांच काय… माडीकर: बास झाल हो ! इथे गावागावात लोकाना प्यायला पाणी नाही, मैलोनमैल चालत जाऊन पाणी आणतात आणि तुम्ही खड्डा खड्डा काय करताय.
पत्रकार: ठीक आहे. आपण पाण्याच्या प्रश्नावर बोलू. स्वातंत्र्य मिळून..
माडीकर: तो आजच्या परिषदेचा विषय नाही.
पत्रकार: मग आपल्याला खड्ड्यांवरच बोललं पाहिजे !
माडीकर: तुम्हीच जर असे खड्ड्यात अडकून राहिलात तर पुण्यात बाहेरचे उद्योग कसे येणार ?
पत्रकार: आणि आम्ही बोललो नाही, तर तुमचे धंदे तरी बाहेर कसे येणार ? खड्ड्यांना खड्डे म्हणायच नाही का..
माडीकर: अर्थातच म्हणायच ! पण दिसले तरच म्हणाल ना !
पत्रकार: म्हणजे ?
माडीकर: त्यासाठीचा उपाय म्हणूनच आता खास गॊगल कम्पल्सरी करणार आहोत लवकरच ! आधी कम्पल्सरी गॊगल घालायचा आणि त्यावर कम्पल्सरी हेल्मेट !
पत्रकार: कसले गॊगल्स ?
माडीकर: हे खास गॊगल घातल्यावर खड्डे दिसण तर दूरच, पण वेगवेगळी छान दृश्य दिसतील ! म्हणजे काचेसारखे गुळगुळीत स्वच्छ रस्ते.. मधे दुभाजकावर रंगीबेरंगी फुलझाडं. बाजूला शीतल छाया देणारी सुंदर झाडं.. परदेशी पाहुण्यानाही आम्ही एअरपोर्टपासून गॊगल घालूनच आणणार ! आता बोला !
पत्रकार: काय बोलणार. आता एकच काम करा. तुमच्या गल्लीतल्या त्या दोनशे पस्तिसाव्या खड्ड्यात लोटा आम्हाला आणि वरून माती लोटा ! म्हणजे एक खड्डा आणि तुमची एक तरी जबाबदारी कमी होईल.
माडीकर: जबाबदारी ? जबाबदारी ! नाईस रिदम. सेक्रेटरी शब्द नोट करा आणि अर्थ शोधून काढा !!!


दृश्य ३) महापालिका आयुक्तांची पत्रकार परिषद.
पत्रकार: आज तुम्हाला काही परखड प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील !
आयुक्त: विचारा तुम्ही, सांगतो आम्ही.
पत्रकार: पुण्यातल्या रस्त्यांविषयी..
आयुक्त: लेट मी बी वेरी क्लिअर. रोड्स आर अवर टॉप प्रायोरिटी. पुण्याच वाढतं महत्व मी तुम्हाला सांगायला नकोच. प्रगतीच्या एका ऐतिहासिक टप्प्यापाशी आपण येऊन थांबलो आहोत. त्यामुळे रस्ते अतिशय महत्वाचे आहेत !
पत्रकार: अगदी खर बोललात पण शहरात किंचीतसे वेगळे चित्र आहे. बरेच रस्ते नांगरणी केल्यासारखे दिसत आहेत. रस्त्यांवर इतके खड्डे का ?
आयुक्त: कारण खड्डे ही आमची प्रायोरिटी नाही ! आय थिंक आय वॉज वेरी क्लिअर ! रोड्स आर अवर टॉप प्रायोरिटी !
पत्रकार: म्हणजे खड्ड्यांविषयी तुम्ही काहीच करत नाही आहात ?
आयुक्त: अर्थातच करतोय ! रोड्स आर अवर टॉप प्रायोरिटी पण आम्ही खड्ड्यांसाठी सुद्धा वेगवेगळ्या धडक कृती योजना करत आहोत
पत्रकार: उदाहरणार्थ ? आयुक्त: ‘खडडा है सदा के लिए’ योजना. म्हणजे काही काही खड्डे आता एव्हढे जुने आहेत की ते ‘ऐतिहासिक वास्तू’ ह्या गटात पडतात. पुण्यात ऐतिहासिक वास्तू जपण्याकडे आधीच दुर्लक्ष होत आहे. बट नॉट एनी मोअर ! परवाच एक चाळीस वर्ष जुना खड्डा बुजवायला निघाले होते मूर्ख स्थानिक नागरिक. दर वर्षी थोडीथोडी भर घालून त्या खड्याच्या मूळ रुप विद्रूप करुन टाकल होत त्या लोकानी ! पण मी स्वत: लक्ष घालून त्यांच्या प्रयत्नांना स्वत: मूठमाती दिली आणि खड्डा वाचवला.
