सप्रेम नमस्कार.
आपले सहर्ष स्वागत!
'राफा' म्हणजे ‘राहुल फाटक’ चे संक्षिप्त रुप.
'काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम’ हे वचन मी विद्वानांंमधे मोडत नसल्याने मला लागू होत नाही. परंतु अनेकविध कलांमधे अत्यंत रुची व किंचीतशी गती असल्याने ह्या ब्लॉगवर मी ह्या गोष्टींमधे वेळ व्यतीत केलेला तुम्हाला आढळेल: विनोदी लेख/चुटके, ललित लेख, लघुकथा, नाटक, काव्य, चित्रकला व प्रकाशचित्रे.
ह्या ब्लॉगवरील सर्व कलाकृती पूर्णपणे 'ओरिजनल' आहेत.
- राफा
ता.क. फोनऐवजी संगणकावर सर्व लिंक्स नीट दिसतील विषयानुसार.
विषय
May 24, 2007
निबंद - पावूस !
May 22, 2007
आज !
पण 'आज' त्याच्यासारखा तोच !
कालच्या 'आज' पेक्षा वेगळा आणि उद्याच्या 'आज'पेक्षाही.
कारण आज ह्या दिवशी तो राजा आहे. उगवतानाच तो आपला स्वभाव दाखवून देतो. येतानाच तो स्वत:चा 'मूड' बनवून येतो. आपल्याला त्याच्या मूड प्रमाणेच वागायला लावतो.. निदान काही वेळ तरी.
कधी सुंदर अतिशय आवडत्या अश्या गाण्याने उठवतो (आपणच लावलेल्या मुझिक सिस्टीमच्या 'गजरा' ने ) तर कधी काही कारणाने अलार्म झालाच नाही म्हणून धडपडत उठवतो..
अगदी आपल 'रुटीन' असलं तरीही 'आज' त्यात आपले रंग मिसळतो. कधी कधी तर त्याच्याच आजच्या वेगळेपणाचा रंग व्यापून राहतो दिवसभर.. आपलं जणू अस्तित्वच नसतं.
एके दिवशी नेहमीपेक्षा थोडी उशिराच जाग आल्यासारखं वाटतं आणि सरसावून थोडं उठावं तर लक्षात येतं की आज सुट्टी आहे .. आह ! हे 'फिलींग' मुद्दाम ठरवून उशीरा उठण्याने कधीही येत नाही .. मग त्या आनंदात उशीवर पुन्हा डोकं टेकताना आठवतं... काल नाही का, तो सुंदर चित्रपट पाहून आपण किती उशिरा झोपलो. हं चला, म्हणजे 'आज' चा मूड सुखद धकका देण्याचा दिसतोय. त्याच्या पोतडीत दिवसभरासाठी काय काय जमती आहेत ते हळूहळू दाखवेल तो.. छान मैफल जमवेल दिवसभर..मग पडल्या पडल्या 'नवरे' नावाच्या वेठबिगारांच्या मनात असेच काहीसे प्रगल्भ विचार : आह ! आज सुट्टी ! आता उगाच लहान कारणांवरून चिडचिड करायची नाही आपणही. ते सिलींगवर कोपऱ्यात लहानसं जळमटं दिसतयं.. त्या विषयी नापसंती नकॊ दर्शवायला उठल्या उठल्या. किंबहुना आपणच काढू ते चढून.. शाब्बास ! थोडी साफसफाई, बागकामात बायकोला मदत, व्यायामाला पुन्हा एकदा सुरुवात वगैरे. मग संगीतमय आंघोळ, मग आपणच उत्कृष्ट सा. खिचडी करु. बायकोभी क्या याद रखेगी ! खादाडीची अशी पारंपारिक सुरुवात करून ते पार कुठेतरी एक्झॉटीक डिनर पर्यंत 'आज' चे प्लान्स ! लगे रहो ! आता १० मिनिटात उठायचे !
'बायको' ही जमातही असाच काहीसा विचार करते : जरा नवऱ्याला आरामात उठू देत.. अजून ५ मिनिटानी उठवूच.. मग जरा प्रापंचिक कटकटी सांगण्याऐवजी त्याच्या आवडीच्या विषयावर आपणहून बोलू. म्हणजे फायनान्स, भारतीय क्रिकेट संघ वगैरे.. आपणहून ब्रेकफास्ट करतो म्हणाला तर करु देत. ( नंतर लंच आणि डिनर चांगली होतील त्यामुळे 'कॉम्पनसेट' होईल..) खरचं.. पण 'आज' चा जमलेला मूड सांभाळला पाहिजे, टिकवला पाहिजे. पाच मिनिटे झाली. उठवाव ह्याला आता ! किती वेळ झोपायचं सुट्टी असली तरी..
वगैरे..
ह्या उगवलेल्या सुट्टीच्या 'आज' ने दिलेले शुभसंकेत पाळण्याचा मग सर्वजण प्रयत्न करु लागतात. आणि मग ही साठा उत्तराची कहाणी..
पण ह्या 'आज' चं काही सांगता येत नाही. तो आज असा आहे.. उद्या ?
कधी नव्हे ते सकाळी पाणी गेलं किंवा भलत्याच कुणीतरी चुकून आपल्या दारावरची बेल सकाळी सकाळी कर्कश्य वाजवून आपल्याला उठवलं की समजावं की 'आज' चा मूड काही ठीक नाही. सुरुवातीला तरी त्याच्या कलाकलाने घेतलं पाहिजे. जरा तबियत जमली की मग दोस्ती होईल (बरं, ह्या प्राण्याला आपण 'काल' भेटल्याचं आठवत नाही कधीच.)
