Dec 20, 2010

लोकशाहीचा लोचा आणि बकासूर !

मुलांनो,

आज मी तुम्हाला बकासुराची गोष्ट सांगणार आहे !

अरे अरे ! किती ओरडताय ! विधानसभेत आहोत का आपण ? डस्टर कुणी पळवले इथले ?

गोष्ट ऐकायची आहे ना ? ऐका तर. एकचक्रा नगरीच्याबाहेर जंगलात एक बक नावाचा एक बोनाफाईड राक्षस रहायचा. तोच बकासूर ! तो एकचक्रा नगरीच्या लोकांना अतिशय त्रास देत असे.

नाही बरे ! आपल्या वाढदिवसाची पोस्टर्स लावून आपला मनमिळावू व सात्विक चेहरा सतत दाखवण्याइतका काही तो क्रूर नव्हता... तो फक्त माणसे व पाळीव पशू वगैरे पकडून खाऊन टाकी ! पालिका कर्मचा-यांना स्वप्नात दृष्टांत झाल्यासारखे ते अनधिकृत बांधकामे एके दिवशी अचानक पाडू लागतात त्याप्रमाणेच, तो लोकांची घरे पाडून टाकी, नासधूस करी पण अगदी रोजच्या रोज.

हो अगदी रोजच्या रोज ! आपण कसे पेपरमधे रोजच्या रोज राजकारण्यांचे घोटाळे वाचतो, आणि मग रस्त्यावर त्यांचेच ‘आमचे तडफदार नेतृत्व’ अश्या लेबलाखाली कुठल्यातरी दिशेला एक बोट केलेला होर्डींगवरचे फोटो बघतो नि खाली त्यांच्या ‘शुभेच्छुक’ रानदांडग्या बगलबच्च्यांचे फोटो पहातो आणि त्याचा कसा रोजच्या रोज आपल्याला वैताग होतो… अगदी तस्सेच एकचक्रानगरीतले लोक वैतागून गेले होते अगदी.

मग ह्यावर त्या लोकांनी तोडगा, म्हणजे ज्याला आधुनिक सुसंस्कृत समाजात आपण ‘मांडवली’ म्हणतो, तो काढला.


Dec 17, 2010

विडंबन : ‘मालवून टाक दीप’

‘मालवून टाक दीप’ चे विडंबन 

(सुरेश भटांची क्षमा मागून)


(अमानूष केस व दाढी-मिशा वाढलेला इसम न्हाव्याला म्हणतो आहे…)


भादरून टाक नीट, कर्तनात हो तू दंग
नापिता किति दिसात, पाडला बळेच भांग

ह्या अशा जटा बटांत, चेहरा लपे तो आत
हाय तू हसू नकोस, दिसतो मी जरी भणंग

लांब लांब दोन हात, गेला हा संभार व्हात
सावकाश घे कापून, कठीण हा जरी प्रसंग

फार फार ह्या हवेत, उडूनी दाढी झोके घेत
मोकळी करून टाक, घेई वस्त-यास संग

हे तुला तेव्हा कळेल, दिसताच मी कोणी पळेल
काप ना केस हे बरेच, पालटू दे रुपरंग

काय हा तुझा मसाज, नाजूक का इतुका आज
बडव रे लावून तेल, मस्तकाचा कर मृदुंग


- राफा



 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Dec 1, 2010

पुणेरी पाट्या आणि मॅक्डी !

 


‘पुणेरी पाट्या’ संस्कृतीचे आक्रमण 'मॅकडोनाल्ड्स' वर झाले तर ?



• आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.


• ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये - हुकूमावरून)


• दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.


• कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठी बसायची सोय.


• टिव्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.


• टिव्ही चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.


• कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: १९ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: ४६ फ्राईज)


• गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८. तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)


• पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर.. पुढच्या दहा मिंटात मिळेल ! पैसे परत मिळणार नाहीत.


• कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.


• विनाकारण सॉस मागू नये. टमाटू फुकट येत नाहीत.


• शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.


• दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.


• उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.


• हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये - हुकूमावरून)


• आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)


• कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.


• शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.




- राफा


 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Nov 26, 2010

..मग कसाब अजून जिवंत का ?

जे सांगायचे आहे ते २६/११ च्याच निमित्ताने.

गेल्या दोन वर्षांत, जेव्हा जेव्हा आठवण होत होती, विषय निघत होता तेव्हा तेव्हा मनातला खदखदणारा अंसतोष डोकं वर काढतच होता.

कसाब अजून जिवंत का ?

दोन वर्षांपूर्वी २६/११ चा जो अभूतपूर्व हल्ला मुंबईमधे झाला, तो भ्याड, निर्घृण, नियोजनपूर्ण आणि तरीही सर्वसामान्यांस भयभीत करणारा random असा होता.

अपेक्षा काय होती ?

(‘पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकून एकदाचे संपवा त्याना’ असा सोप्पे सर्वसाधारण जनमत बाजूला ठेवले तरीही) :
लोकांच्या भावनेचा आदर करून, ज्या अतिरेक्याला जिवंत पकडले आहे त्यासंबंधी विशेष कायदा नसेल तर तसा लवकरात लवकर करून (तासांच्या / दिवसांच्या हिशेबात)
खटला न चालवता त्याला मृत्यूदंड देणे ! अभूतपूर्व हल्ल्याला उत्तर म्हणून अभूतपूर्व असे शौर्य, कार्यक्षमता व निर्धार दाखवण्याची सहाजिक अपेक्षा !

झाले काय ?

सर्वांनाच माहित आहे. पोकळ वल्गना, लाल फीत, उद्वेगजनक दिरंगाई वगैरे. वर मिडीयाने दिलेल्या बातम्या. बिर्याणी मिळते वगैरे. जखमेवर तिखटमीठ चोळल्यासारख्या. ज्या मंदपणाने आणि असंवेदनशीलतेने सत्तेतले जबाबदार लोक ह्याबाबत मुलाखती देत होते/असतात (किंवा त्याहून वाईट म्हणजे संपूर्ण मौन बाळगत असतात.. मग लोकक्षोभ किती का होईना) ते भयंकरच आहे.


आज काय परिस्थिती ?

रीतसर खटला चालून कसाबला फाशीची शिक्षा झालेली आहे.
पण अंमलबजावणी केव्हा होणार ? माहित नाही.
त्याला इतके दिवस जिवंत का ठेवला आहे ? माहित नाही.

कारणे काय असू शकतील ?

काही व्यूहात्मक कारण असू शकेल का ?