पत्रकार: छान !
आयुक्त: कसच कसच. आय ट्राय माय बेस्ट !
पत्रकार: पण हे म्हणजे ‘खड्डे जगवा, खड्डे वाढवा’ सारखं वाटतय हो ? ‘दाग अच्छे है’ सारखं खड्डे चांगले आहेत असं तुम्हाला म्हणायच आहे का ?
आयुक्त: अर्थात. आता जुनी झाड कापणं कस चूक आहे हे आम्ही प्रत्यक्ष रोड वायडनिंग मधे अशी झाडे कापून लोकाना प्रात्यक्षिकानेच दाखवतो.. म्हणजे त्याना काय करायचे नाही ते नीट कळते. मधून मधून खड्डे भरण्यामागेही हाच लोकशिक्षणाचा हेतू असतो. अहो, आपल्यापेक्षाही जास्त पावसाळे बघितलेले खड्डे असतील त्याना अमानुषपणे बुजवायचे ? काय माणस आहात का कोण ?
पत्रकार: तुमचा मुळातच रस्ता गुळगुळीत, स्वच्छ नि सुंदर हवा ह्याला तत्वत: विरोध आहे का ?
आयुक्त: ऑफकोर्स. सुंदर रस्त्यांकडे पहात पहात लोक कार्यालयांमधे उशीरा पोचतील. आयटी सिटीला हे परवडणार नाही ! सरळसोट गुळगुळीत रस्ता असला की प्रवास किती कंटाळवाणा होईल ? अशा रस्त्यात आपल्याच विचारांची तंद्री लागून अपघात होऊ शकतात. खड्ड्यांचे दणके बसले की माणसं आपोआप वास्तवात येतात. सत्य परिस्थितीची जाणीव लोकाना करुन देणं हे आमच कर्तव्य आहे.
पत्रकार: अच्छा !
आयुक्त: शिवाय, पावसाळ्यात एकाच प्रवासात मोटार, होडी आणि बैलगाडी अशा तिन्ही वाहनातून सफर केल्याचा आनंद मिळतो ते वेगळच ! प्रत्येकाला आपल्या शरीरातले हाड न हाड पाठ होते. अर्ध्या तासात जवळजवळ सगळी हाडं मोजून होतात, फक्त पालिकेविषयी बोलताना काही लोकांच्या जिभेला हाड रहात नाही. दॅट्स ओके. चांगल्या कामात शिव्या खाव्याच लागतात कधीकधी !
पत्रकार: अजून् काय योजना आहेत ? आयुक्त: काही वेळा ट्राफिक जॅम फारच लांबतो.. लोक निघाले की पोचेपर्यंत बरेच दिवस आपले गाडीतच ! मग रिटारयमेंट जवळ आलेल्या लोकाना कार्यालयात पोचण्याआधीच रिटायर होऊ की काय अशी भिती वाटते. म्हणून आम्ही नवीन VRS अर्थात Vehicle Retirement Scheme काढली आहे. म्हणजे अशी शंका आल्यास गाडीतूनच फोन करुन रिटायरमेंट घेता येईल आणि तसेच परत घरी जाता येईल.
पत्रकार: वा वा. अजून काही ?
आयुक्त: ट्राफिकमधे अडकल्यावर वाटेत जर दाढी मिशी फारच वाढली तर बायको कदाचित पटकन ओळखणार नाही किंवा घरच्याना तुम्ही तोतया आहात म्हणून संशय येण्याचाही संभव आहे त्यासाठी फ्री DNA टेस्ट उपलब्ध असेल. सध्या तरी एव्हढच. बट रिमेम्बर. हे सगळ सेकंडरी आहे. रोड्स आर अवर टॉपमोस्ट प्रायोरिटी ! (टाळ्या)


दृश्य ४) आमच्या गल्लीतले आद्य सुधारक शेणोलीकर काका ह्यानी एका ट्राफिक हवालदाराची घेतलेली मुलाखत.
शेणोलीकर काका हे सव्वीस वर्ष पोस्टात सर्विसला होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून व दोन नातवंडे आहेत. (मागे - म्हणजे शेणोलीकर काका अजून 'आहेत'. त्यांच्या घरी फोटोत ते खुर्चीवर बसले आहेत आणि बाकी सगळे मागे उभे आहेत त्या संदर्भात 'मागे' अस म्हटलं. अतिशय पापभिरु आणि तरीही समाजसेवेची आवड असणारे शेणोलीकर काका म्हणजे अकल्पित सोसायटी बिल्डींग. क्र. ३ चे आदर्श आहेत.