कधी कधी 'आज' नुसताच आपला फुरंगटून येतो. परकरी मुलीसारखा. म्हणजे नक्की काय बिनसलेलं असतं कळत नाही. काही नेमकं त्रासदायक, तापदायक अस काही होत नसतं. ज्याकडे बोटं दाखवता येईल अशी नापसंत गोष्टही घडलेली नसते पण तरिही काहीतरी चुकतं असतं.. एकूण 'आज' चं एकदंर लक्ष नाहीये एव्हढं आपल्याला कळत राहतं. 'बात कुछ जमी नही' असं रात्री झोपेपर्यंत वाटत राहतं
कधी कधी 'आज' असतो अगदी कृष्ण धवल.. अगदी शार्प कॉन्ट्रास्ट ! म्हणजे पहिला अर्धा दिवस रखरखीत गेल्यावर उरलेल्या दिवसात आनंदाचे एव्हढे शिडकावे होतात की पहिल्या अर्ध्या दिवसाची आठवणही राहत नाही. अशा 'आज' चं 'दुभंग व्यक्तिमत्व' पाहून आपण चकित होतो.
असे कितीतरी 'आज'...
म्हणजे रात्रीशी भांडून आलेला अगोदरच वैतागलेला 'आज'..
जाता येता दोन्ही वेळा ट्रॅफिकमधे दमवून हवा काढणारा किंवा,
बरेच दिवस राहिलेली बरीच कामं एकाच दिवशी सटासट करून देणारा,
फ्रिज पासून ते गाडी पासून ते ऑनलाईन अकाऊंट पर्यंत सगळ्या 'यंत्रणा' एकाच दिवशी बिघडवणारा,
निरर्थक.. वांझोटा.. ओशट.. डोक्यातून आरपार जाणारा,
अचानक बऱ्याच वर्षांनी गाठी भेटी घडवून आणणारा,
सकाळच्या 'त्या' बीभत्स बातमीचं सावट दिवसभर प्रत्येक गोष्टीवर असणारा,
एकदम 'स्पॉट लाईट'मधे आणणारा आणि दिवसभर कौतुकाचा वर्षाव करणारा,
'प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल' किंवा 'प्रसन्नता वाटेल' असे काहीतरी छान छान छापील का होईना 'भविष्य' असणारा
'आज' !
चला 'आज' शी मैत्री करुयात ! 'आज'च्या आज ! :)
May 21, 2007
कालवा !
बरेच दिवस कालव्याचा नुसता ओरडाच राहिला
आश्वासनात न्हाऊनही गाव मात्र कोरडाच राहिला
शेवटी गावकऱ्यानी पाण्याचा प्रश्न फारच रेटला
तेव्हा कुठे गावचा नेता 'सीएम'ना येऊन भेटला
सीएम म्हणाले तुमच्या मागण्याना काही अंत नाही
उगा भडकू नका, पाण्याचा प्रश्न एव्हढा ज्वलंत नाही
एक कालवा दिला तर अजून मागण्या वाढतील
लोक काय डोळ्यातले पाणी पिऊन दिवस काढतील
निषेध करा हो पण एक लहानसा चेंज करा
मी जातोय परदेशी तेव्हाच मोर्चा 'अरेंज' करा
मग करु जाहीर की शासन ह्यावर्षी कालवा काढेल
आसपासच्या गावात जरा तुमचंही वजन वाढेल !
मग उडवलेली धूळ जरा खाली बसू द्यात
माझ्या सत्काराचे मात्र लक्षात असू द्यात
नेत्याचेही आता सर्वांगीण विकासाचे धोरण आहे
त्याच्या वाड्याला आता सोन्याचे तोरण आहे
शेवटी एकदाचा कालवा झाला ...
लोक म्हणाले कालव्यात काहीतरी पाणी मुरतंय
अनुदानातून खर्च जाऊन बरचं काही उरतंय
काही असो, शासन जोरात विकास करत आहे
नेत्याच्या घरी आता लक्ष्मी पाणी भरत आहे !
May 15, 2007
समुद्र !
हे शहर म्हणजे एक समुद्र आहे !
माणसांच्या लाटालाटांनी रस्त्यांवर फुटणारा समुद्र.
बसेसमधून भरभरून फेसाळणारा समुद्र.
लोकल्समधे तुंबणारा समुद्र !
रोज उगवतात संपत्तीचे नवे सूर्य ह्या समुद्रातून. आपापल्या परीने काळोख शोषून घेत चकाकतात.. काही वेळा त्या चकचकाटामागेही असतात काळोखात चाललेली काळी कृत्ये. दिवसभर काळोख पिऊन झिंगल्यावर पुन्हा समुद्रात बुडतात ते सूर्य... तरी त्यांचे अंश राहतात रात्रभर चमचमाट करत !
त्यावेळी बराचश्या कोपऱ्यात काळोख कण्हत असतो. त्या चमचमटाने तो दिवसभर दिपून गेलेला असतो... त्या प्रकाशाला आपलं अस्तित्व नको आहे हे त्याला माहित असतं.. नवे नवे कोपरे शोधून तो टिकून राहण्याचा प्रयत्न करत असतो.
हा प्रकाश काळोखाचा खेळ पाहताना समुद्र मात्र दिवसेंदिवस अस्वस्थ होत आहे, कारण त्याची कुणालाच पर्वा नाहीये. इथे प्रत्येकाचे स्वत:चे मंथन अहोरात्र चालू आहे, समुद्रात आपापले अमृत शोधण्यासाठी ! ह्या सततच्या मतलबी मंथनामुळे समुद्र तळमळत असतो
पण तसं आत्ता तरी सगळ ठीक चाललय !
वरवर पाहता ह्या अशांत समुद्रातले उद्रेक कुणालाच कळत नाहीत… सुनामी झाल्याशिवाय !
आज तरी समुद्र शांत वाटतोय.. माशाच्या जन्माला आल्यामुळे न बुडता पोहताहेत सगळे.. कुणी समुद्रातच जन्मला आहे तर कुणी ओढ्यानद्यातून वाहत, भरकटत आलाय, तर कुणी अळणी जीवनाला कंटाळून खाऱ्या पाण्याच्या ओढीने आलाय..
लहान मासे.. मोठे मासे.. अजूनच मोठे, अगदी अजस्त्र मासे.. गिळताहेत एकमेकाना.
अर्थात इथला निसर्गनियमच आहे तो : मोठ्यानी छोट्याना गिळायचं आणि अजून मोठं व्हायच !