खरे म्हणजे सरकारकडे डोके आणि मन ह्यापैकी कुठलाही ऐवज आहे अशी पुसटशी शंकाही येत नाही त्यामुळे ह्या पातळीवर कुणी विचार करत असेल असे वाटण्यासारखी परिस्थिती नाही. तरीही आंतरराष्ट्रीय संबंधांचा, दहशतवादाचा ज्यांचा अभ्यास आहे अश्या तज्ञ मंडळींच्या सल्ल्यानुसार त्याला जिवंत ठेवला आहे असे गृहीत धरू !

पण का ?

मुद्दा असा आहे की पटण्याजोगे खरे (किंवा खोटे सुद्धा) कारण लोकांना देण्याचीही तसदी सरकारने घेतलेली नाही.

हे अक्षम्य आहे !

लोक रक्त आटवून सांगत आहेत की त्याला लवकर फाशी द्या. ब-याच लोकांना हेही कळते की तो काही पाकपुरस्कृत दहशतवादावर कायमचा उपाय नव्हे. पण ते प्रतिकात्मक आहे ! आमच्यावर हल्ला केला तर आम्ही एकजुटीने मुकाबला करू व सर्वोच्च शिक्षाच हल्लेखोरांना देऊ (छुपे युद्ध पुकारले तर तात्काळ व चोख प्रत्युतर देऊ. उघड युद्ध केलेत तर कायमचा बंदोबस्त करु)

कसाबच्या फाशीने हा संदेश जाणार आहे. जायला हवा. कसाब राक्षस आहेच. पण अर्धशिक्षीत, बेकार युवकांना राक्षस बनवून पाठवणारे नराधम आज पाकिस्तानात आहेत. नाहीतर कसाब व इतरांना मरणाची फिकीर नव्हतीच व त्यांचा अंतही त्याना माहीतच होता. (ताजमधल्या हल्ल्यातून वाचलेली एक फिरंगी वयस्कर महिला म्हणाली होती ‘की आता मला त्यांची कीव येते… ‘doped-up kids who were brainwashed and made into dispensable robots’)

आता मात्र भारत सीमा ओलांडून लष्करी व निर्णायक कारवाई करेल अशी भिती वाटल्याशिवाय पाकिस्तान सरकार त्यांना लगाम घालणार नाही. कमीतकमी सहाय्य तरी करणार नाही. (कारण दीर्घ काळ चालणा-या अशा उघड युद्धात आपले काही खरे नाही हे त्यांनाही माहित आहे)

मग कसाब जिवंत का ?

कसाबकडून सर्व महत्वाची माहिती आत्तापर्यंत नक्कीच घेऊन झाली असणार. त्याचे documentation झाले असणार विविध स्वरुपात (कबुलीजबाब, पुरावे , माहिती ह्यांची कागदपत्रे, ध्वनिचित्रफीत वगैरे). त्या दृष्टीने त्याचा उपयोग संपला आहे.

त्याला पन्नास वर्षांनी फाशी दिले तरी ‘तो पाकिस्तानी नव्हताच व त्याचा कबुलीजबाब जबरदस्तीने घेतला होता’ असा कांगावा पाकिस्तान करणारच (ह्या नावाचा देश पन्नास वर्षांनी अस्तित्वात असेल असे ढोबळ गृहीत आहे !). तेव्हा ते केव्हाही गळा काढणारच. खोटारडेपणा करणारच. त्यामुळे तेही कारण नाही.

कसाब मुसलमान आहे म्हणून सरकार ‘काळजी’ घेत असेल तर निर्बुद्ध आणि असंवेदनशील ह्याबरोबरच सरकार षंढ आहे असेच म्हणावे लागेल (मुस्लिम संघटनांनी कसाब व पाकिस्तानचा केलेला निषेध बघूनही सरकारला कसाबची फाशी politically incorrect वाटत असेल तर धन्य आहे)

मग मुद्दा असा उरतोच की तो जिवंत का ? एक महिन्याच्या आत त्याला फाशी देणे सोडाच पण दोन वर्षे झाली तरी त्या शिक्षेच्या अंमलबजावणीचे वेळापत्रकही जनतेला माहित नसेल (सुरक्षेच्या कारणासाठी पळे घटका असा मुहूर्त सांगितला नाही तर कुठलीही मोघम माहितीही नाही) तर,

‘सत्ताधा-यांना हजार घोटाळ्यांमधून करोडो पैसे कमवण्यापासून फुरसत नाही’ हा आणि असाच अर्थ निघतो.

लोक पेटून उठून जेलवर हल्ला करून कसाबला चौकात फाशी देण्याची सरकार वाट बघत असावे !

आर. आर. पाटील व एकनाथ खडसे कसाबला भेटून आले (कशासाठी ? पुन्हा ‘माहित नाही’ !) तेव्हा आता नेमके २६ नोव्हेंबरच्याच दिवशी कसाबला फाशी देतील अशी अंधूक आशा वाटली..


बघू .. अजून काही तास शिल्लक आहेत २६ नोव्हेंबर २०१० चे !

Nov 24, 2010

कवटी सरकवणा-या गोष्टींपैकी..

खालील विचारांचा अनुवाद करण्याआधीच झटक्यात पोस्ट :

I find it astonishing that a person buys an expensive ticket to watch a movie in a Cineplex and during a particularly interesting scene, answers any unimportant call he receives & continues to talk in a casual and loud voice, with a contented face.

I find it disturbing how pathetically low the probability is that, a lightening stroke can instantly & precisely kill such a person in a crowded cinema hall.

- राफा

Nov 18, 2010

झटक्यात चारोळी

शुभ्र टोपीखालची स्वच्छ माणसे
शोधताना नाकी नऊ आलेत
कलियुग का काय ते हेच
आता घोटाळेही 'आदर्श' झालेत

- राफा

Nov 17, 2010

जिंदगी..

हे सहज सुचलं म्हणून 'झटक्यात' पोस्ट ...


बस यही था सुकूं, के सजा-ए-जिंदगी के दिन अब चंद है
सुनते है अब... के मौत को भी हम नही उतने पसंद है


- राफा

Sep 19, 2010

‘आयशॉट’च्या वहीतून : आम्च्या सोसायटीतला गणेशोत्सव !

एणार एणार असे हा हा म्हण्ताना गणेशोत्सव हा सण येऊन ठेप्लाच. गणेशोत्सव हा शब्द माज्याकडून १२१ वेळा महामरे बाईनी लिहून घेत्ल्यामुळे मी आता अजिचबात चुकत नाही.

