May 21, 2007

कालवा !

बरेच दिवस कालव्याचा नुसता ओरडाच राहिला
आश्वासनात न्हाऊनही गाव मात्र कोरडाच राहिला

शेवटी गावकऱ्यानी पाण्याचा प्रश्न फारच रेटला
तेव्हा कुठे गावचा नेता 'सीएम'ना येऊन भेटला

सीएम म्हणाले तुमच्या मागण्याना काही अंत नाही
उगा भडकू नका, पाण्याचा प्रश्न एव्हढा ज्वलंत नाही

एक कालवा दिला तर अजून मागण्या वाढतील
लोक काय डोळ्यातले पाणी पिऊन दिवस काढतील

निषेध करा हो पण एक लहानसा चेंज करा
मी जातोय परदेशी तेव्हाच मोर्चा 'अरेंज' करा

मग करु जाहीर की शासन ह्यावर्षी कालवा काढेल
आसपासच्या गावात जरा तुमचंही वजन वाढेल !

मग उडवलेली धूळ जरा खाली बसू द्यात
माझ्या सत्काराचे मात्र लक्षात असू द्यात

नेत्याचेही आता सर्वांगीण विकासाचे धोरण आहे
त्याच्या वाड्याला आता सोन्याचे तोरण आहे

शेवटी एकदाचा कालवा झाला ...

लोक म्हणाले कालव्यात काहीतरी पाणी मुरतंय
अनुदानातून खर्च जाऊन बरचं काही उरतंय

काही असो, शासन जोरात विकास करत आहे
नेत्याच्या घरी आता लक्ष्मी पाणी भरत आहे !

***

3 comments:

प्रसाद said...

तुझ्या या पोस्ट नंतर आज ५ वर्षानंतर सुद्धा काहीही फरक नाहीये ...

किंबहुना 'सिंचन सिंचन' म्हणतात ते शिंचं खरंच होतं का हा प्रश्न अजूनही पडतोच आहे आणि आकडे ऐकून डोळे 'पांढरे' होतच आहेत.

(btw या कवितेवरून तुला मी द्रष्टा कवी वगैरे म्हणू का ;))

प्रसाद said...

आणि आता सिंघमचा सिक्वल येणारे 'सिंचन' या नावाने.

दादांच्या मिश्या थोड्या अक्कडबाज केल्या , की झाsssले.

राफा said...

हाहाहा पश्या..

तुझ्या या पोस्ट नंतर आज ५ वर्षानंतर सुद्धा काहीही फरक नाहीये ...>>> अरे खरंच की !!! आज(ही) चपखल बसते आहे नाही का..

ठांकू. ठांकू .. असा (नत)द्रष्टेपणा माझा अगदी पहिल्यापासूनच ! :)