ह्या समुद्रापासून दूर पाहिलतं कधी ?
आसपास आहेत तळी, तलाव आणि डबकी ! त्याच गढूळ पाण्यात पोहत आहेत सगळे ! समोरचं दिसत नसले तरीही.. काहीना ओढ लागली आहे समुद्राची.
ते... ते तळं बघा… कोणे एके काळी, कुठल्या तरी देवतेने त्या तळ्यात स्नान केले होते म्हणे… फार प्रसिद्ध आहे ते तळं. आज सगळे तिथे स्नान करतात. एकमेकांची पापं धुतलेलं दूषित पाणी अंगावर घेऊन पुण्य मिळवल्याचा आनंद घेतात !
बाकी अजून लहान लहान डबक्यात शेवाळी माजली आहेत.. पण त्यातच डुंबत आहेत काही आत्ममग्न. त्यालाच समुद्र समजून ! तिथे सर्वांची धडपड चाललेली आहे ती डबक्यातला सर्वात मोठा मासा होण्याची !
आणि ह्या इथे समुद्रात ?
लटपटत जगणारे मासे. त्या समुद्राच्या अवाढव्य आकाराने भेदरलेले.. काय करणार ? पाण्यात जगण आलं नशिबी.. त्यांचे अश्रू कोणाला दिसणार ? का ह्या सगळ्यांच्या अश्रूंचाच बनलाय हा समुद्र ? सगळे पोहत आहेत चवीचवीने एकमेकांची दु:ख चाखत ! ह्याच्यापेक्षा तो बरा. आणि त्याच्यापेक्षा तो. सगळेच पोहताहेत एकमेकाना पाण्यात पाहत.
काही आयुष्यभर समुद्रात राहतात नि गोड्या पाण्याची तहान घेउन जगतात.. तर काही नुसतेच राहतात सगळ्या इच्छा मेल्यासारखे.. पाण्यात अजून गुदमरून जीव गेला नाही म्हणून जगत राहतात..
पण काही झालं तरी समुद्र सोडवत नाही आहे कुणाला !
पोहताना एकमेकाना धडकत रोज नव्या जखमा होतात. त्या अंगावर घेउनच जगत आहेत सगळे. हे खारं पाणीही आजकाल त्यांच्या जखमांना झोंबत नाही… त्याना फक्त पोहायच आहे एव्हढच माहिती. कुठेही, दिशाहीन पोहत रहायचं ! मोठा मासा गिळेपर्यंत, किंवा त्या ‘शेवटच्या जाळ्या’त अडकेपर्यंत..
पण घाई पाहिलीत का ? प्रत्येकाला पोचायचय आहे कुठ तरी… समुद्राचा किनारा नाही आहे सापडत.. खर म्हणजे स्वत:ला कुठला किनारा हवाय हे कुणालाच नाही माहीत !
अशाने समुद्रही कंटाळेल मग एक दिवस..
आणि..
आणि एका सुनामीच निमित्त होऊन फेकून देईल सगळ्यांना … दूर कुठल्याशा किनाऱ्यावर !
May 9, 2007
कोण आहे रे तिकडे - १
महाराज : कोण आहे रे तिकडे !
सेवक : महाराज ! मघापासन मी इथच आहे ! अस काय करताय .. मै.. हू… ना… !
महाराज : तोतरं बोलू नकोस रे ! पण खरच, तू आहेस की रे !
सेवक : मग ओरडलात कशाला असे ? एव्हढा मोठा खड्डा पडला पोटात की मला स्वतःलाच पुण्यातला एखादा रस्ता असल्यासारख वाटल !
महाराज : अरे बराच वेळ झाला ना म्हणून मी स्वप्न तर बघत नाही ना ही खात्री केली !
सेवक : स्वप्न ? महाराज अहो झोपताय काय ? काय भुगोलाचा तास वाटला का इकॉनॉमिक्स चा ? पालिकेला गाढ झोप लागली असली किंवा तिने झोपेचं सोंग घेतलेलं असल तरी तुम्ही झोपू नका ! पुण्यात वाहतूक, प्रदूषण, वीजटंचाई हे महत्वाचे विषय आहेत ! तुमचा डोळा लागला तर पालिका नि सरकार अजूनच कानाडोळा करेल ना !
महाराज : खरय तुझ ! आत्तापर्यंत पुण्यनगरीचा इतिहास महत्वाचा होता! आता भुगोलही महत्वाचा झालाय !.. पण आता हळूहळू वाटतय की ह्यामागच इकॉनॉमिक्सच सगळ्यात महत्वाच आहे !
सेवक : किती विषयांतर करताय ! मला तर हा नागरिकशास्त्राचा विषय वाटला होता! छे छे ! इतके विषय आहेत ह्यामधे की मला दहावीला बसल्यासारख वाटतय पुन्हा !
महाराज : आत्तापर्यत पालिका पाचवीला पुजली होती आता दहावीच काय काढलस ! पण सगळे विषय आहेत म्हणालास ते कसे काय ?
सेवक : आता पहिल्यांदा गणिताचं पाहूयात.
महाराज : नको रे ! अजून पेपराच्या आठवणी येतात !
सेवक : अहो महाराज ताटातला नावडता पदार्थ आधी संपवावा मग शेवट गोड होतोय ! आता बघा, ह्यात नगरसेवक, कॊंट्रॅक्टर आणि महापालिका अस त्रैराशिक असतं !
महाराज : काय असत ?
सेवक : त्रैराशिक ! हे असे प्रश्न विचारता मधेच ! तरी तुम्हाला मराठी मिडियम मधे घाला अस मी थोरल्या महाराजांच्या मागे लागलो होतो ! तर काय आहे की ह्या लोकांची समीकरणं अगदी फिट्ट झालेली आहेत. म्हणजे परीक्षेआधीच ह्यांची ‘टक्केवारी’ ठरलेली असते !
महाराज : काय म्हणतोस ?