मला गणपती बाप्पा आतिचशय आवडतो. कारण कि तो चांगली बुद्दी देतो जी की परिकशेच्या वेळेस उपयोगी पडते. गणपती बाप्पा विद्येची देवता आहे. पानचाळ सर म्हणतात की प्रत्येक देव कशा ना कशाचा तरी आधी पती आहे. दर परिकशेच्या वेळी विशेशता वारशिक च्या वेळी मी गणपतीची रोज मनो भावे तपशचरया करतो. पण चांगली बुद्दी देण्याच्या आयवजी गणपती बाप्पाने डायरेक चांगले मारक दिले आसते परिकशेत तर किती चांगले होइल. आपण सरवांनी कोणच्या तरी देवाची रोज कमीत कमी तपशचरया कराव्यास हवी (१० मिन्टे लिहावयाचे राहिले ते कंसात लिले आहे).

गणेशोत्सव असतो तेवा सरवत्र आतिचशय मंगलमय वातावरण आस्ते. बाजारात सुद्दा ने वेद्याचे मोदक पेढे व बरफी असे बोर्ड लागून दुकानांची शोभा वाडलेली आसते. सरवत्र रोश्णाइ व लाय टींग केलेले आसते. ते काईकाई वेळा फिरतेही आसते. म्हन्जे की ते तिथेच आस्ते फ्क्त लाईट फिरत असतात पकडा पकडी खेळल्यासार्खे. ठिक ठिकाणी मंडप उभारून रसत्यांची व वातूकीची शोभा वाडवलेली आसते. मंडपाशेजारी स्पिकरांची एकावर एक दहीअंडी करून त्यावरून नवीन हिन्दी पिच्चरमदली गाणी करणमधूर आवाजात लावलेली आसतात. फक्त त्या आवाजात गणपती बाप्पाला लोकांची तपशचरया ऐकू जाईल का अशी मला नेमी भिती वाट्टे.

आमच्या सोसायटीतही गणेशोत्सव असतो मदल्या चौकात. त्या काळात मुले मुली, तसेच प्रोढ व मोठी माणसे तसेच बायका वगेरे आतिचशय उतसाहाने फसफसत आसतात. बायकांमदे रोज बाप्पाला नवनवीन ने वैद्य टिवीत बगून बनवायची चडाओड लागते. ने वेद्य काय आहे त्यावर आरतीला गरदी आसते असे सागरगोटे काका म्हणताना मी आयकले. दरेक दिवशी आर्ती करताना सरव मुले कडव्याची पैली ओळ मोठ्या आवाजात म्हणतात व नंतर आर्ती पाठ नसल्याने मोठ्या लोकानच्या तोंडाकडे पहात बसतात. साठेंचा मुलगा हात जोडून नुस्ता ने वेद्याकडे पहात आसतो. नेनेन्चा राजू दादा प्रदानांच्या पिन्की ताइकडेच पहात आसतो एकसार्खा असे सिकरेट जितूने सांगितल्याने आमी सरव लहान मुलानी खातरी केली. पिन्की सुद्दा मदेमदे पाहत एडपटासार्खी हासत होती. कोलेजमदल्या एवड्या मोठाल्या मुलाना हे सुद्दा कळत नाही का की आर्तीला गंबीरपणाने उभे रहावयाचे आस्ते ? पिन्कीची तपशचरया करून राजू दादाला काय मिळनार ते बाप्पाच जाणे. ह्या वरशी आसे केले तर मी सरळ मोठ्यादी ओरडनार आहे ए राजू दादा समोर बघ म्हणून आसे.

काई काई गोशटी मात्र मला बुच कळ्यातच पाडतात. आता जासवंदीचे फूल आवडते म्हून काय रोज तेच तेच काय फूल वहायचे. बाप्पाला तरी वरायटी नको काय ? मला जिल्बी आवडते म्हणून काय रोज दिली तरी मला कंटाळाच येईल नाई का दोन तिन मैन्यानी. मस्त लाल गुलाबाचे फुल दिले आणिक ने वेद्याला चोकोलेट दिले तर देव नाई म्हण्णार आहे का ? पण मोठी लोक आइकतील तो सुदीन.


Mar 28, 2010

माणूस नावाचे पुस्तक !

जुन्याच मजकूराचे अर्थ नवे
माणसे वाचणे सोडायला हवे


मुखपृष्ठावरुन काही अंदाज ?
कराल तर फसाल !
एखादं पान चाळल्यावरच
खुदकन हसाल !


ह्या बोलण्याला तो संदर्भ,
अन आतला मतलब गूढगर्भ


पाने चाळावीत, चित्रे पहावीत..
पण संपूर्ण माणूस वाचण्याची उबळ ?
...दाबायलाच हवी !


सुंदर चेहरे बघावेत, चंचल नखरे पहावेत
देखणी मने शोधायची सवय ?
...सोडायलाच हवी !


देवमाणसांचे प्रदर्शन
मांडले आहे घराघरात
सामान्यांचे गठ्ठे मात्र
कायम सवलतीच्या दरात


सुंदर सुबक छपाई
मजकूर मात्र कुरुप
मग पाने उलटायला
लागतो उसना हुरूप !


धूळीत पडलेल्या माणसांकडे
कधी कुठे आपली नजर वळते ?
ब-याचदा माणसाची खरी किंमत
शेवटचे पान उलटल्यावरच कळते !


प्रतिभा अफाट म्हणतात,
मग वागणे क्षुद्र कसे ?
गोड मधाळ चेह-यांचे
अनुभव खवट कसे ?


'एकदा मला वाचाच !' कुणी एक बोलतो
पुढची कित्येक पाने स्वस्तुतीत डोलतो
म्हणतो, दुनियेने माझे चरित्र शिकावे
ऐकताना वाटते ह्याला वजनावर विकावे


म्हणे 'ओरिजनल' तो मीच
स्वयंभू ढंग माझा आगळाच !
मनातले त्याच्या वाचू म्हटलं
तर खरा 'प्रकाशक' वेगळाच !


अकारण अतर्क्य, आक्रस्ताळे अनाडी
त्याच गुणांवर आपले प्रस्थ थाटतात
दुमडलेल्या कोप-यांची आडमुठी पाने
मग काही पुस्तके उगाच जाड वाटतात.


कुठे सूप्त दडलेली प्रतिभा
पण भलत्या रकान्यात चुकलेली
रुक्ष वास्तवाच्या ओझ्याने
बिचारी 'फिक्शन'ला मुकलेली


एकगठ्ठा कुटुंबाच्या संचात
सख्खी नाती बोचू लागतात
करकचून बांधलेली नशीबे
एकमेक काचू लागतात.


एका जीर्णश्या डायरीत
असते सारे आयुष्य सरलेले
आठवणींच्या पंचनाम्यात
एक पिंपळपान विसरलेले !


- राफा



 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Mar 4, 2010

कोडे सोडवताना डोके कसे वापरावे ?

“हं.. आता हे सांग..”

“कोडं तू सोडवते आहेस का मी ?”

“हो का? नाही तेव्हा लुडबूड करतोस ना मी सोडवायला लागले की ?”