शेणोलीकर : नमस्कार !
हवालदार : (थेट त्यांच्या डोळ्यात पहात ) हवा काढू का भो़xxx. हवालदाराच्या ह्या अनपेक्षीत नमस्काराच्या पद्धतीने शेणोलीकर हवालदिल. मग काही वेळाने त्याना तो हवालदार डोळ्याने किंचीत तिरळा असल्याचे त्याना जाणवते आणि उजव्या बाजूला सिग्नल तोडणारा एक सायकलवाला दिसतो.
हवालदार : xx ची तेच्या. णमस्कार ! (शेणोलीकर फक्त 'णमस्कार' अंगाला लावून घेतात. पहिलं वाक्य न झालेल्या पोर्शन सारखं कम्पल्सरी ऑप्शनला टाकतात. आणि पुन्हा एकदा नमस्कार घालतात)
शेणोलीकर : नमस्कार
हवालदार : काय पायजेल. क्रॉस करन्यासाठी वातूक थांबनार नाई. ज्याने त्याने आपापल्या जिम्मेदारीवर पलीकडे जायचय.
शेणोलीकर : नाही तस नाही !
हवालदार : आयला सकाळधरन दोन आंधळे आनि तीन म्हाता़ऱया ! आता डोक्यावर टोपलीत बसवूनच पोचवायच राहिलय लोकाना हिथून थिते! मी पोलीस हाय का वसुदेव ?
शेणोलीकर : अहो नाही तस नाही. पुण्याच्या वाहतूक समस्येने भयंकर रुप धारण केल आहे त्याबद्दल बोलायच होत.. आधीच पावसाळा त्यात खड्डे, ट्राफिक जॅम ह्याने त्रस्त जनता आता वाहतूक आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणं धरायच्या बेतात आहे. ह्याला जबाबदार.. ?
हवालदार : धरनांच काय आमच्या खात्या अंडर येतय का ? आपल्या हातानी उघाडली का दारं धरनाची मी ? आयला.. इथ ल्हान पोरग मुतलं तरी भिडे पूल बुडतोय. काय कांगावा लावलाय राव उगाच !
शेणोलीकर : नाही तस नाही. (अचानक इथे शेणॊलीकराना कुठल्यातरी लेखात वाचलेल आठवत. एखादे नकारात्मक विधान स्वत: करण्यापेक्षा प्रश्न विचारून ज्याची मुलाखत घेतोय त्याच्याच तोंडून ते वदवून घ्यावे वगैरे !)
शेणोलीकर : बर तुम्हीच मला सांगा. सध्या रहदारीची काय परिस्थिती आहे असं आपल्याला वाटतं ?
हवालदार : कसली स्थिती ? आपला काय समंध ? काय बोलताय राव. मी ट्राफिक पोलीस हाये !
शेणोलीकर : तेच तेच. स्थिती म्हणजे दशा. म्हणजे सध्याची कंडिशन..
हवालदार : मग ट्राफिकची कंडीशन म्हना की सरळ.
शेणोलीकर : तेच तेच.
हवालदार : काये कंडिशन म्हनल की आपल्या देशात सर्वेसामान्येपने ती बेकारच आसती ! ‘सध्या पॊलिटीक्सची कंडिशन फार छान आहे’ अस कदी आयक्लय का ?
शेणोलीकर : लेनचे महत्व काय आहे असं वाटतं तुम्हाला ?
हवालदार : आता तशी लेन देन सगळीकडेच चालू आहे आजकाल साहेब. आमच्यावरच का खार खाता ?
शेणोलीकर : नाही नाही तस नाही. लेन म्हणजे ट्राफिक लेन म्हणायच होत मला हवालदार : काय ? कुठ ? काय ट्राफिक लेन ? काय राव नवनवीन शब्द काढताय. पुण्यात आधीच ट्राफिक काय बेकार झालय.
शेणोलीकर : अहो (इथे शेणोलीकर कळवळले) ते ट्राफिक सुधारण्यासाठीच तर लेनचा वापर …
हवालदार : गेली अटरा वर्ष सर्विस झाली साहेब पुण्यात. ह्ये असलं लेन वगैरे कुनी बोलल्याच आठवत नाही.. उगाच काम वाढवू नका आमचं. चला आता निघायच बघा. माझी वसुलीची येळ झालीये ! ए.. ए xxx ! घे, साईडला घे गाडी जरा !!
***