सेवक : मग काय ? सगळे गुण्यागोविंदाने एकत्र टेंडरचा पेपर सोडवतात ना ! आधी इथे बेरजेच राजकारण होत मग वजाबाकी !
महाराज : कुणाची वजाबाकी ?
सेवक : अहो असतात काही प्रामाणिक अधिकारी ! छान चाललेलं असत सगळं.. हे अधिकारी मधेच मिसप्रिंट असल्यासारखे येतात.. माग त्याना वजा करुन बाकी जे उरत ना त्यात हे सगळे लोक आपापली उत्तरं शोधतात !
महाराज : छे छे ! हे तर भलतच अवघड गणित आहे !
सेवक : आता भूमिती तर ह्याहून अवघड आहे महाराज ! अस बघा, जनतेला सोयीची सरकारी वाहतूक नाही, दरडोई वहानान्ची सन्ख्या, वाहतूक खोळन्बे असा त्रिकोण आहे ! रस्ते उकरण्यात पाणी, वीज, दुरध्वनी या सर्व विभागाचे अधिकारी समान्तर धावतात ! फक्त सुरळित वाहतुकीला ते छेद देतात ! हे सगळे विभाग एकमेकाना काटकोनात बघतात ! फक्त लाच घेण्यात समभुज असतात ! ह्यान्च्या कार्यक्षेत्रातला सगळा परीघ उकरुन ठेवतात, पण कामाची त्रिज्या मात्र सन्कुचित असते एका वेळी !
महाराज : अरे थांब थांब ! हे भयंकर कठीण आहे पण काय रे हे तू मला एकदा सांगितले आहेस असे वाटतय !
सेवक : होय महाराज, ह्या वेळी ऑडियन्स जास्त आहे म्हणून पुनःप्रक्षेपित केल एव्हढच !
महाराज : आमचे प्रधानजी कसे आले नाहीत अजून ?
सेवक : ते पुण्यनगरीचाच दौरा करायला गेले होते ना ते परत आलेत ! तेव्ह्यापासून त्यांच काही खर नाही !
महाराज : का रे ?
सेवक : काय सांगायच ! ते हिंदी शिकताहेत ! त्यामुळे त्यांच्याशी बोलताना झी मराठी बघत असताना मधेच नॅशनल चॅनेल लागल्यासारख वाटत !
महाराज : पण हिंदी का एकदम !
सेवक : अहो परवा टिव्हीवर मुलाखत दिली हिंदीतून. त्यांच हिंदी ऐकून त्याना सचिवानी घाबरत घाबरत सुचवल की अस हिंदी लोकाना कळणार नाही ! विशेषतः हिंदी भाषिक लोकाना ! त्यामुळे त्यानी रीतसर हिंदी शिकावं !
महाराज : अस काय म्हणाले प्रधानजी ?
सेवक : ते बोलत होते त्यांच्या पुण्यनगरीच्या दौऱ्याविषयी.. तर म्हणाले “पालिकेको जो लोगोने तक्रारे की है उस वजह से मेरेकु ये दौरा पडा है ! लास्ट टाईमके वखतमे बहुत बुरा समय था ! ठंडी के मोसम मे मुझे ‘सर्दी’ हुई थी ! लेकीन मै जब पुण्यनगरी गया था तो वहासे निकलनेका मेरा मन नही कर रहा था.. एकदम पैर भारी हो गये थे ! और फिर .. “
महाराज : बास बास ! अरे मला गरगरायला लागल आहे !
सेवक : मग काय सांगतोय का महाराज ! तर मुद्दा काय ? तर प्रधानजीचं अस झाल आहे आजकाल ! शिवाय ते त्याच प्रदेशाचे आहेत त्यामुळे सर्व काही आलबेल आहे असच भासवतील ते तेव्हा सावध रहा ! ते पहा आलेच ते !
प्रधानजी : भाषिक बनाया … भाषिक बनाया … हिंदी ! भाषिक बनाया आपने !
महाराज : प्रधानजी !
प्रधानजी : जी सरजी !
महाराज : अहो काय हे ! कुठली भाषा बोलताय ?
प्रधानजी : सरजी आय मीन महाराज ! महाराजांचा विजय असो !
महाराज : हा आत्ता कसे बोललात ! तुम्ही म्हणे पुण्यनगरीचा दौरा करुन येताय ?
प्रधानजी : जी जनाब !
महाराज : अहो काय हे ! मराठीत बोला बघू ! बर मला दौऱ्याचा वृतांत हवाय !
प्रधानजी : ओह आखो देखा हाल ! सांगतो ना ! अहाहा !
महाराज : प्रधानजी ! फालतू बडबड नकोय .. आम्हाला लोकांच्या तक्रारी येताहेत अजून !
प्रधानजी : अहो महाराज कसल्या तक्रारी ? सांगा पाहू ! मला तर पुण्यनगरीच्या रम्य आठवणीने अजून गदगदल्यासारख होतय !
सेवक : खड्ड्यामुळे बसलेले धक्के अजून आठवत असतील !
प्रधानजी : नाही रे !
महाराज : बर प्रधानजी, तुम्ही वृतांत द्या बघू !
प्रधानजी : महाराज ! पुण्यनगरीची अवस्था बेकार आहे हे तितल्या हवेइतकीच शुद्ध अफवा आहे ! अफवांवर विश्वास ठेवू नका.. पालिकेने मोठ्या मुश्किलिने खड्ड्यामधून मधे मधे रस्ते बांधलेले आहेत ! खरतर ह्या खड्ड्यांच्या माध्यमातून केवढ मौलिक तत्वज्ञान पालिका लोकाना देत असते ! ‘जीवनात कसेही उतार चढाव येत असतात त्याला तोंड द्यायला शिकल पाहिजे’ हेच ते तत्वज्ञान ! भारतीय संस्कृतीच्या ह्याच उदात्त तत्वज्ञानामुळे मोक्ष मिळतो महाराज !
महाराज : अहो पण तुमच्या खडड्यांच्या तत्वद्न्यावरुन गाडी चालवताना पडून मोक्षाऐवजी कपाळमोक्ष होतो आणि त्या खड्डयाना लोकाना शब्दशः तोंड द्यावे लागते त्याच काय ?