“आयला, हे शब्दकोडं म्हणजे अजब प्रकार आहे. नाही म्हणजे महिनो न महिने कुणी ढुंकूनही पाहत नाही. एकदा का रोज सोडवायचा झटका आला की मग पुढचे काही दिवस विचारता सोय नाही.”

“अवांतर बडबड नकोय. मदत करणारेस का?”

“बोला..”

“सरिता आणि सागर ह्यांच्या मीलनाची जागा.”

“क्याय ? सरिता आणि .. ?”

(आवाज वाढलेला) “सा ग र ! ह्यांच्या मीलनाची जागा.”

“अं… सोपं आहे. खाडी !”

“अं ?”

“खाडी खाडी !”

“च्च. चार अक्षरं आहेत.. ‘खाडी खाडी असं लिही दोनदा’ वगैरे पुचाट विनोद नको आहेत. सांग लवकर ! एव्हढं आलं की आसपासचं सुटेल लवकर बहुतेक..”

“हं..”

“…”

“…”

“च्च ! ‘पार्ले टिळक’ चा ना तू ? काय झालं आता ? …”

“हं.. स रि ता.. आणि... सागर. ह्यांच्या…?”

“मीलनाची जागा !  चा र अक्षरी ! ”

“हां..  बेडरुम !!! ”

Feb 21, 2010

बातम्या: २१ फेब्रुवारी २०५०

बातम्या: २१ फेब्रुवारी २०५०

 मुंबई (दि. २०): सध्या महाराष्ट्राच्या दौ-यावर प्रथमच आलेल्या जर्मनीच्या उद्योगमंत्री कुमारी मार्गारेट गुटेनबर्ग ह्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

काल महाराष्ट्राचे उद्योगमंत्री बबन ढमढेरे त्यांचे स्वागत करण्यास विमानतळावर गेले होते. तेव्हा ढमढेरे ह्यांना पानाचा तोबरा अनावर झाल्याने ते कु. मार्गारेट ह्यांच्या पायाशीच पाचकन थुंकले. पानाच्या लाल रंगामुळे, ढमढेरे ह्यांना रक्ताची उलटी झाली असावी असे वाटून घाबरलेल्या कुमारी मार्गारेट भोवळ येऊन पडल्या होत्या. भक्कम हाडापेराच्या कुमारी गुटेनबर्ग ह्या श्री. ढमढेरे ह्यांच्यावरच पडल्याने त्यांचाही जीव काही वेळ कासावीस झाला होता.

अजूनही, आज २०५० सालीही महान भारतीय संस्कृतीबद्दल पाश्चात्य देशात किती घोर अज्ञान आहे ह्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ‘विविध आवाज काढून कुठेही कसेही थुंकण्याचे स्वातंत्र्य’ ह्या गोष्टीचा आदर करायचा का मूर्खासारखी किळस वाटून घ्यायची असा प्रश्न विचारला जात आहे.

२०१० साली सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबद्दल रु. १००० दंड होता हे ऐकून तरुण वाचकांना कदाचित आश्चर्य वाटेल. तेव्हापासून ते २०२२ पर्यंत महाराष्ट्राच्या शहरी भागात एकूण सात जणांवर दंडाची कारवाई करण्यात आली. इतकी कठोर कारवाई केल्यानंतर चळवळ करुन हा अमानुष कायदा बदलण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याविरुद्धचा कायदा केव्हाच रद्द केला असला तरी परदेशी पाहुण्यांसमोर किंवा त्यांच्यावर थुंकण्यावर बंदी घालण्याचा नियम करण्याचा विचार सरकार करत असल्याचे आज गृहमंत्र्यांनी जाहीर केले.

त्यामुळे विरोधी पक्षाने ह्याविरुद्ध रान उठवले आहे. विरोधी गटनेते चावरे म्हणाले “कुणीही उठावे आणि आम्हाला काहीही शिकवावे असा डाव असेल तर आम्ही तो हाणून पाडू. इथे परदेशी पाहुणे, मंत्री, पर्यटक वगैरे कुणीही नाही आले तरी बेहत्तर ! पिढ्यान पिढ्या चाललेल्या परंपरा मोडीत काढणा-या सरकारला गाडून टाका व त्याच्या थडग्यावर गुटखा खाऊन थुंका ! उद्या प्रगत देशांप्रमाणे 'दिलेल्या वेळेवर पोचा', 'ठरलेल्या वेळेवर कामे करा' वगैरे नसती थेरंही चालू कराल. आपल्या देशात विदेशी संस्कृतीचे हे आक्रमण सहन केले जाणार नाही. पुढच्या वेळेपासून, आपल्या थोर परंपरेनुसार पाहुण्यांना सप्रेम भेट म्हणून गुटख्याची पाकिटे द्यावीत असे मी सरकारला आवाहन करतो म्हणजे ते आपापल्या देशात जाऊन सराईतपणे थुंकू लागतील व गुटख्याची पाकिटे फेकून रस्त्याची शोभा वाढवतील’.

  
पुणे (संध्याछाया वृत्त) : येथील ज्येष्ठ नागरिक अनंत पड्सुले ह्यांचा प्रदीर्घ समाजसेवेबद्दल आज सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी, चाळीस वर्षांपूर्वी कर्वे रस्त्यावर पीमटी बस सेवेच्या भोंगळ कारभाराविरुद्ध तीव्र आंदोलन झाले होते त्या आठवणी त्यांनी जागवल्या.

ह्याप्रसंगी श्री. पडसुले म्हणाले “ते झपाटलेले दिवसच वेगळे होते. कॉलेजच्या वेड्या वयात पीएमटी बसमागे साचलेल्या धुळीच्या थरावर मी बोटांनी ‘अनंत लव्ह्ज सुनेत्रा’ अशी अक्षरे काढली होती. पुढचे काही महीने म्हणजे पहिला पाऊस पडेपर्यंत माझ्या प्रेमाची ती धुळाक्षरे बाळगणारी पीएमटी बस जेव्हा मी अधून मधून रस्त्यावर पाहत असे तेव्हाच्या भावना व्यक्त करणे अवघड आहे. ”

ह्या प्रसंगी श्री. पडसुले ह्याना खरोखरच भावना अनावर झाल्या. थोडे सावरल्यावर, त्याना आम्ही पीएमटी विरुद्धच्या आंदोलनविषयी छेडले असता ते म्हणाले “चाळीस वर्षांपूर्वीचा तो आंदोलनाचा दिवस मला चांगलाच आठवतो. काही उत्साही मंडळीनी रस्त्यावर आडवे पडून पीएमटी बसेस जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. तेव्हा आमच्या आंदोलनाचे नेते श्री. दादा पोफळे ह्यानी ‘मधे येईल त्यावरून बस नेणे पीएमटी चालकास अगदीच अंगवळणी पडले असून तुमचे भलते धाडस शब्दश: तुमच्या अंगाशी येईल’ अशी जाणीव करून दिली. त्यामुळे भिती व निराशा ह्या संमिश्र भावनेने ग्रासलेले आंदोलनकर्ते त्वरेने उठून उभे राहिले.


Jan 29, 2010

पुणे ते गुहागर - मार्ग व टप्पे

पुणे ते गुहागर :


मार्ग :

पुणे - पिरंगुट - मुळशी - ताम्हिणी घाट - माणगाव - लोणेरे - आंबेत - दापोली - दाभोळ - धोपावे - गुहागर


अंतर व टप्पे :
</> </>
क्र.
अंतर (कोथरुडपासून)

Kms
ठिकाण/टप्पानोंद
1.45Quick Bite (Hotel)
चांगले हॉटेल : न्याहारी व जेवण
2.75
ताम्हिणी घाट सुरु

3.82विळे फाटा. माणगावला जायला डावीकडे नवीन मोठा रस्ता.

खरे म्हणजे ह्याला माणगाव फाटा म्हणायला हवे ! :)
4.86
T junction (आडवा रस्ता). इथे डावीकडे वळणे

‘तासगाव’ अशी पाटी
5.-माणगाव गेल्यावर गोवा हायवेला डावीकडे वळणे
6.-काही अंतरावर उजवीकडे ‘मोर्बा’ अशी पाटी. गुहागरला जायला उजवीकडे न वळता हायवेवर सरळ जाणे.
7.113
लोणेरे - हायवे सोडून उजवीकडे वळणे

8.118गोरेगाव एस टी स्टॅंड
9.122नांदवी फाटा
उजवीकडे सुवर्णमंदिर (दिवेआगर चे) ची पाटी
10.-घाट चालू

11.131आंबेत
इथपासून दापोली ५६ किमी
12.147दापोलीसाठी उजवीकडे वळणे
इथपासून दापोली ४० किमी
13.186दापोली
दाभोळ साठी circle ला उजवीकडे घेणे व पुढच्या लहान circle ला डावीकडे घेणे.
14.209कोळथरे फाटा

15.-दाभोळ
(फेरी बोट) : एका वेळी सात-आठ वाहने व पन्नास एक माणसे घेऊन पलीकडे ‘धोपावे’ ला सोडते (व अर्थातच तिथून तसाच ऐवज इकडे आणतेही.) प्रवासाचा वेळ १० मिनिटे. पोचाल तेव्हा बोट पलिकडच्या बाजूस असेल तर साधारण एकूण ४०-५० मिनिटे आपल्याला पलिकडे पोचण्यास लागतील (फेरी पलिकडे ठराविक वेळ थांबून निघणे, आपल्या बाजूस येणे, वाहने उतरवणे, चढवणे वगैरे)
16.-
‘धोपावे’ ला उतरल्यावर उजवीकडचा रस्ता घेणे

हा रस्ता २-३ किमी लांब पण दुस-या डावीकडच्या रस्त्यापेक्षा चांगल्या स्थितीत.
17.230गुहागर




नोंदी:


• एकूण वेळ ५ तास ४५ मिनिटे. (अर्धा तास मधे थांबून)

• जाताना Quick Bite ला थांबलो. बरेच पदार्थ (अजूनही) छान. (पोहे, बटाटा वडा, सा. वडा, मिसळ, भजी वगैरे)

• राहण्याचे ठिकाण : हॉटेल 'कौटिल्य'. व्यवस्था व सेवा समाधानकारक. AC room (शहरी चोचले म्हणून नाके मुरडू नयेत. 'गुडनाईट'ला न जुमानता 'गुडनाईट किस' घेऊ पाहणा-या डासांसाठी हे चांगले हत्यार आहे :). पण फार डास नव्हतेच)

• १० मिनिटे चालत अंतरावर 'अन्नपूर्णा' हॉटेल. ठिकठाक. तुका म्हणे त्यातल्या त्यात. शाकाहारी व मांसाहारी. जेवण बरे/चांगले. भाज्या चविष्ट. सुरमई फ्राय चांगला. सोलकढी मात्र आंबट. चौघांचे शाकाहारी जेवण रु. ३००. 'स्वीट' मधे श्रीखंड, आम्रखंड व आमरस (बरा होता) अशी विविधता (!) . तिन्ही ब्रॅंडेड.

• त्याच्या समोरच असलेले अगदी नवीन व्याडेश्वर हॉटेल फार गर्दी नसलेले (कदाचित शुद्ध शाकाहारी असल्याने). नवीन झालेले त्यामुळे अजून जम बसायचा होता बहुदा.

• बाकी बाजारातील दोन तीन हॉटेल्स साधीच. (साधे म्हणून चविष्ट असेलच असे नाही :))

• हेदवीचे गणपती (द्शभुज लक्ष्मी गणेश) मंदिर सुरेख आहे. सध्या (किंवा आता कायमचा) मंडप घातला आहे त्यामुळे पूर्ण देवळाचा असा फोटो काढता आला नाही. Edit: मित्रवर्य मिलिंद बोडस ह्याने काढलेला देवळाचा सुंदर फोटो आता पोस्टला आहे. एकूण सुबकता आणि रंगसंगती (काहीशी बालवाडीच्या भिंतींसारखी वाटली तरी !) प्रसन्न करणारी आहे. मला फार कमी वेळा मंदिरे आवडतात. ब-याच ठिकाणी सार्वजनिक (अ)स्वच्छतागृहासारख्या पांढ-या टाईल्स लावलेले व त्यावर पान थुंकल्यावर पडतात तसे डाग पडलेले गाभारे पाहिले की मी झपाट्याने नास्तिकतेकडे झुकू लागतो. (वेगळ्या व प्रदीर्घ लेखाचा विषय !)

• हॉटेल कौटिल्य कडून किना-याकडे येता येते फक्त ५ मिनिटे चालत. तो किना-याचा भाग स्वच्छ आहे. एकूण ९०% किनारा स्वच्छ आहे. सणसणीत अपवाद तिथून दुस-या टोकाला बाजारातून किना-याला प्रवेश आहे तिथे ! बरोबर ओळखलंत.. कचरा, सांडपाणी, प्लॅस्टीकच्या पिशव्या वगैरे वगैरे. तिथेच 'चाट' पदार्थांचे ५-६ स्टॉल्स आहेत.