प्रधानजी : अहो आपला महाराष्ट्र हा दगडांचा देश आहे ! वाळूचे कण रगडून तेल काढणारे आपण.. आता हे दगड, गोटे आणि वाळू रस्त्यावर असायचेच ! एखाद्या दगडावरून गेले चाक तर जातो तोल ! त्यामुळे आपोआप हेल्मेटचे महत्व चालकाला कळते महाराज ! हिंदीमधे म्हण आहेच सिर सलामत तो पगडी पचास ! आता पुण्यनगरीत तरी पगडीचे महत्व लोकाना माहितच आहे पण सिर चे महत्व आता कळायला लागलय !
महाराज : अस्स !
प्रधानजी : आता पुढचा मुद्दा लोड शेडींग चा
महाराज : हो ! तुम्ही वीजकपात वाढवत नेणार म्हणून लोक नाराज आहेत !
प्रधानजी : महाराज हे आपल उगाचच कपातल म्हणजे आपल ते .. पेल्यातल वादळ आहे बर का ! आता मला सांगा व्यसन म्हणजे काय ?
महाराज : काय ?
प्रधानजी : काय ?
महाराज : मला काय विचारताय सारख ?
प्रधानजी : नाही सहज समोर होतात म्हणून विचारल .. नथींग पर्सनल ! मी सांगतो ! व्यसन म्हणजे एखादी गोष्ट वारंवार लागण, तिच्यावर अवलंबून असण, ती मिळाली नाही तर अस्वस्थ होण प्रसंगी हिंस्त्र होण वगैरे… आता मला सांगा ह्या पुण्यातल्या आणि अवघ्या महाराष्ट्रातल्या लोकानाच लागलय व्यसन ! विजेचं व्यसन ! लोड शेडींग म्हणजे व्यसनमुक्तीचाच एक प्रकार आहे !
महाराज : काय ???
प्रधानजी : मग काय ! वीज २४ तास पाहिजेच, ती नसली तर निराश होणं , अस्वस्थ होण प्रसंगी विद्युत मंडळाच्या कार्यालयावर हल्ला करण्याएव्हढ हिंस्र होणं हीच व्यसनाची लक्षण आहेत ! तेव्हा हळूहळू वीजेचा डोस कमी करण्याच विद्युत मंडळाने ठरवल आहे !
महाराज : अहो पण मागच्या वर्षी लोक वैतागून विद्युत मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा घेउन गेले तेव्हा तिथे कर्मचारी लोक पत्ते खेळत असताना आढळले.. आजकाल लोक विद्युत मंडळाला ‘द्यूत मंडळ’ म्हणतात !
प्रधानजी : लोकाना फुकट तक्रारी करायची सवयच झालेली आहे ! अहो माझ्या पुढ्यच्या दौर्यात मी खेडोपाडी गेलो होतो.. पुण्यनगरीत ‘वीज जाते’, ‘वीज जाते’ म्हणून लोकं बोंब मारतात महाराष्ट्रात अनेक खेडयात वीज कधीकधी येते !! त्यापेक्षा पुण्यनगरी किती तरी बरी !
महाराज : वाहतूकीच काय ?
प्रधानजी : ह्या बाबतीत मात्र पुण्यनगरीतले लोक सेल्फ़ मोटीवेटेड वाटले.. अजिबात सरकारवर अवलंबून नाहीत.. मला तर अमेरिकेचा दौरा केला होता त्यापेक्षाही भारी वाटले लोक !
महाराज : म्हणजे ?
प्रधानजी : म्हणजे अमेरिकेत ‘ड्रायविंग इज अ प्रिविलेज, वॉकींग इज अ राईट’ अस समजतात.. पण पुण्यनगरीतल्या लोकाना ते केव्हाच समजलय.. मागून ट्रक जरी आला तरी वळून न बघता शांतपणे क्रॉस करताना ते आपली मनःशांती न ढळू देता आपला हक्क बजावतात ! त्यानी कितिही कानाशी येउनही हॉर्न वाजवला तरी ढूंकूनही पहात नाहीत ! चालकवर्ग ही प्रगतीत मागे नाही ! लेनची शिस्त वगैरे असामाजिक विचार पुण्यनगरीत कधी रुजलेच नाहीत पण आजकाल सिग्नलसारख्या जुनाट चालीरितीनाही पूर्णपणे फाटा देण्यात येतो.. लोकशाहीतल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा अविष्कार बघायचा असेल तर दुसरी जागा शोधून सापडणार नाही ! इतके जागरूक नागरिक असल्यावर वाहतूक पोलीस कधीमधी संकष्टीला वगैरे चौकात उभे असतात तेही बंद करायला हवे.. नुसते कटाउट ठेवा हव तर पोलीसांचे !
महाराज : बर प्रदूषणाच काय ? लोक खोकली तरी आजकाल तोंडातून धूर बाहेर पडतो आहे म्हणतात.. नको त्या वयात दम्याचा त्रास वाढतो आहे !
प्रधानजी : दमाने घ्या महाराज ! प्रदूषण अतिधोकादायक पातळी ओलांडून राहिले आहे असे ऐकून होतो.. म्हणून म्हटल बघावे तरी कसे आहेत ते.. ह्याविषयी तर मी स्वतः जाउन निरीक्षण केल .. पौड रोडच्या पुलावर गाडी थांबवून प्रदूषण शोधायचा आटोकाट प्रयत्नही केला पण धूर आणि धूळ इतकी होती की समोरचेच नीट दिसत नव्हते त्यात प्रदूषण वगैरे कसे दिसणार ? ह्या लोकाना कसे काय दिसते कुणास ठाउक !
महाराज : वा ! वा ! एकंदर सर्व काही आलबेल आहे तर पुण्यनगरीत !
प्रधानजी : जी जनाब ! सब कुशल मंगल !
मंगल मंगल मंगल मंगल मंगल मंगल हो !