• हॉटेल कौटिल्यच्या श्री. ओक ह्यांचेच चैताली सुपर शॉपिंग सेंटर बाजारात व्याडेश्वर मंदिराच्या शेजारी. लहान गावाच्या मानाने आधुनिक, प्रशस्त व स्वच्छ. तिथे भरपूर 'कोकण मेवा' खरेदी झाली. आमरस (पल्प). सरबते : आवळा, चिबूड, कोकम, काजू (फळाचे) . लोणची, आवळा कॅंडी, पापड वगैरे वगैरे

• तिथेच जवळ 'विजया बेकरी' मधे (नावाची पाटी नाही) नारळाची ताजी बिस्कीटे (कुकीज) मस्त मिळाली.

• वेळणेश्वर व हेदवी अनुक्रमे २० व २५ किमी अंतरावर. हेदवीला 'बामणघळ' म्हणून ठिकाण आहे. भरतीच्या वेळी इथे घळीत वेगाने पाणी शिरून ५० फूट पाणी उडते असे कळले.. दुर्दैवाने आम्ही गेलो तेव्हा भरती नव्हती. (तरी उत्साहाला ओहोटी न लावता चालत गेलो पुढे. ती घळ खडकांवरून चालताना अचानकच लक्षात आली)

• कोकण परिसराची माहीती 'साद सागराची' ह्या पुस्तक मालिकेत अतिशय छान दिली आहे. विशेषत: नकाशे. (काही माहिती जुनी किंवा चुकीची आहे ती सुधारायला हवी). पण फक्त चाळीस पन्नास रुपयात ही पुस्तके बरीच चांगली माहिती, नकाशे व फोटोंसहीत उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. नकाशात दोन टप्प्यांमधील अंतर (मोटरसायकल रिडींगनुसार) जोडणा-या रेषेवरच लहान चौकोनात तिथेच दिले आहे त्यामुळे अंदाज यायला मदत होते.

• धोपावे येथे फेरी बोटीचे भाडे एकूण ११४/- एका फेरीस. म्हणजे जाऊन येऊन नाही. ८ सीटर (टोयोटा इन्होव्हा) गाडी व ड्रायव्हर धरून ५ माणसे.

• टोल कुठेही नाही.


तर, ह्या पोस्टमधील 'जंक्शन' व फुटकळ अशी सर्व माहिती तुम्हाला उपयोगी पडेल अशी आशा आहे कारण पोस्टचा हेतू उस्फुर्त मजा कमी करणे नसून जास्तीत जास्त माहितीच्या आधारावर तुमची कोकण भेट आनंददायी व्हावी हाच आहे ! ( बाकी उस्फूर्त 'मज्जा' आणायला आपल्या देशात अनेक घटक मौजूद असतातच ! उदाहरणांसाठी फेरी बोटीच्या फलकाचा फोटो पहावा !)


प्रकाशचित्रे :






दाभोळ-धोपावे फेरी बोट



 
खालील छायाचित्रे मित्रवर्य मिलिंद बोडस  यांजकडून सप्रेम भेट :)



 
प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा ! :)
 
 
- राफा

Jan 12, 2010

..फॉर इंग्लिश, प्रेस वन. हिंदी के लिए मराठी का गला दबाएँ ।

काही एक दिवसांपूर्वीची एक सुसकाळ.

माझा मोबाईल वाजला.

“हॅलो. मै फलाना कंपनी से बात कर रही हू. क्या मै राहुल फाटकजी से बात कर सकती हू ?”

“बोला”

“सर, आपके इंट॔रनेट कनेक्शन का इस महिने का बिल रेडी है. क्या आज शाम को चेक कलेक्ट करने के लिए किसीको भेज सकती हू ?”

नेहमीप्रमाणेच लगेच उत्तर देण्याआधी एकदम डोक्यात लखलखाट झाला.
(कदाचित ही इसमी ‘बिलींग सायकल’ १५ तारखेची असतानाही ३-४ तारखेला फोन करते म्हणून ठराविक मासिक वैताग आला असावा.
किंवा
दर ५-६ दिवसांनी इंटरनेट बंद होणे व तक्रार केल्यावर ठराविक उत्तर मिळणे मग ते ७-८ तासात कधीतरी चालू होणे.. पुन्हा ५-६ दिवसांनी तेच वगैरे काही महीने होत असलेल्या गोष्टींचा साठलेला वैतागही असेल.)


“तुम्ही माझ्याशी हिंदीत का बोलताय ?”

“…”

(अग बोल बाई !)

“मी मराठी किंवा इंग्लिश मधे बोलू इच्छितो. हा माझा प्रेफरन्स तुमच्या रेकॉर्डला ठेवा हवं तर. ”

“ओके सर. आज संध्याकाळी पाठवू का ? ”

“आज आम्ही नाही आहोत संध्याकाळी कुणी घरी. उद्या पाठवा. प्लीज फोन करायला सांगा म्हणजे खेप पडणार नाही. ”

तिचे आभार ऐकून फोन ठेवतानाच माझ्या डोक्यात पक्की खात्री झाली ही इसमी उद्या फोन करेल तेव्हा हमखास हिंदीत बोलणार. रोज पाचशे फोन होत असणार हिचे. मी फोन केला तर ऑटोमेटेड मेसेज ने मी भाषा निवडू शकतो. तिने फोन केला तर ती हमखास तशीच बोलणार हिंदीमधे.

आणि वही हुआ जिसका डर था !

दुस-या दिवशी सकाळी तिचा परत फोन.

“… क्या मै राहुल फाटकजी से बात कर सकती हू ?”

मनाची तयारी असूनही माझी काहीशी सटकली. आता नडायची वेळ आली !

“मी कालच तुम्हाला सांगितलं की तुमच्या कंपनीमधून फोन आला तर कृपया माझ्याशी मराठीमधे बोला. अशी काही लक्षात ठेवायची सोय नाही हे तुम्ही मला काल सांगितलं नाहीत. आज तुम्ही परत हिंदीमधे बोलत आहात. का बरं ? ”

“…”

“हॅलो.. ”

“हॅलो सर.. मी संध्याकाळी पाठवू का कोणाला चेकसाठी ? ”

(माझ्या डोक्यात स्वगत चालू : जाऊ देत आता. स्वत:ला शांतताप्रेमी म्हणवतोस. उगाच भांडण तंटा अजिबात आवडत नाही म्हणतोस. मग ह्या बिचारीला कशाला नडायचे ? पण ते काही नाही. जाऊ दे म्हणूनच मग हे सगळं होतं)

कंपनी विरुद्ध साठलेल्या वैतागाची बेरीज जास्त भरली !

“हो पाठवाच आज कुणाला तरी. पण तुम्ही मला उत्तर दिले नाहीत.”

“…”

“तुम्हाला अशा काही इंस्ट्रक्शन आहेत का हिंदीत सुरुवात करायची म्हणून ? ”

“…”

“हॅलो.. ”

“हॅलो सर.. ”

“आर यू अ महाराष्ट्रीयन ? (असणारच. मी मराठीत बोलल्यावर ही मराठीत बोलते की दर वेळी. आवाज ओळखला मी. पण सुरुवात नेहमीच हिंदीमधे करते ! नेहमी !) तुमचे कॉल सेंटर पुण्यातच आहे ना ?”