छाटली झाडे ही, कापल्या टेकड्याही !
वाढल्या गाड्याही हो !
खोकतो चिंटुही, चिंटूचे बाबाही,
चिंटूची आईही हो !
मूड असेल तसे सिग्नल तोडावे
पाहीजे तेव्हा कधीही वळावे,
मनात आले की क्रॉस करावे
संगणकावरी मेणबत्ती लावू रे !
आयटी सिटीचे स्वप्न पुरे होत जाय !
मंगल मंगल मंगल, मंगल मंगल मंगल हो !
***
May 8, 2007
येता का जाऊ ?
स्थळ : पुणे शहरातील एक रिक्षा स्टॅंन्ड. वेळ संध्याकाळी ७.३०.
पात्रे : मी आणि, कुठेही चलायला विचारलं तरी 'नाही !' म्हणून प्रश्न सीमापार धाडण्याच्या तयारीत पहिला बाणेदार रिक्षाचालक ..
पण मी 'यॉर्कर' टाकतो …
मी : तुम्ही कुठे चालला आहात?
रिक्षाचालक : ?? अं !!! (खरं म्हणजे प्रश्नकर्ता तो असायला हवा होता. झालेला गोंधळ समजून घेण्याची धडपड)
मी : नाही. म्हणजे कोथरुडला चालला आहात का?
रिक्षाचालक :अंऽऽऽऽ (ओशाळलेले स्मितहास्य ).. बसा.
दृश्य २ :
वेगळा रिक्षा स्टॅंड. वेगळ्या दिवशी.
मी : तुम्हाला कुठे जायचे आहे?
रि. चा. : (अनवधानाने उत्तर) स्वारगेट ! अंऽऽऽ.. तुमी कुटं चाल्ला ?
मी : ( ते महत्वाचे आहे का वेड्या?) कोथरुड ! असू दे. उगाच तुम्हाला तसदी नको..
(दुसऱ्या रिक्शावाल्याकडे वळतो पुन्हा अनपेक्षित प्रश्नाचा यॉर्कर टाकण्यासाठी)
दृश्य ३ : ह्याच धर्तीवर आगामी (पण सध्या काल्पनिक) संवाद :
मी : तुम्हाला कुठे जायचे आहे?
रि. चा. : अंऽऽ ! मला अं.. अर्रर्र.. तुम्हाला कुठे..?
मी : नवीन लायसंस आहे वाटतं ? मला कुठे जायचय हा सवाल फिजूल आहे. तरीपण आपल्या स्टॅंडवरच्या इतर रि. चा. न्शी गप्पा मारुन झाल्या असतील, शिवाय योगायोगाने रिक्षाही आहेच तेव्हा तुमचा चालवायचा मूड असेल, दिवसभरच्या मग्रूरीचा कोटा पूर्ण झाला असेल, मुहुर्त व रिक्षाचे तोंड असलेली दिशा ठीक असेल आणि तुम्हाला फार वेदना होणार नसतील तर कोथरुडला येणार का ?
रि. चा. : ( पश्चातापदग्ध होऊन, अश्रूपात करत मीटर टाकतो ) बसा साहेब.. अन्या ! मी यानला 'खाली' सोडून येतोरे.
(अर्ध्या वाटेत आल्यवर रडू आवरत)
रि. चा. : साहेब तुम्ही माझे डोळे उघडलेत ( म्हणजे ? हा आत्तापर्यन्त झोपेत चालवत होता की काय ?) मी आता कुठल्याबी गिराइकाला नाय म्हननार नाय !
मी : कसचं कसचं. वास्तविक मैने क्या किया हय? मैं तो अच्छे शेहेरी होने के नाते अपना फर्ज अदा कर रहा था... काश पुणे का हर रिक्शावाला तुम्हारी तरह होता तो इस देश का ..
रि. चा. : ए xxखाऊ.
मी : !!!!
रि. चा. : बगा सायेब ... (एका नाठासाला सायकल चालीवतो का इमान ?
मी : (हुश्श!)
दृश्य ४ :
कट टू : वास्तव
मी : पस्तीस ना ? हे घ्या. थॅंक्यू !!!
रि. चा. : वेलकम सर !!!
मी मूर्च्छीत पडल्याचे न पहाता निघून जातो …
दृश्य ५ :
रिक्षा जवळ येउन थांबताच ‘अतिविशिष्ट’ पेयाचा भपकन वास !
मी : (रि. चा. माझ्याचकडे पहात आहे अशी सोयिस्कर समजुत करुन घेऊन) कोथरुडला येणार का?
रि. चा. :माराष्ट्रात कुठई येउ की ! बसा !
मी : (आत बसत) बर मग आधी यवतमाळला घ्या.
दृश्य ६ :
.....
.....
मी : सावकाश हो...
रि. चा. :च्यायला ह्या खड्ड्यांच्या .. हे खड्डे बुजवणायाना अमेरिकेत नेले पाहिजेत ट्रेनिंगला
मी : का ?
रि. चा. : हेना 'समांतर' म्हणजे काय माहित नाही. खड्डा बुजवायचा म्हणजे वरती उंचवटा करुन ठेवतात...
मी : बरोबर आहे. (तो बिचारा कारुण्याला विनोदाची झालर लावत होता.. पण रिक्षा त्याची आपटत होती !)
....
.....
(अमेरिकेतले आणि भारतातले खड्डे आणि उंचवटे ह्यावर एक परिसंवाद झाल्यावर)
रि. चा. : तुमी किति वर्ष होता तिकडं?
मी : पाच.
रि. चा. : तुमचं शिक्शाण तिथच झालय का ?
(नेमका मोठा खड्डा येउन रिक्षा पुन्हा आपटते.. त्यामुळे 'तिथच' हा शब्द मला ऐकूचं येत नाही.. त्यामुळे त्याचा प्रश्न 'तुमच शिक्शाण झालय का' असा वाटतो. मी त्याचा प्रश्न 'किंवा' ह्या सदरात टाकून पुढच्या प्रश्नाची आणी खड्ड्याची वाट पाहू लागतो !)
***
May 7, 2007
खड्डेमें रहने दो, खड्डा ना 'बुजाओ' !
दृश्य १)
दृश्य २)
दृश्य ३) महापालिका आयुक्तांची पत्रकार परिषद.
दृश्य ४) आमच्या गल्लीतले आद्य सुधारक शेणोलीकर काका ह्यानी एका ट्राफिक हवालदाराची घेतलेली मुलाखत.
डायवर कोन हाय ?
पुण्यनगरीत ('विद्येचे माहेरघर' फेम) वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे ! रक्त बासुंदीसारखं आटवून आटवून सांगितलं आणि कितीही समाजप्रबोधन केलं तरी अजूनही परिस्थिती गंभीरच आहे.
तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण आजही.. हो हो ह्या आजच्या युगात, आजच्या दिवशी, काही तुरळक लोक अजूनही सिग्नल पाळत आहेत ! आधुनिक समाजातल्या बहुसंख्य लोकांप्रमाणे सिग्नल, लेन, वेगमर्यादा वगैरे जुनाट वाईट चालीरिती झुगारून देण्याचे धाडस त्या सामान्य लोकांच्या अंगी नाहीच. पण जपून वाहने चालवणे, उजव्या साईडनेच ओव्हरटेक करणे, नेमून दिलेल्या जागेतच पार्कींग करणे आणि सर्वात दुर्दैवी म्हणजे हॉर्नचा वापर कमीतकमी करणे वगैरे प्रकारही काही मोजक्या लोकांकडून अजूनही चालू आहेत.
हे कुठेतरी थांबायला नको का ???
ह्या निवडक मूर्ख लोकांमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती देशाला कुठे घेऊन जाईल ह्याचा विचार मनात आला तरी मेंदूत वाहतूक मुरंबा होतो ! पण मुळातच हे लोक 'रस्त्यावर' यावेत का हाच प्रश्न आहे !
सुदैवाने वाहतूक खात्याने ह्यावर तातडीने उपाययोजना करायचे ठरवले आहे. पुणे वाहतूक शाखेने नवीन परवाना ' काढायला ' येणाऱ्यांसाठी खास प्रश्नावली बनविली आहे. आता आठचा आकडा काढून परवाना घ्यायची पद्धत जाउन ह्या सर्व कठीण प्रश्नांची योग्य पर्याय निवडून अचूक उत्तरे देण्याऱ्यासच ह्यापुढे परवाना मिळु शकेल !
प्रश्नावली:
प्रश्न १. पुण्यात वाहतूक सौजन्य दिन साजरा करण्याचे ठरत आहे. त्यासाठी सर्वात चांगला दिवस कुठला ?
- दर महिन्याच्या बत्तीस तारखेला
- सडपातळ अंगयष्टी असलेला ट्रॅफिक पोलिस दिसेल त्या दिवशी
- रिक्षावाले तिरके न बसता सरळ बसू लागतील त्या दिवशी
प्रश्न २. चालकासाठी रस्त्यावर परीक्षा देण्यास सर्वात योग्य दिवस :
- गटारी अमावास्येला रात्री ११ वाजता
- ट्रॅफिक पोलिस, सिग्नल वगैरे नसलेल्या चौकात 'पालखी'च्या दिवशी
- सर्व धरणांचे सर्व दरवाजे उघडावे लागतील अशा 'रिमझिम' पावसाच्या दिवशी
प्रश्न ३. '१०० मीटर पर्यंत वाहने उभी करु नये' हा बोर्ड पाहून तुम्ही काय करणे अपेक्षित आहे ?
- घरुन टेप घेउन निघावे व टेपने मोजून बरोबर अंतरावर गाडी लावावी
प्रत्येकाने हाताची एक 'वीत' म्हणजे किती सेन्टिमिटर ते लक्षात ठेवावे आणि बोर्डपासून १०० मिटर होइपर्यन्त वीता मोजून मग गाडी लावावी - बोर्डवर सोसायटीच्या गणेशोत्सवातल्या स्पर्धांचे राहिलेले पोस्टर लावावे
- बोर्ड उखडून आडवा ठेवावा
प्रश्न ४. तुम्ही अलिशान चार चाकी चालवताना सिग्नल तोडलात आणि पकडले गेलात. वाहतूक पोलिसाने हसुन गाडीकडे पहात हात खाजवत 'काय करता साहेब' अशी सुरुवात केल्यास..
- गाडीचा ड्रायवर असल्याची बतावणी करुन खिशात फक्त सव्वा रुपया आहे असे सांगावे
- झटकन आंधळे असल्याची बतावणी करावी व क्रॉस करण्यास मदत मागावी
- पोलीसाशी हस्तांदोलन करावे आणि 'आज इकडे कसे काय? ऑफ ड्यूटी आहात का?' असे विचारावे !
- चालू फॅशनच्या पक्षाचा झेंडा कायम गाडीत ठेवावा व अशा वेळी झटकन लावावा
प्रश्न ५. लाल सिग्नल असल्यास...
- सिग्नललाच ठोकावे म्हणजे पुढच्या वेळी लाल दिव्याचा त्रास होणार नाही
- हिरवा सिग्नल मिळालेल्या काटकोनात असलेल्या गाड्यांमधे आपली गाडी खुशाल घुसवावी आणि वर आपणच त्रासिकपणे खांदे उडवत रहावे !
- करकचून ब्रेक दाबावा व थांबावे .. पण त्याआधी गाडी सिग्नल पार करून चौकात मधोमध आहे ना ह्याची खात्री करावी
प्रश्न ६. हिरवा सिग्नल असल्यास..
- गाडी कासवाच्या वेगाने चालवून आयत्या वेळी सटकावे आणि बरोब्बर मागच्या गाडीला लाल सिग्नलला अडकवून असूरी आनंद घ्यावा.
- उजवीकडे लांबपर्यंत डिव्हाईडर असूनही उजवा इन्डिकेटर देउन मागच्यास गोंधळात टाकावे
- सिग्नल ओलांडून गाडी चौकात रस्त्याच्या मधोमध थांबवून पत्ता विचारावा.