“हो सर. ”

“मला एक सांगा. पुण्यात दोन मराठी माणसांनी एकमेकांशी हिंदीत का बोलायचे ? इन्फ़ॅक्ट, जगाच्या पाठीवर कुठेही..”

“…”

“मला तुमच्या मॅनेजरशी बोलायचे आहे. ”

“…”

“हॅलो ? ”

“.. ओके सर. सिनियर मॅनेजरशी बोला. ”


अर्धा मिनिट खूडबूड.


“हॅलो. धिस इज अमुक तमुक. व्हॉटस द इश्यू सर ? ”

(आडनाव नीट ऐकू आले नाही पण बहुतांशी अमराठीच वाटतयं. यूपी कडचे. बहुतेक.)

“ऍक्चुअली नथिंग अगेंस्ट युअर रिप्रेझेंटेटिव. शी वॉज पोलाईट …”

त्याला थोडक्यात घटनाक्रम व ‘इश्यू’ सांगितला.


“या सर.. नो प्रॉब्लेम. आय विल टेल हर’ (आवाज घाईत असलेला. कदाचित हा त्याच्यासाठी ‘नॉन इश्यू’)

(अगदीच ‘कर्टली’ बोलायची गरज नाही म्हणून बोलावे)
“सी, इट्स नॉट दॅट आय डिसलाईक हिंदी.. ”

“येस सर. बट हिंदी इज अवर नॅशनल लॅंगवेज सर नो? ”

(देवा ! आता ह्याच्याशी ह्या विषयावर वाद घालायचा ! मला मराठीमधे ऐकायला बोलायला आवडेल ह्या सरळ अपेक्षेमधे चुकीचे काय आहे ? )

< सगळे विचार गिळून... थोडक्यात समारोप करण्यासाठी >

“सी…यू शूड स्टार्ट इन रिजनल लॅंग्वेज. ९०% ऑफ द पिपल आर कंफर्टेबल स्पिकिंग इन मराठी.. सो.. ”

“ओके सर बट वुई आर ऑल इंडीयन्स”

(दे ! मलाच डोस दे ! तू आणि मी कुठेही भारतात जाऊ शकतो, राहू शकतो ते इंडीयन आहोत म्हणूनच ना ? राष्ट्रगीताला उभे राहताना तुझ्या ह्रदयात होते तेच माझ्याही होते. नाही का? पण राष्ट्रप्रेमाशी ह्याचा काय संबंध ?
हिंदी ? हिंदीत मीच केलेला एखादा शेर ऐकवू का लेका ? कारण मराठीत केलेले काव्य तुला कळणार नाही. अनौपचारिक किंवा चपखल बसणा-या एखाद्या ‘ड्वायलॉक’ साठी ही हिंदी छान असते रे.
अर्थात काही गोष्टी खरचं डोक्यात जातात बघ. ‘लोकमान्य तिलक’ काय, ‘अंग्लैद’ काय ?.. अरे विशेष नाम तसेच नको का उच्चारायला ? उद्या मी ‘तिवारी’ ला ‘उधारी’ म्हटले तर चालेल का ?

आणि माझे अमराठी मित्र किंवा परिचयाचे लोक नाहीत काय ? मी पंजाबमधे बराच काळ - महिने किंवा वर्षे - जाणार असेन तर जुजबी का होईना पंजाबी भाषा अवगत करणे हे न्याय्य, व्यवहार्य व तर्कशुद्ध नाही का ? वीस वीस वर्षे महाराष्ट्रात राहून कामापुरती, जुजबी व्यवहरापुरती मराठीही शिकाविशी वाटत नसेल, शिकायची जरुरी भासत नसेल तर मराठी लोकांना आडमुठे संकुचित म्हणण्याचा अधिकार कुणी दिला यू. पी. वाल्यांना ? तेव्हा उत्तरेतली सो कॉल्ड ‘वॉर्म्थ’ कुठे जाते वागण्यातली ? त्या त्या प्रदेशाच्या भाषेला काडीचीही किंमत न देणे म्हणजे स्वभावातील मार्दव आणि सहिष्णुता? महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी हा कुठला न्याय ? गरज असताना/नसताना मला तेलगू, कन्नड, फ्रेंच, पंजाबी ढंगाची हिंदी, उर्दू, गुजराती,काश्मिरी वगैरे भाषांमधली २-४ (किंवा जास्त) वाक्ये तरी शिकाविशी वाटली ना ? हे महत्वाचे नाहीच का ?

बरं हे सगळे जाऊ देत. हा 'बिजिनेस कॉल' आहे ना? मग भूगोलातच बोलायचे तर मग देश कशाला ? आज जागतिक भाषा कुठली, आर्थिक किंवा अन्य औपचारिक व्यवहारांची ? इंग्लिश ना ? तुझ्या कंपनीचा ऑटोमेटेड मेसेज इंग्लिशमधेच सुरु होतो ना ? मग करा ना फोन इंग्लिशमधे ! थेट विशाल दृष्टीकोनच घेऊया ना.. आपण ग्लोबल सिटिझन्स नाही का ?

हेही समजून घेण्याची इच्छा नसेल तर जाऊ देत. मी कस्टमर आहे. मला मराठीतच बोलायचे आहे. तू करु शकत असशील तर सांग नाहीतर मी दुसरी कंपनी बघतो ! पूर्णविराम.)

“यू आर ऎब्सुल्यूटली राईट. वुई आर इंडियन्स. बट सी..”

पण मी पुढे काही बोलायच्या आतच तो म्हणाला

“ओके ओके. नो प्रॉब्लेम सर. आय विल नोट युअर प्रेफरन्स. आय विल ऑल्सो टॉक टू दि टॉप मॅनेजमेंट अबाऊट धिस.”

(डोंबल तुझे. पुढच्या महिन्यात मला हिंदीतच फोन येतो का नाही बघ. पण ठीक आहे. आपणहून म्हणतोय सांगेन वरिष्ठ अधिका-यांना सांगेन म्हणून, तर बास आता)

“ओके. थॅंक्स. ”

“थॅंक यू सर. ”

फोन खाली ठेवला.

कुठल्याही कारणाने, मनातले सगळे विचार जेव्हाच्या तेव्हा भरभर बोलले गेले नाहीत की आपण स्वत:वरच वैतागतो तसा वैतागलो !