प्रश्न ७. सिग्नल तोडताना पोलीसाने शिट्टी मारल्यास..
- आपणही दुप्पट जोरात शिट्टी मारावी
- पोलिसाला घरी आया बहिणी नाहीत का विचारावे !
- बाजूच्या स्कुटरवाल्याच्या हेल्मेटची काच वर करुन 'ते तुम्हाला बोलवताहेत' असे सांगावे
- दोन शिट्ट्यांच्या मधे 'जागते रहो' असे ओरडावे
प्रश्न ८. लाल सिग्नलला आपल्या पुढचा थांबल्यास..
- त्याला सुसाट ठोकून आपणच वाईटातली वाईट शिवी द्यावी
- ठोकता नाही आले तर बाजूने जाऊन 'चल ना.. सिग्नल दिसत नाही का' असे तुसडेपणाने म्हणावे व रागात बघत निघून जावे
- सिग्नल सुटायला वेळ असेल तर त्याच्या गाडीवर ब्लेडने 'वाटेल तिथे थांबू नये' असे कोरावे
प्रश्न ९. 'एकदिशा मार्ग' असा बोर्ड पाहिल्यास..
- आपल्याला हव्या त्या कुठल्याही एका दिशेने जावे.
- त्या गल्लीत जाताना बोर्डवरच्या बाणाचे तोंड आकाशाकडे वळवावे (मागचा ट्राफिक एकदम कमी होईल !)
- बरोबर विरुद्ध दिशेने जाउन बरोबर दिशेने एकेरी वाहतुक करणारे 'एकेरी'वर येतील असे बघावे
प्रश्न १०.उजवीकडे वळायचे असल्यास काय कराल ?
- दुचाकीवर असाल तर.. तर काय ? असाल तसे वळा !!!
- चारचाकीत गाडीतल्या पाठच्या पुढच्या सर्व लोकाना खिडकीबाहेर सर्व दिशाना हात दाखवून अगम्य खुणा करण्यास सांगावे.
- शक्यतो सर्वात डावीकडच्या लेन मधे गाडी ठेवुन वळायचा सिग्नल जवळ येईल तशी जोरदार उजवीकडे वळण्यास सुरुवात करावी.
प्रश्न ११. 'जड वाहनास प्रवेश बंद' अशी पाटी पाहिल्यास
- बायकोस गाडीतून खाली उतरण्यास सांगावे
- त्यानेही नाही काम भागले तर आजूबाजूच्या गाडीवाल्याना दोन चार शिव्या देउन मन हलके करावे
- ट्रक चालवत असल्यास पाटीपर्यंत जाऊन ती वाचावी आणि मग ट्राफिक जॅम झाल्यावर रिव्हर्स घ्यायला सुरुवात करावी.
प्रश्न १२.अतिशय बुद्धिमान व सुजाण नागरिक असल्याचे सर्वात उत्तम लक्षण कोणते ?
- तुम्ही लहान मुलाची माता असाल तर रस्त्याकडेने चालताना तुमच्या मुलाला ट्रॅफिकच्या साईडला ठेवुन आपण दुसरीकडे वेंधळेपणे बघत चालणे.
- अतिशय भिकार अशी 'लेटेस्ट ट्यून' हॉर्नवर वाजवायचा प्रयत्न करणे !
- चार चाकीची आर्थिक ऐपत आली तरी जुने दिवस न विसरता ती दुचाकी सारखी चालवणे व कायम तिरकी घुसवण्यास बघणे.
- समोरच्याचे डोळे पांढरे होतील आणि त्याच्या भावी पिढ्याही आंधळ्या निपजतील इतका 'हाय बीम' उगाचच मारणे !!!
* * *
माझी चित्रकला
थेट संगणकावर साध्या माऊसने काढलेली ही काही चित्रे.
नवीन चित्र काढण्याची पद्धत :
- संपूर्ण कोऱ्या 'पार्श्वभूमी' वर (white/transparent background) सुरवात.
- मुख्यत: 'स्प्रे टूल' वापरून सर्व चित्र काढणे.
- सर्वात शेवटी काही effects देणे.
May 6, 2007
श्रीगणेशा !
विशेष महत्वाचे लिहायचे असले किंवा नवीन वही वगैरे वापरायला सुरवात करायची असेल तर आपण बरेच जण पहिल्या कागदाच्या डोक्यावर 'श्री' लिहीतो. .
म्हणजे देवाच्या 'good books' मधे पहिल्या पानापासूनच रहाण्याचा खटाटोप ! आता आपल्या श्रद्धेचं असं 'documented proof' दिल्यावर तरी देवाने आपल्याकडे कृपादृष्टीने पहावं (म्हणजे शाळेची वही असेल तर त्या विषयात जरा बरे मार्क पडावे निदान त्या विषयाची 'विषयासक्ती' वाढून गटांगळ्या खायला लागू नयेत) अशी अपेक्षा !
तर ब्लॉगला सुरवात करताना माझाही हा श्री !
असा 'श्री' लिहीण्यामागची गंमत शं. ना. नवरेंनी एकदा सांगितली होती :
सुरवातीला 'श्री' च का लिहीयचा ? 'ढ' का नाही ?
'श्री' हा 'श्रीगणेशा' तला म्हणून तर खरंच पण त्याला अजून एक कारण असू शकेल.. 'श्री' लिहीताना उभ्या, आडव्या, तिरक्या रेघा आहेत. वेलांटी आहे. म्हणजे पेन/पेन्सिल सर्व बाजूनी वळवून वापरावी लागते. आपोआपच सर्व प्रकारानी ते पेन/पेन्सिल नीट उमटते आहे की नाही ह्याची छोटीशी चाचणी पण होते !
म्हणजे आपण सही वगैरे करण्यापूर्वी दुसऱ्या कागदावर काहीतरी गिरवून/खरडून, 'पेन नीट उठते आहे ना?' ते तपासतो ना..
तसंच काहीसं..
चला तर, सुरवात करतो !!!