तोच मला सोयीस्कर रित्या आडमुठा (किंवा ‘हुकलेला’) समजला असेल का ? तो त्या मुलीवर ती मराठी आहे म्हणून आता डूक धरेल का (किंबहुना सर्व मराठी ‘आडमुठ्या’ लोकांविषयी - केवळ माझ्यामुळे - त्याला अढी बसेल का) ?
की, सांगण्याची गरज नव्हती तरी तो विशेष आपणहून म्हणाला तसे.. ‘लोक मराठी मधे संवाद करण्याची मागणी करत आहेत’ असे खरेच तो वरिष्ठांना सांगेल ?

ह्म्म्म्म..

पण एकूण ‘इश्यू’ त्याच्या खरंच लक्षात आला असेल का ?



- राफा

Jan 3, 2010

एक किनारा शोधताना !

रात्रीच्या मध्यावर,
आभाळ पार काळंवडलेले.
अवतीभवती काळोखे पाणी..
काळ्या लाटांवर लाटा..


होडीत मी एकटाच.
लूकलूक किना-याच्या दिशेने..

माझे हात विलक्षण तंद्रीत वल्हे चालवताहेत
डोक्यात समोरच्या किना-याचीच स्वप्ने
परकेपणाने पाण्याचा अडसर दूर लोटत,
होडीचे टोक स्पष्टपणे किना-याच्या दिशेने..


अचानक…


नजरेच्या कोप-यातून जाणवते काहीतरी..

भलत्याच दिशेला पाण्यात उगवतो
कुणा एकाचा हात..


बुडू न पाहणा-या,
मरायची तयारी नसलेल्या
कुणाचा तरी हात

एकवार खाली जातो आणि..
पुढच्याच क्षणी पाणी कापत पुन्हा वर उंचावतो. तीव्रतेने.


फास टाकल्यासारखा एखादा भोवरा
त्याच्या देहाला खाली खेचतो आहे बहुतेक

त्याच्या तडफडीने चेकाळल्यासारखा
अवतीभवती मृत्यू खळाळतो आहे त्याच्या


त्या झगड्यातून मृत्यूशी सामना करते आहे
त्याची ती तीव्र जीवनेच्छा
फण्यासारखा हात काढून..

‘कुणाला अजून जगायचे आहे रे ?’
कुणीतरी जणू अदृश्य प्रश्न केलाय आणि..

त्यासरशी झरकन वर केल्यासारखा त्याचा तो हात !


आणि मग मला चक्क ऐकू येते..


त्याची ती मूक हाक.. निर्वाणीची !


मी दचकतो..


छे छे !
अजून बधीरता आली नाही कानांना ?
अजून निबरता नाही मनाला.. ?
छ्या.. काय पोचणार मग तू त्या उबदार रौशन किना-याला..
असे भरकटून चालते का कुठे ?


पण..

तो माझ्या दिशेने आशा लावलेला हात तर स्पष्ट दिसला मला
आणि त्याच्या आत्म्याची केविलवाणी हाकही ऐकू आली नीट

आता ?


मी माझा मार्ग बदलून त्याच्या दिशेने जायचे ? मदतीला ?

मी ?

मीच का ?

दुसरा कुणीतरी येईलच तो पूर्ण बुडण्याआधी..
येईलच ?

माझी ही चिमुकली होडी. त्याला अन मला एकत्र पेलू शकणार नाहीच..
नक्की?


माझ्याच प्रश्नांच्या ओझ्यानी होडी जड झालीशी वाटते..

त्याच वेळी दूर किना-यावर काहीतरी चकाकते.. भुलवते.

विसर त्याला..
भरकटू नको..
आता ह्या टप्प्यावर भावनेच्या भोव-यात अडकू नकोस..
बुडशील त्याच्यासारखाच..
दिशा बदलू नकोस..


क्षण, दोन क्षणांचा मोह..


मग अचानक अनपेक्षितपणे..

माझ्याच आत आत खोलवरून
काहीतरी उसळते..


प्रकाशाची तीव्र रेषा असावी तसे काहीतरी..

सर्व संभ्रमांची जळमटे फाडून..
कुठलीतरी टोकदार बळकट भावना..

दया ?
माणूसकी ?
न्याय ?

नक्की ओळख लागत नाही..
पण..

कौल नि:संदिग्ध असतो !


माझा हात कष्टाने का होईना उठतो
होडीची दिशा बदलते..
पाणी खरवडल्यासारखे वल्हे चालते
किना-याकडून आता होडीचे टोक वळते
त्याच्या दिशेने..

हळू हळू वेग वाढतो..

आता नजरेच्या कोप-यात किनारा.. आणि तो स्पष्ट समोर.



लांबवलेला माझा हात
तो कसाबसा धरतो..
घट्ट कृतज्ञतेने..



एक होडी अन आता दोघेजण..
वाढलेले ओझे.
माझे मन डगमगते..
पण दोघांचा भार उचलतही होडी स्थिर आहे.

..

तो थोडा सावरतो. हळूवार कण्हतो..
"देवासारखे आलात .. "

असेच काहीतरी..


आता मात्र माझ्या मनाचा राग राग..

अनावर त्राग्याने डहुळते सर्व.. गढूळ गढूळ होते..
ती मघाचची भावना अस्पष्ट.. विझल्यासारखी होते..

छे…

किना-याकडे जायला आता किती लांबचा पल्ला..
केवढा वळसा पडला..


ह्याच्यामुळे मार्ग बदलावा लागला !

मीच सापडलो ह्याला ?


कण्हत तो पुढे बोलतो.. तुटक तुटक..

“पाण्यात खडक आहेत मधेच.. माझ्याकडे न येता तसेच सरळ जाता तर..”

त्याला धाप लागते..

“..तर, खडकावर आपटून माझ्यासारखीच.. तुमचीही होडी फुटली असती कदाचित.. पण तुम्ही माझ्याकडे.. मला वाचवायला.. देवासारखे.. आता.. आता भिती नाही..”


त्याच्या बोलण्याचा अर्थ माझ्या दमलेल्या मनात उलगडतो !


आणि अंगावर सरसरून शहारा फुलतो..

एक विलक्षण स्तब्धता येते.. मी वल्हे मारायचेही विसरतो.


वाचवले नक्की कुणी कुणाला ?

मी त्याला.. ?

त्याने मला.. ?


की.. ? कुणीतरी आम्हा दोघांना ?


कुणी ?


मघाशी आतल्या आत उसळलेल्या प्रकाशाच्या रेषेची उब पुन्हा जाणवू लागते.

त्या समोरच्या किना-याला पोचणे आता अचानकच अगदी क्षुद्र वाटू लागते.. अगदीच क्षुल्लक.


आणि..

किना-यापेक्षाही लक्षपटीने तेजस्वी असे काहीतरी माझ्याच आत उजळून निघाल्यासारखे वाटते !


- राफा


 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा